विसाव्या शतकातला महान शायर: साहिर लुधियानवी

साहिर लुधियानवी
साहिर लुधियानवी

डॉ. प्रवीण घोडेस्वार

चित्रपटातल्या विशिष्ट पात्रासाठी विशिष्ट प्रसंगानुरूप त्या पात्राच्या मनातले भाव दर्शवणारे गीत लिहिण्यासाठी केवळ कवी असणं पुरेसं नाही तर त्यासाठी वेगळं तंत्रही अवगत असायला लागतं.

ज्यांचे एकाहून एक सरस कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत ते दोन-तीन कडव्यांचं चित्रपटगीत लिहू शकतीलच असं नाही. चित्रपट गीतातला भाव साध्या, सोप्या व सहज शब्दांत नि मनाला पटकन स्पर्श करेल अशा रीतीने प्रकट होणं आवश्यक असतं. आणि हे संगीतकाराने आधीच योजलेल्या चालीवर बसवायचं असतं. परिणामी गीतकाराला संगीताची जाण असणं आवश्यक ठरतं. स्वत:च्या भावना स्वत:च्या छंदात अभिव्यक्त करण्याची सवय असलेले सर्वच कवी चित्रपट गीतकार म्हणून यशस्वी झालेले नाहीत. फलस्वरूप स्वत:चं कवी म्हणून फारसं कर्तृत्व नसलेले पण संगीताची जाण असलेले आणि पाहिजे ते लिहून देत असलेले गीतकार म्हणून यश मिळवत असतात. हे कमी-अधिक फरकाने सर्वच काळात घडलेलं दिसतं.

साहीर लुधियानवीने जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा असेच शब्द जुळवणार्‍या गीतकारांची चलती होती. त्या जमान्यात ‘मधोक’ नावाचा गीतकार खूप लोकप्रिय होता. संगीताचं जुजबी ज्ञान असलेल्या ङ्गमधोकफच्या गाण्यांमध्ये ‘गेयता’ हा मुख्य घटक होता. बाकी काव्यात्मक दृष्टीने त्याची गाणी सुमारच म्हणता येतील अशीच होती. संगीताची असलेली बर्‍यापैकी समज व पूर्व रचित चालींवर झटपट शब्द लिहिण्याचं कौशल्य या भांडवलावर लोकप्रियता प्राप्त करणारे ‘मधोक’चे वारसदार म्हणजे गीतकार आनंद बक्षी आणि समीर.

सरदार जाफरी, फैज, मजाज, सागर निजामी,जोश आदी उर्दू साहित्यातले प्रतिभावंत शायर चित्रपट गीतकार म्हणून लोकप्रिय होऊ शकले नाहीत. याच पंक्तीतले शायर शकील बदायुनी, कैफे आझमी,मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी मात्र अपवाद ठरले. केवळ गीतकार असलेल्यांनी लिहिलेल्या गाण्यांपेक्षा कवी-गीतकारांची गाणी अर्थ व आशयाच्या दृष्टीने सरस असतात. याचा प्रत्यय गुलजार, जावेद अख्तर आणि इर्शाद कामिल ह्या तीन वेगवेगळ्या काळातल्या गीतकारांच्या गाण्यांवरून येतो.

समकालीन सर्वांपेक्षा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गीतकार ङ्गसाहीर लुधियानवीफ या नावाला वेगळं असं मौलिक स्थान आहे. साहीर लोकप्रिय गीतकार होऊ शकला याचं महत्वाचं कारण म्हणजे सदैव प्रेमाव्यतिरिक्त इतर काही मानवी जीवनात नाही असा भास निर्माण करणार्‍या रोमांटीक उर्दू कवींच्या मांदियाळीतला तो नव्हता. साहिरची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्याच्याकडे असलेली एक विचारप्रणाली व निश्चित असा दृष्टिकोन. ‘और भी दुख है जमाने मे मोहब्बत के सिवा, राहते और भी वस्ल की राहत के सिवा’ असं आपल्या प्रियतमेला सांगणार्‍या फैज अहमद फैजच्या पुरोगामी शायरीच्या कुळाशी नाते सांगणारा शायर म्हणजे साहीर लुधियानवी. साम्यवादाचा जबरदस्त पगडा, कणखर व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा, भाषेवरील असामान्य प्रभुत्व तसेच मजूर-श्रमिक-शेतकरी-शोषित-पीडित-वंचित-दलित-स्त्रिया यांच्याविषयी पराकोटीची आत्मीयता ही साहीर नावाच्या संवेदनशील कवीची बलस्थानं. साहीर स्वत:ला केवळ एक कवी न समजता एक क्रांतिकारक, एक समाजसेवक समजत असे. त्याने म्हटलंय -

‘आज से ऐ मजदूर किसानों ! मेरे राग तुम्हारे है,

फाकाकाश इन्सानो! मेरे जोग-बिहाग तुम्हारे है,

जब तक तुम भूखे-नंगे हो, ये शोले खामोश न होंगे,

जब तक बे-आराम हो तुम, ये नग्मे राहत कोश न होंगे’

आपली कला, आपल्या सर्व आशा-अभिलाषा शोषित-दलित यांच्यासाठी त्याने समर्पित केल्या होत्या. साहीर समाजात दिसून येणार्‍या स्त्रियांच्या परिस्थितीविषयी खूप हळवा नि संवेदनशील होता. त्याने लिहिलंय-

‘लोग औरत को फकत जिस्म समझ लेते है,

रूह भी होती है उसमे कहा सोचते है?’

स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराने त्याचे मन व्यथीत होते. या अत्याचाराविरुद्ध प्रहार करताना साहिरची लेखणी धारदार होते-

‘औरत ने जन्म मर्दोन्को

मर्दोने उसे बाजार दिया’

अशा जळजळीत शब्दांत त्याने स्त्री जन्माची व्यथा मांडली आहे. तो स्त्रीवादी शायर होता, असं म्हणायला कोणाची हरकत नसावी ! (त्याच्या जन्म तारखेला पुढे जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला!)

अतिशय तल्लख नि विलक्षण प्रतिभेचा धनी असलेल्या साहीरचा जन्म 8 मार्च 1922 रोजी लुधियाना इथं एका जहागीरदार कुटुंबात झाला. चौधरी फझल मोहम्मद हे त्याचे वडील. साहिरचं खरं नाव अब्दुल हय्यी. त्याच्या पित्याने अकरा विवाह करूनही ‘साहिर’ हे त्याचं एकुलते एक अपत्य. परिणामी त्याचं पालनपोषण मोठ्या लाडा-कोडात झालं. पुढे साहिरच्या आई-वडिलांमध्ये बेबनाव झाला.त्याची परिणीती त्याच्या आईने घटस्फोट घेण्यात झाली. आईवर अतोनात माया करणार्‍या साहिरने वडिलांच्या संपत्तीवर पाणी सोडून आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला.त्या दिवसापासून साहिरच्या संघर्षमय जीवनाचा आणि काव्यजीवनाचाही प्रवास सुरू झाला.

अनेक खडतर, यातनामय प्रसगांच्या अनुभवातून वाटचाल करीत असताना त्याचं काव्यलेखन अव्याहतपणे सुरूच राहिलं. त्याच्या कवितेच्या मूळाशी होती धगधगत्या अनुभवाची शिदोरी. जिवंत अनुभवाची दाहकता त्याच्या काव्यातून ओथंबून वाहत होती. 1943-44 च्या सुमारास त्यानं लिहिलेल्या कवितांचा संग्रह ‘तल्खीया’ दिल्लीच्या ‘प्रीतलडी’ नामक मासिकाने प्रकाशित केला. या काव्यसंग्रहाने एका रात्रीतून साहिर तरुणांचा लाडका कवी बनला. यातल्या-

‘मेरे महेबूब कही ओर मिला कर मुझसे,

ये चमनजार, ये जमाना, ये मेहराब, ये ताक

इक शहनशाहने दौलत का सहारा लेकर,

हम गरीबों की महोब्बत का उडाया है मजाक’

या कवितेने तेव्हाची युवा पिढी साहिरच्या प्रेमात बुडाली. ही कविता म्हणजे शकील बदायुनी यांच्या ‘इक शहनशाह ने बनवाके हसीन ताजमहल, सारी दुनिया को महोब्बत की निशानी दी है’ या भावनेला दिलेलं सणसणीत वास्तवदर्शी उत्तर होय. या काव्यसंग्रहाच्या उर्दूत वीसपेक्षा जास्त तर हिंदीत दहापेक्षा जास्त आवृत्या तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. दरम्यान साहिरने ङ्गअदबे लतीफफ व ङ्गशाहकारफ आणि पुढे ‘प्रीतलडी’ तसेच ‘शाहराह’ या मासिकांच्या संपादनांची जबाबदारीही काही काळ पार पाडली.

1947 नंतर साहिर पुन्हा एकवार चित्रपटसृष्टीत दाखल झाला. त्याने लिहिलेली गाणी संगीतकार सचिनदेव बर्मन यांना प्रचंड आवडली. त्यामुळे ‘नवनिकेतन’च्या ‘बाजी’ या चित्रपटासाठी साहिरची गीतकार म्हणून शिफारस केली. ‘बाजी’साठी सचिनदांनी आधी चाली तयार केल्या, मग त्यावर साहिरने गाणी लिहिली. शरमाए काहे घबराए, ये कौन आया कि मेरे दिल की दुनिया मे बहार आई, आज की रात पिया दिल ना तोडो, देख के अकेली मोहे बरखा सताए, तुम भी न भूलो हम भी न भूले, तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले अशी एकापेक्षा एक सरस रोमँटिक गीतं साहिरच्या लेखणीतून साकार झालीत. या गाण्यांमधलं काव्य, टवटवीतपणा, पाश्चात्य संगीताची झलक असलेल्या सचिनदांच्या नावीन्यपूर्ण चाली आणि गीता दत्तच्या आवाजातली मादकता आणि नशेचा स्पर्श यामुळे ही गाणी तुफान लोकप्रिय झालीत. ‘तल्खीया’ ने साहित्यविश्वात ‘कवी’ म्हणून मानाचं स्थान मिळवणारा साहिर ‘बाजी’ चित्रपटाने गीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाला.

साहिरने गाणी लिहिलेला ‘बाजी’नंतरचा ‘जाल’ हा चित्रपट. यातल्या गाण्यांमधून निसर्गावर प्रेम करणारा साहिर दिसून आला. हा सिनेमा म्हणजे साहिरचं ‘बाजी’ नंतरचं पुढचं पाऊल. यातली चोरी चोरी मेरी गली आना है बुरा (लता), दे भी चुके हम दिल नजराना (किशोरकुमार-गीता दत्त), सोच समझकर दिल को लगाना (गीता), कैसी है ये जागी अगन (लता), ये रात ये चांदनी फिर कहा (हेमंतकुमार), पिघला है सोना दूर गगन पर (लता) ही सारी गाणी लोकांनी पसंत केली.

साहिरच्या गाण्यांमधून पुरोगामी आशय व्यक्त होतो. त्याने सूचकता, प्रतीकात्मकता झुगारून भांडवलशाही व्यवस्थेला उघडपणे विरोध केला.

‘रह न सके अब इस दुनिया मे युग समीयादारी का,

तुम को झंडा लहराना है अब मेहनत की सरदारी का,

मिल हो अब मजदूरों के और खेती हो दहका की’

तर दुर्दम्य आशावाद व्यक्त करताना तो म्हणतो-

‘जिस सुबह की खातीर जुग-जुग से हम सब मर-मर के जीते है,

जिस सुबह के अमृत की धून मे हम जहर के प्याले पिते है,

इन भूखी प्यासी रुहों पर इक दिन तो करम फर्मायगी,

वो सुबह कभी तो आएगी...’

‘फिर सुबह होगी’ या चित्रपटामुळे पुरोगामी विचारांचा कवी म्हणून साहिरची प्रतिमा चित्रपटसृष्टीत आणखीनच दृढ झाली. याच चित्रपटात त्याने ‘आसमा पे है खुदा और जमी पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कम’ हे उपरोधिक गाणं लिहिलं आहे.

साहिर-सचिनदा-गुरुदत्त या त्रयींची अद्वितीय अशी अजोड कामगिरी म्हणजे ‘प्यासा’ हा चित्रपट. या तिघांवर प्रेम असलेल्या प्रत्येक रसिकाकडे ‘प्यासा’ची गाणी संग्रही असतीलच. जगाने उपेक्षा केलेल्या संवेदनशील कलावंताची मनोवस्था साहिरने अत्यंत उत्कटतेने आपल्या गाण्यांमधून बोलकी केलीय. यात खरं तर साहिरने आपलीच व्यथा मांडली आहे.

ये कुचे, ये नीलामघर दिलकशी के,

ये लुटते हुए कारवा जिंदगी के,

कहा है, कहा है मुहाफिज खुदा के,

जिन्हे नाझ है हिंद पर वो कहां है?

साहिरने त्याकाळी चितारलेलं हे चित्र आजच्या परिस्थितीलाही लागू होणारं असंचं आहे! ‘प्यासा’ मध्ये दुनियेला नाकारणार्‍या नायकाची दुनियेविषयी कडवट मन:स्थिती व्यक्त करताना साहिर म्हणतो-

‘जला दो इसे, फूंक डालो ये दुनिया

मेरे सामने से हटा लो ये दुनिया

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है !’

साहिरच्या प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे ‘प्यासा’ मधली गाणी. यातलं ‘जाने वो कैसे लोग थे जिनको’ हे तलतचं एक अविस्मरणीय गीत. याच चित्रपटात साहिरने ‘सर जो तेरा चकराए’ हे विनोदी ढंगातलं गाणंही सहजतेनं लिहिलंय. ‘प्यासा’ नंतर साहिर व सचिनदा कधीच एकत्र आले नाहीत, हे चित्ररसिकांचं खूप मोठं दुर्दैव होय. नौशाद-शकील, गुलाम मोहंमद -शकील, शंकर-जयकिशन - शैलेन्द्र, हसरत या संगीतकार -गीतकार यांच्या जोडीसारखी साहिर-सचिनदेव बर्मन ही जोडी अल्प काळ जमली होती. या जोडीची ही काही उल्लेखनीय गाणी- जिने डॉ और जियो, ए मेरी जिंदगी आज रात झूम ले, दिल जले तो जले, जाए तो जाए कहां (सर्व ींरुळ ड्रायव्हर), ठंडी हवाए (नौजवान), जीवन के सफर मे राही (मुनीमजी), तुम न जाने किस जहां मे खो गये (सजा), तेरी दुनिया से बेहतर है की मर जाए (हाउस न.44), जिसे तू कबूल कर ले वो तोहफा कहा से लाऊ (देवदास), दुखी मन मेरे सून मेरा कहना (फंटूश) इत्यादी.

सचिनदांसमवेतची जोडी तुटल्यावरही साहिरचे गीतलेखन सुरूच राहिलं. त्याने अनिल विश्वास-श्यामसुंदर पासून ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन, राजेश रोशन, हृदयनाथ मंगेशकर पर्यंत वेगवेगळ्या संगीतकारांसाठी गाणी लिहिलीयत. संगीतकार रोशनने संगीत दिलेल्या ‘बरसात की रात’ चित्रपटातील ‘ना तो कारवा की तलाश है’ ही कव्वाली आणि ‘जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात’ हे शीर्षकगीत, या त्याच्या अविस्मरणीय अशा अजरामर रचना. रोशनसाठीच ‘चित्रलेखा’ या चित्रपटात साहिरने संसार से भागते फिरते हो, मन रे तू काहे न धीर धरे, सखी रे मोरा मन उलझे, छा गए बादल नील गगन पर या सारखी शुद्ध हिंदीतली गाणीही उत्कटतेने लिहिली आहेत. तर संगीतकार रवीसाठी नीले गगन के तले, तुम अगर साथ देने का (हमराज), वक्त से दिन और रात (वक्त), जिंदगी इत्तेफाक है (जिंदगी और इत्तेफाक), संसार की हर रौ का इतनाही फसाना है (धुंद) वगैरे आशयघन गीतं साहिरने रचलीत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने ठेका धरायला लावणार्‍या ह्रिदम किंग ओ. पी. नय्यर करिता ‘नया दौर’ चित्रपटात रेशमी सलवार कुर्ता जाली का, उडे जब जब जुल्फे तेरी, साथी हात बढाना, मांग के साथ तुम्हारा, ये देश है वीर जवानोका अशी सदाबहार गाणी साहिर लिहून गेलाय. जयदेवकडे त्याने अल्ला तेरो नाम, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया(हम दोनो), सुबह का इंतजार कौन करे,सच बतला मुझे जोगी (जोरू का गुलाम) वगैरे गाणी साकारलीत. तर गझल सम्राट मदन मोहनसाठी साहिरने लिहिलेली बस्ती-बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा (रेल्वे रिश्रींषरीा), हुस्न और नूर की बारात किसे पेश करू (गझल) ही गाणी उल्लेखनीय आहेत. संगीतकार एन. दत्ता यांच्यासाठी मैने चांद और सितारोंकी तमन्ना की (चंद्रकांता), तू मेरे प्यार का फूल है या मेरी भूल है (धूल का फूल) आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल करिता ‘दाग’ या चित्रपटात मेरे दिल मे आज क्या है आणि जब भी जी चाहे नई दुनिया बस लेते है लोग ही लोकप्रिय गाणी साहिरने लिहिलीत. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘धनवान’ चित्रपटात ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है व कुछ लोग महोब्बत को ब्येपार समजते है ही दोन अर्थपूर्ण गाणी शब्दांकित केली आहेत. इक रस्ता है जिंदगी, बाहो मे तेरी मस्ती के फेरे ही लोकप्रिय गाणी राजेश रोशनसाठी अमिताभच्या ‘काला फत्थर’मध्ये साहिरने दिली.

साहिरने लिहिलेल्या काही कविता चित्रपटांमध्ये गाणी म्हणून घेतलेल्या आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे ‘कभी-कभी’ चित्रपटातले शीर्षकगीत सिनेमात येण्याआधी साहिरने ते 20 वर्षांपूर्वी लिहिले होते. ‘चलो इकबार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो’ हे गाणंही मूळ कविताच. यातल्या दोन आशयगर्भ ओळी-

‘ओ अफसाना जिसे अंजाम तक लाना न मुमकिन,

उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’ (जी गोष्ट किंवा ज्या नात्याची परिणीती सुफळ सफल होऊ शकत नाही, त्यास एका सुंदर वळणावर सोडून दिलेलं बरं!) साहिरच्या जन्मजात प्रतिभेचा हा विस्मयकारक नमुना.

अभी सांसो की खुशबू हवाओंमे है (तुम अभी थे कहां), जुल्फे शान पे मुडी (बात कुछ बन गयी), आज मुझे कुछ कहना है (गर्लफ्रेंड), तुम चले जाओगी परछाईया रह जाएगी (शगुन) या सारखी कोमल, नाजूक, तरल भावनेची कलात्मक प्रेमगीतंही साहिरने लिहिली. निगाहे मिलाने को जी चाहता है (दिलही तो है), मिलती है जिंदगी मे (आंखे), ऐ मेरे दिल कही ओर चल(दाग), मै जिंदगी का साथ (हम दोनो), क्या मिलीये ऐसे लोगोसे (इज्जत), गैरो पे सितम अपनो पे करम( आंखे), कितना हंसी है मौसम (आजाद), रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल), तोरा मन दर्पण कहलाये (काजल), पल दो पल का साथ हमारा (हम किसीसे कम नही), शाम -ए-गम की कसम ( फुटपाथ),आप आए तो ख्याल दिल (गुमराह) अशी विविध भाव-भावनांचा आविष्कार करणारी गाणी लिहून साहिरने स्वत:ला साचेबद्ध होऊ दिलं नाही. वास्तव जग आणि प्रितीचं नातं याविषयी एक कटू सत्य ‘त्रिशूल’ या चित्रपटातल्या एका गाण्यांत साहिरने सांगून ठेवलंय-

‘किताबो मे छपते है चाहत के किस्से,

हकीकत की दुनिया मे चाहत नहीं है,

जमाने के बाजार मे ये वो शै है कि,

जिसकी किसीको जरुरत नहीं है,- ये बदनाम, बे-काम की, चीज है...’

साहिरने आपल्या देशाविषयीचा जाज्वल्य देशाभिमान

‘उस मुल्क की सरहद्द को छू नही सकता

जिस मुल्क की निगहेबान है आंखे’ अशा शब्दांत व्यक्त केला तर माणसा- माणसांमधले चिरंतन सत्य

‘ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा,

इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा’ या शब्दांत सांगितलं.

भारत सरकारने साहिरचा ‘पद्मश्री’ देऊन त्याचा सन्मान केला. तसेच सोविएत श्ररपवचा नेहरू पुरस्कारही त्याला मिळाला. त्याच्या ‘आओ की कोई ख्वाब बुने’ या दुसर्‍या काव्यसंग्रहाचा महाराष्ट्र शासनाने बक्षीस देऊन गौरव केला. ‘गाता जाए बंजारा’ व ‘तन्हाईया’ हे साहिरचे इतर कवितासंग्रह. आपल्या शायरीविषयी

‘कल और आयेंगे नग्मो की

खिलती कलिया चूननेवाले

मुझसे बेहतर कहनेवाले

तुमसे बेहतर सुननेवाले

कल कोई मुझको याद करे !

क्यो कोई मुझको याद करे?

मसरुफ जमाना मेरे लिए

क्यो वक्त सिरा बरबाद करे!’

असं स्पष्टपणे सांगणारा हा मनस्वी कवी आपल्या गाणी-कवितांबद्दल म्हणतो-

‘अश्को मे जो पाया है वो गीतो मे दिया है,

इस पर भी सुना है की जमाने को गिला है,

जो तार से निकली है वो धून सबने सुनी है,

जो साज पे गुजरी है वो किस दिल को पता है?’

नियतीने जे त्याच्या वाट्याला दिलं तेच त्याने आपल्या गीतानांमधून साभार परत केलंय. अविवाहित राहिलेल्या साहिरने ‘तू अबसे पहले सितारों मे बस रही थी कही, तुझे जमी पार बुलाया गया है मेरे लिए’ असं लिहूनही त्याचं सहजीवन बहरू शकलं नाही! ‘मै जिंदगी का साथ निभाता चाल गया’ या गाण्यात ‘बरबादीयों का सोग मनाना फिजूल था, बरबादीयों का जश्न मानता चला गया!’ (उद्ध्वस्त आयुष्याबद्दल खंत करणं अनाठायी होतं. म्हणून वाट्याला आलेल्या उद्ध्वस्त अवस्थेचा उत्सव मी साजरा करत गेलो!) असं हृदयापासून सांगणारा विलक्षण प्रतिभेचा वरदहस्त लाभलेला हा शायर 25 ऑक्टोबर 1980 रोजी हे जग सोडून गेला. जोवर उर्दू साहित्य जिवंत आहे आणि जोवर हिंदी चित्रपट गाण्यांमध्ये भावार्थ, आशय शोधणारे रसिक आहेत तोवर ‘साहिर लुधियानवी’ हे नाव अजरामर राहणार आहे !

नाशिक

9403774530

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com