दिवाळी २०२० : जाग यायला हवी !

jalgaon-digital
6 Min Read

– कॉ. अजित अभ्यंकर, ज्येष्ठ विचारवंत

जगातील सर्व उन्मत्त सत्ता कोरोना विषाणुसमोर हतबल झालेल्या पाहून कुसुमाग्रजांच्या या पंक्ती आठवतात. पर्यावरणाचा विध्वंस, जागतिक तापमान वाढ-हवामान बदल यांच्या बाबत आपण अत्यंत वेगाने काही केले नाही, तर सध्यापेक्षा कितीतरी पट हतबल होऊन निसर्गातील माती आपल्याला एक मूलभूत सत्य सांगेल. कदाचित आज देखील सांगतेच आहे. ते म्हणजे ‘….मार्ग शेवटी मातीलाच मिळती, मातीवर चढणे एक नवा थऱ अंती…’

करोना ही भीषण आपत्ती आहे, हे कोणीही समाजावून सांगण्याची गरज नाही. आता सर्वच जणांनी ते अनुभवले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर इतक्या भीषण प्रमाणात सर्व जगच ज्याची शिकार होऊ शकेल, अशी ही पहिलीच आपत्ती ठरली, असे अनेक जण म्हणत आहेत. पण या विधानातच एक सूचकतादेखील आहे. म्हणजे मी ती सकारात्मकतेने घेतो.

1. खरे तर, यापूर्वी यापेक्षादेखील भीषण मृत्यूचे तांडव करणार्‍या प्लेग, एन्फ्लूएन्झा यांसारख्या रोगांच्या साथी मानवी इतिहासात घडल्या आहेत. युरोपियन्सच्या अमेरिकेतील स्थलांतरामुळे तर तेथील स्थानिक मूळ अमेरिकन्स जमाती अशा साथीच्या रोगांना लाखोंच्या संख्येने बळी पडल्या. 1343 ते 1350 या काळात ‘ब्लॅक फिवर’ या रोगाने युरोपची एक तृतीयांश लोकसंख्याच गारद झाली. भारतातदेखील बरोब्बर 100-125 वर्षांपूर्वी आपण अनुभविलेल्या प्लेगच्या साथींच्या आठवणी आजदेखील आपल्या मागच्या दोन पिढ्या इतक्या ताज्या आहेत.

2. प्लेगच्या मानाने करोनाग्रस्तांमधील मृत्यूचे शेकडा प्रमाण तुलनेने कमी आहे. शिवाय तो पसरण्याची कारणे काही प्रमाणात तरी नियंत्रित करण्यासारखी आहेत. पण असे असले तरी त्याची भयानकता वेगळ्या कारणाने मोठी आहे. करोना अथवा कोणत्याही विषाणूला कोणतीही राजकीय-राष्ट्रीय सीमा नाहीत आणि नसतात. एका स्थानिक पातळीवरील विषाणु संसर्ग हाहा म्हणता जागतिक होतो, असे इतक्या प्रमाणात पूर्वी कधीच घडले नव्हते. कारण आता जग आपल्या कल्पनेपेक्षादेखील अधिक जवळ आले आहे. जग हे एक खेडे बनले आहे, या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्याचा अर्थ आता आपल्याला लागतो आहे. मानवी समस्या या राष्ट्रीय नाहीत. त्या सार्वत्रिक-जागतिक म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, ही जाणीव यानिमित्ताने आपल्याला व्हायला हवी.

3. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस 1945 मध्ये अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँम्बस्मुळे सर्व जग किरणोत्सर्गाच्या आणि आण्विक शस्त्रस्पर्धेच्या कवेत खेचले गेले. त्याची एक भीषण आवृत्ती चेर्नोबील आणि जपानमधील अणुप्रकल्पातील गळतीमुळे पाहण्यास मिळाली. त्याच मालिकेमध्ये आता करोना नावाचे एक संकट आले आहे. ते तात्पुरते असावे अशी आशा आहे. पण ते काहीही असले तरी, माझ्या मते करोना ही जागतिक आर्थिक -राजकीय व्यवस्थांनाच दिली गेलेली धोक्याची अखेरची घंटा आहे.

4. अखेरची घंटा अशासाठी की, यापूर्वी जागतिक पातळीवर समंजसपणा जोपासणारी युनो नावाची संस्था मोडीत निघाली आहे. आता त्याची जागा घेणारी कोणतीही संस्था शिल्लक नाही. येणार्‍या आपत्ती मात्र जागतिक आहेत. लक्षात घ्या, दुसर्‍या महायुद्धातील विध्वंसापासून वाचण्यासाठी, सकारात्मक उद्दिष्टांसाठी जागतिक एकजूटीसाठी जगातील सर्व देशांनी युनायटेड नेशन्स अर्थात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघटना नावाची एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण केली. तिने निदान 30 वर्षे तरी आपले कार्य -काही मर्यादांमध्ये का होईना -पार पाडले. पण 1993 मध्ये सोविएत युनियनचा विलय झाल्यानंतर तिची परिणामकारकता, प्रभाव व कार्य जवळपास संपुष्टातच आणले गेले.

युनोऐवजी फक्त जागतिक व्यापार आणि भांडवलाचे बाजारीकरण या एकमेव कार्यक्रमपत्रिकेवर काम करणारी जागतिक व्यापार संघटना हीच एकमेव जागतिक प्रभावी संघटना उरली होती. आता तिच्यादेखील अटींचे ओझे झाल्यामुळे आता अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांना आता जागतिक व्यापार संघटनेचीदेखील फिकीर राहिलेली नाही. सोविएत युनियनचा अस्त झाल्यामुळे युनोच्या विचाराला किंचितही भीक न घालता अमेरिकेकडून मनाप्रमाणे जगात लष्करी आक्रमणे होतच आहेत.

5. एक सूक्ष्म विषाणू सर्व शक्तिमान महासत्तांच्या गर्वाला आणि उन्मादाला एका आठवड्यात नेस्तनाबूत करू शकतो. मानवी समाज हा भांडवलाच्या घोंघावणार्‍या वादळावर किंवा उत्पादित वस्तूंच्या राशीवर चालत नाही कारण मानव हा निसर्गाचाच घटक आहे. याची विदारक जाणीव जगातील उन्मत्त अशा भांडवलाच्या मालकांना आणि आपल्या सर्वांनाच होणे आवश्यक आहे. कारण आपण प्रदूषण नावाचा जो महाराक्षस गेल्या 200 वर्षांच्या अतिविलक्षण अशा हव्यासाने निर्माण केला आहे, त्याने महासागरच आपली जागा सोडणार आहेत आणि ते आपल्या शहरांमध्ये घुसणार आहेत. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीच आहे. ती वाढणार आहे. हवामान बदलांमुळे आज समुद्री वादळे-चक्री वादळे गेल्या 5 वर्षांत अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे शेती व्यवस्था धोक्यात येते आहे.

6. येत्या काळात अनावश्यक चैनीच्या वस्तूंच्या निर्मितीतून नफा मिळविण्यासाठी आपले भांडवल, बुद्धीकौशल्य आणि सर्व सायास पणाला लावून प्राण्यांचे आणी वनस्पतींचे जेनेटिक कोड बदलून टाकण्याचा पराक्रम कदाचित आपल्याला यापेक्षादेखील मोठ्या अशा संकटात ढकलू शकतो. करोनाच्या निमित्ताने आपल्याला आपण निसर्गाचे घटक आहोत याची तसेच भांडवलाची-वस्तूंची निर्मिती- आयात-निर्यात, शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री चालण्यासाठी किंवा आपल्या धर्मपुस्तकाचा दिग्विजय साजरा करण्यासाठी करायची शस्त्रयुद्धे, द्वेषयुद्धे हे मानवी जीवनाचे श्रेयस् तर सोडाच पण प्रेयस् देखील होऊ शकत नाही, याची जाणीव आपल्याला झाली तर करोना ही एक इष्टापत्ती म्हणावी लागेल.

7. राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर आरोग्य ही वैयक्तिक बाब नसून सामाजिक पर्यावरणाचा भाग आहे. ती वैयक्तिक लाभाची वस्तू किंवा वैयक्तिक संरक्षणाचे कवच नसून सामाजिक वास्तवतेचाच भाग आहे. कारण आपले अस्तित्व हे सामाजिक-नैसर्गिकच आहे. म्हणूनच आरोग्य सेवा सार्वत्रिक सेवा व्यवस्थेचाच भाग असायाला हवी, याची जाणीव आपल्या सत्ताधारी धोरणकर्त्यांना आणि भांडवलांच्या मालकांना मुखंडांना होण्याची हीच वेळ आहे. खरे तर तीच बाब शिक्षणाची देखील आहे. या आरोग्य पर्यावरणाचा विचार न करता त्या व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याच्या आणि तिचे रूपांतर केवळ विमा कंपनीच्या व्यवसायात करण्याचा प्रयत्न यापुढे बंद झाला आणि सरकारी सार्वजनिक क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेसाठी सरकारने भरघोस अशी तरतूद करणे किती आवश्यक आहे, हे सरकारला कळले तर ती या संकटाची फार मोठी उपलब्धी ठरेल.

अखेरीस, जगातील सर्व उन्मत्त सत्ता या एका विषाणुसमोर हतबल झालेल्या असताना कुसुमाग्रजांच्या या पंक्ती आठवतात. पर्यावरणाचा विध्वंस, जागतिक तापमान वाढ-हवामान बदल यांच्या बाबत आपण अत्यंत वेगाने काही केले नाही, तर सध्यापेक्षा कितीतरी पट हतबल होऊन निसर्गातील माती आपल्याला एक मूलभूत सत्य सांगेल. कदाचित आज देखील सांगतेच आहे.

अभिमानी मानव आम्हाला अवमानी

बेहोष पाऊले पडती आमच्या वरूनी

त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी

मार्ग शेवटी मातीलाच मिळती

मातीवर चढणे एक नवा थऱ अंती…….

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *