ज्ञानसंपन्न पिढी घडवायची तर...

ज्ञानसंपन्न पिढी घडवायची तर...

- शं.ना.नवलगुंदकर, माजी उपकुलगुरू, पुणे विद्यापीठ

गेल्या काही वर्षांत शिक्षणापासून ‘ज्ञान’ बाजूला गेलं आहे आणि ‘परीक्षा’ केंद्रस्थानी आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामध्ये पालकांची व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

शैक्षणिक प्रगतीसोबत विद्यार्थ्यांच्या चारित्र्याचा व सांस्कृतिक मूल्यांचाही विचार केला गेला पाहिजे. मुलांना जीवनातील पुढील स्पर्धेसाठी त्यांना तयार करणंही आवश्यक आहे. तरच एक सक्षम, बुद्धिमान व संस्कारशील पिढी निर्माण होईल.

शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट ‘ज्ञान’ हे आहे. मात्र सध्याची शिक्षणपद्धती या मूळ उद्दिष्टांपासून फार दूर गेली आहे. कारण सध्या शिक्षणाचं उद्दिष्ट परिक्षा आणि गुण एवढेच राहिले आहे. शिक्षणाशी निगडित असणारे पाचही घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, सरकार आणि पालक सारेजण परिक्षेच्या गुणांवरूनच विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरवतात. कोणत्या शाळेचा अथवा महाविद्यालयाचा निकाल अधिक चांगला ती शाळा व महाविद्यालय अधिक उत्तम अशी मानसिकता सर्वांच्याच मनात रूढ झालेली आहे. यामध्ये ‘ज्ञान’ बाजूला गेले आणि ‘परिक्षा’ केंद्रस्थानी आली.

हे सर्व चित्र बदलायचे असेल तर वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न व्हावेत. शिक्षकांची मानसिकता बदलली पाहिजे. वर्गात शिकवताना त्यांची मानसिकता ही ‘ज्ञानकेंद्रीत’ असली पाहिजे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात होणार्‍या परिवर्तनामध्ये शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांंनी ज्ञान संक्रमित केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वत: ज्ञान वाढवण्यासाठी भरपूर वाचन केलं पाहिजे. केवळ पाठ्यपुस्तकातले पाठ शिकवून ज्ञानाचे संक्रमण खर्‍या अर्थाने होत नाही तर विद्यार्थी खर्‍या अर्थाने ज्ञानसंपन्न होण्यासाठी त्यांना व्यावहारिक ज्ञान ही आलं पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चारित्र्याचा विचारही ज्ञानदानाबरोबर केला गेला पाहिजे. ज्याला आपण इंग्रजीत ‘कॅरेक्टर पॉर्मेशन’ म्हणतो. ते चारित्र्य घडवण्याची सुरुवात शालेय जीवनापासून होणं गरजेचे आहे.

या सर्व गोेष्टींचा उहापोह करताना मूल्यशिक्षणाचा विचार येतो. अलिकडे सरकार मूल्य शिक्षणावर अधिक भर देत आहे. ही बाब चांगली आहे. मात्र यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होणं महत्त्वाचं आहे. त्यापैकी एक म्हणजे शास्त्रीय विचार व मूल्ये विद्यार्थ्यांच्या वृत्तीत आली पाहिजेत आणि दुसरे म्हणजे खोट्या रुढी, अंधश्रद्धा, परंपरा यांना धक्का देणारी वृत्ती जोपासली गेली पाहिजे. जेणेकरून एक प्रगल्भ विचारांची शास्त्र व तंत्रज्ञान खर्‍या अर्थानं जाणणारी पिढी निर्माण होईल.

मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीचा प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण देशाच्या, समाजाच्या प्रगतीत ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या बघता, एकाच वेळी ही गोष्ट एका शिक्षकाला करता येणार नाही. पण यातून मार्ग नक्कीच काढता येईल. ज्यांना इच्छा आहे, ऐकून घेण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा एकत्र करावे. त्यांना चांगली चरित्रात्मक पुस्तके वाचून दाखवावीत. लहान लहान चर्चा घडवून आणाव्यात. त्यामुळे मुले चौफेर विचार करायला शिकतील. आजच्या मुलांकडे परिस्थितीजन्य बुद्धिमत्ता नक्कीच आहे. मी लहान असताना टेलिफोन केवळ लांबूनच बघितला होता. आजच्या मुलांना मात्र मोबाईल फोनही सहजपणे हाताळता येतात. त्यातली माहिती त्यांना भरपूर असते. म्हणूनच अशा बुद्धिमान मुलांवर संस्कारक्षम शिक्षणासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. ही मुले कुठलीही गोष्ट चटकन आत्मसात करतात. म्हणूनच ते चांगले संस्कारही नक्कीच आत्मसात करतील. ही सुरूवात आई-वडिलांपासून झाली पाहिजे. घराबरोबरच ही जबाबदारी शाळेची अर्थातच शिक्षकांचीही आहे. विद्यार्थ्यांना ज्या विषयाची आवड आहे. त्यात त्याने उंची प्राप्त जरूर करावी मात्र त्याचबरोबर त्याला बाकीच्या विषयांचीही थोडी थोडी माहिती असावी.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे इंग्रजी माध्यमांचे आग्रह मोठ्या प्रमाणात धरला जात आहे. ग्रामीण भागातील किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांच्या भोवतालचे वातावरण, त्यांची आकलनशक्ती या सर्वांचा विचार करता इंग्रजी माध्यमातील विषयांचा आशय समजणे आणि भाषा समजणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. ही अडचण दूर होण्यासाठी काही विषय मराठी तर काही विषय इंग्रजी विषयातून शिकवणे आवश्यक आहे. बरेचदा अभ्यासक्रमातील विषय आणि बोलीभाषा यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. इंग्रजी शाळांबाबतचे असणारे आकर्षण कमी करण्यासाठी मिश्र व्यवस्था आणणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. इंग्रजीचे वाढलेले आकर्षण हा शैक्षणिक व्यवस्थेचा पराभवच म्हणायला हवा. पण इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पालकच अधिक पसंती देताना दिसतात. मराठी माध्यमांच्या शाळांबाबत काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. माध्यम इंग्रजी असावं की मराठी हा बराच वादाचा मुद्दा आहे. पण माझ्या मते गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून असावे आणि बाकीचे विषय मराठीतून असावेत. कारण सगळे विषय इंग्रजीतून आणले तर मुलांची अनेक दृष्टीने अडचण होणार आहे. यामुळे भाषेवर अधिक लक्ष दिले जाईल आणि आशयावर कमी लक्ष दिलं जाईल. उदा. भूगोल हा विषय घेतला तर तो शिकताना इंग्रजीवर अधिक लक्ष दिलं जाईल आणि त्यातील आशयाकडे मात्र कमी लक्ष दिलं जाईल. इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे विद्यार्थी भूगोलात कमी पडेल. म्हणून मला वाटते शिक्षणाचे माध्यम हे ‘मिश्र’ असावे.

आज विज्ञानाने विलक्षण प्रगती केलेली आहे. आपल्या बुद्धिमान विद्यार्थी-विद्यार्थीनींसमोर ते विज्ञान आले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसमोर संगणक किंवा त्याच्याशी निगडीत असणारे विषय कुठल्याही परिस्थितीत येणे आवश्यक आहेे. ग्रामीण भागात सर्व पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा यांचा समावेश झाला पाहिजे. हे सगळे करत असताना शिक्षण ‘तत्व’ म्हणून आणि शिक्षण ‘व्यवहार’ म्हणून या दोन्ही गोष्टींचा समन्वय केला पाहिजे. व्यवहार अशा अर्थाने की आपण तत्व शिकतो, पण त्याचे व्यवहारात उपयोजन कसे करायचे असते हे आपल्याला माहितीच असते असे नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीला अकौंटन्सी कळत असते; पण बँकींगमध्ये प्रत्यक्ष व्यवहार कसा चालतो हे त्याला कळतेच असे नाही. तर असा व्यवहार निर्माण होणे, शिक्षण क्षेत्रातून तो विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.

आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, आपण भौतिकदृष्टीने खूप मोठी प्रगती केली, त्यातून आपल्यावर जे खूप मोठे संस्कार झालेले आहेत ते पदार्थमात्रावरचे आहेत. पण आपल्या मनावर जीवनमूल्यांचे संस्कार झाले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे निर्माण झालेली जीवनमूल्ये ही शिक्षणक्षेत्रात आली पाहिजेत. आता ही मूल्ये आहेत पण प्रत्यक्षात त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे ‘समाज आणि मी’ याचा काहीतरी संबंध आहे, समाजाचा मी घटक आहे आणि त्यामुळे समाजाबद्दलची कृतज्ञता माझ्या मनात असली पाहिजे, हा संस्कार आपण विद्यार्थी-विद्यार्थीनींपर्यंत पोहोचवला पाहिजे. पण सध्या याच्या अगदी उलटे चित्र समाजात दिसत आहे. आताच्या घटकेला घराघरातील मुलामुलींपर्यंत पोहोचणारा संदेश म्हणजे, ‘तुझ्या पुरते तू बघ’, ‘तुला बाकीच्यांचे काय करायचे आहे’ असा विचार रुजविणे बरोबर नाही. कुठल्याही परिस्थितीत माणूस हा समाजाचा घटक म्हणूनच असतो, हे मुलांच्या मनावर बिंबविले गेले पाहिजे. या पद्धतीची जी जीवनमूल्ये आहेत ती मुलांच्या मनावर ठसवली गेली तर त्यातून आदर्श समाजनिर्मिती होऊ शकेल.

आपल्याकडे पाश्चिमात्य विचारांचा जो प्रभाव आलेला आहे त्यातील चांगल्या गोष्टी नक्कीच घ्याव्यात; मात्र चांगल्या नसलेल्या गोष्टी टाकून द्याव्यात. पश्चिमेकडे तीन विचार प्रामुख्याने विकसित झालेत. त्यापैकी एक म्हणजे व्यक्तीवाद, यामध्ये व्यक्तीला स्वतःबद्दल कळते, त्यामुळे त्याला त्याच्या पद्धतीने जीवन जगू द्यावे, समाजाने त्यात हस्तक्षेप करू नये असा एक विचार आला. दुसरा विचार उपयुक्ततावाद, म्हणजे जोपर्यंत वस्तूचा उपयोग आहे तोपर्यंत ती ठेऊन घ्यावी आणि उपयोग संपल्यानंतर ती टाकून द्यावी, असा विचार आला. आणि तिसरा म्हणजे जडवाद, याचा अर्थ वस्तू हेच आनंदाचा विषय आहे त्यामुळे वस्तूंची प्रगती आमच्या जीवनात महत्त्वाची असली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. हे तीन विचार टोकाला गेले आणि त्यानंतर अडचणीत आले. ते अशा अर्थाने की, लॉर्ड मेकॅलोचे स्वप्न होते की, भारतीय समाज हा रक्ताने भारतीय आणि विचाराने पश्चिमी निर्माण करू. त्यामुळे आपल्याकडील तरुण मुलामुलींच्या मनावर हा टोकाचा विचार येता कामा नये. कारण या विचारामुळे समाजाची घडी विस्कटू शकते.

उपयुक्ततावादाबाबत विचार करायचा झाल्यास वस्तूची उपयुक्तता आहे तोपर्यंत ती वापरणे हे वस्तूच्या बाबतीत ठीक आहे परंतु हे माणसाच्या बाबतीत बरोबर नाही. म्हणजे आई-वडील उपयोगी आहेत तोपर्यंत ठेऊन घ्यावेत आणि त्यांचा उपयोग संपल्यानंतर टाकून द्यावेत, ही जी कल्पना आपल्याकडे काही प्रमाणात आलेला आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याकडे येता कामा नये. माणूस म्हणून जगण्याची जी कल्पना आपल्याकडे निर्माण केलेली आहे, आपल्या पूर्वजांनी ही अतिशय सुरेख पद्धतीने मांडलेली आहे. तीच मुलामुलींच्या मनात रुजविली गेली पाहिजे. आताची मुले-मुली खरोखरच खूप बुद्धीमान आहेत. त्यांच्यावर हा संस्कार जर आपण केला तर राज्य, देश नक्कीच खूप पुढे जाईल.

बौद्धिक क्षेत्रात भारत जगावर स्वामित्व मिळवेल, हे स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भाकीत होतेे. पण याबरोबरच सांस्कृतिक मूल्यांच्या क्षेत्रातही आपण जगावर स्वामित्व मिळविले पाहिजे. हा विषय आपण घेतला तर दोन्हींच्या एकत्रिकरणातून आपण देश सगळ्यात पुढे घेऊन जाऊ, हे आताचे चित्र आहे. हे साध्य होण्यासाठी सरकारने शिक्षणाला प्राथमिकता दिली पाहिजे. ती अशा अर्थाने की, प्रत्येक ठिकाणी शाळेच्या उत्तम इमारती आहेत, उत्तम क्रीडांगण उपलब्ध आहे, प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय उपलब्ध असावेत. शिक्षकांच्या नेमणुका या बुद्धिमत्तेनुसार झाल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींसाठी शासनाने मदत केली पाहिजे. तर आपोआपच आपल्याला अपेक्षित असणारे परिवर्तन होईल.

शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आपण विद्यार्थ्यांना एक विशिष्ट अभ्यासक्रम शिकवितो; पण त्याचबरोबर अवांतर वाचन देखील शिकविले पाहिजे. त्यातून संस्कार होत असतात. त्या संस्कारातून आपोआपच आपण पुढे जाऊ शकतो. वर्तमान परिस्थितीत आपल्याकडे बुद्धिमान युवाशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. पण या युवाशक्तीच्या मनात एक पोकळी आहे की, आपला भविष्यकाळ काय असेल, भविष्यकाळाबद्दल काही सांगता येत नाही, असे बरेचदा त्यांना वाटते. ही पोकळी भरून काढण्यासाठी ते हॉटेलिंग किंवा तत्सम कृती करतात. इकडे-तिकडे भटकतात. हे कुठेतरी आपल्याला थांबविले पाहिजे. म्हणूनच आपला भविष्यकाळ समृद्ध स्वरुपाचा आहे, असा विश्वास तरुणांच्या मनात आपण दिला पाहिजे. सद्यस्थितीत बुद्धी पुढे गेलेली आहे, पण भावना आणि शरीर मागे राहिलेले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मनाने भक्कम करणे गरजेचे आहे. मन खंबीर राहण्यासाठी शरीर समृद्ध असले पाहिजे. त्यासाठी मैदाने, खेळाची साधने या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींची उपलब्धतता करून देणे आणि त्यातून एक संस्कारीत, विचाराने आणि कृतीने समृद्ध असा समाज निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com