Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकाली

काली

डॉ. सतीश तराळ :

कथा : काली

- Advertisement -

तालुक्यावरून जिल्ह्याला जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर उजव्या हाताला किलोमीटरचे दगड आहेत. तालुक्यापासून नऊ किलोमीटरवर असा एक दगड आहे त्यावर समोरून जिल्हा 43 कि.मी. आणि मागून तालुका नऊ किलोमीटर असा उल्लेख आहे.

या किलोमीटरच्या दगडाजवळून डाव्या हातावर एक गाडरस्ता आहे. त्याने चार शेते आत गेलो की माझे पाच एकर शेत आहे. याला आम्ही दोन नंबरचे शेत म्हणतो. हे मी दुसर्‍यांदा विकत घेतलेले शेत नाही किंवा दोन नंबरच्या पैशातून घेण्याचाही प्रश्न नाही. शेतकर्‍याकडे कुठून येणार दोन नंबरचा पैसा!

ते शेत एका माजी सैनिकाला ‘सीलिंग’मधील अतिरिक्त जमिनीतून मिळालेले होते. ते मी विकत घेतले. त्याच्या सातबारावर भोगवटदार क्रमांक दोन आहे म्हणून पाच शेतांना जी वेगवेगळी नावे आहेत, जसे गणेशपूरचे शेत, आराळ्याचे शेत, बोराळ्याचे शेत तसेच या शेताचे नाव ‘दोन नंबरचे शेत’. शेत दोन नंबरचे असले तरी पिकायला एक नंबर आहे.

गणेशपूरच्या शेताशिवाय कोणतेच शेत त्याची बरोबरी करू शकत नाही. माती एकदम काळी आणि कसदार. शेत एकदम सपाट. कुठे उंचवटा नाही, कुठे खोलगट भाग नाही. शेत रुंदीला कमी आणि लांबीला जास्त त्यामुळे ट्रॅक्टरने पंजीपास, पट्टीपास, पेरणे आदी कामे लवकर होतात. काम करणारे खूश असतात. वेळ आणि श्रम कमी पडतात.

शेताच्या लंबानच्या पहिल्याच धुर्‍यावर सुरुवातीलाच एक लिंबाचे झाड आहे. झाडाचा एक चतुर्थांश भाग माझ्या शेतात तर तीन चतुर्थांश भाग लागून असणार्‍या रामकृष्ण सांगोळे यांच्या शेतात आहे. माझ्या धुर्‍याला लागूनच सुरुवातीलाच रामकृष्णाच्या शेतात एक समाधी आहे. बरेच दिवस मला त्या समाधीबद्दल काही विशेष वाटले नाही. रामकृष्णाच्या वडिलांची किंवा आजोबा, पणजोबांची ती असावी असे मला वाटले. शेतामध्ये अशी समाधी असते. घरातल्या माणसाला शेतात समाधी देतात. पण त्या समाधीला ‘काली’ समाधी का म्हणतात हा एक प्रश्न माझ्या मनात राहून गेला होता.

रामकृष्ण आराळ्यातला एक गरीब माणूस. त्यात एका पायाने लंगडा. लहानपणीच पॅरेलिसीस झालेला. घरी शेती नाही. पायामुळे कष्टाची कामे करता येत नाहीत. तो सोकार्‍याचे काम करायचा. उन्हाळ्यात शेतं रिकामी झाली की आराळ्याच्या स्टॅण्डवर पानेरीत पाणी वाटपाचे काम करायचा. एकदा उन्हाळ्यात तो पानेरीत बसला होता.

खेडेगावाचे स्टॅण्ड. जलद गाड्या थांबत नसत. फार गर्दीही नसे. रस्त्यावरून मोठा मेंढ्यांचा कळप जात होता. दोन कुत्री धनगरी. मागे तीन काठेवाडी धनगर… खास काठेवाडी पोषाखात. हाती काठ्या. एकाच्या हातात लांब बांबूला विळा-कोयता बांधलेला.. बाभळीच्या शेंगा मेंढ्यांना पाडून देण्यासाठी आणि एक धिप्पाड काळी काठेवाडी गाय.

कळप पानेरीच्या पुढे जिल्ह्याच्या दिशेने सरकला. मागून एक ट्रक कापसाच्या गाठी घेऊन जिल्ह्याच्या दिशेने भरधाव मोठमोठ्याने हॉर्न देत आला आणि थोड्याच वेळात एकच गोंगाट झाला. गाय ट्रकवर धावली, ट्रकखाली आली. तिचे पुढचे दोन्ही पाय मोडले होते. चूक ट्रकवाल्याची नव्हती. त्याने वेगही कमी केला होता. गायीलाच ट्रकवर धावायची सवय होती. कोणीतरी ट्रकवाल्याने तिचे वासरू केव्हातरी चिरडले होते.

तेव्हापासून ती ट्रकवर धावायची. गाय उंच, धिप्पाड, रंग काळा पण कुठे पांढरे, कबरे धब्बे, पट्टे, शिंग सरळ लांब, दुधाचे आचळ मोठे. खाली लोंबणारे. एका बंडीत मावणार नाही एवढे अवाढव्य शरीर. डोळे काळेशार टपोरे. विस्तीर्ण कपाळ, बैलासारखी खाली लोंबणारी आयाळ, लांब काळ्या झुपक्याची शेपटी. एकदम उमदे जनावर! डोळ्यात भरणारे! ती मागच्या पायावर उठण्याचा प्रयत्न करत होती पण समोरचे दोन्ही पाय मोडल्याने तिला ते शक्य होत नव्हते.

लोक धावले तसा रामकृष्णाही धावला. गायीचे रक्ताळलेले पाय रामकृष्णा फडक्याने पुसू लागला. मोडलेली हाडे कशी जुळवायची त्यावर बोलू लागला.

‘तुम जानते हो टुटी हड्डी बराबर करना?’ काठेवाडी धनगर.

“हाव, हा… हा… रामकृष्णा.

‘हम गय्या आपको दे देते है. पालोगे?”

“हा.”

“बचोगे तो नही? हम आये तो हमको दिखनी चाहिये. हम हरसाल आते है.”

‘मी कायले इकू बाप्पा. गाय म्हनजे माय. मायले कोनी इकते काय”?

“तो लेलो.”

गायीला नमस्कार करून काठेवाडी आपला कळप घेऊन पुढे निघाले.

युद्धात शत्रूकडून गंभीर जखमी जवानाला नाईलाजाने सॅल्यूट करून पुढे जावे लागणार्‍या जवानांसारखे. भावना तर त्यांच्याही अनावर झाल्या होत्या. पण परराज्यात जंगली जीवन जगताना भावनांना आवर घालणे त्यांना आवश्यकच होते.

रामकृष्णाने गावातून बंडी बोलावली. गायीला बंडीत टाकणे आणि पुन्हा गावात उतरवणे म्हणजे मोठी सर्कसच होती. थोड्याच वेळात अर्धे गाव स्टॅण्डवर जमा झाले. त्यांच्यासाठी ही घटना अपूर्वाईची होती. सर्वत्र त्याच विषयाची चर्चा सुरू झाली. सर्वांनी मिळून गायीला बंडीत टाकले. गायीने पूर्ण बंडी व्यापली होती. तरी तिचे पाय बंडीच्या बाहेर आले होते. तिच्या शेपटीकडचा भाग धुरकर्‍याच्या दिशेला आणि डोक्याकडचा भाग बंडीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आला. नाहीतर बंडी उलार होईल यावर सर्वांचे एकमत झाले. बंडी गायीसह गावाकडे निघाली. मागोमाग गावही चालू लागले.

रामकृष्णाच्या घरी काठेवाडी धनगराची गाय आली ही मग गावाच्या दृष्टीने एक वेगळीच महत्त्वाची धार्मिक पवित्र बाब झाली. गायीवर उपचाराची जबाबदारी मग एकट्या रामकृष्णाची राहिली नाही.

रामकृष्णाला वनौषधींची माहिती होती. जनावरांचे हाड जोडण्याचे ज्ञान होते. त्याने शेतशिवारातून वनौषधी-झाडझुडपाचा पाला आणला. बांबूच्या विशिष्ट लांबीच्या कमच्या केल्या. जखमांवर उपचार सुरू झाले. जखमा सुकताच कमच्यांच्या सहाय्याने कापड, कापूस याचा उपयोग करून प्लॅस्टर बांधले गेले. गायीची सुश्रुषा सुरू झाली. गावही त्यात सहभागी झाले. तिच्यासाठी गोठा केला गेला. तिला जागेवर चारा-पाणी मिळू लागले. तिनेक महिन्यात ती पूर्णपणे बरी झाली. समोरच्या पायावर उभी राहू लागली. चालू लागली. धावू लागली. पुढे पुढे तर तिचे समोरचे पाय कधी तुटले होते हे खरेही वाटू नये अशी ती धावे. उड्या मारी. दरम्यानच्या काळात गावाने तिचे नामाभिधान करून टाकले होते. तिच्या काळ्या रंगावरून तिचे नाव काली पडले होते.

काली शरीराने जशी धिप्पाड तशी बुद्धीने तल्लख होती. डॉबरमॅनसारख्या विदेशी कुत्र्यांच्या ठिकाणी आढळणारा स्वामिनिष्ठपणा हा वेगळाच गुण तिच्यात होता. तीन-चार महिने रामकृष्णाने तिची सेवा आणि सुश्रुषा केली होती. आपण या माणसामुळे उभे होऊ शकलो. मूळ मालक टाकून गेला आणि याने आपल्याला नवजीवन दिले ही भावना एखाद्या संवेदनशील, प्रामाणिक माणसाप्रमाणे तिच्यात निर्माण झाली.

सहा-सात महिन्यांतच तिने एका लालसर-काळपट रंगाच्या गोर्‍ह्याला जन्म दिला. आपल्या बछड्याला पोटभर पाजूनही ती एका वेळी आठ-आठ लिटर दूध द्यायची. गोर्‍हा मोठा झाल्यावर तर ती दहा लिटर दूध द्यायला लागली. चारा-पाण्याचा खर्च नाही आणि वीस लिटर दूध रोज घरी होऊ लागले. रामकृष्णाची मुले तालुक्याला दूध विकू लागले. रामकृष्णा सोकारीसाठी जाताना कालीला सोबत नेऊ लागला. तो सोकारी करायचा आणि कालीला चारायला इतर सोकारी कुत्रे सोबत न्यायचे. त्या जंगलात रानडुकरांचा त्रास होता पण रामकृष्णा कालीला न्यायचा.

सुरुवातीला सर्वांना याचे आश्चर्य वाटायचे. गंमत म्हणजे रानडुकरे कालीला घाबरायची. एकदा एका रानडुकराला तिने शिंगाने घायाळ करून पायाखाली तुडवले होते. तेव्हापासून तिच्या गळ्यातल्या कासंड्या वाजल्या की रानडुकरे आपोआप पळून जायची. एखादे ढोर, मोकाट गाय, गोर्‍हा शेतात येताना दिसला की ती त्याच्या अंगावर जायची. रामकृष्णाऐवजी आता तीच सोकारी झाली होती. रामकृष्णाची सारी शेत आता तिला रामकृष्णासोबत जाऊन जाऊन पाठ झाली होती. ती शेताबाहेर धुर्‍याधुर्‍याने चरायची आणि रामकृष्णाकडे आलेल्या शेतांवर लक्ष ठेवायची.

एक दिवस रात्री वेगळाच प्रकार घडला. बच्चा आता चांगलाच उंच झाला होता. काही काळानंतर बैल होणार होता. तिच्यासारखाच धिप्पाड आणि धष्टपुष्ट होणार होता. रात्री काही बैल चोर आले. त्यांनी गोठ्यातून गोर्‍हा सोडला आणि गोठ्याबाहेर पडले. कालीच्या हा प्रकार लक्षात आला. चोर आले की कुत्रे भुंकतात तशी काली मोठमोठ्याने विचित्र हंबरडे फोडू लागली. तिने दोर तोडला. आता रामकृष्णा आणि त्यांची मुलेही उठली होती.

काली एकदम धावत निघाली. दोन चोरांपैकी एकाच्या हाती तिच्या बछड्याचा दोर होता. दुसरा काठीने मारून त्याला हाकलत होता. कालीने प्रथम मागच्या चोराला शिंगावर घेतले अन् पायाने तुडवले. हे पाहून दुसरा पळाला पण तिने त्याचा पाठलाग केला. त्यालाही खाली पाडले आणि त्यालाही तुडवले. दोन्ही चोर जबर जखमी झाले. गावाला त्यांना मारहाण करायचेही काम पडले नाही. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पंचक्रोशीत काली हाच चर्चेचा विषय होता. आपल्या पिलाच्या प्रेमातून तिने हे केले, असेच सगळ्यांना वाटत होते. त्यानंतर काही महिन्यांनी घडलेली घटना आणखीनच वेगळी होती.

गावात चार-पाच ट्रॅक्टर होते. गाव लहान असल्याने सर्वच ट्रॅक्टर थोड्याफार अंतरावर होते. त्यातले दोन ट्रॅक्टर रामकृष्णाच्या घराजवळ होते. रात्री तीन-चार ट्रॅक्टरची बॅटरी चोरणारे चोर आले. त्यांनी दोन बॅटर्‍या काढल्या आणि ते रामकृष्णाच्या घराजवळील ट्रॅक्टरच्या बॅटर्‍या चोरायला आले. ट्रॅक्टर कालीच्या गोठ्याजवळच होते. त्यांनी पान्हे लावून बॅटर्‍या काढल्या. कुशाग्र बुद्धीच्या कालीला काय प्रकार आहे हे लक्षात आले. ती मोठ्याने हंबरडे फोडू लागली. दोराला झटके मारू लागली. दोर प्लॅस्टिकचा असल्याने तुटेना. शेवटी तिने खुंटा उपटला. चार चोर बॅटर्‍या खांद्यावर घेऊन निघाले होते. काली माणसासारखी त्यांच्या मागे लागली. एकाला शिंग मारून खाली पाडले. बॅटरीही खाली पडली. त्याला तिने पायदळी तुडवले. आता ती दुसर्‍याच्या मागे लागली. त्यालाही शिंगाने जखमी केले. पायदळी तुडवले. दोघे मात्र बॅटर्‍या टाकून पळून जाण्यात यशस्वी झाले.

आता रामकृष्णा आणि गावातली माणसे जमा झाली होती. रक्तबंबाळ झालेले ते चोर त्यांनी ओळखले. येथून बारा किलोमीटरवर असणार्‍या खोलापूरचे जब्बार आणि जावेद होते. गेल्या पाच-सात वर्षांत आजूबाजूच्या अनेक गावांतून ट्रॅक्टरच्या बॅटर्‍या चोरीला गेल्या होत्या. पाच-सात हजार रुपये बॅटरीची किंमत होती. जब्बार आणि जावेदला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्यांचे दोन साथीदारही पकडले. त्यांनी परिसरातील सर्व चोरांची माहिती दिली. अकोट, अमरावतीला कोणाकडे बॅटर्‍या विकल्या याचीही माहिती दिली. वर्षानुवर्षे होणारी एक मोठी चोरी पकडली गेली होती. कालीच्या फोटोसह वृत्तपत्रांत बातम्या छापून आल्या.

तालुक्याच्या ठाणेदाराने गावात येऊन सार्‍या गावकर्‍यांसमोर रामकृष्णाचा आणि कालीचा सत्कार केला. तेव्हापासून कोणाची बॅटरी चोरी गेली नाही. आता या परिसरात भुताच्या, सापाच्या अन् चोरांच्या न संपणार्‍या गोष्टीत आणखी एका अद्भूततेची भर पडली ती म्हणजे काली. ती कोणताही खुंटा उपटते, कोणताही दोर तोडते, परिसरातील सर्व जनावरे तिला घाबरतात. डुकरे तिला पाहून तिच्या कासंड्याचा आवाज ऐकताच पळतात आणि सर्वात रंजक चर्चा म्हणजे भूत तिला घाबरतात. ती ज्या भागात, रानात तिथे भूतबाधा नाही.

कालीची स्वामीनिष्ठा म्हणजे तर अद्भूत प्रकार होता. एकदा उन्हाळ्यात रामकृष्णा पानेरीवर पाणी वाटत होता. काली बाजूला बसली होती रवंथ करत. बाहेरगावाचा कुणी धटिंगण रामकृष्णाशी वाद घालत होता.

“तुया मले उष्ट पानी पाजलं”

“हाट राजेहो, मी कायले उष्ट पानी पाजू.”

“डोयानं पायलंत पेले कसे?

वाद वाढत गेला. बाचाबाचीवरून मारामारीवर गोष्ट आली आणि त्या अपरिचित धटिंगणाने रामकृष्णाला मारझोड सुरू केली. काली ताडकन उठली. काय होते आहे हे कुणाला कळण्याआधी तिने त्या धटिंगणाला शिंगावर घेऊन फेकले आणि पायदळी तुडवून रक्तबंबाळ केले. त्याच्या छातीवर, पोटावर तिचे खुरे पडले नाहीत की तिने दिले नाहीत कोण जाणे नाहीतर त्याचे प्रेतच उचलावे लागले असते.

त्यानंतर गावात वेगळाच प्रकार होई. गंमत म्हणून काली गोठ्यात बांधलेली असली की गावातली माणसे रामकृष्णाला कवट्यात घेत मारल्यासारखे करत. त्याच्या अंगावर धावून जात. मग काली विचित्र हंबरडे, दोराला झटके मारी. कधी दोर तोडे तर कधी खुंटा उपटे पण गंमत करणारा पूर्ण सावध असल्याकारणाने घरात पळून गेलेला असे.

कालीच्या पायाने रामकृष्णाच्या घरी वैभव चालत आले. तिने भरपूर दूध दिले. एकामागोमाग एक गोर्‍हे दिले. तिच्यामुळे शिंगणापूरच्या बलाढ्य सांडालाही महत्त्व आले. कालीच्या गोर्‍ह्यासारखे गोर्‍हे शोधूनही सापडत नसत. पण त्यांचे बैल करून विकता येत नसत. बैल कितीही लांब विका; आठ-पंधरा दिवसांत तो घरी परत येत असे. मोठ्या मुश्किलीने एक बैल त्याच्या विवाहित मुलीकडे मुले-मुली आणि रामकृष्णा तिथे दोन महिने राहिल्यामुळे राहिला होता. बैल घरीच ठेवावे लागत. रामकृष्णाची मुले लवकरच कामाला लागली. त्यांचा एक मामाही त्यांच्या घरी येऊन राहू लागला. रामकृष्णाही लंगडत लंगडत वखर हाकू लागला.

रामकृष्णाचे बैल बलवान म्हणून त्याच्याकडे जोडी भाड्याने सांगणार्‍यांची गर्दी. त्याचे कुटुंब मेहनती, प्रामाणिक आणि काटकसरी. घरात तंबाखूचेही व्यसन नाही. चहा-सुपारीपलीकडे त्यांची व्यसने गेली नाहीत. त्यातून ते दरवर्षी एक-दोन एकर शेती घेऊ लागले. घरच्या जोड्यामुळे लागवणीची शेती करू लागले. कालीच्या शेणखताने शेतं भरमसाठ पिकू लागली. गावातले आणि परिसरातले मोठमोठाले खटले विभाजनाने आणि व्यसनाने गारद होत असताना एकही तास नसलेला रामकृष्णा मात्र दिसामासाने वाढत होता. तो शेती विकत घेत होता तशा त्याने काही म्हशी विकत घेतल्या. पानेरीच्या जागेच्या मागे जवळच असलेल्या त्याच्या शेतात डेअरी टाकली. म्हशीचे दूध तो तालुक्यातील हॉटेलवाल्यांना विकू लागला. शेणखताने शेती अधिकाधिक उत्पन्न देऊ लागली. त्याने ट्रॅक्टर घेतला. नांगर, पंजीपास, पेरणी यंत्र, पट्टीपास, मोगळा, तिर्री, फंटन, रोटावेटर, सारी यंत्र क्रमाक्रमाने घेतली.

मामा ट्रॅक्टरचा जाणकार, उत्तम ड्रायव्हर. त्याने भाचे ट्रेन केले. त्यांचे काम चांगले, स्वभाव प्रामाणिक, भाव वाजवी यामुळे कामाची रीघ लागे.

काली रामकृष्णाच्या घरी आली तेव्हापासून तिच्या नाकात बैलाप्रमाणे वेसण होती. रामकृष्णा, त्याची मुले कालीला बांधताना वेसण बांधत नसत. तिच्या गळ्याला दावे होते. त्याला बांधत असत. पण काल कामावरच्या गड्याने कालीला वेसणेत बांधले होते. त्यामुळे ती फार जोरात झटके मारू शकत नव्हती. चोर म्हशीला घेऊन म्हशी पिटाळत जात होते. पुढे त्यांनी ट्रक उभा केला होता. ट्रकमध्ये भरून ते नेणार होते. कालीचा आकांत सुरूच होता. वेसण, दोर तुटत नव्हता. वेसण नाकाला घासून नाकातून रक्त वाहू लागले होते. तरी कालीची दोर तोडण्याची धडपड सुरूच होती. तिच्या धडपडीमुळे वेसणाची गाठ नाकात आली. दोन नाकपुड्यांच्या मधल्या छिद्रात अडकली. दोराच्या तुलनेत ती मऊ होती. दोराला झटका न मारता कालीने शिंगाखालच्या वेसणेच्या दोरावर सारा भार देईल असा दोर पूर्ण ताकदीनिशी शरीराचे वजनही त्यावर आणून मागे ओढला आणि वेसणाची गाठ निसटली. काली मुक्त झाली. क्षणात तिने ट्रकमध्ये म्हशी चढवण्याच्या बेतात असणार्‍या चोरांना गाठले. हाती कुल्हाडी असणारे चोर प्रतिकाराचा प्रयत्न करू लागले. एक दोघांना तिने शिंगावर घेऊन पायदळी तुडवताच बाकीचे वाट मिळेल त्या शेतात पळू लागले. कालीचा हा पराक्रम पोलीस स्टेशनमध्ये चोरांकडून सर्वांना ज्ञात झाला.

आता सर्व गायी, म्हशी डेअरीत असत. डेअरीही चांगली बांधली होती. तिथे सर्व सोयी होत्या. पण काली मात्र घरच्या गोठ्यात असे. एक दिवस रात्री तिने अचानक आकांत मांडला. विचित्र हंबरू लागली. जागच्या जागी थयथयाट करू लागली. आज तिने दोर तोडला नाही. खुंटा उपटला नाही पण जिवाच्या आकांताने ओरडत होती. आजचे तिचे हंबरणे, ओरडणे वेगळेच होते. विचित्र होते. जरूर ती काही सांगत होती. सांगणे कारुण्यपूर्ण होते, दु:खद होते. ती शोकाकूल झाली होती. तिच्यातला आक्रमकपणा आज नव्हता. ती अगतिक वाटत होती.

रामकृष्णा, त्याची मुले, मामा, आजूबाजूचे लोक गोळा झाले. काली रामकृष्णाला चाटू लागली. आकांत करू लागली. सर्व तिच्याभोवती गोळा झाले. तिच्या अंगाखांद्यावरून हात फिरवू लागले. ती मोठ्या संकटात आहे, दु:खात आहे हे जाणवत होते. पण काय ते कळत नव्हते. सर्वजण चिंताग्रस्त, हतबल झाले होते. काली एकदम खाली कोसळली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. काळी पडलेली जीभ बाहेर येऊ लागली आणि एकदम रामकृष्णा ओरडला, ‘अरे माह्या कालीले पान लागलं.’ मग इतरांच्या लक्षात आले… ‘हो पान लागले…’ पण वेळ झाला होता. ‘जनावर’ महान विषारी होते. कोणताही उपचार करण्यापूर्वीच कालीने मान टाकली. रामकृष्णा आणि त्याच्या मुलांसोबत सार्‍या गावाने हंबरडा फोडला. ‘काली गेली हो..’ एखाद्या स्त्री-पुरुषाची निघावी तशी तिची अंत्ययात्रा निघाली. ट्रॅक्टरमधून तिचे शव वाजत-गाजत नेण्यात आले. आजूबाजूच्या गावातील लोक तिच्या अंत्ययात्रेत सामील झाले. रामकृष्णाच्या पहिल्या शेतात तिला समाधी देण्यात आली.

-डॉ. सतीश तराळ, अमरावती

- Advertisment -

ताज्या बातम्या