अभ्यंगस्नान दिवाळीतच का?

अभ्यंगस्नान दिवाळीतच का?

दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, आकाशकंदील, रांगोळी, फराळ, आनंदी प्रसन्न वातावरण यासोबतच सर्वांना आठवते ती दिवाळी पहाट आणि अभ्यंग स्नान. दिवाळीत आपण वसुबारस, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, यम दीपदान हे सगळे साजरे करतो. आपले भारतीय सण-उत्सवांचा निसर्गातील ऋतू बदल आणि त्यानुसार आपल्या शरीरात होणार्‍या बदलांचा खूप जवळचा संबंध आहे. ऑक्टोबर हिट म्हणजेच शरद ऋतू संपून कार्तिक महिन्याच्या सुरुवातीलाच हेमंत ऋतू म्हणजेच थंडीची चाहूल लागताच सर्वांचा आवडता दिवाळीचा सण येतो...

आयुर्वेद शास्त्र हे जीवन शास्त्र आहे. कारण ते फक्त आजारी व्यक्तीसाठी नाही तर निरोगी व्यक्तीसाठी आधी आहे.

‘स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् । आतुरस्य विकार प्रशमनं च ॥ (चरक संहिता सूत्रस्थान. 30)

अर्थात, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. दैनंदिन जीवनात दिनचर्या म्हणजे सकाळी उठण्यापासून झोपण्यापर्यंतचे, ऋतुबदलानुसार आपल्या आहार विहार यात करायचे आवश्यक बदलांचे वर्णन आपल्या आचार्यांनी सांगितले आहेत. हेमंत ऋतूचर्या पळताना अभ्यंग, उद्वर्तन, शिरोभ्यंग, उष्ण जलस्नान, उन्हात बसणे, उबदार वातावरणात राहणे तसेच योग्य शरीर पोषक असा आहार, आपल्या शक्तीनुसार व्यायाम करावा हे आचार्य सांगतात.

अशा हेमंत ऋतू मध्ये येणारा दिवाळी हा सण आणि अभ्यंग याचा आयुर्वेद दृष्टीने काही संबंध आहे का? तर हो, शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होताना जशी थंडीची चाहूल लागते त्याच प्रमाणे हवेमध्ये हळूहळू कोरडेपणा वाढत चाललेला असतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेचा हा कोरडेपणा वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. ‘अभि + अंग’ अंगाला संरक्षण देणे. रक्षण ते कशाने तर स्निग्ध गुणात्मक तेलाने. सोप्या भाषेत अभ्यंग म्हणजेच शरीराला तेल लावणे व जिरवणे. पण ते फक्त दिवाळी पुरते मर्यादित आहे का? तर नाही, आयुर्वेदात तर अभ्यंग रोज करावा असे सांगितलं आहे.

आता ज्यांना काही कारणाने अभ्यंग रोज शक्य नाही त्यांच्या साठी एक छोटी युक्ती आपले ग्रंथकार देतात ‘शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ॥’(वाग्भट संहिता 2/8) म्हणजेच मुख्यत्वेकरून शिर म्हणजेच डोकें, श्रवण म्हणजेच कान आणि पाद म्हणजेच पाय या ठिकाणी तरी नेहमी अभ्यंग करावा. अभ्यंग दररोज करावाच पण जर शक्य नसेल तर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आणि ते ही नाही तर निदान पूर्ण हेमंत आणि शिशिर ऋतूपर्यंत म्हणजे जवळजवळ होळीपर्यंत तरी अभ्यंग स्नान करावे.

‘अभ्यङ्गमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ॥ 7 ॥ दृष्टिप्रसादपुष्ट्यायुःस्वप्नसुत्वकदार्ढयकृत् ।

(वाग्भट संहिता 2/7)

नित्य अभ्यंग केल्यामुळे वार्धक्य लवकर येत नाही, तारुण्य टिकून राहते, त्वचा तजेलदार राहते, शरीर बांधेसूद राहते, आयुष्य वाढते, झोप चांगली येते, दृष्टी सुधारते आणि हो मुख्य म्हणजे मन अतिशय प्रसन्न राहते.

आता अभ्यंग कोणी करू नये तर

‘वर्ज्योऽभ्यङ्गः कफग्रस्तकृत संशुद्धयजीर्णिभिः।

(वाग्भट संहिता 2/7)

ज्यांना कफाचे आजार झाले आहेत, ज्यांनी पंचकर्म उपचार घेतलें आहेत व ज्यांना अजीर्ण झाले आहे त्यांनी अभ्यंग करू नये.

अभ्यंग सोबतच सर्वांना आठवते ते उटणे. त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेत उद्वर्तन म्हणतात. अभ्यंग केल्यानंतर साबण न वापरता, सुगंधी उटणे किंवा मसूर डाळीचे पीठ अंगाला चांगले चोळून लावावे, मगचं आंघोळ करणे.

‘उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलापनम् ॥ 14 ॥

स्थिरीकरणमङ्गानां त्वक्प्रसादकरं परम् ॥ ( वाग्भट सूत्रस्थान 2/14)

शरीराला उटणे लावल्याने शरीराची रोमरंध्र स्वच्छ होऊन, रक्तप्रवाहण सुधारते, त्वचा फार स्वच्छ होते, अंगावरील अनावश्यक चरबी कमी होते आणि भूक चांगली लागते.

दिवाळी म्हटलं की फराळ तर आलाच. हेमंत ऋतू मध्ये जाठरग्नी प्रदीप्त असतो. जाठरग्नी म्हणजे भूक लागणे. आहार घेण्याची आणि पचविण्याची दोन्ही शक्ती उत्तम असतात. हेमंत ऋतू हा विसर्ग काळ यात निसर्ग धन धान्य आरोग्यमय वातावरणची मुक्त हस्ताने उधळण करत असतो. शरीर बल, अग्नी उत्तम असतो. या काळात घेतलेला योग्य पोषक आहार सर्व शरीराचे बल वाढवतो. म्हणून ज्यांना आपले वजन, उंची वाढवायची आहे त्यांनी योग्य आहार विहार औषधी संदर्भात आपल्या जवळच्या आयुर्वेद वैद्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.

अग्नी उत्तम असल्यामुळे इतर वेळी अपथ्य असे तेल, तुप, गोड, नवीन धान्य असे सगळे जे की आपल्या दिवाळी फराळ मध्ये येतात. ते खाण्याची मुभा आपल्याला हेमंत ऋतुत मिळते. प्रत्येकाने आपापल्या अग्नीनुसार फराळाचा आनंद घ्यावा. फराळामध्ये मैदा, डालडा तूप, साखर यांचा वापर टाळता आला तर चांगलेच. त्याऐवजी गाईचे तूप, तिळ तेल कणीक, खडीसाखर, गूळ यांचा वापर करून बनवलेला फराळ आपली दिवाळी नक्कीच अजूनच आरोग्यमय करेल.

दीपोत्सव म्हणजेच दिव्यांचा उत्सव. या काळात रात्र मोठी दिवस लहान असतो म्हणूनच दिव्यांच्या प्रकाशाने अंधारावर मात करत दिव्यांची आरास, रांगोळी, रोषणाई, फुलांची सजावट या सगळ्यांनी मनाची प्रसन्नता साधली जाते. सर्वांना दीपावलीच्या आरोग्यमय शुभेच्छा

- डॉ. किरण दराडे-कातकाडे, एम. डी. आयुर्वेद (मुंबई).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com