Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedयंत्रांवर विश्वास वाढवणारे दिवस

यंत्रांवर विश्वास वाढवणारे दिवस

कोविडच्या प्रसारामुळे भारतात अनेक समस्या उभ्या ठाकल्या असताना, त्यांचे निराकरणही तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच होऊ शकेल. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच शारीरिक अंतराची अट सर्वत्र लागू झाली असताना यंत्रे मात्र एकमेकांशी कमीत कमी संपर्क साधून अधिक उत्पादन करू शकतात. त्यामुळे यंत्रमानव आणि स्वयंचलित यंत्रांच्या मागणीत वाढ झाली असून, ही तेजी कायम राहण्याचे संकेत आहेत. यंत्रांवरील विश्वास वाढला असून, या बदलामुळे काही फायदे होणार असले तरी काही तोटेही संभवतात आणि अनेकांना रोजगार कायमचा गमवावा लागू शकतो.

बंगळुरू शहरात दुसर्‍यांदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला त्याच्या एकच दिवस आधी म्हणजे 13 जुलै रोजी उद्योगपतींनी अन्य अधिकार्‍यांच्या समवेत राज्याच्या मुख्य सचिवांना विनंती केली होती की, कारखाने सुरू ठेवण्याची अनुमती दिली गेली पाहिजे. कारखाना सुरू करणे, बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि अवघड असल्याचे उद्योगपतींचे म्हणणे होते. लॉकडाउन एखाद्या आठवड्यापुरता असला, तरी जी समस्या यातून उद्भवते, ती टाळता येत नाही. अनेक कंपन्यांचे तीन-तीन प्लान्ट बंगळुरू शहरात सुरू आहेत. अखेर कर्नाटक सरकारने कारखाने सुरू ठेवण्यास अनुमती दिली; पण उद्योग जगतातील धुरिणांच्या मनात ‘स्टॉप अँड स्टार्ट’ प्रक्रियेची भीती घर करून राहिली आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे भारतीय कारखान्यांमधील स्वयंचलित यंत्रांची गरज अधोरेखित केली आहे. काही उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, एखादा साथरोग आल्यास आम्ही आमचे कारखाने कसे चालविणार? दूरवरून कंपनीच्या कामावर देखरेख ठेवणे आणि अशा काळातही 70 टक्के क्षमतेने काम सुरू ठेवणे शक्य आहे का, याचा आम्ही विचार करीत आहोत. त्यासाठी शारीरिक श्रमांवरील अवलंबित्व आम्हाला हळूहळू कमी केले पाहिजे. त्यामुळे उद्योजकांची पुढील टप्प्यावर होणारी गुंतवणूक स्वयंचलित यंत्रांवर अधिक असेल, असा अंदाज आहे.

शारीरिक अंतर राखण्याचा नियम देशभरात लागू आहे आणि यंत्रे मात्र एकमेकांच्या कमीत कमी संपर्कात राहून काम सुरू ठेवू शकतात. स्वयंचलित यंत्रसामग्री आणि अन्य यंत्रणांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली असून, हा एक सुखद धक्का आहे. यंत्रमानवांची निर्मिती करणार्‍या युनिव्हर्सल रोबोट्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणार्‍या कंपन्यांकडून रोबोट्ससाठी केल्या जाणार्‍या विचारणेत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. स्वयंचलित आरोग्यविषयक उपकरणांबाबत होणारी विचारणा तब्बल 50 टक्क्यांनी वाढली आहे. सर्व्हिस रोबोट्स तयार करणार्‍या मिलग्रो ह्यूमनटेक या कंपनीच्या म्हणण्यानुसार, रोबोटिक व्हॅक्युम क्लीनरच्या युनिट्सची विक्री एप्रिल ते जून या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 400 टक्के वाढली आहे.

सॉफ्टवेअरच्या आघाडीवर पाहिल्यास असे दिसते की, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांकडून ऑटोमेशनसंबंधी विचारणा होण्याचे प्रमाण तीन ते चार पटींनी वाढल्याचे आयबीएम या कंपनीने म्हटले आहे. मॅकेन्जी ग्लोबल इन्स्टिट्यूटमधील (एमजीआय) तज्ज्ञांच्या मते, हिशेब, व्यावसायिक प्रक्रिया, पेमेन्ट प्रक्रिया आणि मनुष्यबळ (एचआर) यांसारख्या ‘बॅक ऑफ द शॉप’ कामांमध्ये ऑटोमेशनची मागणी पहिल्यापासून होतीच. परंतु आता ‘फ्रंट ऑफ द शॉप’ श्रेणीतील कामांसाठीही ऑटोमेशनची मागणी वाढत चालली आहे. अशा कामांमध्ये विक्री, विपणन आणि विशेष श्रेणीतील अन्य अनेक कामांचा समावेश होतो. ज्या कामांत ज्ञान आणि तज्ज्ञता यांची गरज काहीशी कमी असते, अशा कामांसाठी ऑटोमेशनची मागणी वाढत आहे.

एमजीआय या संस्थेने 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले होते की, भारतात 2030 पर्यंत 4.40 कोटी पुरुषांना आणि 1.20 कोटी महिलांना तंत्रज्ञानामुळे नोकरी गमवावी लागू शकते. स्वयंचलित यंत्रसामग्रीच्या साह्याने सोनेरी भविष्य खुणावत आहे आणि ते महत्त्वाचे आहे; परंतु त्यामुळे अऩेक महत्त्वाचे प्रश्नही निर्माण होत आहेत. भारत यापुढे वेदनादायी अशा एका संक्रमणकाळातून वाटचाल करणार आहे. या कालावधीत तंत्रसंपन्न नोकर्‍यांमध्ये उच्च कौशल्य आणि मनुष्यबळ विकसित करण्याची गरज भासणार आहे. भारताच्या विशाल लोकसंख्येकडे पाहिले असता, हे किती शक्य होईल हा प्रश्नच आहे. काही उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, हा असा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर अद्याप हवेतच आहे. या मुद्द्यावर प्रत्येक सरकारी मंचावर आणि औद्योगिक मंचावर होत असते. लोक या मुद्द्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. काही जणांची दृष्टी सकारात्मक आहे तर काही जणांची नकारात्मक आहे. योजना तयार करण्याऐवजी आपल्याला आता थेट काम सुरू करावे लागेल, असे काही उद्योजकांचे म्हणणे आहे.

भारतात काही अतिस्वयंचलित, स्मार्ट उद्योग आधीपासूनच अस्तित्वात आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी अशा प्रकारच्या ग्रीनफील्ड यंत्रणेवर मोठी गुंतवणूक केली आहे. माहिती तंत्रज्ञानाबरोबर परिचालन तंत्रज्ञानाचे एकसूत्रीकरण करण्यावर काम सुरू आहे. हे उद्योग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे स्मार्ट सेन्सर, सहकारी रोबोट, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्लाउड कॉम्प्युटिंग, मानव-यंत्र यांचे एकीकरण, थ्री-डी प्रिंटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांत चांगले काम करीत आहेत. उत्पादकता वाढविण्यात ही सर्व साधने महत्त्वपूर्ण ठरू शकतात. अनेक उपक्रम राबविण्यात आले असूनसुद्धा रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत जगात 11 व्या स्थानी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या आकडेवारीवरून दिसून येते की, 2018 मध्ये भारताने 5000 युनिट यंत्रमानव किंवा स्वयंचलित यंत्रे प्रस्थापित केली होती. या तुलनेत चीनने त्यावर्षी 1,54,000 यंत्रमानव तर जपानने 55,000 यंत्रमानव युनिट्स स्थापन केली होती. मोठ्या कंपन्यांमध्ये आधुनिकीकरणाचा स्वीकार केला जाणे शक्य आहे; मात्र छोट्या आणि मध्यम कंपन्यांना यावरील गुंतवणूक तूर्तास परवडणारी नाही. छोट्या उद्योगांमध्ये आधुनिकीकरण करायचे झाल्यास कमी किमतीत मिळणार्‍या स्वयंचलित यंत्रांची आणि यंत्रणांची गरज भासेल.

गुरुग्राममधील एका कार्यालयात अभिनेत्री जूलिया रॉबर्टस् आणि अभिनेता लिओनार्दो डी कॅप्रियो यांच्या नावावर अनुक्रमे रोबोजूलिया आणि रोबोडीकॅप्रियो हे ह्यूमनॉइड्स तैनात करण्यात आले आहेत. जूलिया ही 5.25 फूट उंचीची रेस्टॉरंट डिलिव्हरी रोबोट आहे तर रोबोडीकॅप्रियो हा पाहुण्यांना अभिवादन करतो आणि मार्गही दाखवितो. या कंपनीचे संस्थापक म्हणतात की, रोबोटिक तंत्रज्ञानाकडे मनुष्याप्रमाणेच पाहावे लागेल. अर्थात रोबोटिक्समधील संशोधन आताही प्राथमिक स्तरावरच आहे. सुमारे वर्षभरापूर्वी इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांचा वापर सुरू झाला. ही यंत्रे दुर्घटनाग्रस्त गाडीची छायाचित्रे पाहून नुकसानीच्या रकमेचा अंदाज बांधतात. या यंत्रांमुळे अपघातस्थळी जाऊन पाहणी करण्याची गरज संपुष्टात आली आहे. ग्राहकाकडून गाडीची अनेक छायाचित्रे एका विशिष्ट वेबसाइटवर अपलोड केली जातात आणि मग रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रे नुकसानीचा अचूक अंदाज बांधून विम्याची किती रक्कम द्यायची हे तातडीने सांगतात. रोबोटिक्सचा अधिकाधिक वापर सुरू झाल्यानंतर व्यवस्थापकीय अधिकार्‍यांची संख्याही कमीच लागेल आणि कष्टकर्‍यांची संख्याही कमीच होईल. घरगुती कामांमध्ये जर रोबोटिक्सचा वापर वाढला तर घरगुती नोकरांच्या लाखो नोकर्‍या संपुष्टात येऊ शकतात. काही नवीन नोकर्‍या निर्माण होतीलही; परंतु गेलेल्या नोकर्‍यांची भरपाई त्यातून होईल याची खात्री नाही. स्वयंचलित यंत्रांच्या वापराचे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. परंतु जर नुकसानीपासून आपल्याला बचाव करून घ्यायचा असेल तर सरकारची जबाबदारी वाढते.

अनेक मानवी कामे आता स्वयंचलित यंत्रे करतात. आगामी काही महिन्यांत पिक अँड प्लेस म्हणजेच मानवी बळाच्या आधारे वजन उचलणे आणि ठेवणे अशी कामेही स्वयंचलित यंत्रे करू लागतील. अनेक कंपन्या आता कमी खर्चाच्या यंत्रमानवांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. ज्या लाइनवर पाच लोक एका तासात 100 पार्ट तयार करतात, त्या लाइनवर स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने पाच व्यक्तींच्या मदतीने एका तासात 120 पार्ट तयार करण्यात येतात. एका शिफ्टमध्ये दोन श्रमिकांची बचत झाल्यास तीन शिफ्टमध्ये सहा श्रमिकांच्या पगाराची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे उत्पादनात मानवी चुकांमुळे होणार्‍या त्रुटी 50 टक्क्यांनी कमी होतील. कोविडच्या साथीमुळे श्रमिक वर्ग कामावर येण्यास नाखूष असताना आधुनिकीकरणाला बळ मिळू शकते आणि अधिकाधिक कंपन्या स्वयंचलित यंत्रे आणि यंत्रमानवांचा वापर सुरू करू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या