Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनकळत सारे घडले..!

नकळत सारे घडले..!

छांदसी कल्याणकर

गुलमोहराचे झाड हे एक असे झाड आहे की ते स्वत: पेटते आणि बघणार्‍यालाही पेटवते. त्याला सुगंध नसला तरी त्याचे मखमली लालपण, पिवळेपण पार मनाच्या आत खोलवर पोचते.जुन्या आठवणी तर तेच पुन्हा संगतवार आठवून देते.

- Advertisement -

पहाटे पहाटे पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यावर गुलमोहोर आपले पुष्पवैभव मुक्त हाताने रस्त्यावर अंथरत असे. तेव्हा रस्ते म्हणजे मातीचे, खडकाळ, पण त्यावर पडलेल्या गुलमोहराच्या पखरणीवरून येणार्‍या त्या युवकाच्या क्षणभर भेटीचा आनंद मला दिवसभर पुरत असे. उत्साह संचरत असे. तेव्हा मी शाळेत नववीला होते. आम्हाला युनिफॉर्मला निळी साडी होती. मी आणि माझी मैत्रीण भावना दोघी बरोबरच बाहेर पडायचो. शाळा बरीच दूर असल्याने लवकर निघावे लागे.

आमची घरातून बाहेर पडून रस्त्याला लागण्याची वेळ आणि आमच्या समोरून, आम्हाला वळसा घालून तिथून त्याची जाण्याची वेळ एकच असे. एक वाटसरू एवढेच मी त्याला समजत होते. पण ही क्रॉसिंगची घटना रोजच घडू लागली.

आणि मी माझे चित्त त्याला न्याहाळून घेण्यात पणात लावून घेऊ लागले. तिच्या समोरून तो युवक पूर्ण पुढे जाईपर्यंत मी बघतच रहायची. अनिमिष नेत्रांनी. ती वेडी म्हणजे मीच. भावनाच्या हे लक्षात येऊ लागलें. त्या युवकाला दुरून येतांना पाहून ती तिला काहीसं बोलायची.” आला गंऽ तो”. पण मला समजत नव्हते. असे का होतेय? आमच्या अवतीभवती, शाळेत खूप मुले होतीं. पण हाच तरुण का आवडतो? काय आहे एवढेें त्याच्यात?

त्याचं नाक अगदी सरळ आहे. डोळे स्निग्ध आहेत. ओठ पूर्ण दिसत नाहीत. कारण त्याने मिश्या ओठावर घेतल्या आहेत ओढून त्या मिश्या किती भाग्यवान? सारख्या त्याच्या ओठावरच टेकलेल्या असतात. त्याचे कपडे डिझाईनवाले शर्टस असतात. नेहमी त्यामुळे त्याचा चेहरा उठावदार दिसतो. तो चपला घालतो की बूट?

घड्याळ लावतो का?

केसांचा भांग कसा असतो?

तो नेमका माझ्याकडे बघतो की भावनाकडे?

एका मिनिटाच्या ओझरत्या भेटीत काय काय बघायचे?

आधी तो नजरेच्या टप्प्यात आला की मला छातीत धडधडायला लागते. का कुणास ठावूक? त्याची जरा भीती वाटते. जसा जवळजवळ येतो तसा मवाळही होतो. चोरून बघतो. न बोलणे, ना हसणे, ना खाणाखुणा.

काय समजायचे मी?

ह्या रस्त्यावरून हजार जण जा ये करतात. आमच्या इस्टेटीतूनच हा रस्ता लोकांनी रहदारीचा केलाय. पण मग हाच का मनात भरतो?

ना नाव त्याचे माहिती?

ना कुठे राहतो, कुठे जातो ते माहिती?

मी सुद्धा इतकी वर्षे ह्या रस्त्याने जातेय पण यंदाच हे काय विचित्र खूळ आलेय?

आई म्हणते ते बरोबर आहे. वय वाढतेय तशी शिंग फुटलीत! म्हणजे हे असेच का? विचित्र, काल्पनिक, प्रेम, स्वप्न बघणं. वगैरे.

माझे विचाराचे एवढें मोहोळ, उठलेले असतांना त्याच्याकडे मी टक लावून बघायची. तो पुढे जायचा. आम्ही आमच्या रस्त्याने त्याला पाठमोर्‍या कधी मी न राहवून पुन्हा मागे बघायची. कारण नंतर तो उद्याच दिसणार असे.

पहाटेपासून आई बाहेर मेंदीच्या झाडाखाली चूल पेटवायची. त्यावर आंघोळीसाठी पाणी गरम करायला हंडा चढलेला असे. गोवर्‍या जाळून त्यात कापूर, तुरटी, मीठ, घालून आई राखुंडी बनवायची. ती घेऊन भराभर दात घासायचे. चुलीवरचा गरम चहा प्यायचा. घर गावाबाहेर होते. त्यामुळे थंड हवा खूप आल्हाददायक वाटे. मग वेणी, आंघोळ, मेंदीच्या झाडाखालचा गरम झालेला हंडा फडक्याने धरून उतरवायचा. मेंदीच्या फुलांचा मादक गंध दरवळायचा. पूर्वेकडे लालिमा पसरलेली असे. खूप सुंदर दृश्य असे ते. धाकटा आणि मोठा भाऊ मात्र घोरत पडलेले असत. तो एसएससी झाला होता. वडिलांना मदत करायचा. त्याच्या शाळा दुपारी, माझ्या कपाळी सकाळी असा वैताग यायचा अंथरूण सोडताना.

आमच्या भल्या मोठ्या घरात न्हाणी घर होते. मी अंगावरचे कपडे उतरवायला फारच लाजायची. भरा भरा अंगावर पाणी घ्यायचे. शरीराचे वाढणारे, बदलत जाणारे आकार पाहून मला वेगळेच भान यायचे. मग साडी नेसायला आईच्या खोलीत पूर्ण कपडे उतरवतांना मी समोरच्या आरश्यावर कपडा टाकायची. मला माझीच लाज वाटे. नकळत कोणी बघितले तर? ब्रा, पेटीकोट चढवतांना मला वेगलाच कैफ यायचा. भावना म्हणाली ते वाक्य तेव्हा नेमके आठवायचे. “नवर्‍याला सगळे दाखवावे लागतेे. त्याचा हक्क असतो तो.” मी त्या कल्पनेने लाजून साडीच्या निर्‍या करायची.अंगभर पदर घ्यायची. कुंकू लावायची. तेव्हा त्या युवकाच्या नावे कुंकू लावता आले तर? रम्य कल्पनेने मी क्षणभर आरशात बघत असे. पण माझ्याऐवजी त्याचाच चेहरा दिसायचा.

हा काय चमत्कार?

मी स्वत:ला पूर्ण बघून घेत असे.मग दप्तर भरलेले असे रात्रीच. ते घ्यायचे नि भावनाला हाक मारायची.

“आले गंऽऽ थांब जरा. सँडलची क्लिप लागत नाहीये.”

मलाही चटकन् स्मरण व्हायचं. आपल्या ब्रा ची क्लिप पण नीट लागली नाही. पुन्हा घरात यायचे ते सारे नीट करून निघायचेे. आम्ही वाटेला लागलोय तोवर तो समोरुन येतांना दिसायचा. माझा त्याचा काही संबंध नसतांना मी तो दिसताच मंत्रमुग्ध व्हायची. वाटायचे उलट फिरावे. त्याच्यामागे जावं. पण हे सगळं एकतर्फीच होते ना!

आमचे घर, इस्टेट, घराजवळची आमची शेती सगळे गावाबाहेर होते. कल्याणचं शेवटचे टोक. थोडेसे पुढे पायवाटेने गेलें की चिकणघर. पुढे शेती, रिकाम्या पाट्या, गर्द झाडी, रानफुलांचे मनाला झिंग आणणारे सुगंध. कातकरी, अगदी कावोड्यांच्या झोपड्या. भरदिवसा साप, नाग, मुंगूस आरामात फिरायचे. आमचे कौलारू घर स्वतंत्र होती. मधे मोठ अंगण. अंगणात विहीर. नळ नव्हते. इ टाईपमध्ये बाबांनी दोन मजली तीन घर उभारली होती. त्यात भाडेकरी होते. घराच्या मागे बाबांचा छोटासा कारखाना होता.

शाळेच्या रस्ताभर मी भावनाजवळ त्याचच कौतुक करायची. ‘तू काय त्याच्या प्रेमात पडलीस का? सारखं त्याच्याबद्दल काय बोलतेस? कोण तुझा तो? काही ओळख पाळख आहे का? आपला काय संबंध? तो उच्च जातीतला दिसतोय! आपण’…

त्यावेळी समाज रचनेत जात व्यवहाराच्या भिंती खूप मजबूत होत्या. त्यातून बाहेर पडून प्रेमविवाह करणे ही फार कठीण गोष्ट होती कधीमधी एखादी घटना घडे. पण गावभर चर्चा व्हायची. त्या मुलीशी संबंध तोडले जायचे. ग्रामपंचायती अशा आंतरजातीय जोडप्यांना गावाबाहेर हकलून देत. आपला खुळेपणा वाढत गेला तर आपल्यावर सुद्धा ती वेळ येईल. ह्या भीतीने मी गप्प व्हायची. भावना मला त्याच्यापासून परावृत्त करू पहात होती. पण हो. मी त्याचच वेड घेऊन बसले होते. शनिवारी आमची दोनदा भेट व्हायची. तो कॉलेजमधून यायचा. आम्ही अर्धी शाळा म्हणून लवकर जायचो. आता मी थोडीशी स्माईल द्यायची त्याला.

पण माझ्यापेक्षाही लाजरा बुजरा. बराच दूर गेला की मागे वळून मला त्याच्या हास्य पाकळ्या फेकायचा.

एक दिवस त्याने वही पुस्तकाबरोबर हातात ओल्या रुमालात काही तरी आणले. दिवस पावसाचे होते. त्याला छत्री, पुस्तक आणि रुमाल सांभाळतांना पुरेवाट होत होती. जिथे आमची रोज गाठ पडे तिथे तो आला.

“ए, थांबा जरा”

त्याच्या ह्या पहिल्या वाक्याने मी हादरलेच. आता हा काय करणार?

मला काही विचारणार?

लग्नाची गळ घालणार?

काही भेट देणार? की

मी उद्यापासून भेटणार नाही असा निरोपाचा धक्का देणार?

त्याने रुमाल उघडला. रुमालात सुंदर पांढरी स्वच्छ सुगंधी फुले, मला अतिशय आवडली. सोनटक्क्याची फुलं होती आठ. माझ्या हातात त्याने फुले दिली. हसला. पुढे निघाला.

“अस्सं आहे तर? चांगला चिकणा पोरगा पटवलास गंऽ” भावना मला म्हणाली.

अर्थात त्या फुलांनी आमची हृदये जवळ आली होती. आणि त्याचा सुकुमार हवा हवा असलेला स्पर्शही मिळाला होता. आम्ही चार चार फुलं घातली. माझ्याकडे खूप फुल झाडं होती. पण हेच झाड नव्हतं. त्याच्या स्वच्छ, शुभ्र विनयशील, सद्भावनापूर्ण मनाचं प्रतिक होती ती फुलं! आम्ही ती माळली. मी तर सारा दिवस त्या सुवासाच्या धुंदीतच वावरत होते. प्रेमाचं प्रतिक म्हणून गुलाबाचं फुल दिलं जातं. पण ह्या तरुणाचं मन काही वेगळच होतं. त्या माझ्या उमलत्या वयातल्या रुपावर तो प्रेम करत नव्हता तर माझ्ये निर्मळ भावनेवर प्रेम अर्पित होता हे मला समजलं.

मग रविवार वगळता आम्हाला रोज फुलांचा नजराणा मिळू लागला. पण तो गप्प असे. रविवारी तो दिसणार नाही. ह्याची रुखरुख मनाला खूप त्रास द्यायची. तो आपली आठवण करत असेल?

मात्र रविवारी एक सुख होतं. आंघोळीचं. नाही तर रोज जवळजवळ अंधुरक्या वेळीच स्नान भराभर आटपावं लागे. आता मी मोठी झाल्याने आईची डोक्यावर शिकेकाईचं पाणी ओतण्याची मदत लागत नव्हती. मी भरपूर पाणी तापवून घेत असे. शिकेकाई लावत असे. हे असे रेशमी केस त्याला आवडतील? त्याचा माझ्या केसांवरून हळुवार हात फिरतोय असं मला डोळे मिटलेल्या अवस्थेत वाटायचं.

डोळे उघडले तर शिकेकाई डोळ्यात जाणार. वेड्यासारखी माझेच हात मी केसावर फिरवायची. रोज घातलेल्या सोनटक्क्याच्या फुलांचा कोमल गंध हळूच बाहेर यायचा केसातून. डोकं धुतलं की बाकी अंग धुवायची. माझं सूर्यफुलासारखं यौवन आणि आतल्या भागातलं गोरेपण पहात रहायची. माझा चेहरा, हात, पाय, काळे आहेत. तरी तो माझ्यावर का जीव टाकतो? काळ्यांना दुय्यम स्थान असतं. मग हा तरुण गोरा गोमटा माझ्याकडे कसा टक लावून बघतो. मी त्याला कशी आवडते?

हां, माझे डोळे टपोरे आहेत. ते आवडत असतील. आणि त्यांच्या गौर वर्णाइतकं माझं मनही गोरं आहे. तो मनकवडा आहे नक्कीच.

आंघोळीच्या वेळी मी माझा तरुण देह निरखून पहात असे. आरश्यातही बघायची. माझं मलाच नवल वाटायचं.

हा काय प्रकार आहे?

मग लाजून पटकन आंघोळ उरकायची.

दुपारी सोमवारचा अभ्यास

संध्याकाळी भावनाबरोबर मार्केटिंग. इतर खरेदी, वह्या, पुस्तकं, पेन-पेन्सिली. खरेदीत माझ्या हिशोबात चुका होतं.

“काय गऽ आज तो दिसला नाही म्हणून कां?”

“चल ग चाभरे. मला गणितच येत नाही.

मी वेळ मारून न्यायची. मार्केटच्या गर्दीत तो कुठे दिसतो का ते भिरभिरत्या नजरेने बघत रहायची. अत्तराचा बोळा हातावर लावला की खूप वेळ सुगंध येत रहातो. माझं अगदी तसंच झालं होतं. त्याच क्षणभराचं दर्शन मला सारा दिवस आनंद देत रहायचं.

त्या रविवारच्या रात्री मी त्याचाच विचार करत झोपले. स्वप्नात तो आला. मी त्याच्याजवळ गेले. एक सुंदरसं उद्यान होतं. त्यात कारंजी थुईथुई नाचत होती. मोर, लांडोर, पक्षी मुक्त विहार करत होते. त्याने मला तळ्याजवळ नेलं. आमचं प्रतिबिंब पाण्यात उमटलं होतं. पुढल्याच क्षणी त्यानं माझ्या कमरेला हात घातला.

आणि… धपकन् पाण्यात माझ्यासकट उडी मारली. आम्ही भिजलो. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं. चुळा सोडल्या. शेवटी त्याने ओल्या अंगाने मला गच्च मिठी मारली. त्याने माझी हलकी हलकी चुंबनं घेतली. एकदा कचकन् ओठ चावला. मी ओरडले. “सोड ना, किती चावलास?”

शेजारी आई झोपली होती. आईने मला हलवून जागं केलं.

“काय झालं गऽ? स्वप्न पडलं काय?”

“अं, हो. अगं राक्षस स्वप्नात आला. मला चावला.”

मी खोटच सांगितलं. पण आई वेगळं. जे समजायचं ते समजली. माझ्यावर जरा लक्ष ठेवू लागली. माझं वय पाय घसरण्याचं होतं.

सकाळी शाळेला निघालो. तो आला. भावना म्हणाली.

“काल म्हणालीस मला गणित येत नाही. आणि तो यायची अचूक वेळ कशी साधतेस गऽतू?”

“गप रहा. तो ऐकेल ना.” मी तिला दटावलं.

तो दिसताच ओठ उलगडला. पण जखम नव्हतीच. ते स्वप्न होतं. मी त्याला पाहून खूष झाले. आज मी वेणीचा भांग बदलला होता. त्याने हातात फुलं दिली. हात दाबला. रोमांच उठले. त्याने दुरुन माझा भांग सुरेख आहे खुणेने सांगितलं.

एक दिवस एक अडचण आली. पण ती इष्टापत्ती ठरली. भावनाने भावाजवळ निरोप पाठवला. ती शाळेत येत नाहीय. ताप आलाय. मला इतकं अंतर एकटीनं चालत जाणं अवघड वाटत होतं. मी भावाला झोपलेला उठवला. मला सायकलने शाळेत सोड नाहीतर मी जाणार नाही. असा हट्ट धरला. मोठा भाऊ तयार झाला.

दोघेही सायकलने निघाले. त्या दिवशी तो युवकही वाटेत दिसला नाही. मला उगीच वेडेपणाची शंका आली. तो भावनावरच मरतोय. मला फसवतोय. ती नाही तर हा पण कसा नाही. तिला … आलाच नसेल. हा भेटणार नाही म्हणून त्यांचं शनिवारीच ठरलं असेल. मीच मूर्ख.

ते दोघं सायकलने निघाले. आग्रा रोड पार करून टिळक चौकाकडे निघाले. मी दिंडी दरवाजातून घाईने बाहेर पडायला आणि ते दोघं माझ्यासमोर यायला एकच वेळ आली. मी दिसताच तो थांबला. मागे मी होते.

तिच्या भावाला बघताच मी ओरडले. “अरे नंद्या, कुठे निघालास? आता काय करतोस?

“अरे राजय तू… आज उशिर झाला काय? बिर्लाला जातोस का? तुझ्या घरच्या झोपाळ्यावर आपण कसली धमाल करायचो. माझ्याकडे ये ना. तुझ्या वाटेवरच घर आहे माझं.” ती आमचा संवाद ऐकत होती. आतल्या आत मोहोरत होती. मी तिच्या भावाचा मित्र आहे हे कळल्यावर ती खूप खूष झाली.

“अरे ही माझी बहीण. आज तिची मैत्रिण येणार नाहीये म्हणून तिला शाळेत सोडायला चाललोय.”

त्या काळी सायकल हेच गतिमान साध होतं. आजच्या सारख्या टू, थ्री, फोर व्हीलरने मुलं शाळेत जात नव्हती. आपल्या श्रीमंतीचं आणि मुलांचे लाड करण्याचं प्रदर्शन दाखवण्याची पद्धत नव्हती.

“चल मी निघतो, मला आता धावतच गेलं पाहिजे.” मी म्हणालो. ते दोघेही पुढे गेले. ती बराच वेळ राजयकडे बघत होती.

त्याने तिला अंगठा दाखवला. डोळा मारला. तिला त्याचा पत्ता आणि नाव कळलं होतं.

नंतर राजयच्या कॉलेजात वेगळेच पेच निर्माण झाले. इंग्लिशच्या बाई आजारी झाल्या. लॉजिकचे प्राध्यापक नोकरी सोडून गेले. प्रशासनाकडे स्टुडंट्स्नी पुष्कळदा विनंत्या केल्या. पण निर्ढावलेल्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने काहीही सोय केली नाही. दोन महिने असेच गेले. आम्ही सर्वच काळजीत होतो. शेवटी प्रभुणे नावाचे प्राध्यापक पुण्याहून आयात केले. इंग्रजीला एक आडुमाडु प्राध्यापिका आणली. तिला इंग्रजी आणि मद्रासीशिवाय भाषाच कळत नव्हत्या.

तो तरुण आता सकाळी आणि दुपारी त्याच रस्त्याने कॉलेजच्या एक्ट्रा लेक्चर्सना जायला लागला. सकाळी भेट व्हायची. संध्याकाळी येतांनाही तो गुलमोहरापाशी आला की उजव्या बाजुच्या घराकडे. अंगणात, शेतात कुठे दिसली तर? त्याचीही भीड चेपली होती. त्याच्या मित्राची बहीण आहे हे त्याला कळलं होतं. त्या मैत्रीचा उपयोग करून घ्यायचं त्यानं ठरवलं होतं. असं अलिकडे त्याच्या माझ्या नजरभेटीत जाणवत होतं.

एक दिवस तो तरुण दुपारचं लेक्चर आटपून घरी परत यायला निघाला. तिच्या घराच्या बराच अलिकडे तो येत होता. त्याला शेतात एक मुलगी दिसली. ती शेणाच्या गोवर्‍या थापत होती. तो जसा जसा जवळ आला तसं त्याला कळलं की ती मीच आहे. फक्त रोज मी शाळेच्या साडीत पहात असे तो. आज मी घरच्या स्कर्ट-ब्लाऊजवर गोवर्‍या थापत होते. शेतीवाडीमुळे घरात बैल, म्हशी होत्या आणि आमचा भाग तसा शहराला जोडलेला असला तरी खेडवळ वातावरण होतं. ही घरची कामच होती. शिक्षणाव्यतिरिक्त ती करावी लागतच होती.

त्याने माझ्या मागून येऊन ‘शूकऽ शूकऽऽ’ केलं. मी मागे वळून पाह्यलं. तर राजय समोर उभा. त्याने केलेल्या धाडसाने मी आनंदी झाले. तो मला असा एकटा भेटायला हवाच होता. मी बादलीभर पाणी नेलं होतं. हात धुतले. जरा गोंधळले. मी अशी घाणेरडी काम करते हे बघून त्याला काय वाटलं असेल.

“पाणी प्यायचय?”

“हो. चालून आलो ना. असलं तर.”

“हो आहे की, बसा त्या आंब्याच्या पाराखाली. तिकडून घागर आणते. ती जरा दूर गेली आणि स्वच्छ चकचकीत घासलेल्या तांब्याच्या घागरीतलं विहिरीचं थंडगार पाणी मला पाजलं. मी धार धरली. तो ओंजळीने पाणी प्यायला.

“ये बस ना इथे.”

“नको मी जमिनीवरच बसते.”

आता बोलायचं तर खूप होतं. पण दोघांच्याही तोंडून शब्द फुटेना.

“तुम्ही रोज एवढं चालला?”

“हो. तुझ्यासाठी.”

“माझ्यासाठी?”

“हो नाही तर इथे कोण आहे ओळखीचं?”

“का माझा दादा आहे ना. त्याला भेटायला यायचं.”

मधे बराच वेळ गप्प बसण्यात गेला.

“आपण काय करायचं?”

“काय म्हणजे? असं का विचारतेस?”

“नाही. म्हणजे आता मनाची देवाण घेवाण तर झाली आहेच. आता शरीराने कधी जवळ यायचं.” मी जीव एकवटून विचारलं.

“आपले समाज भिन्न आहेत ना, हीच मुख्य कळ आहे.”

“पण समाजाशी काय करायचंय? मला तुमच्याशिवाय चैन पडत नाही.”

“पण आज समाजात जाती जातीत पक्क्या भिंती आहेत. त्या तोडणं तुला जमेल?”

“मी काहीच बोलले नाही. कारण तो 45 वर्षांपूर्वीचा काळ होता. समाज परंपरागत रुढींमध्ये गुरफटलेला होता.

“चला, अंधारायला’ लागलय. मला गेलं पाहिजे.”

तो उठला. इतक्यात –

इतक्यात तिच्यामागून मोठा साप सळसळत आला.

“अगं ए, उठ साप, तुझ्यामागे”

ती उठली आणि राजयला घट्ट बिलगली. खूप बावरली होती. खर म्हटलं तर अशी अमोल संधीची आम्ही दोघं वाट पहातच होतो. राजयने नकळत मला घट्ट आवळलं. डोक्यावर हात फिरवला आन तिच्या ओठावर ओठ टेकले. माझ्या देहातून एक सौम्य सुगंधाची लकेर घुमली. मी सावरले. बाजूला झाले. खूप लाजले. हे मी काय केलं.

‘अरे हां चल आता तुला घरापर्यंत सोडतो.”

माझा हात मी त्याच्या हाती दिला होता. थरथरता, आत्मविश्वासाने आम्ही दोघेजण घराजवळ आल्यावर मी दूर झाले.

“तुझं नाव? आजवर मला माहितच नाही.”

“ऋतूजा. पण राणीच हाक मारतात.

राजय झपझप पावलं टाकत निघाला. मी ही घाबरलेल्या स्थितीतच घरात आले. रात्री मला ते गाणं सारखं आठवत होतं. मी मज हरवून बसले गऽ”

नंतरही त्यांचं फुलं देण चालूच होतं. एक दिवस आईने विचारलच- “सकाळी जातेस तेव्हा नसतात, आणि येतेस तेव्हा ही फुलं डोक्यात असतात तुझ्या? शाळेत रोज फुलं वाटतात का? का कोणी भेटलाय?”

“अगं नाही गं आई, आमची मैत्रिण देते.”

रोजचं भेटणं चालूच होतं. परिचय, प्रेमात आणि प्रेम अद्वैतात बांधण्याचे धागे घट्ट होत होते.

कधी संध्याकाळी दमलेला राजय कॉलेजवरून परत येतांना मी अधीरपणे त्याची वाट बघत उभी राही. तो दुरून दिसला की मला कमालीचा आनंद व्हायचा.

“आज भावना नाही आली बरोबर”

“ती भावना ना, भोचक भवानी आहे. घरी माझ्या चुगल्या करते. ती इथेच कुठे झाडामागे लपून पहात असेल पक्की टवळी आहे.”

एक दिवस राजय आजारी झाला. फणफणून ताप भरला. तो कॉलेजला येऊ शकत नव्हता. एरव्ही आमचा रस्ता आणि त्यावरून चालणं अतिशय घाणेरडं होतं. पण राजयच्या ओढीने मला आता आमचा रस्ता आवडू लागला. आता चार-पाच दिवस मी शाळेत जातांना नाराजीनेच भावनाबरोबर चालायची. काही बोलतही नसे. मन किती वेडं? मला तो नक्की पुढे कुठेतरी भेटेल अशी आशा वाटायची. पण तो दिसत नसे. खूप दिवस असे न भेटताच मला शाळेत जावं लागलं.

एक दिवस भावना म्हणाली, “अगं तुझा तो राजकुमार. आजारी आहे. तिला राजय आजारी असल्याचं समजलं ते अगदी योगायोगाने. ती संध्याकाळी राजयच्या फॅमिली डॉक्टरकडेच कंपाऊंडर म्हणून अर्धा दिवस नोकरी करत होती. राजयचे उपचार त्यांच्याकडेच चालू होते. तो सुरूवातीला एकटा जायचा. औषध आणायचा. पण डॉक्टरांनी निदान केलं मला टायफाईड झालाय. तेव्हा मी घरून दवाखान्यात येऊ नये. त्यांनी क्लोरोमाझाइसिटीन आणि अन्य काही औषधं लिहून दिली. कपांऊडरच्या कॅबिनमध्ये भावना? राजय दचकले. पण क्षीण आवाजात विचारलं, “ऋतुजा कशी आहे? मला आठवण येते तिची.”

ती काहीच बोलली नाही. अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने ऋतुजाने शाळेत जाणं सोडलं. खरं कारण तो भेटत नाही हे होतं. त्यांच्या परीक्षा झाल्या. राजयला परीक्षेला बसणं शक्य नव्हतं. 51 दिवस ताप येत होता. तो अतिशय क्षीण झाला होता. शेवटी हॉस्पीटलात दाखल केलं होतं.

परीक्षेच वेळापत्रक आणण्याचं कारण सांगून ऋतुजा घराबाहेर पडली. राजयच्या वाड्यापाशी आली. राजयबरोबर त्याच्याच वाड्यात रहाणारी प्रतिमा कॉलेजमध्ये होती. ऋतूने तिला एकदा राजयबरोबर जातांना बघितलं होतं. ती घराच्या दारातच उभी होती.

“ए राजय कुठे राहतो?”

“ते काय समोरचं मोठ घर त्याचच आहे. अगं पण तो बरेच दिवस झाले आजारी आहे. बहुतेक परीक्षेलाही त्याला बसू देणार नाहीत. त्याची प्रेझेंटी कमी आहे.”

हे ऐकून ऋतुजा आणखीच घाबरली. मी घराच्या मागल्या पडवीकडून वर पायर्‍या चढून माजघरात आले. ते प्रचंड घर बघून मला नवल वाटलं आणि आवडलंही. मी इकडे तिकडे बघितलं कोणीच दिसेना. मला कळेना हा आहे तरी कुठे? का आपण दुसर्‍याच घरात आलोय. आणि चारी दारं सताड उघडी. पण इथे माणूस कसा दिसत नाही कोणी? शेवटी मी हाक मारली. “राजय, अहो राजय, तुम्ही कुठे आहात?” क्षीण आवाज आला. “कोण आहे? इकडे उजवीकडल्या खोलीत या.”

मी राजय पुढे उभी राह्यले. त्याची अवस्था बघून मला रडू आलं. त्याला उठवतही नव्हतं. त्याने समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. मी खूप रडले. मला त्याचा भरोसा वाटेना. शेवटी ती बेभान होऊन राजयच्या अंगावर पडले. त्याला गच्च मिठी मारली. आणि पाठीखाली हात घालून उठवलं त्याला.

“घरात कोणीच नाही?”

“वडील कामावर. आई शाळेत धाकटा भाऊ शाळेत?”

“आता कशी आहे तब्येत?”

“बरीय. वीकनेस आहे. ताप उलटण्याची शक्यता आहे. म्हणून बेडरेस्ट सांगितलीय.

“थांबा मी चहा करून आणते.”

आम्ही चहा प्यायलो. मी फारच दु:खी झाले होते. त्यांची ती अवस्था बघून. काही वेळाने ती उठली. जायला निघाली.

‘अरे हो एक वस्तू राहिलीच द्यायची.” मी म्हटलं.

“काय गऽ?

तिने माझं कॉलेजचं ओळखपत्र माझ्या हातावर ठेवलं. माझ्या लक्षातही नव्हतं. माझं ओळखपत्र गायब झालंय.

“त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही घाईने गेलात तेव्हा खिशातून पडलं तुमच्या ही अत्तराची बाटली. आपल्या प्रेमाची सुगंधी आठवण. येते मी. लवकर बरे व्हा. मी वाट पहातेय तुमची.” तिच्या टपोर्‍या डोळ्यातून आसवं टपकली.

राजयचे ते वर्ष आजारपणामुळे वाया गेलं. पुन्हा वर्षभर घरी बसावं लागलं. पुढल्या वर्षी मी पुन्हा कॉलेजला जाऊ लागलो. पण रस्ता बदलला. कारण इतकं चालण्याची शक्ती नव्हती. राजयचं ग्रॅज्युएशन झालं. तेव्हा सरकारी नोकर्‍या भरपूर मिळत होत्या. राजयला नोकरी मिळाली. तो जवळजवळ ऋतुजाला विसरूनच गेला. जे कधीच जमणे शक्य नव्हते त्याचा हव्यास तरी कशाला?

माझं लग्न ठरलं. मला राजयशिवाय कुणीच पसंत नव्हता. पण वडील, दादांपुढे बोलण्याची हिंमत कुणाचीच नव्हती. तयारी सुरू झाली.

दरम्यान एकदा मला चौकात तिचा भाऊ चंदू भेटला. सहज बोलतांना राजयने त्याला सांगितलं. मला पोलीस खात्यात नोकरी मिळालीय. त्यालाही आनंद वाटला. घरी नुकताच 27636 आला होता. माझे वडील नुकतेच वारले होते.

माझी धावपळ दैनंदिनी चालू झाली. मी मागलं सारं विसरलो. नवी स्वप्न पाहू लागलो. रविवारचा दिवस होता. मी रेंगाळत आवरत होतो. रविवारचा दिवस होता. मी रेंगाळत आवरत होतो. इतक्यात फोन खणाणला. मी उचलला. “अरे राजू, तू पोलीस पार्टी घेऊन ताबडतोब इकडे ये. पक्का लोच्या झालाय. तूच मदत करू शकशील.”

“अरे पण तुम्ही कोण बोलताय?”

“अरे बाबा मी चंदू. इथे भयंकर प्रकार झालाय. तू ताबडतोब ये इथे. पोलीस पण आण.”

“बरं बाबा येतो.”

मला वाटलं. ऋतुजाने जीवाचं काही वाईट तर केलं नाही ना?”

मी बाजारपेठ ठाण्याला फोन केला. ताबडतोब 4 पोलीस गाडी

घेऊन माझ्या घराशी आले.

आम्ही तिथे पोचलो. मांडव पडला होता. लग्न आहे म्हणजे. ऋतुजाचं तर नाही? मग मी येणं आणि तिला नवरी म्हणून बघणं योग्य नाही. आता आतमध्ये प्रचंड गोंधळ माजला होता. हमरीतुमरीवर आलं होतं. दोन्ही पार्टीचे लोक एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. हजार, दीड हजार लोक भयचकित झाले होते.

“अरे चंदू ही काय भानगड आहे? तू मला का बोलवलंस?”

“अरे ऋतूचं लग्न ठरलं. ऐनवेळी मांडवात हे लोक वीस लाख हुंडा मागतायत. त्याशिवाय मुलगा उभा रहाणार नाही. त्यावरून लग्न आम्हाला मोडून टाकायचय आणि त्या लोकांना धडा शिकवायचाय. आता तूच कर. मी पोलिसांना आत पाठवले. त्यांनी दोन्ही पक्षांना दम दिला.

“तुम्हाला किती हुंडा पायजे?”

“वीस लाख, मुलगी काळी आहे.”

“बरं ठीक आहे. मग तुम्ही लग्नाला तयार नाही तर.”

“नाही”

“अरे मोरे, सातव ह्या मुलाला बेड्या ठोका. त्याचे आईवडील, भाऊ बहिणी सगळ्यांना गाडीत बसवा. पोलीस स्टेशनला देऊ हुंडा. चला लवकर. ह्यांची वरात काढू.

सगळेच घाबरले. पोलिसांच्या पाया पडू लागले.

“हुंडा मागणं आणि घेणं दोन्ही गुन्ह्यास पात्र आहे. तुम्हाला ठाऊक नाही का? चला आता सांगतो.”

सगळ्यांना पोलीस घेऊन गेले.

“अरे चंद्या, ऋतुजा कुठाय?”

“ती बेशुद्ध पडलीय. त्यां खोलीत. तिला हे सहन झालं नाही.

मी आणि चंदू आत गेलो. चंदूने दार लावलं. अरे राजू पण आता पुढे काय? मुहूर्त टळला. खर्च वाया गेला.

“आई-दादा ह्या आघाताने गळून गेलेत. प्रतिष्ठा गेली. अब्रू गेली. ते नुसते रडताहेत. आता काय करायचं ते तूच सांग.” तो राजयला काकुळतीला येऊन म्हणाला. वर्‍हाडी, चिडीचूप होते. थांबायचं की जायचं?

मी जवळ जाऊन हाक मारली. ऋतुजा, राणी मी आलोय.”

हे ऐकताच तिने डोळे उघडले. उठून बसली. “मी ह्यांना सांगत होते. हे लोक बरोबर नाहीत. पण हे मला घालवायला अधीर झाले होते.” ती राजयला म्हणाली.

इतक्यात वडील बाहेर आले. त्यांनी स्टेजवर जाहीर केलं.

“हे लग्न मोडलंय. पण मांडवात उपस्थितांपैकी कोणी तरुण माझ्या मुलीशी लग्नाला तयार आहे का? पटकन् बोला. कुजबुज झाली. कुणीच काही बोलेना.

मी आणि चंदू खोलीतून बाहेर आलो.

“दादा, मी तयार आहे, ऋतुजाशी लग्नाला.”

चंदूने मला मिठी मारली. “लेका, माझी अब्रू वाचवलीस.”

“अरे चंद्या पण माझ्या आईला गाडी पाठवा आणायला. तिला बघू दे सोहळा.”

थोड्या वेळात आई आली. संजयने थोडक्यात तिला सर्व सांगितलं. ती तयार झाली. ती नवविचारवादी, सुधारणावादी होती. तिला परजातीची सून स्वीकारण्यात काहीच गैर वाटलं नाही.

मामाने ऋतूला पुन्हा बोहल्यावर आणलं. आता ती खूपच आनंदी होती. मंगलाष्टका सुरू झाल्या. राजय आहे त्या कपड्यावरच उभा राहिला. ही संधी महाभाग्याने चालून आली होती. आम्ही एकमेकांना हार घातले. तिचा प्रसन्न चेहरा पाहून आता राजयलाही खूप आनंद झाला. राजयला सोन्याच्या दोन अंगठ्या, गळ्यात जाडजूड सोनसाखळी, भला मोठा रुखवत, आईला साडी, दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. भावना लग्नाला नव्हती. ती एका सेवाभावी संस्थेकडे कायमची गेली होती. पुढचा मंगल सोहळा दैदिप्यमान झाला. सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.

“राजू तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही.” चंदूने हात जोडले आणि आसवं पुसली.

“लेकीला सांभाळा बरं. लहान हाय. कसली जात आनं पात. अखेरीला तुमीच धावून आला मदतीला.” दादा बोलले.

आई रडत होत्या. ऋतूजाही रडत होती.

आमची वरात दणक्यात निघाली. आम्ही घरी आलो.

अचानक हा प्रसंग घडल्याने मला रजा नव्हतीच. त्यामुळे घरातच मधुचंद्र झाला. बाहेर अंधार होता. पण दोघांच्या देहात पौर्णिमेचं चांदणं पेटलं होतं. आज पहिलीच भेट होती. हक्काची ऋतू घाबरली होती. मी तिला समजावलं. तिला जवळ घेतलं. अहो मी ना एक गाणं ऐकलं होतं मराठी. किती छान ओळी होत्या. मला वाटायचं हे केव्हा घडणार?”

“कोणतं गऽ?”

“आसुसली अन् अलिंगनासी, मधुमिलन हा ध्यास मनासी

चिर वांछित हा योग सुमंगल का नच अजुनी घडे”

कधी तू दिसशील डोळ्यापुढे” आज ते असं माझ्या मनातलं, डोळ्यातलं सारं घडलं. मी सुखी झाले. दैवानेच माझा हट्ट पुरवला.”

“प्रेम खरं असलं तर ते जिंकतच” मी दिवा बंद केला. माझ्या गळ्यात अचानक बेडी पडली. मात्र अनेक दिवस ह्या घटनेचे चांगले वाईट प्रतिसाद उमटत होते. आम्ही इतक्या भीषण प्रसंगातून एकमेकाचे जीवनसाथी झालो ह्याचा राजयला-ऋतूजाला आनंद आणि विस्मय वाटत होता. चार जणांसारखाच राजय व ऋतुचा संसार सुरू झाला.

कुणाला सांगू नका. कथेतला राजय मात्र लेखक स्वत: आहे. आणि लग्नाचा घाट घालण्याची शक्कल चंदूची होती. हे नंतर ऋतूला कळलं. तेव्हा ती गाणं म्हणत होती. नकळत सारे घडले…..

– छांदसी कल्याणकर

मो. 9833016725

- Advertisment -

ताज्या बातम्या