Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedनैराश्यावर मात करायची तर..

नैराश्यावर मात करायची तर..

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये चार मानसिक विकार आहेत. त्यात नैराश्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. उदासीनता आणि निराशेची छाया मनावर असेल तर जगावेच कशाला असे टोकाचे विचारही मनात येऊ शकतात. त्यामुळे नैराश्य वाढत जाते. मात्र, नैराश्य या मानसिक विकारावर वेळीच उपाययोजना करून आयुष्याला सामोरे जाणे आवश्यक असते. औदासीन्य ही जाचक मनोवस्था आहे आणि ती कायम टिकणारी नाही. त्यातून बाहेर येणे शक्य असते. नैराश्यावर निश्चितपणाने मात करता येते; पण त्याआधी ते समजून घेणे गरजेचे आहे.

मराठीत ज्याला निराशा, उदासीनता, औदासिन्य, शून्यमनस्कता म्हटले जाते त्याला आपण डिप्रेशन म्हणून संबोधत असतो. तथापि, डिप्रेशन हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांन वापरला जातो. स्टॉक मार्केटमध्ये डिप्रेशन आल्याने दलाल हवालदिल झाले आहेत. समुद्रात डिप्रेशन आल्यामुळे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सामान्य व्यक्ती, मला आज जरा डिप्रेस्ड वाटते आहे, असे म्हणताात.

- Advertisement -

प्रत्येक संदर्भात त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. त्यामुळे या गोष्टीचा अचूक अर्थ समजणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणूस डिप्रेस वाटते आहे, असे म्हणतो तेव्हा त्याला निराश वाटत असते. नैराश्य हा शब्द मराठीत अगदी सहजगत्या वापरला जातो. निराश वाटणे किंवा नैराश्य येणे ही आपण एखाद्या घटनेला दिलेली प्रतिक्रिया असते, असे आपण गृहित धरतो. त्यामुळे कोणत्यातरी कारणाने आपल्याला एकदम निराश वाटू शकते. परंतू मनोविकारतज्ज्ञ असे म्हणतो की या माणसाला नैराश्य आले आहे तेव्हा तो एक क्लिनिकल सिंड्रोम असतो. तो एक मानसिक विकार आहे असे मनोविकारतज्ज्ञाला अभिप्रेत असते.

मी शाळेत असताना एका आजाराला मुदतीचा ताप असे म्हणायचे. पुढे त्याला विषमज्वर असे म्हणू लागले. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यानंतर त्याला आम्ही इंटेरिम फीव्हर म्हणू लागलो. तो होता टॉयफॉईड. म्हणजे एखाद्या शब्दाच्या जसजसं अधिकाधिक खोलात जाऊ तसतसा त्या शब्दाला आणि त्या विशिष्ट प्रकारच्या वाक्यप्रयोगाला असणारा अर्थ लक्षात येतो.

डिप्रेशन किंवा नैराश्य या शब्दाचा जुना अर्थ पाहिला, तर ग्रीक भाषेमध्ये त्याला मेलनकोलिआ म्हणायचे. मॅल किंवा मेल म्हणजे वाईट. मॅलेनकोल म्हणजे शरीरातील द्रव्य आणि कोल म्हणजे हे द्रव्य खराब झाल्याने निर्माण होणारी तीव्र स्वरूपाची नैराश्याची भावना. त्यामुळे डिप्रेशनला मेलिन्कोलिक डिसऑर्डर म्हटले पाहिजे.

पण ग्रीकांनी मेलनकोली शब्द वापरताना एक विशिष्ट वय लक्षात घेतले होते. त्या काळामध्ये साधारण मध्यमवयीन लोकांना जे नैराश्य यायचं त्याला ते मेलनकोली म्हणत. त्यानंतर लक्षात आले की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वयात नैराश्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हापासून त्याला डिप्रेशन म्हटले जाऊ लागले.

पण डिप्रेशन, मेलनकोलिया असा हा शब्दगोंधळ दूर करण्यासाठी मनोविकारशास्त्राने नवीन शब्द शोधला. तो होता अ‍ॅफेक्टिव्ह डिसऑर्डर. याचे कारण कित्येक जण माझा मूड खराब आहे, मला निराश वाटते आहे असे म्हणत असतात. परंतु मनोविकारतज्ज्ञाने तपासणीअंती त्याला मानसिक ताण प्रचंड आहे, असे सांगणे आवश्यक आहे. तरच त्याला डिप्रेशन किंवा अ‍ॅफेक्टिव डिसऑर्डर म्हणता येईल.

ज्याप्रमाणे बरेचदा एखाद्याला अंगात कणकण आहे असे वाटत असते; पण डॉक्टरनी थर्मामीटरने मोजला असता त्याला ताप नसतो. तसंच मनोविकारशास्त्रात आहे. पण याविषयी लोकांना माहिती नसते. त्यामुळे लोक तपासणार कधी असं विचारतात. वास्तविक, शारिरीक तपासणी करावीच लागते; पण मानसोपचार तज्ज्ञ तुमच्याशी बोलतो तेव्हा तो तपासणीच करत असतो. त्यातून निदान केले जाते.

म्हणूनच याला अ‍ॅफेक्टीव्ह डिसऑर्डर म्हटले जाऊ लागले. हे स्पष्ट झाले तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु झाले. जगातील लोक त्याला मान्यता देऊ लागले. त्यामुळे डिप्रेशन हा शब्द समजून घेऊन वापरणे गरजेचे आहे.

सामान्यतः दोन प्रकारचे डिप्रेशन आढळून येतात. एक म्हणजे प्रतिक्रियात्मक उदासीनता. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, नापास होणे, अपेक्षाभंग होणे, दुःखद घटना घडणे, काही तरी गमावणे या सर्व घटनांनी आपल्याला शोक वाटत असतो. त्याला प्रतिक्रियात्मक नैराश्य म्हटले जाते.

दुसरा प्रकार म्हणजे कारणरहित उदासीनता किंवा नैराश्य. मेलनकोलीमध्ये ग्रीकांनी असाच सिंड्रोम वर्णन केला आहे. यामध्ये अंतर्गत रासायनिक बदलांमुळे उदास वाटू लागते. वरवरचे काहीही कारण दिसत नाही; पण त्या व्यक्तीला खरोखरीच उदास वाटत असते. ही मनोवस्था रुग्णाला आणि मनोविकारतज्ज्ञालाच समजू शकते. इतरांना ते कळत नाही.

त्यांना ती व्यक्ती उगाचच अशी वागते आहे, असे वाटतं. ती एक डिसऑर्डर असते. या मनस्थितीचे निदान करणे हा कळीचा मुद्दा असतो. यासाठी मनोविकारतज्ज्ञ प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्याला डिसऑर्डर म्हणजे काय याचा अभ्यास असावा लागतो. तरच त्याला ते कळू शकते. यासाठी रुग्णाबाबत सहअनुभुती, सहवेदना असाव्या लागतात. रूग्णाला दुःख होते आहे हे त्याला जाणवणे गरजेचे असते.

उदाहरणार्थ, एखादा चित्रपट पाहताना आपण रडतो. त्यावेळी नेमके काय घडते हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले नसले तरी मनोविकारतज्ज्ञ म्हणून मला तो अनुभव कळतो. दुसर्‍याला सहअनुभुती देता येणे ही एक व्यावसायिक क्षमता आहे. त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. अनुभव घ्यावा लागतो. त्या जोरावर याचे विश्लेषण केले जाते. या नैराश्याची कारणे शरीरांतर्गत असल्याने त्याला इन्डोजिनस डिप्रेशन असेही म्हटले जाते. आजवर मध्यमवयीन स्त्रियांमध्ये दिसणारे हे नैराश्य आता सर्व वयोगटामध्ये दिसू शकते; अगदी 9-10 वर्षाच्या मुलांमध्येही आढळू शकते. हे डिप्रेशन हे तीव्र स्वरूपाचे असते. रुग्णाला असे का होत आहे हे समजतही नाही.

साधारणपणे असे मानले जाते की, कमीत कमी दोन आठवड्यांसाठी सातत्याने एखाद्याचा मूड खराब असेल, तो दुःखी असेल तर त्याला डिप्रेशन किंवा नैराश्य आले आहे असे म्हणता येते. पण आपल्याकडे मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतच ‘उदासिनता’ जाणवत असल्याने कित्येकदा रुग्ण काही आठवडे-महिने उलटल्यानंतर आमच्याकडे येतात. वास्तविक, दोन आठवडे मूड खराब असेल तर डोक्यात घंटा वाजली पाहिजे. त्याचे निदान केले पाहिजे आणि उपचार घेतले पाहिजेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याविना उगाचच मनोविकार जडला आहे, डिप्रेशन आले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा आपल्याला कशातच रस वाटत नाही. उदाहरणार्थ, एखादी महिला म्हणते की मी चांगले मोदक केले पण चाखून पाहण्याची इच्छा झाली नाही. असे नीरस वाटणे आणि उदास वाटणे या दोन्ही गोष्टी सातत्याने 15 दिवस घडत असतील तर सदर व्यक्तीने तपासणी करून घेतली पाहिजे.

डिप्रेशन हा मानसिक त्रास होणारा विकार आहे असे आपल्याला वाटते. परंतु ते जैवरासायनिक बदल असल्यामुळे त्याची शारिरीक लक्षणेही दिसतात. उदाहरणार्थ, झोप. काही वेळा पेशंट सांगतो की मला खूपच झोप येते. सतत झोपतो, लोळतो. काही करत नाही; किंवा दुसरे टोक म्हणजे, मला झोपच लागत नाही किंवा पहाटेच जाग येते. त्यानंतर झोप लागत नाही, मी ताजातवाना नसतो. याला अर्ली मॉर्निंग इन्सोमेनिया म्हणतात. याखेरीज भूक लागत नाही, असेही काहीजण सांगतात. बरेचदा नीरसपणा वाटत असल्याने जेवणा-खाण्याची मजा येत नाही. याखेरीज नैराश्यात वेळ घालवण्यासाठी म्हणून काही वेळा लोक खूप खात राहातात. परिणामी, नैराश्यात काहींचे वजन कमी होते तर काहींचे वाढते. भूक वाढणे कमी होणे, अतिझोप किंवा झोप न येणे, पोट साफ न होणे, अंग दुखणे या इतर डिसऑर्डर येतात.

काही पन्नाशी-साठीचे रुग्ण सांगतात की, मुलगा दहा वर्षांचा असताना मी त्याला खूप मारले होते, त्याचा आता त्रास होतोय. ताक घुसळल्यावर लोणी वर येते तशा प्रकारे मनातील अपराधीभावना कालांतराने वर येते. हे सर्व वयोगटांमध्ये दिसते. राजकीय व्यक्ती, पोलिस अधिकारी या सर्वांमध्ये हा प्रकार दिसतो. शिक्षण, पद या कशाचाही मुलाहिजा या डिसऑर्डरला नाही. हृदयरोगतज्ज्ञाला हृदयविकाराने प्राण गमवावा लागल्याची उदाहरणे दिसतात तशाच प्रकारे मानसिक आरोग्याविषयी खूप माहिती असणारा मनोविकारतज्ज्ञही याला बळी पडू शकतो.

कारण तो स्वतःवर उपचार करू शकत नाही. म्हणूनच आपल्या मानसिक आजारांवर मात करण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची मदत घ्यावीच लागते. अनेक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणतात की, मला कळतंय काय झालंय मला. पण केवळ माहिती असण्याने समस्या सुटत नाहीत. कॉम्प्युटरकडे बरीच माहिती असूनही तो हँग होतोच ना ! तसेच हे आहे. माणूसही हँंग होतो. तेच ते विचार परत मनात येत राहातात. लोक सांगतात सकारात्मक विचार कर, फुलांकडे पहा, निसर्गात जा; पण रुग्ण म्हणतात की फुलांकडे पाहून मला छान वाटतच नाही.

थोडक्यात, असे सहज दिले जाणारे सल्ले अशा परिस्थितीत तोकडे पडतात. ज्याप्रमाणे गाडीत बिघाड झाला की ती गॅरेजमध्येच दुरूस्तीला घेऊन जाणे गरजेचे असते, तशाच प्रकारे मनोविकारांचे निदान करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत गरजेची असते. पूर्वी देवीचा रोग होत असे. त्यावेळी ढोल वाजवायचे, पाणी टाकायचे हे सर्व मी डोळ्यांनी पाहिले आहे. त्यावेळी देवीचा रोग हा रोगाणूंमुळे होते हे माहित नव्हते. नैराश्याचेही तसेच आहे. त्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तज्ज्ञाची मदत आवश्यक आहे. अन्यथा समस्येचे निराकरण होत नाही.

नैराश्याची स्थिती दीर्घ काळ राहिली तर टोकाचे विचार मनात येऊ लागतात. आत्महत्या करणार्‍या व्यक्तीला नैराश्य असतेच; परंतू नैराश्य असणारी प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करते असे नाही. ‘ऑल जंक्शन्स आर स्टेशन्स पण ऑल द स्टेशन्स आर नॉट जंक्शन’ असा त्यामागचा विचार आहे.

हे झाले नैराश्याचे, डिप्रेशनचे शास्रीय विश्लेषण. काही वर्षांपूर्वी नैराश्याने ग्रस्त असणार्‍यांचे प्रमाण पाच टक्के होेते. आता ते 10 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हा एक सामान्य आजार आहे आणि त्यावर उपचार उपलब्ध आहे. पण त्याविषयी लोकांना माहिती नसल्यामुळे गुंतागुंत वाढत जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 4 पैकी एका व्यक्तीला म्हणजेच 25 टक्के लोकसंख्येला मानसिक तणावांमुळे उपचाराची गरज भासणार आहे. मी शिकत होतो तेव्हा हे प्रमाण 15 टक्के होते. आज कोरोनाच्या काळाचा विचार केला, अशा साथींचा लोकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. वास्तविक, ही बाह्य कारके असतात; पण आज त्यांचेच प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोनापश्चातच्या काळात चारपैकी दोन व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार आजघडीला 30 टक्के लोकसंख्या ही डिप्रेशन किंवा नैराश्यग्रस्त आहे. हे नैराश्य प्रतिक्रियात्मक नैराश्य आहे. अशी शक्यता आहे की यातील काहींमध्ये जैवरासायनिक बदल आधीपासून झालेले होते. तशातच ही आपत्ती आल्यामुळे त्यांना नैराश्याने ग्रासले.

याव्यतिरिक्त चिंता, भीती, ओसीडी यांनी ग्रस्त असणार्‍यांची संख्या मोठी आहे. आपल्याला खूप मोठा आजार होईल अशी भीती बाळगणारे अनेक जण आज आढळतात. या सर्वांवर कोण उपचार करणार, कसे करणार, काय करणार, त्यांना औषधे कोण देणार, त्यासाठीचा खर्च कोण उचलणार या सर्वांबाबत अस्पष्टताच आहे. तशातच आपल्याकडे तज्ज्ञांची कमतरता आहे. दुसरीकडे डॉक्टरना कल्पना असली तरीही रूग्णाने ते मान्य केले पाहिजे. कोव्हिडच्या बाबतीत सर्वच जण व्हल्नरेबल आहेत. वास्तविक आपल्याकडे मृत्यूदर कमी आहे. पण माध्यमांमधून सतत प्रसारित होणार्‍या बातम्यांमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोनाकाळाचे परिणाम पुढील काही वर्षे भोगावे लागू शकतात. विशेषतः मानसिक तणाव यामुळे वाढत जाणार असून तो खर्‍या अर्थाने कळीचा मुद्दा आहे.

मनात उदास वाटत असताना, विफलतेचे कढ येत असताना अगदी एकटं एकटं वाटत असताना उबदार प्रेमाच्या आधाराची गरज असते. त्या आधारामुळे नैराश्य मावळत नसले तरी औदासीन्याच्या वेदना हलक्या होतात. नैराश्याची लक्षणं सुसह्य होतात. यासाठी, जादूचे किंवा परवलीचे अंतिम शब्द नाहीत; पण हळुवारपणे घडलेला स्पर्श, पाठीवरून फिरवलेला हात खूप आश्वासक वाटतो. दु:खाच्या यातायातीत आपण एकटे नाही, हा विचार मनाला आधार देतो. त्यासाठी आधार देणा-या व्यक्तीमध्ये सहअनुकंपा म्हणजे एम्पथी असणे गरजेचे असते. आधार देणे म्हणजे सतत त्या व्यक्तीबरोबर असणे नव्हे. अनेकदा आपला सहवास नैराश्यग्रस्त व्यक्तीला सहन होत नाही. म्हणून त्यांना त्यांचा अवकाश द्या. विशेषत: पुरुष रुग्णांना त्याची जास्त गरज भासते. नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये रोजच्या साधारण गोष्टीही उरकण्याची ऊर्जा नसते. अशा वेळी ‘अंघोळ कर’, ‘कपडे बदल’ असे सारखे सुचवू नये. नैराश्यग्रस्त व्यक्ती संध्याकाळी अधिक अँक्टिव्ह होतात. त्यावेळी त्यांना रोजच्या गोष्टी करू द्याव्या. साधारणपणे गप्पागोष्टी करणे, लोकांमध्ये मिसळणे यामुळे सामान्य व्यक्तींना हलके वाटते. त्यामुळे आपण ते नैराश्यग्रस्तांना पुन्हा पुन्हा सुचवत राहतो. पण नैराश्यग्रस्त व्यक्तींना याचेच दडपण येते. आपण इतरांसारखे थट्टाविनोद करीत गप्पा मारू शकत नाही, याचे वैषम्य वाटत असते म्हणूनच ते इतरांना टाळतात. म्हणूनच त्यांना काही गोष्टी सुचवाव्यात; पण मागे लागू नये. नैराश्यग्रस्तता हा मनोविकार आहे. नैराश्यग्रस्त व्यक्तींना आपण कमकुवत असल्याची लाज वाटते, हा मनाचा कमकुवतपणा नसून विकारग्रस्ततेचं लक्षण आहे हे स्पष्ट शब्दांत थोडक्यात सांगावे. नैराश्यग्रस्त व्यक्तींना प्रयत्न करायचे असतात; पण करण्याची ऊर्जा नसते. त्यामुळे त्यांच्यापुढे अगदी सहजसाध्य उद्दिष्ट ठेवून ती पार करायला मदत करावी. नैराश्यग्रस्ततेमुळे अनेकदा, उपचारानं आपण बरे होऊ शकतो, यावर रुग्णांचा विश्वास नसतो. मग औषधोपचाराची टाळाटाळ होते. अशा वेळा प्रसन्नपणे हाताळाव्या. ‘डिप्रेशन’ हा औषधोपचार, कुटुंबीयांचा आधार आणि नियमित मानसोपचारानं बरा होणारा विकार आहे. डॉक्टरांच्या मदतीने उपचारांचा स्वीकार म्हणजे अर्धी लढई जिंकण्यासारखे असते.

वैयक्तिक पातळीवर तणावाच्या समस्येवर मात करण्यासाठी म्हणजेच सकारात्मक राहाण्याच्या दृष्टीने पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

1) शारिरीक व्यायाम ः केवळ शारिरीक तंदुरूस्ती किंवा फिटनेसच्या दृष्टीनेच नव्हे तर मानसिक तंदुरूस्तीसाठीही शारिरीक व्यायामाचे महत्त्व आहे. व्यायाम कोणता करायचा ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट असावी. आपल्या क्षमतेनुसार, प्रकृतीनुसार, वयानुसार आणि आवडीनुसार एरोबिक्स, चालणे, योगासने, जिम एक्सरसाईज असा कोणताही व्यायाम करावा.

2) आहार ः व्यायामाबरोबरच आपण घेत असलेला आहारही शरीरारोग्य आणि मनारोग्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे चुकीचा आहार घेऊ नका. सकस, पौष्टिक, सत्वयुक्त आहार आनंदाने सेवन करा.

3) माईंडफुलनेस ः नकारात्मक विचार हे भविष्यासाठी असतात. पण जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा माईंडफुलनेस महत्त्वाचा असतो. हा माझा नियम आहे. हे मी मनोविकारतज्ज्ञांनाही सांगतो, शिकवतो. याला मनाचे पूर्ण भान राखणे असे म्हणतात.

4) संवाद ः आपल्या बरोबरचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सर्वांशी जोडले जाणे, है नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. प्रत्यक्ष भेटू शकत नसाल तर व्हर्चुअल भेटणं, बोलणं आणि संवाद साधत राहणं गरजेचं आहे.

5) सोशल मीडिया ः समाज माध्यमांवर येणारी नकारात्मक माहिती फॉरवर्ड न करता तिथल्या तिथे डिलीट केली पाहिजे. कारण त्यामुळे निर्माण होणारी भीती, धसका हा मोठा असू शकतो. नकारात्मक विचारांमुळे सातत्याने ताणतणाव जाणवत असतो. यामुळे आपली इम्युनिटी कमी होते. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना भान असणे गरजेचे आहे.

थोडक्यात, मन शांत राहण्यासाठी सर्व त्या गोष्टी आपण करत राहिले पाहिजे. आपण जे काम करत आहोत त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. तसेच ज्या गोष्टीने मनाला बरे वाटते आहे, मन शांत राहू शकते, मनाला उभारी येते, आत्मविश्वास वाटतो अशी एखादी गोष्ट नियमाने करत रहा. त्यासाठी वेळ काढा. स्वत:साठी वेळ काढणे आणि आयुष्याबाबत तटस्थपणे विचार करणे हे सर्वात महत्त्वाचे. रोजच्या रोज मनातील वाईट घटनांचा गाळ काढून टाकला तर ताणाचे व त्यातून येणार्‍या निराशेचेही परिणाम कमी होत जातात.

(शब्दांकन : अंजली महाजन)

- Advertisment -

ताज्या बातम्या