संघर्ष करा आणि भरारी घ्या !

- प्रा. प्रवीण दवणे
संघर्ष करा आणि भरारी घ्या !

नैराश्य आणि आत्महत्या हा एक परिणाम आहे आणि तो काही गोष्टींच्या घडण्यातून येतो. सध्याच्या काळात ठळकपणानं दिसणारी निराशा ही आत्यंतिक सुखापोटी आलेली आहे. आपल्याला झोपडपट्टीतील निराशा बघायची सवय आहे. पण पंचतारांकित महालाच्या आतली निराशा काय आहे हे आपल्याला माहिती नसते. वास्तविक, संघर्ष करत जगणारी भाजीवाली सुखी असते. परंतु राजकन्या मात्र दुःखी असते. त्यामुळे निराशा का निर्माण होत आहे हा भाग महत्त्वाचा आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे पालकांनी आणि समाजव्यवस्थेने तरूण पिढीचा जगण्याचा संघर्षच पिऊन टाकला आहे. परिणामी, ज्या नखांच्या साहाय्यानं गड चढायचा असतो ती बोथट झाली आहेत. अशी मुलं गुळगुळीत खाचेवर घसरताना दिसताहेत.

व्यक्तीचं जीवन, जगणं हे संघर्षातून आकाराला येत असतं. काही वर्षांपूर्वीचं चित्र पाहिलं तर एखाद्या आव्हानावर मात करून, प्रत्यक्ष पराक्रमानं एखादी गोष्ट जिंकून, त्यातून ठाम उभं राहाण्याची ओढ दिसून यायची. परंतु आजची तरुणपिढी हा संघर्षच संपवून टाकण्याच्या विचारात दिसून येते. हे चित्र जागतिक आहे.

आज उच्चभ्रू वर्गांमध्ये जगण्याचे मूलभूत प्रश्न संपलेले आहेत. साक्षरता वाढत असली तरी शिक्षणव्यवस्थेतून जगण्याचं उद्दिष्ट देण्यासाठीची व्यवस्था नाहीये. विजीगिषु वृत्ती निर्माण करणारं शिक्षण पाठ्यपुस्तकातून दिलं जात नाहीये.

नव्वदीच्या दशकाच्या आधीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलीकडं जाऊन स्थूलवाचन हा प्रकार असायचा. त्यामध्ये ‘पण लक्षात कोण घेतो’ सारखी एखादी ह. ना. आपटेंसारख्या लेखकांची कादंबरी असायची. शाळकरी वयापासून होणार्‍या या पूरक वाचनातून समाजाची सुख-दुःखं उमगायची.

आज घरटी एक मूल ही संकल्पना रूजली आहे. भागाकारातील गुणाकार म्हणजे आपल्यातील काहीतरी दुसर्‍याला द्यायचं आणि आपण सुखी व्हायचं हे आपोआप ‘घडणं’ संपलं आहे. एकच मूल असल्यानं आई-वडील दोघांचा लाडाचा आणि उपेक्षेचा फोकस त्याच्यावरच असतो. परिणामी एक तर ते मूल अति लाडावतं किंवा सांडपाण्यासारखं वाया जातं. भावंडं नसल्यामुळे संवाद साधणं, सुखदुःख व्यक्त करणं या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत नाहीत. त्यामुळं आजच्या सुखवस्तू कुटुंबातील मुलांना ‘पंचतारांकित अनाथपण’ जाणवतं. ती एकाकीच वाढतात. जीवनाचं मूल्यच न कळल्यामुळे त्यांना ते असलं काय आणि नसलं काय, काहीच फरक पडत नाही. कारण ते जिंकून मिळवलेलं नाही.

एखाद्या किल्ल्यावर प्रत्यक्ष गुडघे फोडून अतिशय धडपडीनं शिखरावर किंवा बुरूजावर जाणं हे आता मागं पडलं असून पाचशे रूपये देऊन रोप वेने जाण्याचा प्रवाह वाढला आहे. पण असं केल्यानं त्या किल्ल्याची उंची कळत नाही. वाटेवरचा वारा, निळं आकाश याचं मूल्य कळत नाही. प्रत्यक्ष किल्ल्यावर चढून जाणार्‍याला ते अनुभवायला मिळतं. हल्ली मुलांच्या हातात सहज पैसे येतात. सहजगत्या मोठी घरं मिळतात.

चैनीसाठी दरवाजे खुले असतात. याला आपण ‘मुलांना विकासाचे स्वातंत्र्य देतो आहोत’ असं म्हणतो. पण अनेकदा हे ‘विकास स्वातंत्र्य’ विनाशाच्या स्वातंत्र्यात बदलू शकतं. याचं कारण, जे प्रयत्नांनी मिळवायचं असतं ते आईवडिलांनीच सहजगत्या ओंजळीत टाकल्यामुळं ते हातून निसटलं तरी मुलांना त्याबद्दल काहीच वाटत नाही.

माझ्याच आयुष्यात मागे जाऊन डोकावले तर बसच्या प्रवासाचे पैसे वाचवून त्यातून भाजी आणणारे वडील मी पाहिले आहेत. तेवढे स्टॉप ते चालत जायचे. त्यामुळं वडिलांनी सेकंडहँड पुस्तकं शिकायला दिल्यानंतर आम्हाला त्याचं विशेष वाईट वाटलं नाही. कारण घरातच सुरू असलेला संघर्ष आम्ही पहात होतो. आज सुखवस्तू आईवडील एकाच वेळी पुस्तकांचे दोन सेट घेतात. दोन कंपास, चार पेन देतात. एक कंपास हरवली की दुसरी तयार असते. काही वर्षांपुर्वी कंपास भावंडाची वापरलेली मिळायची.

पेन्सिलीला टोक करून परत वापरायची हेच शिक्षण होतं. आता पेन्सिलीचं टोक तुटलं की ‘दे फेकून घे नवीन’ अशी वृत्ती तयार झाली आहे. पण त्यामुळं जीवनाला आणि झगडण्याला कुठलंही टोक येत नाहीये. मी गरीबीचं उदात्तीकरण करत नाही. पण अशा संघर्षहीन परिस्थितीमुळं टोकाचं पाऊल उचलण्याचे प्रकार वाढत आहेत. नैराश्य आणि आत्महत्या हा एक परिणाम आहे आणि तो काही गोष्टींच्या घडण्यातून येतो. आत्महत्या न करता जिवंत असलेली मुलं तरी प्रत्यक्षात जिवंत आहेत का? नुसता श्वासोच्छवास हा जिवंतपणाचा पुरावा असला तरी जगण्याचा नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

कुटुंबव्यवस्थेतील अव्यवस्था, मूल्यांचा र्‍हास, लिव्ह इन रिलेशनशीपचं समर्थन, एका घटस्फोटानंतर दुसर्‍याची तयारी असं बेडौल दृश्य आजूबाजूला पाहिल्यानंतर लक्षात येतं की, आताच्या काळात ठळकपणानं दिसणारी निराशा ही आत्यंतिक सुखापोटी आलेली आहे. आपल्याला झोपडपट्टीतील निराशा बघायची सवय आहे.

पण पंचतारांकित महालाच्या आतली निराशा काय आहे हे आपल्याला माहिती नसते. वास्तविक, संघर्ष करत जगणारी भाजीवाली सुखी असते. परंतु राजकन्या मात्र दुःखी असते. त्यामुळे निराशा का निर्माण होत आहे हा भाग महत्त्वाचा आहे आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे पालकांनी आणि समाजव्यवस्थेने तरूण पिढीचा जगण्याचा संघर्षच पिऊन टाकला आहे. परिणामी, ज्या नखांच्या साहाय्यानं गड चढायचा असतो ती बोथट झाली आहेत. अशी मुलं गुळगुळीत खाचेवर घसरताना दिसताहेत.

आज खोटा संघर्ष निर्माण करण्यासाठीचा अट्टाहास दिसून येतो. पण त्यातून विकृतींचा जन्म होतो. मी काहीतरी भयंकर वेगळं जगेन ही मानसिकता वाढत आहे. प्राध्यापक म्हणून मी एका अजिबात अभ्यास न करणार्‍या सुस्थितीतील मुलाला विचारलं की तुझं चांगलं करिअर असताना तू अभ्यासाकडं दुर्लक्ष का करतो आहेस? यावर तो मला म्हणाला, ‘मी नापास व्हायचं ठरवलं आहे.’ ते ऐकून मला धक्काच बसला. ठरवून जास्त गुण मिळवणारी मुलं मी पाहिली होती. पण मला नापासच व्हायचंय असं ठरवणारं मी कुणीच पाहिलं नव्हतं. म्हणून मग मी विचारलं ‘का?’. यावर तो म्हणाला, ‘दहावीला 90 टक्के मार्क मिळवले तरीही पालकांना 95 टक्के मार्क हवे असतात. कितीही काही केलं तरीही मी त्यांची स्वप्नं पूर्ण करु शकत नाही. म्हणून मग मी त्यांना रडवून दाखवतो.” अशा मानसिकततेतील हा मुलगा न दिसणारे विष घेऊन निराशेच्या उतारावर स्वतःला संपवताना मी पाहिला आहे.

बदलत्या काळात कुटुंबव्यवस्थेत होत गेलेले बदल अपरिहार्य म्हणून स्वीकारले गेले. आजीआजोबांपासून नातवंडं लांब राहताना दिसू लागली. परंतू, आई-वडील त्यांच्या आईवडिलांसाठी काही करताना, त्यांची सेवा करताना दिसले नाहीत, तर पुढच्या पिढीला आईवडिलांचं काही करायचं असतं हे उमगणार कसं? ‘आधुनिक’ आईवडील असं म्हणतात की, ‘मुलगा वीस-बावीस वर्षांचा झाला की त्याला आम्ही स्वतंत्र करणार.’ त्यावेळी ते पन्नाशीच्या काठावर असतात. उमेद असते.

परंतू ते 80 वर्षांचे होतात आणि मुलं पन्नाशीची होतात तेव्हा मुलांनी आपली सेवा करावी अशी त्यांची इच्छा निर्माण होते. कारण तेव्हा ते थकलेले असतात. उमेद मावळलेली असते. पण अशा वेळी आपणच स्वतंत्रतेची बीजं पेरलेली मुलं पाठ फिरवून मोकळी होतात. कुठल्याही प्रकारची अपराधी भावना त्या मुलांमध्ये नसते. कारण आजीआजोबा नावाचे छत्र सांभाळायचं असतं असे संस्कारच त्यांच्यावर झालेले नसतात. स्वाभाविकपणे ते आपोआप आईवडिलांपासून दूर जातात.

सांगण्याचा मुद्दा इतकाच की, पिढ्यापिढ्यांचे ऋणानुबंध जपण्याचे जे काम आजवरची कुटुंबव्यवस्था करत होती; पण सुखाच्या कल्पनेने सुखवस्तू आईवडिलांनी ते ऋणानुबंध तोडले. त्यामुळे जी दुःखं निर्माण होतात ती निराशेचं नवं दालन उघडणारी ठरत आहेत. यातील उपमुद्दा असा की आज विवाहविच्छेदनाचे प्रमाण वाढले असून मुलं त्याचे बळी ठरताहेत. मी कार्यक्रमाला गेलो तर प्रेक्षकांतील तरूण मुलांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या कुटुंबाची स्थिती मला समजते.

आई स्विकारायची की वडील स्विकारायचे हे कोर्टाला सांगण्याच्या तयारीत असलेली, सैरभैर झालेली मुलं मी पाहिली आहेत. त्या भांबावण्यातून जे एकाकीपण येतं, ते पुढं जाऊन मुलांचा विवाह संस्थेवरचा विश्वासच उडवणारं ठरतं. म्हणून आत्महत्या हा शब्द आपण वापरतो तेव्हा केवळ गळफासाला लोंबकळणार्‍या मुलांचाच विचार करतो; पण गळफासापर्यंत न पोहोचलेली, कुटुंब-अव्यवस्थेचा आणि आईवडिलांच्या विसंवादाचा ताण झेलणारी, एकाकीपण सोसत जगणारी मुलं आपण पहात नाही. दुर्दैवानं त्यांची संख्याही मोठी आहे.

आपले आधुनिक विचारवंत, आधुनिक लेखक-लेखिका, तथाकथित विचारवंत मंडळी यांपैकी अनेकांच्या घरात हा प्रादुर्भाव असल्यामुळं ती हे कधीच मान्य करणार नाहीत. ही सगळी माणसं वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली एकाकीपणाचं समर्थन करतात. व्यासपीठावर आपल्या उत्तम व्यक्तीमत्वाच्या आधारे आणि वक्तृत्त्व शैलीच्या जोरावर ती ‘मार्गदर्शन’ करत असली तरी घरात दुःखी असतात. अशी मंडळी दुभंगलेपणाचं समर्थन करत समाजाला चुकीच्या दिशेने नेताना पाहून माझ्यासारख्याला खेद वाटतो.

वास्तविक, न्याय आणि अन्याय प्रत्येकाच्या घरात असतो. भांडणे प्रत्येकाच्या घरात असतात. वाद कोणाचेही होतात. परंतू सकाळी झालेला एखादा वाद उन्ह कलल्यावर निवला पाहिजे. कुणीतरी चार पावलं मागं गेल्यामुळं घर दोन पावलं पुढं जात असतं, हे आईवडील दोघांनीही मुलांना दाखवून दिलं पाहिजे. आज आधुनिकतेच्या, स्वातंत्र्याच्या नावाखाली जे ‘पेरलं’ जात आहे त्यातून ‘श्यामची आई’ हे नाव सुद्धा जुनाट वाटेल. आई दूरची वाटेल. ती व्यवस्था, संघर्ष, मूल्यशिक्षण, प्रार्थना हे प्राचीन आणि आदिवासी काळातलं वाटेल.

विसाव्या वर्षी शारिरीक तंदुरूस्ती, आईवडिलांचा अमाप पैसा, दोन चार फ्लॅट यामुळे त्यांना उपभोगासाठी मोकळं रान मिळतं आहे. पण मी नेहमी मुलांनाही सांगतो की सुखदेखील थोडं अलीकडं सरकलं की त्याचं रूपांतर दुःखात होतं. हसा, खेळा, नाचा; पण पायाखाली काचा हे आज कोणी सांगत नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे - उपभोगाच्या तळाशी निराशा असते. सर्व उपभोगल्यानंतर शेवटी ‘डेड एण्ड’ येतो. पुढे जाता येत नाही. अशा वेळी मागं येणं हेच पुढं जाणं असतं. याच टप्प्यावर मग कधी आत्महत्या, कधी दुसर्‍याची हत्या, कधी व्यसनं, कधी विकृती असे प्रकार घडतात.

खरं पाहता, आजची तरूण पिढी उत्तम आहे; पण ‘पालक पिढी’ आणि भरकटलेली शिक्षणव्यवस्था यांनी त्यांचा रस्ता चुकवला आहे. पालक पिढीत राजकारणीही आले. ज्येष्ठ राजकारणी लोक निष्ठाशून्य रितीने वागत असतील तर पंचविशीची मुले चुकली असं कसं म्हणायचं? या गोष्टी स्विकारणे अवघड आहे. कारण आपल्यावर जबाबदारी येते तेव्हा आपण झटकून मोकळं होत असतो. हे झटकणं सोडून देऊन आपल्यात डोकावायला हवं. कोरोनाच्या काळानं ही संधी सर्वांनाच दिली.

या विषाणू संसर्गानं प्रचंड गती असलेला समाज धाडकन जमिनीवर आदळला. यामध्ये बाह्यगतीबरोबर आंतरिकदृष्ट्या थांबण्याची सवय होती ते सावरले. चिंतनाची, ध्यानधारणेची सवय असणार्‍यांना ते तितकं जाणवलं नाही. कारण गतीचाच एक भाग आहे की कधीतरी स्वल्पविराम घेऊन स्वतःशी बोलावं आणि चिंतनानं पुढं जावं. पण बाह्यगतीच्या नादात, बाह्यवैभवाच्या नादात आपण आपल्या घराला अंतरीच्या अध्यात्माची जोड कधी दिलीच नाही. आज किती घरात संध्याकाळी दिवा लावला जातो? सायंप्रार्थना केली जाते? याचा विचार केला पाहिजे. यामागं देव मानणं हा भाग नाही; पण कोणाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचंच आहे.

माझ्यासारखा लिहिता-बोलता वक्ता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला भांबावला होता. विषारी वायू फैलावल्यानंतर सर्व दारे खिडक्या बंद केल्यावरही फटीतून तो घरात शिरेल का, कितीही नाकातोंडाला बांधले तरी नाकपुड्यात जाऊन आपण मरू की काय हे भांबावलेपण जाणवत होतं. ढिगानं माणसं मरताहेत हे पाहायची सवय नव्हती. पण थेट आपल्या घरापर्यंत मृत्यू दरवाजा ठोठावतोय, हे सारं वातावरण सुन्न करणारं होतं. पण घाबरलेपणाचा हा अवधी लांबवण्यात काहीच अर्थ नाही, हे मी जाणलं. प्रत्यक्ष शरीराने येणार्‍या मृत्यूपेक्षाही मरण येईल की काय या धास्तीने मरणप्राय होणंं हे अस्वस्थ करणारं असतं. म्हणून मग त्यावर उपाय करण्याचं ठरवलं. बाहेर कितीही काळोख असला तरी निसर्गानं मला दिलेली लेखणी आणि वाणीची ताकद कायम आहे. आपण अजून जिवंत आहोत, ही निसर्गाची इच्छा आहे, असं मी मलाच सांगितलं. हा माझा रियाज होता.

उद्या काय होईल ते होवो पण आज मी सकारात्मकच राहिलं पाहिजे हे मी मनाशी ठरवलं. या काळात वेगळ्या प्रकारच्या लेखनाचे प्रकल्प हाती घेऊ शकतो का, नव्या माध्यमांना आपण सामोरे जाऊ शकतो का याचा अदमास घेतला. कारण माझी तिसरी नाकपुडी माझी लेखणी आहे, हे मी ओळखलं. पाणी ज्याप्रकारे स्वतःची वाट शोधतंं तसंच आपणही करायला हवं, हे कोरोनाकाळानं मला शिकवलं. मला माझ्या जगण्याचा जो आनंद मिळतो तो मला कसा वाटून घेता येईल याचा विचार केला.

लेखक म्हणून, वक्ता म्हणून, कुटुंबव्यवस्थेवर प्रेम करणारा वक्ता म्हणून कोणत्या मार्गानं आपल्याला सकारात्मकता पोहोचवता येईल याचं चिंतन सुरु केलं. आज लोक उपदेश ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत हे मला उमगलं होतं. मग मी विचार केला की घरातील लहान मुलं भांबावली आहेत, त्यांच्यासाठी 20-25 नव्या वेगळ्या विचारांच्या बालकविता केल्या. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी त्यावर चित्रे काढली आणि समाज माध्यमांतून त्या कविता सर्वदूर - अगदी सातासमुद्रापार- पोहोचल्या. तुफान प्रतिसाद मिळाला. फिनलंडमधील शिक्षण परिषदेत कोरोना काळात राबवलेल्या सर्जनशील उपक्रमांमध्ये मराठी भाषेत लेखक-कवि म्हणून माझं नाव निवडलं गेलं. त्यांनी ऑनलाईन परिषद घेतली आणि जगातील सर्व देशांतील लेखकांबरोबर मला संधी देऊन मुलांच्या आनंदासाठी काय केलं हे मी मांडलं.

मी बोटांनी टाईप केलेली कविता समुद्रावरच्या जहाजावर असणारा 22 वर्षांचा तरूण ती वाचतो आणि मला दाद देतो ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. पण तो अनुभव मला सुखावून गेला. नवआनंद देऊन गेला. अनेक वेबिनार्स केले. यातून मिळालेली रक्कम कोरोना फंडसाठी दिली. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात माझ्यापुरते मला हे मार्ग सापडले. वाचकांनीही त्यांचे मार्ग त्यांच्या पद्धतीने शोधले पाहिजेत.

सकारात्मक राहाण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला मिळताहेत. अतिसुगमतेतील नैराश्य बाजूला ठेवण्यासाठी त्यातूनच मार्ग निवडा आणि मार्गस्थ व्हा. आपत्तीची संपत्ती करा. स्वतःच्या क्षमता शोधा. कारण कोरोनाची भीती हा जसा प्रादुर्भाव आहे, तसा भीतीचा कोरोना हा त्याहून भयानक आहे. मध्यंतरी आमच्या भाजीविक्रेत्या गरीब महिलेला विचारलं की तुमच्या वस्तीत कोणाला कोरोना झाला आहे का? ती म्हणाली, ‘कोरोनाबाबत विचार करायला आमच्याकडे वेळच नाहीये.’ ही कष्टकरी माणसं उमेदीनं उभी असताना वातानुकुलित घरांमधील का उदास? कारण ती हाताबरोबरच पायाचीही घडी घालून बसतात. त्या घड्या उघडा.. आतले पंख उघडा आणि भरारी घ्या !

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com