काव्यरंग : प्रवीण सोमासे यांच्या कविता भाग १

0

वाटू नये वझं

ववाळीला माझा
आला भाऊराया,
गोड दोन घास
घालीते गं खाया.

इडापिङा नगं
देवा देऊ त्याला,
सुखाचं रं दिसं
आसू दे वाट्याला.

चांगल्याचा संग
सुटू नगं देऊ ,
पाटी ती प्रेमाची
तुटू नगं देऊ .

एवढं मागणं
ऐक देवा माझं,
मायबाप त्याला
वाटू नये वझं.

एवढा उदारं

थंङी वा-यात पिकाला
बाप घालतोय पानी,
पोट खळगी भरण्या
चार मिळावेत दानी.

बाप शेतात पिकवी
जगण्याची सोनंसरी ,
तरी तूटक्या वाटेचा
जन्मभरं वारकरी.

त्याच्या मनातं स्वप्नांची
रातदिसं घालमेलं,
जन्मभर सोबतीला
असे माती नि चिखलं .

रान जाई करपूनं
सारं उन्हाच्या कोपानं ,
तुकड्यात काळजाच्या
नवं पुरतो सपानं .

जगताला पुरवितो
धनधान्याचं कोठारं ,
तिन्ही ताळातं मिळेना
कोणी एवढा उदारं.

फुटली पहाट

आले थेंब पावसाचे
झाले जमिनीचे मित,
व्याकुळल्या भूईमधी
आली बहरून प्रीत.

याचं आनंदानं रानी
मोहरल्या फुलवेली,
किती दिसाची पारशी
नदी उभेपुरं न्हाली.

गुरं पांगली माळाला
सण साजरा कराया,
आजसाठी पोटामधी
नवं जगणं भराया.

झाली सरीसरीतून
जगण्याची खुली वाट,
दुष्काळाच्या माथ्यावर
नवी फुटली पहाट.

भाऊ पाठचे वाटती

लई राब राब राबे
मह्या शेतातले बैलं,
त्यांच्या कष्टानं पेटते
मह्या घरातली चूलं.

भर उन्हात जोमानं
धीट नांगर वढती,
असं भाळी वावराच्या
नवं सपान कोरती.

नसे भुकेल्या पोटास
कधी पोटभरं चारा,
नसे बसाया आडुसा
खाती पावसाचा मारा.

त्यांचा पाहून हमामा
अश्रू डोळ्यांत दाटती,
मह्या मायला हे बैलं
भाऊ पाठचे वाटती.

गझल.

हा टोचतो मनाला घडला प्रकार आहे.

केला तिनेच माझ्या छातीत वार आहे.

गेली बघून मजला आहे अशीच वरवर
ना पाहिली जखम ती जी आरपार आहे.

 

पाऊस हा अवेळी पडला तिच्या घनांचा
गेला गळून माझा मातीत बार आहे.

जातो न मी कधीही ढोसावयास दारू
मज झिंगण्या सखीची ती याद फार आहे.

घेऊन जीव माझा भरलेच पोट नाही
मज वाटते सखे गं तू सावकार आहे.

असता खुलेच माझे घर रोज हे मनाचे
ती ठोठवीत बसली भलतेच दार आहे.

गझल..

नाव आहे.
दाटला नयनी तुझा तो भाव आहे.
आत माझ्या बघ तुझे रे नाव आहे.

जाळली तू प्रेमपत्रे मी दिलेली
ना जळाले या मनाचे ताव आहे.

तू नको मानू सखे हे धर्म जाती
भामट्यांनी खोदले हे धाव आहे.

समज तू अश्रूंस माझ्या नाटकी पण
हुंदके माझे बिचारे साव आहे.

शेवटी येऊ नको मयतात माझ्या
संकटांचा भोवती घेराव आहे.

सोडना जगणे जुने ते बाहुलीचे
या युगाचे चालणे भरधाव आहे.

मी जरी शहरात आलो नोकरीला
आजही रक्तात माझ्या गाव आहे.

कुणब्याचा…

कुणब्याच्या जिवा
न सुख डोहाळे
उरीचे उमाळे
निजे उरी.

स्वप्न चांदण्यांच
पायदळी पडे
दुष्काळाचे किडे
माथ्यावरं

ऊफनतो वारा
काळजाची माती
भुसाचिया प्रीती
उंब-याशी.

मना ओढ लागे
पावसाची मिठी
त्याच्या येते देठी
जन्मजातं.

काय असे दिसं
नशिबी भेटले
ढेकळं पेटले
वावरातं.

आधाराचा माचा
त्यानेच दिधला
तोच आता झाला
निराधारं

बरसतं खाली
नक्षत्र कोरडं
जनावरं मडं
पाहवेना.

प्राणप्रिय बैल
नदिला पडतो
आधार तुटतो
कुणब्याचा..

एक जुनी गझल..

पोटातले नगारे बडवीत भूक होती.
दारात दुष्मनांच्या रडवीत भूक होती.

आलो फिरून जेव्हा गावात वेदनांच्या
सा-याच वेदनांना घडवीत भूक होती.

मी लाजलो न केव्हा मागावया भिकेला
जर पायरीच तीही चढवीत भूक होती.

पाहून दुःख माझे आले रडू तयांना
माझ्यासमान ज्यांना सडवीत भूक होती.

मी जिंकलो तरीही गर्दीत संकटांच्या
मज जिंकण्या जरी का! अडवीत भूक होती.

वावरताना

या जगात वावरताना
जगण्यातून छोटे व्हावे,
मी शत्रूशी लढताना
मरणातून मोठे व्हावे..

आधार होऊनी गरिबा
देह धुपवावा रक्षनार्थ,
क्षणात संपवून जाणारे
मी कवेत घ्यावे अनर्थ.

पाल्हाळ नको जगण्याचा
अंती मरणाचे नकोत कोडे,
मातेसाठी मरून बनावे
शव सह्याद्रीचे कडे.

गझल

जा जपूनी आज काळी रात आहे.
पेटलेली माणसांची जात आहे.

ते न करती कीव कोण्या याचकाची
देव त्यांचा फक्त रे दगडात आहे.

काल होती वादळे जी शांत येथे
भडकली त्यांचीच आता वात आहे.

मारली माणूसकी आहे अशी की
घेतला सौदा जणू उक्त्यात आहे.

भाव हा ठेवून भक्तीचा तयांनी
मांडला बाजार रे चौकात आहे.

ते न आता लावती रे जीव कोणा
जीव त्यांचा अडकला पैशात आहे.

LEAVE A REPLY

*