Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदिवाळी २०२० : कार्यशैली बदलण्याची वेळ

दिवाळी २०२० : कार्यशैली बदलण्याची वेळ

– प्रा. शुभांगी कुलकर्णी

कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम या कार्यशैलीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. काही तोटे वगळता याचे अनेक फायदे दिसून आले आहेत. हळूहळू या आजाराचा प्रकोप पूर्णपणे नष्ट होईल, तेव्हा अनेक कामे अशी असतील, जी करण्यासाठी कार्यस्थळी जाण्याची आवश्यकता नसेल. म्हणजेच बरीचशी कामे आपण घरबसल्या करू शकणार आहोत. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणात झालेले सकारात्मक बदल परिस्थिती पूर्ववत झाल्यावर गायब होण्याची शक्यता आहे. परंतु ऑनलाइन कामकाजापासून काही नव्या प्रणाली अंगीकारल्यास जगाचे एक वेगळेच स्वरूप आपल्यासमोर येऊ शकते.

- Advertisement -

अनेक आपत्ती बर्‍याच काळापर्यंत आपल्या स्मरणात राहतात. त्याचे एक कारण असे असते की, आपत्तीच्या काळापूर्वीचे जग आणि आपत्तीनंतरचे जग यात काही मूलभूत फरक झालेले असतात. अनेक वर्षे विशिष्ट मार्गावरून चालणार्‍या जगाला या आपत्तीमुळे मार्ग बदलावा लागतो. हीच गोष्ट कोविड-19 च्या बाबतीत दिसून येत आहे. विशेषतः कोरोनाच्या साथीचा कामकाजावर जो परिणाम झाला आहे, तो अभूतपूर्व आहे. या साथीने संपूर्ण जगाच्या कार्यसंस्कृतीत काही मूलभूत बदल घडविले आहेत. हळूहळू या आजाराचा प्रकोप प्रचंड प्रमाणात कमी होत जाईल आणि जेव्हा तो पूर्णपणे नष्ट होईल, तेव्हा अनेक कामे अशी असतील, जी करण्यासाठी कार्यस्थळी जाण्याची आवश्यकता नसेल. म्हणजेच बरीचशी कामे आपण घरबसल्या करू शकणार आहोत.

अर्थात भारतासारख्या देशात वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्याची संकल्पना रुजविण्याचे प्रयत्न अत्यंत कमी प्रमाणात आणि विशिष्ट क्षेत्रांमध्येच आजवर झाले आहेत. वस्तुतः बदलत जाणार्‍या परिस्थितीमुळे जगभरात अशा प्रकारच्या कार्यसंस्कृतीची गरज निर्माण झाली आहे. घराचेच रूपांतर ऑफिसात करण्याच्या गरजेविषयी आणि संकल्पनेविषयी गेल्या काही दशकांपासून चर्चा होत आहे. ऑफिसात जाण्याऐवजी घरूनच कामकाज करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम अमेरिकेतील व्यवस्थापक डेम स्टीफन शर्ली यांच्याकडून देण्यात आला होता, असा दावा केला जातो. मागील शतकात म्हणजे 1960 च्या दशकातच त्यांनी तसा प्रस्ताव अमेरिकेतील कंपन्यांसमोर ठेवला होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कामकाज करायचे ठरविले तर अनेक कामे कर्मचार्‍यांना ऑफिसात न येता आपापल्या घरातूनच करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यानंतरच्या सहा दशकांमध्ये आजतागायत इंटरनेट, टेलिनेटवर्किंग अशा क्षेत्रातील तंत्रज्ञान अनेक मैल पुढे गेले आहे. माहिती तंत्रज्ञान तसेच बीपीओ क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी अलीकडे अनेक कामे घरातूनच करण्याची कार्यसंस्कृती स्वीकारली आहे.

दुसरीकडे, विद्यापीठे आणि शाळांनीही ऑनलाइन क्लासेसच्या संकल्पनेद्वारे ही चर्चा पुढे नेली आहे. अध्यापन आणि परीक्षांचे व्यवस्थापन शाळा- महाविद्यालयांमध्ये न येता करता आले, तर इतरही काही कामे घरातूनच पूर्ण करता येऊ शकतात, असा विचार मांडला गेला. ही चर्चा केवळ काल्पनिक स्वरूपाची नव्हती. असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (असोचेम) या औद्योगिक संघटनेने देशातील साडेतीन हजार कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून एक अहवालत तयार केला होता. त्यानुसार, लॉकडाउननंतर कंपन्या आपल्या कार्यालयांच्या रूपरेषेत बदल करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. संपूर्ण लॉकडाउन असताना काही गोष्टी वगळता जगातील बहुतांश व्यवहार सुरू असण्याची मानवी इतिहासातील पहिलीच घटना आपण पाहिली आहे. लोकांना अन्नधान्य मिळत होते. औषधांसह काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रमाणात होते. शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाईनचा आधार घेऊन पुढे वाटचाल सुरु झाली आहे. ऑनलाइन परीक्षांविषयी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) स्थापन करण्यात आलेल्या एका विशेष समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला अशी शिफारस केली आहे की, कोरोनाचे संकट समाप्त झाल्यानंतरसुद्धा विविध विद्यापीठांमधील 25 टक्के शैक्षणिक कामकाज ऑनलाइन माध्यमांद्वारे केले जावे. या धोरणांतर्गत महाविद्यालयांमधील 75 टक्के अध्यापनकार्य वर्गांमध्ये होईल, तर 25 टक्के काम ऑनलाइन माध्यमांद्वारे पूर्ण केला जाईल.

केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच बदल संभवतात असे नव्हे. इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि अनेक प्रकारच्या माध्यमांनी अनेक गोष्टी साध्य करून दाखविल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत अनेकजण घरबसल्या छोटे-मोठे व्हिडिओ तयार करून जगभरात पोहोचवीत होते. जग चालविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांची व्यवस्था केल्यास त्याचा फायदा आपल्या पृथ्वीला, पर्यावरणाला किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, हे लॉकडाउनच्या कालावधीने आपल्याला दाखवून दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण स्वच्छ झाले आणि अनेक प्राणिप्रजातींना मोकळीक मिळाली. पर्यावरणात झालेले हे सकारात्मक बदल आता परिस्थिती पूर्ववत झाल्यावर गायब होतील आणि परिस्थिती पहिल्यासारखी होईल. परंतु ऑनलाइन कामकाजापासून काही नव्या प्रणाली आपण अंगीकारल्यास जगाचे एक वेगळेच स्वरूप आपल्यासमोर येऊ शकते. घराचेच रूपांतर ऑफिसात करण्याची गरज आज आणखीही एका कारणासाठी आहे. बहुतांश शहरांमध्ये घर आणि कार्यस्थळ यातील अंतर दिवसेंदिवस वाढत आहे. कामकरी लोकांना घरून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडी आणि परिवहनावरील वाढता खर्च अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक विभागांमध्ये जमिनी आणि कार्यालयांचे भाडे प्रचंड वाढले आहे. हे भाडे भरणे अनेक कंपन्यांना शक्य होत नाही. कार्यालयांची रचना, सजावट आणि ते चकचकीत राखण्यासाठी वातानुकूलन यंत्रणा आदींवर कंपन्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे.

घरून काम करण्याची नवी कार्यशैली किती परिणामकारक ठरू शकते, याविषयी काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाने आणि रोसेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी अमेरिकी नागरिकांना भेटून जे सर्वेक्षण केले होते, त्याच्या निष्कर्षाकडे लक्षपूर्वक पाहायला हवे. या संशोधकांनी निष्कर्ष सांगताना म्हटले होते की, 2003 च्या तुलनेत 2012 मध्ये अमेरिकी नागरिकांनी घरून कार्यालयीन काम करण्यात सरासरी 7.8 दिवस जास्त व्यतीत केले. याचा सर्वांत मोठा फायदा असा झाला की, 2012 मध्ये अमेरिकेत विजेची मागणी 1700 लाख कोटी युनिटने (बीटीयू-ब्रिटिश थर्मल युनिट) घटली. ही बचत अमेरिकेच्या सरासरी वार्षिक वीजवापराच्या 1.8 टक्के एवढी होती. याव्यतिरिक्त लोकांनी कामावर जाण्यासाठी प्रवास करताना स्वतःची कार किंवा बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला असता, तरी विजेची आणि इंधनाची मागणी वाढली असती आणि जागतिक तापमानासह अनेक कारणांमुळे पृथ्वीवर पडत असलेला अतिरिक्त ताण आणखी वाढला असता.

घरातून काम करण्याच्या पद्धतीविषयी काही मूलभूत प्रश्नही निर्माण केले जातात. उदाहरणार्थ, घरातून काम करण्याच्या पद्धतीमुळे कर्मचार्‍यांच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना? त्याहूनही महत्त्वाची शंका अशीही आहे की, आपत्तीच्या वेळी ऑनलाइन कामकाज करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेत काही त्रुटी असतील, तर त्यामुळे परिस्थिती बिघडणार तर नाही ना? हे प्रश्न अप्रस्तुत नक्कीच नाहीत. बहुतांश व्यवस्थापकांना असे वाटते की घरून काम करणारा माणूस कार्यालयीन कामकाजापेक्षा घरातील कामेच अधिक करतो. अशा कर्मचार्‍यांना बढती देण्यास व्यवस्थापक त्याची पात्रता असतानासुद्धा तयार होत नाहीत आणि त्यांना पगारवाढही बेताचीच देतात. परंतु याहून मोठी समस्या तातडीच्या स्वरूपात घरून कामकाज करण्याच्या तयारीमध्ये तत्कालीन व्यवस्थापनात होणार्‍या त्रुटींशी निगडित आहे. बहुतांश भारतीय घरांचे डिझाइन करताना, वेळ पडल्यास घरातील एका कोपर्‍याचे रूपांतर कार्यालयात करता येईल आणि तेथून कार्यालयीन कामकाज करता येईल ही गोष्ट ध्यानातच घेतलेली नसते. अशा परिस्थितीत एखादी आपत्ती आल्यास लोक आपल्या बेडरूममध्ये किंवा ड्रॉइंग रूममधील सोफ्यावर बसून कामकाज करताना किंवा ऑनलाइन क्लासेस घेताना दिसून येतात.

समस्येचा दुसरा पैसू इंटरनेटच्या वेगाशी जोडलेला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कामकाजाचा बोजा इंटरनेटवर जसा वाढला, तसतशी इंटरनेटची गती कमी झाल्याच्या तक्रारी आल्या. सर्वाधिक हास्यास्पद परिस्थिती ऑनलाइन शैक्षणिक कामकाजांमध्ये पाहायला मिळाली. अनेक शिक्षक आपल्या नेहमीच्या शैलीत शिकवत राहिले; परंतु नेटवर्कमध्ये अडथळे असल्यामुळे आपल्याला काहीच कळले नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. अर्थातच, घरातून काम करण्याची पद्धती विकसित करायची असेल, तर आपल्याला इंटरनेट आणि संबंधित पायाभूत संरचनेत काही सुधारणा तातडीने कराव्या लागतील. त्याचबरोबर घराला कार्यालयाचे स्वरूप देऊन काही कामे घरात बसून होऊ शकतात, ही मानसिकता रुजविण्याची गरज आहे. परंतु अर्धवट पायाभूत सुविधा उभारून तातडीने घरातून कामकाज करण्यास सुरुवात केल्यास ते संबंधित क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या