Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअंत्ययात्रा

अंत्ययात्रा

प्रकाश खंडागळे

आज सकाळी मला दुकान उघडायला उशीरच झाला होता. दुकान उघडताना शटर जरा अवजड वाटत होते. का बरं जड जातेय शटर? एक शंका मनाला चाटून गेली. शटर बळजबरीने लोटत गज अडकवला. दुकान झाडून घेतले.

- Advertisement -

आज पिंपळगाव येथील शाळेची पुस्तके पोहोच करायची आहेत. तसा निंबाळकर सरांना फोनही झाला होता. आज तुमची वाट पाहतो, सरांचा निरोप आला होता. त्याप्रमाणे निघण्याच्या तयारीतच होतो; तो दारात नीलेश उभा. येता का? कुठे हो, माझा प्रश्न. तुम्हाला माहीत झाले नाही का? नाही बाबा! आपल्या शेजारच्या विजयचे वडील गेले ना! कधी हो? आज सकाळी सकाळी; मग अंत्यविधी कधी आहे? माझा प्रश्न. आताच आहे. येत असाल तर चला. जाऊन येऊ. अहो, मी तर पिंपळगावला निघालो होतो शाळेवर! पाहा, सांगा मला, मी जाणार आहे आता लगेच.

तसे म्हणत तो त्याच्या मोटारसायकलकडे जाऊ लागला. माझ्या मनात विचार आला अंत्यविधी महत्त्वाचा की पुस्तके? पुस्तके तर कधीही देऊन येऊ शकतो आपण पण शेजारच्या विजयच्या वडिलांचा अंत्यविधीही तितकाच महत्त्वाचा. लगेचच दुकानाचे शटर खाली ओढले. तेवढ्यात निघालात का शाळेवर? अहो, तुमचा चहा तसाच राहिलाय! आशा घराच्या पायर्‍या उतरून खाली आली. समोर नीलेश गाडीवर बसून होता.

मी आशाला म्हटले, अगं विजयचे वडील वारले आहेत. कधी हो? सकाळी! आम्ही अंत्यविधीस निघालो आहेत. ठीक आहे, जा, पण चहा पिऊन लगेच निघा. नीलेश घेणार का चहा? नको नको म्हणत त्याने मोटारसायकलचे स्टार्टर दाबले. मी घशाखाली तो गरम चहा ओतला अन् नीलेशच्या मोटारसायकलवर विराजमान झालो. चला, अंत्यविधी महत्त्वाची आहे, पुस्तके उद्या देता येतील, मी स्वतःच्या मनाचे समाधान करत होतो.

तसा आमचा घाईगडबडीत प्रवास रस्त्यावरचे खड्डे, गाड्या, रस्त्यावरील जनावरे चुकवत सुरू झाला. काय हो, राजाची गाडी घेतली आहे? मी म्हटले, लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ. माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे. तेव्हा राजाला म्हटलो दे चावी, लगेच आम्ही येतो बाबा. तेंव्हा त्याने गाडी दिली. फक्राबादकडे आगेकूच करता करता आयटीआयच्या बाजूचा चढ पार केला आणि कुसडगावच्या उतारावर गाडी भुरभूर करून आचके देऊ लागली.

आता हो काय झाले? तसा मी गाडीवरून खाली उतरलो. नीलेशने पेट्रोलची टाकी उघडून अंदाज घेतला. अहो, पेट्रोल संपले वाटते! बोंबला आता, अहो, आता रस्त्यात पेट्रोल कोठे मिळणार आहे? काही काळजी करू नका हो सर तुम्ही, रिझर्व्ह पेट्रोल आहे टाकीत. तशीच गाडी ओढतो मी! तुम्ही बसा बरं. तसा मी गाडीवर बसलो. मनात शंकेची पाल चुकचुकलीच! अशा काही प्रसंगी अडथळा होतच असतो असे म्हणतात. गाडी फक्राबादच्या दिशेने धावत होती. मधल्या प्रवासात राजकारणावर गप्पा झाल्या. तसा राजकारण नीलेशचा आवडता विषय.

आता येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल? या माझ्या एका प्रश्नावर नीलेशने मला फक्राबाद येईपर्यंत निवडणुकीचे संभाव्य विश्लेषण सुनावले. मी खड्डे वाचवत आणि गाडीचा तोल सांभाळत कान देऊन ऐकत होतो. तशात फक्राबाद कधीच पास झाले होते. गाडी कच्या खाचखळग्यांची शर्यत करत वाडीवस्तीवरच्या रस्त्याने धावत होती. चार-पाच फर्लांगची दमछाक सरताच एका ठिकाणी अनेक मोटारसायकली उभ्या दिसल्या. वस्तीवर आपण आलो आहेत का? एस सर! विजयची फॅमिली येथेच राहते. तेथेच उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या घोळक्यात नीलेशने गाडी लावली. समोर विजयचे जुने घर, समोर शेतीजवळ गुरांचा गोठा वजा एक खोली, दारासमोर शेतीची साधने पडलेली. नुकताच शेतातून मोघाडा फिरवल्याचे दिसत होते.

आम्ही आणि काही सगेसोयरे घराकडे येताच समोरच्या घरातून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज चालू झाला. आता सर्व पुरुष मंडळी तिरडी बांधण्याची तयारी करत होती. एका कोपर्‍यात विजय रडून रडून घायकुतीचा चेहरा करून बसला होता. आम्ही दोघे त्याच्या शेजारी जाऊन बसलो. आम्हाला पाहताच तो नीलेशच्या खांद्यावर डोके ठेऊन मोठमोठ्याने रडू लागला. कसे झाले रे विजय? अहो, मी पुण्याला यशकडे गेलो होतो. तेथून संध्याकाळी निघालो तर रस्त्यात मला फोन आला, दादा गेले म्हणून. मी पहाटे येथे पोहोचलो. घरात पाहतो तर दादा गेले. यशला फोन केला. तो आता येतो आहे.

कोण हा यश? माझा नीलेशला प्रश्न. त्याचा भाऊ आहे. पुण्यात कंपनीत काम करतो. त्यासाठी सर्वजण थांबले आहेत. तेवढ्यात अहो, आंघोळीची तयारी करा, गरम पाणी करा तोपर्यंत यश येईलच. तसे पार्थिवाला आंघोळीसाठी बाहेर आणले एका झोळीत. कुठे ठेवावे या गडबडीत समोरच जुना मोटारपंप पडला होता. त्याला एका व्यक्तीने लाथ मारून पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. तो लोखंडी मोटारपंप एका अंगावरून दोन-तीन पलट्या खात एकीकडे जाऊन पडला.

त्याचवेळी त्यातून भलामोठा साप बाहेर येताना एकाच्या दृष्टीस पडला. त्याने मागचा-पुढचा काहीही विचार न करता त्याच्या डोक्यावर आपला पाय ठेवून चांगला दाबला. सुदैवाने त्या सापाचे तोंड चप्पलने छिन्नविछिंन्न झाले होते. तरी सापाने त्या व्यक्तीच्या पायाला वेटोळे गुंडाळलेले होते. तेथे उभ्या असलेल्या सर्वांच्या भेसूर नजरा तो घडलेला प्रसंग भयमुक्त नयनाने टिपत होत्या. तो एक भयंकर विषारी साप होता. त्या व्यक्तीने आपल्या हाताने तो पायाचा वेढा सोडत मेलेल्या सापाला काठीवर घेत दूर भिरकावून दिले. तेव्हा तेथे हजर असलेल्या लोकांचा जीव भांड्यात पडला.

इकडे अनुभवी पुरुष मंडळींनी जावई व मुले आणि मुलींनी पार्थिवाला आंघोळ घालून नवीन कपडे चढवून तिरडीवर ठेवले. दरम्यान, यश आला होता. त्यानंतर तिरडीवर पार्थिवाला नवीन पांढर्‍या कपड्यात गुंडाळून दोरीच्या सहाय्याने बांधले. त्यानंतर राम नाम सत्य है म्हणत चार खांदेकर्‍यांनी खांदा देत अंत्ययात्रा घरापासून सुरू झाली. मला वाटले, त्याच्या शेतावर असेल अंत्यसंस्कार! पण अंत्ययात्रा निघाली विंचरणा नदीच्या पात्रातून थेट सांगवी गावाच्या स्मशानभूमीच्या पुढे. रस्त्यात खड्डे, वाळू तुडवत अंत्ययात्रा एक तास चालत एका निर्जनस्थळी आली. तेथेच ओली कच्ची लाकडे रचून सरणावर अग्निडाग मुलगा विजय याने दिला. त्यानंतर चिता पेटवली.

जो तो चिता चांगली पेटवण्याचा प्रयत्न करत होता, कारण आदल्या दिवशी चांगला पाऊस पडून गेल्याने सरणावर लाकडे ओली होती. त्यामुळे जो तो लाकडे शिलगवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होता. जोराचा वारा असल्याने एकीकडेच जाळ लागत असल्याने जो तो डोळ्यात तेल ओतून चिता कधी चांगली पेटेल याची वाट पाहत होता. जवळ बसलेल्या महिलांतील त्यांच्या मुलींचा आक्रोश मात्र आसमंतात घुमत होता.

शेवटी एका गुरुजींनी सर्वांचे आभार मानून पसायदान म्हटले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शेवटची श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर जो तो आलेल्या मार्गाने मार्गस्थ होत होता. आम्ही मात्र आल्या रस्त्याने विजयचे घर गाठले. दुपारचे दोन वाजले होते. डोक्यावर सूर्याची किरणे तळपत होती. घशाला कोरड पडली होती. दारासमोर पाण्याच्या बादल्या आणि लिंबाचे डहाळे घेऊन एक व्यक्ती उभी होती. लिंबाच्या पानांचा कडू स्वाद घेत हाता-पायावर पाणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

तोच कुसडगावचा चढ चढताना पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. मी नीलेशला म्हटले, आता आपण चांगलेच भिजणार हो! अहो सर, मी तर वाट पाहतो आहे, मी कधी चिंब चिंब भिजतोय पावसात! कारण यावर्षी अजून मी पावसात चिंब भिजलोच नाही! तसा पाऊसच पडला नाही आपल्याकडे. त्याचीच मी वाट पाहतो आहे.

आज माझी ती इच्छा पूर्ण झाली तर बरे होईल. मला चिंब चिंब भिजायचे आहे. तेव्हा समोर तर जोरदार पाऊस पडतो आहे. आपण मात्र कोठेच आता थांबणार नाही आहोत म्हणत त्याने गाडी जोरात पुढे ओढली, पावसात भिजण्यासाठी. थोडे अंतर पावसात भिजलो. पण आम्ही जसे धावत होतो त्याच्या दुप्पट वेगाने पाऊस आमच्या पुढे सुसाट वारा प्यायल्यागत धावत होता. दरम्यान, आम्ही जामखेडला पोहोचलो तर येथील सारा परिसर कोरडाच दिसत होता. या भागात पाण्याचा टिपूसही स्पर्श करून गेला नव्हता. अंत्ययात्रेसारखाच दुःखाचा हळवा स्पर्श करून, आमच्या पुढे अनंतात विलीन झाला हो पाऊस…हळवा पाऊस..! मात्र लक्षात राहिली ती अंत्ययत्रा…

जामखेड, जि. अहमदनगर

मोबाईल 8087877965, 8830068335

- Advertisment -

ताज्या बातम्या