Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमानाच कडं

मानाच कडं

आदिनाथ एन. सुतार,

चैत्राचे दिवस चालू होते. दिवसा उन्हात तापलेल्या शिवारावर सांजवेळी पानमळ्यातला गारवा फुंकार घालायचा अन् शिवार फुलवायचा. दुपारच्या उन्हात गाव म्हसणवाट्यागत वाटायचा.

- Advertisement -

सगळीकडे चिडीचीप. रानमळ्यामध्ये पीकपाणी नसल्याने ते बोडखे नंबरचे नंबर दिसायचे. उन्हाच्या कार्‍हात जीतराबं झाडाखाली पायात डोके घालून झोपलेले असायचे.

गावच्या दक्षिण उत्तराला केरबा शेती होती. शेतात पिकपाणी नव्हतं. सगळ वावर चंपी केल्यागत वाटायचं. शेताच्या मध्यभागी असलेल्या झोपडीत केरबा विचार करत बसला होता. गावच्या खंडोबाची यात्रा असल्यामुळे यात्रेतील ढोलताशाच्या आवाजाने केरबाचं चित्त ढाळत होतं. सारखा कानात आवाज घुमायचा. केरबाला दोन पोरं होती. थोरला लखुजी व धाकला माधव.

माधव बीए होऊन दोन वर्ष झाली होती. केरबा एकटाच झोपडीत विचार करण्यात गढून गेला होता. त्यानं आल्या आल्या माठातलं गार पाणी घेतले व तिथच शांत बसला. केरबानं माधवला सांगितलं, ‘आर माधा? उद्याच्याला जहागीरदार आपल्या जितराबाच्या जप्तीला येणार काय? त्यांच्या कर्जाचं पाहायला पाहिजे.’

माधवला काहीच सुचत नव्हतं. पैसे यायला जागा नव्हती. तो डोक्याला हात लाऊन बसला होता. त्याची मती गुंग झाली होती. तेवढ्यात लखुजी नांगर सोडून सरदार-दिलदारला घेऊन झोपडीजवळ आला. त्यानं बैल दावणीला बांधली अन तोही झोपडीत शिरला. झोपडीत केरबा माधवला जहागीरदाराच्या कर्जाविषयी सांगत होता. ते लखुजी लक्ष वेधून ऐकत होता. शेतपाणी न पिकल्याने लाखुजीचे हातही रिते झाले होते. तो शांत बसून केरबाचं आपल्या वडिलांचं बोलणं ऐकत होता. दिस मावळतीला पोहचून बराच वेळ झाला होता. पण एकालाही मार्ग सुचत नव्हता.

गावात जत्रेचं काहूर उठलं होतं. सगळीकडे ताशाचे ध्वनी होते. माधवच्या मनात जहागीरदाराच्या पैशाच्या विचारनं वादळ उठलं होतं. त्याच्या मनात एक वेगळीच युक्ती आकार घेऊ लागली होती. गावातील जत्रेचा कोलाहल वाढत चालला होता. केरबा, लखुजी नुकतेच जेवण करून लवंडले होते. त्यांना डोळा लागला होता. परंतु माधव जागाच होता. पैशाचा विचार करत होता. त्याला मार्ग सुचायचा पुन्हा चित्र अस्पष्ट व्हायचं, याच विचारात असताना त्याला केव्हा झोप लागली त्याचे त्यालाच कळले नाही. तांबडं फुटलं तसा केरबा उठला. त्यानं जनावरांना वैरण टाकली. सरदार-दिलदार शांतपणे रवंथ करत बसले होते. केरबानं मायेने त्यांच्या पाठीवरनं हाथ फिरवला. तो बैलाचा विचार करतच झोपडीत आला.

सूर्य पूर्वेकडनं वर आला अन केरबा पैसा पाहण्यासाठी गावात निघाला. लखुजी दिवसांबरोबरीनं नांगर जुपायला निघाला. माधव आईबरोबर बोलत होता. गावात केरबा फिरत होता. तो ज्याच्या नाही त्याच्या घरी जात होता. पैसा देण्याची याचना करत होता. पण कोणीच त्याला उसनवारी पैसा देण्यासाठी मदतीचा हात दाखवत नव्हता. तो विनवणी करायचा, प्रसंगी पाया पडायचा. पण व्यर्थ केरबाला कोणीच मदतीला तयार नव्हतं. शेवटी गाव पालथा घालून केरबा सगळं संपल्यागत रानाकडं निघाला. सूर्य माथ्यावर होता.

लखुजी सरदार-दिलदारला घेऊन वावरात नांगर हाकत होता. माधव बाकीची जितराबं घेऊन वावरातल्या बांदाला चारत उभा होता. केरबा आला, झोपडीत शिरला अन माठातलं गार पाणी पिऊन मटकन खाली बसला. गावात यात्रेचा दुसरा दिवस हगाम्याचा असल्यामुळे सगळी आमराई कुस्त्याच्या फडाने दणाणून गेली होती. माधवच्या मनात गावातील कुस्त्यांचं काहूर उठलं होतं. त्याच अंग फुरफुरायचं. त्याचं जितराबं चारण्याकडं लक्ष नव्हतं. दूरवरनं जाहागीरदार व त्याचे चार पाच माणसं माधवच्या वावराच्या दिशेने येताना दिसली. तसे त्याच्या मनातील काहुरानं पेट घेतला. त्याला काही सुचेना.

जहागीरदार आला तसा झोपडीजवळच्या चिंचेच्या झाडाखाली बसला. तो तावातावाने केरबाला बोलत होता. केरबा खळ्यातल्या मेढीगत उभा होता. जहागीरदाराचा तोंडाचा पट्टा चालू होता. शेजारीच वस्तीची भाऊबंदकी फुकटचा तमाशा पाहायला हजर झाली. जहागीरदाराच्या व्याजासकट पैसा मागणीन केरबाचं घरच हवालदिल झालं होतं. सगळं भविष्यच काळवंडल होतं. जाहगिरदाराची दोन माणसं चालत्या नांगराची बैल सोडण्यासाठी लखुजीशी हुज्जत घालत होते. बिचारी सरदार-दिलदार मुकी जनावरं भर उन्हात उभा होती. जहागीरदाराचा केरबाच्या बैलजोडीवर बर्‍याच दिवसांपासून डोळा होता. आज त्याला संधी चालून आली होती.

माधवला झोपडीजवळ चाललेलं बोलणं सहन होईना. त्याचं आता माथं फिरलं व तो तसाच वार्‍यागत गावच्या रोखानं निघाला. गावात आमराईत कुस्त्यांचा हगामा जोरदार भरला होता. तो आला तसा हगाम्यातील लोकांत शिरला. तिथे मोठेमोठे मल्ल कुस्ती खेळण्यासाठी आले होते. माणसं पाखरागत चिवचिवट होते. सगळं वातावरण शौर्यानं भारलं होतं. माधव कॉलेजला असताना तालमीत जात होता. पण त्याला दोन चार वर्षे झाली होती. फायनल ईयर पासून त्याचं तालमीला जाणं बंद होतं. पण अंगकाठी पैलवानागत होती. त्यानं सरदार-दिलदारसाठी एक मोठी कुस्ती खेळण्याचं धाडस मनाशी केलं होतं. दणकेबाज कुस्त्यांनी फड दणाणून गेला होता. हिर्‍या मांगानं ढोलकं वाजवलं अन चांदीचं कडं आकाशात उंचवत तो दवंडी पिटवू लागला. ‘ऐका हो ऐका ह्या चांदीच्या कड्याला जो हात लावीन अन कुस्ती जिंकल त्याचं हे कडं आणि अकरा हजार एक रुपये होतील हो होतील…’

ढोलक वाजवून त्यानं ते कडं फडाच्या मध्यभागी ठेवला अन तेवढ्यात पंचक्रोशीतला प्रसिद्ध इशा पैलवान त्याला जावून शिवला. पण कोणी ईशाला जोड म्हणून येत नव्हते. त्यानं आजपर्यंत खूप कुस्त्या केल्या होत्या. तो सगळ्यामध्ये अजिंक्य ठरला होता. वेळ वाढत होता, तसे सगळे लोक फडात टवकारून बघत होते. तेवढ्यात माधव फडात उतरला अन गलका झाला.

आरं! माध्या मागं फिर. आरं! इशा लई भारी हाय हातपाय तुटलं लेकाच्या. आरं मागं फिर!…

गावकर्‍यांना माध्याची किव येत होती आता माध्याच काय होईल याचा लोक विचार करत होते. सरदार-दिलदारा पुढं त्याला सगळं जीणं फिकं दिसत होतं. त्यानं चांदीच्या कड्याला हात लावला अन मागचा पुढचा विचार न करता सरळ मैदानात कपडे काढून उतरला. गावकर्‍यांना माध्याची काळजी लागली होती. लोक पुन्हा पुन्हा म्हणत होती… आरं! माध्या मागं फिर इशा लई भारी हाय…

लोकांचा कलगा चालूच होता. हिर्‍याचं ढोलकं वाजत होतं. दोन्ही मल्ल फडात उतरले कुस्ती चालू झाली. माधव विजेच्या चपळाईनं झटत होता. त्याला फक्त बैलजोडी दिसत होती. लोकांचा आरडाओरडा वाढत होता. माधव बजरंगबलीचं मनात ध्यान करत होता. ढोलकं मस्तकात भिनलं होतं. तो प्रयत्नांची पराकाष्टा करत होता. पण इशा काही साधा पैलवान नव्हता. माधवची डाळ शिजत नव्हती. लढता लढता माधव व इशा दोघेही क्षीण झाले होते.

प्रबळ इच्छाशक्ती किंवा निराशा देखील कधी कधी बळ पुरवते! तसा माधव प्रबळ ठरू लागला अन माधवनं ईशाला काही क्षणात आकाश दाखवलं. पण, शेवटी शेवटी त्याचा उजवा हात कुस्तीत निकामा झाला होता. तो वेदनामय झाला होता. सगळं गाव माधवकडं अवाक होऊन पहात होतं. काही जण त्याचा जयजयकार करत होते. तेथे पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. पंचांनी माधवला सन्मानपूर्वक चांदीचं कडं व रोख अकरा हजार एक रुपये बहाल केले. पण! त्यांनी ज्या हाताला कडं घातलं, त्या हातांच्या वेदना त्यांना कुठे ठावूक होत्या? तो फडात न थांबता वावराच्या रोखानं निघाला सगळे लोक त्याचा जयजयकार करत होते पण त्याची दृष्टी सरदार-दिलदारला शोधत होती. केरबानं लेकरासारख्या जपलेल्या बैलजोडीला.

तो वावरात पोहचला तेव्हा त्याचा बाप केरबा त्याला रडताना दिसला. जाहगिरदाराच्या पायाशी याचना करताना दिसला. भाऊबंदकी हात बांधून तमाशा बघण्यात गर्क होती. जहागीरदार सगळी जितराबं आपल्याबरोबर घेऊन जाण्याच्या तयारीत होता. तोच, माधव वार्‍यागत तिथं धडकला. तो आला तसं जाहागीरदारावर ओरडला.. आरं ये! पैशावाल्याच्या पोटच्या लेका! हे घे तुझे पैसे. जहागीरदार आश्चर्यचकित होऊन पहात होता. केरबा कुतूहलाने माधवकडं पहात होता. लखुजी माधवच्या उजव्या हाताला न्याहाळात होता. माधवचा हात खुंटीवर टांगल्यागत दिसत होता. त्यानं ते ताडलं होतं. तो खाल मानेनंच रडत होता. जहागीरदाराचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. माधव केरबाच्या कुतूहलाच्या दृष्टीला दृष्टी भिडवत बोलला, ‘हे मी कुस्तीत मिळवलेलं मनाचं कडं आहे आपल्या सरदार-दिलदारसाठी!‘

जहागीरदार पैसे घेऊन तोंडात मारल्यागत खाल मानेनं निघून गेला. माधव सरदार व दिलदारला आपल्या एकमेव हाताने गोंजारत होता. केरबानं माधवच्या पाठीवरून हात फिरवला व त्याच्या उखळलेल्या हाताकडे पाहून टाहो फोडून म्हणाला, ‘काय करून ठेवलास हे माझ्या वाघा?’

केरबाला बोलणं सुचत नव्हतं त्याचे डोळे अश्रुपूर्ण झाले होते. त्याची आई, लखुजी रडत होते. ती मुकी जितराबं सरदार-दिलदार माधवाकडे करूणतेने पहात होते. केरबा माधवला घेऊन शहरातल्या मोठ्या दवाखान्याच्या रस्त्याला लागले. सगळा परिसर एका अलौकिक प्रेमाने लाजला होता. दिस मावळतीला झुकलेला. केरबा, माधव दूर क्षितिजाला चाललेले, वेदनांचा हुंकार घेऊन. अन् इकडे सरदार-दिलदारचे दूरवर जाणार्‍या आपल्या मालक बाप लेकांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात डोळे पाणावलेले….!

अकोले, जि.अहमदनगर

मो.9890709175

- Advertisment -

ताज्या बातम्या