फराळाबरोबर व्यायाम हवाच!

फराळाबरोबर व्यायाम हवाच!

‘दिवाळी’ म्हणजे वर्षभरातला सर्वांत मोठा सण. ‘दिवाळी’ म्हटली की नजरेसमोर येते फटाक्यांची अतिशबाजी, रंगीबेरंगी आकाशकंदिल, लहान-मोठ्या वेगवेगळ्या रंगांच्या आकाराच्या रांगोळ्या आणि त्याचबरोबर फराळाचे नवीन पदार्थ...

प्रत्येक वयामध्ये दिवाळीचे पदार्थ खाण्याची इच्छा आपल्याला होतच असते. त्यामुळे हे पदार्थ खाऊन, त्याचा आस्वाद घेऊन जर दिवाळी साजरी करायची असेल तर मुख्य मुद्दे असतात की फराळाचे पदार्थ कधी खायचे? किती खायचे? आणि कसे खायचे ?

प्रत्येक वयोगटामध्ये या तीन प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतात. प्रथम मुलांबद्दल जाणून घेऊया. मुलांनी खरे तर कोणत्याही वेळी म्हणजे नाश्ता, जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण यामध्ये फराळाचे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. फक्त महत्त्वाचं हे आहे की, नाश्ता म्हणून फराळ किंवा जेवण म्हणून फराळ कधीही करु नये. नाश्त्यामधील कुठल्याही पदार्थाबरोबर फराळाचे पदार्थ खावेत किंवा जेवणामध्ये इतर आहारासोबत एखादा लाडू, चकली किंवा करंजी तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता.

फराळाचे पदार्थ नाश्ता म्हणूनच पोटभर खायला दिले तर तळलेले पदार्थ जास्त खाल्यामुळे मुलांनना खोकला होण्याची किंवा पोटात दुखण्याची शक्यता असते. काही लहान मुलांमध्ये जास्त फराळाचे पदार्थ खाल्यामुळे जंतही होऊ शकतात. तेव्हा नुसताच लाडू किंवा नुसतीच चकली खाण्यापेक्षा पोहे आणि लाडू, शेव आणि उपमा, इडली आणि लाडू/करंजी असं तुम्ही मुलांना देऊ शकता; पण जेवणाऐवजी किंवा नाश्त्याऐवजी जर फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले तर मुलांना आवश्यक असणार्या वाढीसाठी उपयुक्त असणार्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत. तसे करु नये.

आता मधल्या’ पिढीबाबत जाणून घेऊया. साधारणपणे 20 ते 40 या वयागटातील व्यक्तींना फराळ मनापासून करायचा असतो. पण बर्‍याचदा डाएटच्या नावाखाली फराळाचे पदार्थ कमी खाण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. पण जर आपण पाहिलं तर दिवाळी वर्षातून एकदाच येणारा सण आहे. फराळाचे पदार्थ बाजारात सर्रास उपलब्ध असले तरी शक्यतो इतर वेळी आपण घरी ते करत नाही.‘फराळ’तर करायचा पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करायचा. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

वजन वाढू न देता जर तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे असतील तर नाश्त्याच्या कुठल्याही पदार्थाबरोबर तुम्ही फराळातील कुठलाही पदार्थ थोडा पण जेवणानंतर किंवा नाश्ता म्हणून तुम्ही वाटीभरुन शेव, लाडू, करंजी असे पदार्थ न खाणेच इष्ट. जेवताना सुद्धा शक्यतो फराळ करु नये. फराळाचे पदार्थ हे तळलेले असल्यामुळे जेवणाबरोबर खाल्ल्यास पित्त जास्त वाढण्याची शक्यता असते.

आता वयोवृद्ध किंवा चाळीशीनंतरच्या वयोगटाच्या विचार करुया. चाळीशीनंतर आपली पचनशक्ती थोडी थोडी कमी कमी होत जाते. त्यामुळे या वयोगटामध्ये फराळाचे पदार्थ खाण्याची एक वेळ योग्य आहे. ती म्हणजे सकाळी नाश्त्याबरोबर.

जर पोहे किंवा उपीट किंवा दही -पोहे याबरोबर कुठलाही फराळाचा पदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ला तर पचायला जास्त त्रास होत नाही. म्हणूनच पूर्वीपासून दही पोह्याबरोबरच चकली, शेव, करंजी, लाडू, चिवडा खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. दही पोह्यांसाठी वापरलेले दहीसुद्धा अगदी ताज आणि गोड असायला हवं. नाहीतर दिवसभर आपल्याला फराळाच्या पदार्थांचे ढेकर (आंबट ढेकर) येत राहते.

थोडक्यात, या सगळ्याच सारं एवढचं की दिवाळी छान सर्व पदार्थ खाऊन मजेत घालवा. फराळाबरोबर फळ, दही न ताक रोज आहारात ठेवा. त्यामुळे फराळाचे पदार्थ ‘घशाशी’ येणार नाहीत. फराळाबरोबरच रोज अर्धा ते पाऊण तास व्यायामाची साथ सोडू नये. तसे केल्याने वजन वाढण्याची शक्यताच उरणार नाही. स्वस्थ रहा आणि मस्त खा॥. सर्वांना दीपावलीच्या आरोग्यदायी शुभेच्छा !

- मंजिरी फडके, आहारतज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com