लाभांश वाटपाने सभासदांची दिवाळी गोड : ‘मुळा’कडून पेमेंट व ठेवींपोटी 12 कोटी वर्ग

0
सोनई (वार्ताहर) – मुळा सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस पुरविलेल्या शेतकर्‍यांचे अंतिम भावाप्रमाणे निघत असलेले ऊस पेमेंट तसेच सन 2005-2006 व 2006-2007 मध्ये ऊस पेमेंटमधून कपात केलेल्या परतीच्या ठेवी आणि सभासदांच्या नावावर शिल्लक असलेल्या परतीच्या ठेवींवरील व्याजाची रक्कम मिळून 12 कोटीचे पेमेंट संबंधित सभासदांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.
मुळा कारखान्याने 2016-17 गळीत हंगामात दोन लाख 56 हजार टन ऊस गाळप केले होते. एफआरपीनुसार पेमेंट प्रतिटन 1981 रुपये इतके निघत होते. मात्र कारखान्याने 2300 रुपये अ‍ॅडव्हान्स पेमेंट केले होते. त्यानंतर नवीन सूत्रानुसार शासनाने मुळा कारखान्याचा ऊस दर 2401 रुपये प्रतिटन प्रमाणे निश्‍चित केला.
खताच्या स्वरुपात कारखान्याने दिलेले अनुदान विचारात घेता हा दर 2596 रुपये इतका होता. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या लागवडी घटल्या होत्या. शेतात उभ्या असलेल्या उसाला पुरेसे पाणी मिळाले नाही. उसाची वाढ खुंटली. त्याचा परिणाम साखरेच्या उतार्‍यावर झाला. केवळ 58 दिवसात हंगाम आटोपता घ्यावा लागला. साखरेचे उत्पादन घटले.
तसेच डिस्टीलरी व विजेच्या उत्पादनावरही परिणाम झाला. मात्र शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले नियोजन केले. त्यामुळे साखरेचा उतारा अवघा 8.94 टक्के मिळूनही कारखान्याकडून ऊस उत्पादकांना तुलनेने चांगला दर दिला. त्याचे पेमेंट बँकेत वर्ग केले असल्याचे श्री. तुवर यांनी स्पष्ट केले.
येणार्‍या हंगामासाठी बॉयलर प्रदीपन झाले असून 10 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने तसे नियोजन केले आहे. येत्या हंगामात 30 मेगावॅट क्षमतेच्या विस्तारीत वीज प्रकल्पातून विजेचे उत्पादन घेणार असून साखरेचा उतारा वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुळा कारखान्याने उत्पादकांना चांगला ऊस दर देण्याची परंपरा जोपासली आहे. मागील गळीत हंगामात अपुरे गळीत आणि कमी साखर उतारा असतानाही कारखान्याने चांगले ऊस दर देऊन दिवाळीपूर्वी योग्य वेळी पेमेंट केल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*