Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगुलमोहर

गुलमोहर

ज्योती कपिले

दूर कुठून तरी ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता’ ह्या गाण्याचे मन धुंद करणारे सूर कानी पडले आणि पटकन गुलमोहराच्या झाडाची विविध रुपं, आठवणी डोळ्यासमोर आल्या.

- Advertisement -

मला आठवतयं, माझ्या शाळेत जायच्या मार्गावर फांद्यांचा विस्तीर्ण पसारा सांभाळत गुलमोहर आपल्या फुलांचा लालभडक गालीचा जमिनीवर अंथरूण उभा असायचा. गुलमोहराची ती मोठी व गडद लाल-नारिंगी रंगाची डौलदार फुलं आणि त्याच्या पाकळ्याची रोज वेगवेगळी नक्षी आम्हाला जमिनीवर बघायला मिळायची. त्या फुलाच्या गालिच्यावरून जातांना माझा जीव कासावीस व्हायचा त्या फुलावर पाय पडला की, ती फुलं तुडवली जायची. जे मला नको वाटायचं मग चालतांना मोठी कसरतच करायला लागायची.

गुलमोहराचे फूल म्हणजे, चार समान लाल केशरी तर एक किंचित मोठी पाकळी असणारं आणि त्या पाकळीवर दिसणारे पांढर्‍या, पिवळ्या रंगाचे शिंतोडे शिवाय लाल तंतूंची केसरदले. या सगळ्यामुळे ते हाताच्या ओंजळभर फुल बघायला मला खूप आवडायचे. माझ्या एका मैत्रिणीला तर ते फूल चक्क खायला आवडायचे.

ती मलाही ते फुल खायचा आग्रह करायची. (आता समजतंय गुलमोहराचं फुल, झाड औषधी आहे ते) मात्र मला कधीही ते फुल खावंसं वाटलं नाही. पण हो, मात्र ते फूल मी माझ्या पुस्तकात ठेवत असे. त्या फुलाच्या सुकलेल्या पाकळ्या, त्याचा डौल आणि पुस्तकावर उमटलेला किंचितसा लाल-नारंगी रंग नि रेषा मला खूप आवडायच्या. त्यामुळेच झाडाची फुलं गळून गेली की झाडाचं ओकं बोकं होणं मला बिलकूल आवडत नसायचं. मीही मनातून उदास व्हायची. अर्थात तेव्हा शिशिर आणि बहर हे फारसं कळण्याच वय नव्हतंच मुळी.

पुढे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे गुलमोहराचे झाड सतत माझ्या सोबतीला राहिलं. आणि मग त्या झाडाकडे माझी बारकाईने बघायला सुरुवात झाली. मग मी गुलमोहराची माहिती गोळा करू लागले. झाडाचा जीवनक्रम समजून घेऊ लागले. लाल गुलमोहराची नावं बघा हं, संस्कृतमध्ये कृष्णचूड़ा, बंगालीमध्ये राधाचूड़ा, आसामीमध्ये कृष्णसुरा या सर्वांचे अर्थ कृष्णाचा मुकुट असा होतो. हिंदीमध्ये गुलमोहर, गुजराथीमध्ये रक्त गुलमोहर, तामिलमध्ये मायारम (चरूर्रीीा), तेलगूमध्ये अग्निपुलु, अरबीमध्ये गोल्डमोर , मल्ल्यालममध्ये गुलपरी, केरळमध्ये कालवशिप्पू , इंग्रजीत फ्लेमबॉयेन्ट ट्री, फ्लेम ट्री, रॉयल पोन्सियाना अशी वेगवेगळी नावं मला सापडली.

‘गुलमोहर’ हा मादागास्कर या देशाचा मूळ रहिवासी. नंतरच्या काळात हे झाड युरोपमधील राष्ट्रे, नायजेरिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतील फ्लोरिडा आणि ब्राझिल आदी ठिकाणी सापडले. विशेषत: उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा वृक्ष आढळतो. फेबॅसी कुळातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘डेलोनिक्स रेजिया’ असे आहे. सेंट किटीस आणि नेवीस या राष्ट्रांनी गुलमोहराला राष्ट्रीय फूल म्हणून मान्यता दिली आहे.

फ्रांसमध्ये गुलमोहरच्या फुलाला ‘स्वर्ग फूल’ म्हणतात. आणि गुलमोहराचं या पेक्षाही अजून सुंदर नाव दुसरं कुठलं असू शकेल का? तर अशा विविध नावाने हा वृक्ष ओळखला जातो. निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या काळात गुलमोहर फुलतो. भारतात एप्रिल ते जून हा गुलमोहर बहरण्याचा काळ आहे. त्याच्या फांद्याही विशिष्ट प्रकारे रचलेल्या असतात. खोडावर वयोवृध्द माणसाच्या त्वचेप्रमाणे सुरकुत्या असतात. खोडावरील खाचेतून फांद्या फुटलेल्या असतात. एका फांदीतून दुसरी आणि मग तिसरी अशा रीतीने हा वृक्ष डेरेदार होतो. त्याची इवली इवली हिरवीगार पाने संयुक्त प्रकारची असतात.

खरंतर वसंत ऋतू येतो ते चैतन्याची पालवी घेऊन पण गुलमोहर तो नियम सरळ धुडकावून लावतो. आणि वसंतात काही गुलमोहराच्या झाडाची पानं गळून फुले येण्यास सुरुवात होते. उन्हाळ्याची सुरवात झाली की. फांद्यांच्या टोकास फुलांच्या मंजिर्‍या येतात आणि मग फुलतो तो लालजर्द फुलांचा बहर. अर्थात ह्या मनभावन, डोळ्याचे पारणे फेडणार्या बहरामुळेच तर गुलमोहराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इकडे विशेष स्थान लाभले आहे. दरवर्षी गुलमोहर बहरात येण्याच्या काळात ‘गुलमोहर फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते….मिरवणुका काढल्या जातात….फुगे फुगवून, कॉन्फेटी (रंगबिरंगी कागदाचे कपटे) उधळत नाच, गाणी म्हणत, सहली काढत मगुलमोहर फेस्टिव्हलफ साजरा केला जातो. तसेच काहीसा प्रकार भारतातील महाराष्ट्रात सातारा येथे दरवर्षी 1 मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो. आबालवृध्द ह्यात आनंदाने भाग घेतात. निसर्गविषयक कविता वाचन, चित्रं, फोटोग्राफ्स, यांचा आनंद लुटतात. गेली कित्येक वर्षे हा उपक्रम चालू आहे. लोकांचे निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांकडे लक्ष वेधावे म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेला गुलमोहर प्रातिनिधिक वृक्ष समजून गुलमोहर दिन साजरा केला जात असावा यात काही शंका नाही.

गुलमोहराच्या झाडाखाली पडलेला फुलांचा मखमली सडा पाहून मला तर नेहमी वाटते की ते बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है हे गाणं गीतकाराने नक्कीच गुलमोहराच्या झाडाकडे बघून लिहिलेले असावे. गुलमोहर जेव्हा ऐन वसंतात बहरतो, तेव्हा तो सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अंगाखांद्यावर लालभडक फुलांची शाल पांघरलेल्या अवस्थेतील गुलमोहर पाहणं हा एक नयनरम्य अनुभव असतो. त्यामुळेच असं म्हणत असतील की जितका उन्हाळा कडक तितका गुलमोहर भडक.

निळ्या पांढर्‍या आकाशाच्या पार्श्वभूमीवर गुलमोहोर म्हणजे विधात्याने रेखाटलेले सुंदर चित्रच होय. आजही माझ्या घराशेजारी एक गुलमोहर माझी सोबत करतोय. जुन्या आठवणींना उजाळा देत असतो. एकंदरीत गुलमोहराचे झाडं बघितलं की माझं मन प्रसन्न होतं. एक वेगळाच आनंद आसमंतात भरून जातो. या झाडाच्या शेंगा पट्टी किंवा तलवारीसारख्या असतात. पिकल्यानंतर त्या गडद तपकिरी रंगांच्या होतात. त्यामध्ये चॉकलेटी रंगाच्या उभट, गोल चपटया बिया असतात. आजही घरात, पिकनिकला जेव्हा अंताक्षरी खेळली जाते. तेव्हा गुलमोहराची वाळलेली शेंगेला हळूवारपणे मी हातात घेवून ठेका धरते. पण काही ठिकाणी म्हणे ह्या शेंगा सरपणासाठी वापरतात. ह्या गुलमोहोरला जगातल्या पहिल्या पाच देखण्या झाडांत गणला जातोय. एक शोभिवंत वृक्ष म्हणून गुलमोहर सर्वज्ञात आहे. बहरण्यासाठी हिरवा असताना या वृक्षाची सावली थंड व सुखदायी असते. रस्त्यांवर दुतर्फा या झाडांची लागवड ही मुख्यत: शोभेसाठी तसेच सावलीसाठी करतात. गुलमोहराच्या फुलात मोठ्या प्रमाणात मकरंद असल्याने मधमाशा मोठ्या प्रमाणात त्याकडे आकर्षित होतात. आदिवासी लोक डोकेदुखी शमविण्यासाठी तसेच पचनासाठी या झाडाची साल औषध म्हणून वापरतात. फुलांच्या लाल-नारंगी रंगांपासून होळीसाठी रंग तयार केले जातात. गुलमोहर हे आनंदाचे प्रतीक आहे तर असा हा सर्वांग सुंदर गुलमोहोर, त्याचं पुराण आठवलं की एक वाचलेला किस्साही आठवतो.

त्या किस्स्यात अर्थात कवीचे नाव, महिती दिलेलं नव्हतं. किस्सा असा आहे की, एक जण त्याची कविता वाचत होता…

पहाटे तुझ्या कुशीतून …..गुलमोहोराला पहावं शेजारी बसलेला दुसरा कवी हळूच मिस्कीलपणे पुटपुटला… वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं कसे कोण जाणे पण हे पुटपुटणं सगळ्यांना ऐकू गेलं…..आणि प्रत्येकाच्या गालावर आपला असा एक खास गुलमोहर फुललेला दिसू लागला.

घोडबंदर रोड, ठाणे-400607

- Advertisment -

ताज्या बातम्या