काव्यरंग : प्रवीण सोमासे यांच्या कविता भाग २

0

माय

आभाळाच्या निळाईत
माय पाऊस शोधते,
अंधारात गरीबीच्या
दिवा होऊन जळते.

उरी घातल्या चोळीस
माय मारते गाठनं,
गळा कष्टाचं कायम
असे गुंतुंन लोढणं.

अंगी फाटके लुगङे
नसे सावली गारवा,
उभी मातीत पेटत्या
असे वेचित सरवा.

नऊनवसाचं बाळ
टाहो फोङते दारात,
घोटभरं दुध नसे
त्यास पाजण्या उरात.

तिनं सांगितली गोष्ट
जगण्याच्या आनंदाची ,
कष्टाच्या भाकरीनं
आग निवते पोटाची.

 दुःख

डोई धरण उशाशी
तरी वावर कोरड,
घोटभरं शिपासाठी
पाना-पानात ओरड.

ऊन करी लाही लाही
सारं सुकलया पिकं,वारा उधळतो आहे

वर बुडातली राख.

सुटा-बुटावाल्या घरी
थेट धरणाची चारी,
एक पाळी पाण्यासाठी
खोरी आहे शेतकरी.

कासावीस दिसे पिकं
बापा उठतीया कळ,
जन्मभर पोतडीत
त्यानं वेचिले वादळ.

ज्याच्या जीवावर जगा
भाजी-भाकर मिळतं,
नाही त्याच्या जिंदगीच
दुःख कुणाला कळतं.

टाळकरी

घोटभरं नही पाणी
दारी तुळसं सुकली,
जपलेली पोरावानी
गुरं बाजारी ईकली.

रङे एकटी गव्हानं
गाणं दुष्काळाचं गाते,
गेले निघून मैतरदुःख देवाला सांगते.

येतो सुसाट्याचा वारा
दारी ऊफनतो माती,
भुसं खेळतया पिंगा
त्याची दारोदार प्रीती.

कर्ज जाळीतं राहीलं
रोज जिंदगीचा मळा,
दुष्काळाच्या फासावरं
असा लटकला गळा .

असा पाहून रे भोग
बाप खचतचं मेला,
त्याच्या सपनाचा मळा
सारा म्हसनातं गेला.

मळा पंढरीचा देव
बाप त्याचा वारकरी,
त्याच्या मागं गुरंढोरं
आहे त्याचे टाळकरी.

नाही कोणी

इथे कोण जाने
कुणाचिया दुःखा ,
तुज विन देवा
नाही कोणी .

ममतेचे सारे
धनाचे शिकारी,
तुझे वारकरी
नाही कोणी .

सग्याच्या डोक्यास
संसाराचा भार,
तुज विन उदार
नाही कोणी .

धनासाठी हात
आहे चोरामागे ,
सावासाठी जागे
नाही कोणी .

सत्येसाठी घात
करती भावाचा ,
भरत जातीचा
नाही कोणी .

दगा

हंगामान केला दगा
सारं नशीब फिरलं,
अंतरला थेंब थेंब
ऊन पोटात शिरलं.

काळजाचं दानं सारं
होतं मातीत टाकलं,
ऊब नाही रुजायला
तेबी मातीतच मेलं.

कसं घ्यावं नव सुतं
कशी उभारावी गुढी,
काळजाच्या जनावरा
नही चारावया सुडी.

गरिबाशी नही चार
असे एकटाच खोंङं,
चारा मिळेचना त्यासी
हिंङे आपटीत तोंङ.

बोलीवरं कापसाच्या
आहे व्याह्याच रं पैक,
नाही फिरले यळतं
लेकी,बोलतील कैक.

पंढरीच्या इठुराया
धाव धाव तूच आता,
गेला पार बिचकूण
माहा शेतकरी दाता.

डोंबारी

माय दोरावं नाचते
बाप बडवितो ढोल,
उभ्या आयुष्याचं,असं
दोघं चुकविति मोल.

पोरं-टोरं,बाया-बापे
खेळ बघायला येती,
ङोंबां-याची करामत
पाहताच थक्क व्हती.

कुणी देते चार आणे
कुणी भाकरं वाढते,
तव्हा आग पोटातली
माय बापाच्या निवते.

दोघं जल्माचे डोंबारी
नसे ठाव त्यासी सूःख,
पोटासाठी दारिद्रयाचं
रोज गिळती रे इखं.

पुन्हा यांचेच फास बघा

यांनी जातीचे म्होरके बनून
चिक्कार खेळ खेळून घेतले,
गरिबाला गुलाम बनून
आपलेच ताक पोळून घेतले.

निवडणूकीच्या पेठेत आपण
ठेवत आलो अंगठे गहाण,
वढीत वढीत पळतोय आता
पायामधली फाटकी वहाण.

त्यांच्याच सत्ता,त्यांच्याच गप्पा
चालत राहिल्या आतल्याआत,
आपण सारे आश्वासनांची
पाहत राहिलो फक्त वाट.

गरिबांची कित्येक घरे
मोडून झाले मोकळे हे,
प्रश्न पुढे करताच कोणी
बनून जातात ठोकळे हे.

आपण फक्त गप्प बसा
हातावरती ठेवून हात,
बोलला कोणी काही जर
खावी लागे त्याला लात.

बोलणा-याला दाबतील हेच
लढणा-याला मारतील हेच,
मुखवटे चढवून आपल्यापुढे
ढोंग करत नाचतील हेच.

यांचा नंगानाच बघा
साव असल्याचा भास बघा,
निवडणूकीच्या दारावरती
पुन्हा यांचेच फास बघा.

हायकू कविता

जोही जळतो
त्यातला पूरूषार्थ
त्याला कळतो.

घाम गळतो
तरच आयुष्याला
आकार येतो.

रोजचा दिस
हा नवाच असतो
जगण्यासाठी.

आतली ज्योत
आशेच्या किरणांची
तेवत ठेवा.

थोङेसे तरी
हे उद्यासाठी आज
आयुष्य भाज.

चोरांचा मान
पोलीसांच्या हातात
निर्दोष कान.

LEAVE A REPLY

*