Monday, April 29, 2024
HomeUncategorizedदिवाळी २०२० : ही केवळ सुरुवात ?

दिवाळी २०२० : ही केवळ सुरुवात ?

– जॉन विडाल, पर्यावरणतज्ज्ञ

करोना विषाणूच्या प्रसाराने जग हादरले असले, तरी जैवविविधता क्षेत्रातील काही तज्ज्ञांना याचे बिलकूल आश्चर्य वाटलेले नाही. मानवी हस्तक्षेपामुळे प्राणिजीवन आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.

- Advertisement -

अनेक विषाणू प्राण्यांमधून माणसांच्या शहरात येत असून, करोनासारख्या असंख्य विषाणूंचा आपल्याला शोधही लागलेला नाही. आतापर्यंत ज्या प्राण्यांच्या शरीरात ते प्रवेश करीत होते, ते प्राणीच राहिले नसल्याने या विषाणूंना नवे ‘आश्रयस्थान’ हवे आहे. करोनासारख्या अनेक साथी भविष्यात येऊ शकतात.

मेयबाउट 2 हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठिकाण नाही. गॅबन या मध्य आफ्रिकी देशाच्या उत्तरेला आइविंडो नदीच्या दक्षिण किनार्‍यावर ग्रेट मिकंबेच्या जंगलात असलेल्या या गावात राहणारे सुमारे दीडशे लोक नेहमी मलेरिया, डेंग्यू, पिवळा ताप आणि झोपेसंबंधीच्या आजारांनी ग्रस्त असतात. मुख्य म्हणजे ग्रामस्थांना चा आजारांचे फारसे गांभीर्य नसते. परंतु जानेवारी, 1996 मध्ये इबोला नावाच्या एका घातक विषाणूने ग्रस्त 37 ग्रामस्थांपैकी 21 जणांचा बळी घेतला. संसर्ग झालेल्यांमध्ये अशा लोकांचा समावेश होता, ज्यांनी जवळच्या जंगलातून एका चिम्पांझी वानराला आणले होते आणि कापून खाल्ले होते. 2004 मध्ये मी मेयबाउट 2 गावाचा दौरा केला होता. उष्ण कटीबंधीय सदाहरित जंगलांसारख्या जैवविविधतेची प्रमुख केंद्रे असलेल्या आफ्रिकी आणि आशियाई शहरांमध्ये जंगली जनावरांच्या मांसातून प्राणघातक आजार कसे पसरतात, याचा मला वेध घ्यायचा होता.

ज्या गावातील 90 टक्के संसर्गित लोकांचा मृत्यू झाला होता, त्या गावात गेल्यावर मला जाणवले की, उरलेले लोक विषाणूच्या पुनरागमनाच्या शक्यतेने प्रचंड घाबरले होते. गावकर्‍यांनी मला सांगितले की, त्या दिवशी गावातील मुले कुत्र्यांना सोबत घेऊन जंगलात गेली होती. कुत्र्यांनी एका चिम्पांझीला ठार मारले होते. चिम्पांझीला कापून, शिजवून खाणार्‍यांपैकी अनेकांना काही तासांतच तीव्र ताप आला. काही लोकांचा ताबडतोब मृत्यूही झाला. काहीजणांना नावेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार झाल्यानंतर नेस्टो बेमेटिस्कसारखे काही लोक बचावले. नेस्टोने मला सांगितले की, आमचे जंगलावर खूप प्रेम आहे. मात्र, आता या जंगलाची भीती वाटू लागली आहे.

सुमारे दहा ते वीस वर्षांपूर्वी असे मानले जाऊ लागले होते की, उष्ण कटिबंधातील जंगलांनी आणि वन्यजीवांनी युक्त असलेल्या नैसर्गिक वातावरणाने अनेक विषाणूंना आणि रोगजंतूंना आश्रय दिला असून, त्यामुळे मानवजातीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच माणसांमध्ये इबोला, एचआयव्ही, डेंग्यू अशा नवनवीन आजारांचा प्रसार झाला आहे. परंतु आता अनेक संशोधकांनी मान्य केले आहे की, माणसाने जैवविविधतेचा नाश केल्यामुळेच नवनवीन विषाणू निर्माण होत आहेत.

रस्ते बांधणे, उत्खनन, शिकार आणि जंगलतोड या मानवनिर्मित कारणांमुळेच 1990 च्या दशकात इबोलाच्या संसर्गाला जन्म दिला होता का? आणि आजही कोविड-19 च्या संसर्गालाही हेच कारण ठरले असावे का? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. ‘स्पिलओव्हर ः अ‍ॅनिमल इन्फेक्शन अँड द नेक्स्ट पॅन्डेमिक’ या शीर्षकाखाली न्यूयॉर्क टाइम्समध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखाचे लेखक डेव्हिड क्वामॅन म्हणतात, “आपण सदाहरित जंगले आणि अन्य जंगली प्रदेशांवर हल्ले चढविले. तिथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती असतात. तिथेच अनेक अनोळखी विषाणूही अस्तित्वात असतात. आपण झाडे तोडतो, जनावरांना मारतो किंवा पिंजर्‍यात टाकून त्यांना बाजारात पाठवतो. अशा कृत्यांमुळे आपण नैसर्गिक परिस्थितकी धोक्यात आणतो. ज्या प्राण्यांचे शरीर विषाणूंचे नैसर्गिक स्थान असते, ते आपण त्यांच्यापासून विलग करतो. जेव्हा असे घडते तेव्हा विषाणूंना नव्या आश्रयस्थानाची, नव्या शरीराची आवश्यकता भासते. आपण कायम असेच करीत आलो आहोत.”

विविध रोगांना जन्म देणारे विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरत आहेत आणि त्यातील अनेक विषाणू वेगाने अन्य स्थानी पसरण्याइतके सक्षम झाले आहेत. अमेरिकेतील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अंदाजानुसार, तीन चतुर्थांश नवे किंवा विकसित होत असलेले आजार असे आहेत, जे प्राण्यांमधून माणसांना बाधित करीत आहेत.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये परिस्थितकी आणि जैवविविधता पीठाच्या प्रमुख केट जोन्स यांच्या मते, नव्याने संक्रमित होत असलेले हे पशुजनित संसर्गजन्य आजार हा जागतिक आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि अर्थव्यवस्थांसाठी असलेला महत्त्वाचा धोका आहे. 2008 मध्ये जोन्स आणि संशोधकांच्या एका समूहाने 335 अशा आजारांचा अभ्यास केला होता, ज्यांनी 1960 ते 2004 या कालावधीत नव्यानेच माणसांना ग्रासले होते. त्यातील कमीत कमी 60 टक्के आजार प्राण्यांमधून माणसांत आल्याचे निष्पन्न झाले होते. त्या म्हणतात, की हे संसर्गजन्य आजार पर्यावरणीय परिवर्तन आणि मानवी व्यवहारांशी संबंधित आहेत.

एमोरी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील असोसिएट प्रोफेसर थॉमस गिलेस्पी म्हणतात, “करोना विषाणूचा प्रसार झाल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. अशा अनेक विषाणूंचा शोध अद्याप लागायचा आहे. आतापर्यंत आपल्याला खूपच कमी विषाणूंबद्दल माहिती मिळाली आहे.” अशा स्थितीत आपण काय करू शकतो? जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला जागतिक जैवविविधतेसंबंधी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. तसेच विकसनशील देशांमध्ये आरोग्य सुविधांचा विकास करणेही अत्यावश्यक आहे.

(लेखक लंडनमधील ‘द गार्डियन’ मध्ये पर्यावरण संपादक म्हणून कार्यरत आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या