ऋतूबदलांची दिवाळी

ऋतूबदलांची दिवाळी

सगळ्यांना शुभ दिवाळी. खरंतर दिवाळी हा शब्द नसून दीपावली असा मूळ शब्द आहे ज्याचा अर्थ होतो दिव्यांची रांग. अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे म्हणून आपल्याला शुभ दीपावली...

खरंतर आपले सण, रूढी, परंपरा यामध्ये देखील शास्त्र लपलेले आहे. पण सगळ्यांना ते समजावे, कळावे यासाठी वेगळा दृष्टीकोन लागतो तो दृष्टिकोन म्हणजे आयुर्वेदीय दृष्टिकोन होय. कारण सगळ्यांना सगळे नियम पाळत येणे शक्य नव्हते म्हणून काही ठराविक नियम सगळ्यांनी पाळावे म्हणून विविध सण परंपरा हे सांगण्यात आले. त्याच्यामध्ये शास्त्र लपलेले आहे. आज आपण त्याबद्दलच बघणार आहोत की, दिवाळीच्या दरम्यान की साधारण ऋतू कसे असतात आणि त्यासाठी काय करावे?

खरं तर दिवाळीचा काळ हा साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत येतो. भारतीय पंचागानुसार आपल्याकडे हेमंत शिशिर वर्षा ग्रीष्म शरद वसंत असे सहा ऋतू सांगण्यात आलेले आहेत. नुसते उन्हाळा पावसाळा हिवाळा असे न सांगता त्यांनी अगदी सविस्तर याची माहिती ग्रंथांमध्ये लिहिली आहे. त्या काळात वातावरण कसे असते काय खावे कसे पथ्य पाळावे याची सगळी माहिती आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे . दसरा कोजागिरी पौर्णिमा आणि नंतर दीपावली मुख्य करून शरद ऋतूच्या काळात येतात.

साधारण आश्विन कार्तिक शरद ऋतू हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. या ऋतूत आधीचा वर्षा ऋतू, त्यात असणारा पाऊस, त्यामुळे सगळीकडे दमट वातावरण म्हणून वात वाढून पित्त शरीरात साठायला लागते. मग येतो शरद ऋतू. यात परतीचा पाऊस देखील असतो, दुपारी कडाक्याचे ऊन देखील असते आणि रात्रीचा गारवा देखील असतो. असे विचित्र वातावरण या ऋतूत असते. दुपारच्या उन्हाने पित्त वाढायला लागते त्यामुळे पित्ताचे विकार, रक्ताचे विकार या कालखंडात सगळ्यात जास्त प्रमाणात होतात. मुळव्याध, आम्लपित्त, शीतपित्त, अंगाची लाही लाही होणे, विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू, मलेरिया, कावीळ, हृदय रोग, स्ट्रोक, पॅरॅलिसिस असे अनेकविध आजार या ऋतूमध्ये होतात. बोलीभाषेत ऑक्टोंबर हिट यालाच म्हणतात.

आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वैद्यानाम शारदी माता असे म्हटले आहे, याचा अर्थ जसे आई आपल्या बाळांचे पालनपोषण करते तसेच शरद ऋतू हा वैद्यांचे पालनपोषण करतो. कारण या ऋतूत आजार खूप मोठ्या प्रमाणात होतात. म्हणून काळजी घेणे गरजेचे असते. म्हणूनच वाढदिवसाला ‘जीवेत शरद शतम’असे म्हटले गेले आहे. याचा अर्थ तुम्ही शंभर शरद ऋतू पर्यंत जगा. कारण शरद ऋतु फार कठीण असतो. किती सुंदर आपल्या ग्रंथामध्ये लिहिले आहे.

अशा या शरद ऋतूत बाह्य वातावरणात रुक्ष, उष्ण हे गुण वाढलेले असतात आणि ते गुण कमी करण्यासाठी स्निग्ध शीत असे गुणात्मक दुधासारखा पदार्थ हे औषध म्हणून ठरते. त्याचे अजून गुण वाढावे म्हणून चंद्राच्या शीतल किरणांमध्ये छान दुधात केसर चारोळी बादाम टाकून आटवून ते दूध घेतले जाते. याला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तर या दुधाने पित्ताचे विकार कमी व्हायला मदत होतेच आणि हे दूध मृदू विरेचन काम करते त्यामुळे अजूनच मदत होते . आहे की नाही जुन्या काळाचे हे लसीकरण. एकाच वेळी सगळ्यांना औषध. कारण आजार होऊच नये हे आयुर्वेदाचे अत्यंत मुख्य प्रयोजन आहे ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम’

नंतर येते दीपावली. या दिवाळीत आपण आपले घर, व्यवसायाची जागा, ऑफिस सगळे अगदी झाडून पुसून स्वच्छता करतो. दिवाळीची साफसफाई म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते. पण काय गरज एवढे स्वच्छतेची? कारण जिथे स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा असेल तिथे तर लक्ष्मी येईल ना आणि त्या निमित्ताने कितीतरी अडगळ, भंगार अशा अनेक नको असणार्‍या गोष्टी घरातून निघतात आणि घर स्वच्छ आणि सुंदर होते. जसे घर आपण स्वच्छ करतो त्याचप्रमाणे या शरद ऋतूमध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण ही दोन शरीरशुद्धीसाठी पंचकर्म सांगितले आहेत.

विरेचन म्हणजे औषधी तूप काही दिवस घेऊन एक दिवस जुलाबाचे औषध देणे होय. यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरशुद्धी होते व पित्ताचे आजार, रक्ताचे आजार, कफाचे विकार हे देखील दूर होण्यास मदत होत. रक्तमोक्षण म्हणजे दुष्ट झालेले रक्त. हे आपण सिरावेध द्वारे किंवा जळू द्वारे बाहेर काढतो. त्यामुळे रक्तातली हिट म्हणजे रक्तातली उष्णता ही कमी होण्यास मदत होते. या दोन्ही पंचकर्मामुळे आजार होऊ नये म्हणून देखील मदत होते आणि असलेले आजार कमी होण्यास तर मदत होतेच. कारण की शरीर स्वच्छ झाले तरच आरोग्य रुपी लक्ष्मी आपल्या शरीरात येईल ना. पण हे पंचकर्म फक्त आणि फक्त वैद्याच्या सल्ल्याने करावे. उगाच सहज कुठेही कोणीही सांगितले म्हणून करू नये. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या काळात तर हे फार सांगणे गरजेचे आहे.

या काळात रात्र मोठी होत असल्याने वातावरणात गारवा देखील वाढतो. थंडीला सुरुवात झालेली असते आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करतात. छान सुगंधी, वातदोष कमी करणारे, आपल्या अवयवांना ताकद देणारे, शरीराला स्निग्ध ठेवणारे, त्वचेला निरोगी ठेवणारे अभ्यंग तेल शरीराला लावले जाते. आजच्या काळात विविध पेट्रोलियम जेली, विविध मॉइस्चरायझर आपण बघतो पण सगळ्यात स्निग्ध आणि ताकद देणारे असे अभ्यंग तेल मात्र आपण लावत नाही.

अभ्यंगस्नान झाल्यावर सुगंधी उटणे लावून अंघोळ करणे. सुगंधी उटणे मध्ये अत्यंत उत्तम प्रतीचे आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचे चूर्ण असते. ज्यामुळे अभ्यंगानंतर जास्तीचे तेल शोषले जाऊन त्वचा अजून निरोगी होते. आजच्या भाषेत उत्तम स्क्रबिंग होऊन होऊन स्किन ला टोन येतो. आयुर्वेदात याला उद्वर्तन असा शब्दप्रयोग केला जातो. आणि त्यानंतर छान गरम पाण्याने अंघोळ म्हणजे मृदू स्वेदन. आहे की नाही एक्झॉटिक स्पा ची फिलिंग. हेच राजेशाही स्नान.

म्हणून या दिवाळीत अभ्यंग स्नान नक्की कराल ना. . .

या दिवसात रात्रीही मोठी होते थंडी आणि काळोख दोन्ही जास्त प्रमाणात असतात. पूर्वीच्या काळी त्यामुळे दिव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले म्हणूनही तेजोपासना. मग बलिप्रतिपदा, वसुबारस. यात जो कष्टकरी शेतकरी, दूध देणारी गोमाता, जे आपल्याला उत्तम अन्न देतात त्यांचे आभार मानण्याचे दिवस त्यांची पूजा करण्याचा दिवस.

नंतर येते धन्वंतरी जयंती. ज्यांच्या हातात साक्षात अमृत आहे असे आयुर्वेदाचे, आरोग्याचे दैवत यांची पूजा ,आराधना, उपासना करायचा दिवस. जेणेकरून हा शरद ऋतू जो अत्यंत त्रासदायक असतो त्याच्यात आम्हाला उत्तम आरोग्य लाभेल. यांचा प्रसाद देखील खूप छान असतो धने आणि गूळ हे मुख्य करून देतात. धने आपल्याला माहिती आहेत जे पित्तशामक आहे, गुळ मधुर आणि स्निग्ध आहे. त्यामुळे देखील स्नेह वाढतो. मग स्वच्छ शरीर आणि स्वच्छ वास्तू यांची केलेली पूजा म्हणजे लक्ष्मी पूजन होय.

कोव्हिड काळात किती त्रास झाला. मित्रांची, कुटुंबातील व्यक्ती ची किंमत कळाली .अशी वेळ नकोच कोणावर. असाच स्नेह या शरद ऋतूच्या काळात कमी होऊ नये म्हणून दीपावली, पाडवा, बलिप्रतिपदा, भाऊबीज यासारखे हे कौटुंबिक सण. यामुळे मनातले, नात्यातले हे सगळे स्नेह टिकून राहतील. राग, दुरावा कमी होऊन आरोग्य उत्तम राहावे यासाठी कोजागिरी पौर्णिमेचे दूध, विरेचन व रक्तमोक्षण सारखे पंचकर्म, अभ्यंग स्नान, उत्तम प्रतीचा फराळ, उत्तम प्रसाद अशा अनेक गोष्टी या सणांमध्ये लपल्या आहेत.

त्याच्या मागचे शास्त्र आत्ताच आपण अभ्यासले. यावरून आपले पूर्वज, ऋषीमुनी, आयुर्वेदामधील चरक सुश्रुत वाग्भट ऋषी यांना शतशः शतकोटी नमन. त्यामुळे आयुर्वेदीय जीवनशैली ज्यात दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म हे जर आपण पाळले तर नक्कीच ‘जीवेत शरद शतम’ ही उक्ती आपणास लागू होईल. पण सध्या ऋतुमान थोडसे बिघडले आहे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या, वाढणारे प्रदूषण, भरमसाठ वृक्षतोड यामुळे देखील ऋतुमान थोडेसे बदलले आहे. निसर्गाची काळजी घेणे हे आपले काम आहे.

रोषणाई करणे, चांगले पदार्थ खाणे व एकमेकांना खाऊ घालणे, एकमेकांना भेटून एकमेकांचा स्नेह वाढवणे, आरोग्य जपणे पण कर्णकर्कश्य फटाके मात्र खरच नकोत.

हि दीपावली आपणास भरभराटीची

उत्तम आरोग्याची जावो ह्याच शुभेच्छा ..

- वैद्य रविभूषण स सोनवणे, एमडी पंचकर्म.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com