कथा : विठ्ठल म्हणाला…

0

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा…’ ‘हेचि दान देगा देवा…’
विठ्ठलाची वर्षातून एकदाच येणारी आषाढी एकादशी म्हणजे त्याच्या असलेपणाचा दाखला…
कार्यक्रमातला सांगतेचा अभंग रंगला.

भैरवी रागातल्या कारूण्य आणि आर्ततेने उपस्थित श्रोतृवर्ग हेलावून गेला. त्या हरिमय वातावरणातच थांबून लोक प्रसादाची वाट पहात बसून राहिले. प्रसाद जागेवरच देण्यात आला. साखरफुटाण्यांचे वाटप करणारे लोक प्रसादाची ताटे फिरवून घरच्या दिशेला लागले…. कर्मचारी वर्ग उपासना मंदिर बंद करून निघून गेले.

आता त्या उपासना मंदिरात दोघेजणच उरले…
एक साक्षात पांडुरंग आणि दुसरा एका कोपर्‍यात वळचणीला येऊन बसलेला विठ्ठलाचा एक भक्त. शांततेत दर्शन घ्यावं अशा विचारांनी शेवटी बसलेला.

पायात त्राण नाही, घसा कोरडा, भरलेल्या डोळ्यांनी तो विठ्ठलासमोर जाऊन हात जोडून उभा राहिला. ‘देवा पांडुरंगा, आज चांगला योग गाठून आला बघ. उद्या बोलतो म्हणालात देवा. म्हणून आलो.’
शांत विठ्ठलाचा चेहरा अचानक बदलला. आवाजात कोरडेपणा आणत त्याने पहिला प्रश्न केला.

‘गेले काही दिवस पाहतोय मी, तुझं चाललंय काय? पूर्वीचे अनुभव आठव. वयासोबत शहाणपण वाढतं ना? पुन्हा पुन्हा त्याच-त्याच चुका.. अनुभवातून काही शिकायला नको? प्रश्न माझा नाही, तुझा आहे.
सगुणातल्या पांडुरंगाला प्रत्यक्ष आणि इतक्या जवळून तो पहिल्यांदाच अनुभवत होता. भरलेल्या डोळ्यांनी भक्त नुसताच पाहात राहिला.

कोरडा आवंढा घशाखाली गिळत म्हणाला…
‘काय चुकलं जी माझं? नेहमीसारखं जरा मायेनं बोला ना देवा… काळजावर वार केल्यासारखे शब्द सोसत नाहीत तुमचे.’
‘अरे, वयानं वाढलात रे नुसते, अजून अक्कल येत नाही तुझ्यासारख्या भक्ताला.’
‘विस्कटून सांगा पांडुरंगा… हातून काय घडलं ते तरी सांगा…’

‘कसं आणि काय सांगावं तेच कळेनासं झालंय. वयाची शुध्द नाही, जबाबदारीचं भान नाही, आजूबाजूचं जग तुला दिसत नाही. तहान-भूक विसरून गुंतून राहिलास ना माझ्यात गेला पहिला – दोन महिने? असं काय पाहिलंस रे माझ्यात?’
विठ्ठलाच्या ह्या अशा अचानक झालेल्या प्रश्नांच्या बाणांमुळं भक्तांची जणू वाचाच बसली. तो एकदम घेरी आल्यासारखा मटकन खालीच बसला.

काय सांगावं ह्या देवाला? काय सांगावं ह्या पांडुरंगाला…
‘….कसं पटवून द्यावं ह्याला माझ्या रक्तात भिनलेलं भक्तपण?… कसं सांगावं त्याला त्याच्या नावाचं भक्तानं स्वत:च्या मस्तकावर वाहिलेलं प्रेमाचं तुळशीपत्र? व्यवहार आणि भावना वेगळी असते देवा… तुझ्या नावाचा उच्चार करत जीव द्यावासा वाटतो, एवढंच कळतं बघ मला.’

‘थोडावेळ शांततेत गेला. विठ्ठल आज बहुदा सोक्ष-मोक्ष लावायचाच असं ठरवूनच आला असावा.
म्हणाला, ‘सगळ्यात अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंच कसं तुला? मागितलंस आणि लगेच मिळालं असं असतं का कुठं? मलाही मर्यादा आहेत.’

‘तुझा सहवास मिळावा, याच्या शिवाय दुसरं आणखी काहीच मागितलं नाही देवा..’ भक्त.
‘पुन्हा चुकलास… माझ्या नादीलागून बायका-पोरांना वार्‍यावर सोडणार आहेस का?.. मी गेलोय ह्या वेळेपणातून पूर्वी कधीतरी. रखुमाईला विचार हवं तर. नाही सहन होत वियोग. जरा अलिप्तपण असेल तरच माणूस राहतो शाबूत यातून.’ शांतपणाने तरही जरब वाटावी अशा स्वरात विठ्ठल बोलला.

‘असं विपरीत कसं घडेल पांडुरंगा…? तुला पाहिलं की मला माझी बायको आठवते. नीट वागत जा बायकोबरोबर असं तू सांगितल्यापासून काळजीनं करतो प्रपंच. तुझी संगत पाहिजे मला. तुझ्या संगतीनं जगावं वाटतं चार दिवस. तुझी संगत मिळावी म्हणून धडपडतो..’ भक्त अगीजीनं बोलला.

‘एक विचारू का देवा?’ भक्तानं हळूच पण खात्रीच्या स्वरात विचारलं…
म्हणाला, ‘मी असतो तुझ्याच नादात, मी असतो तुझ्याच आठवणीत. मला सतत दिसतात तुझे निर्मळ डोळे, मला दिसतं तुझ्या चेहर्‍यावरचं निर्मळ हास्य. तुझ्या रुपाचं मला कवतिक वाटतं…’

पण तुला कधीच नाही दिसला नाही कार रे? भक्ताने थोडा आक्रमक पवित्रा घेत विचारलं…
‘वाढलेल्या वयाची खूण सांगणारा, तुझ्या सहवासासाठी, भेटीसाठी आसूसलेला, कष्टानं रापलेला माझा चेहरा? माझ्या मनात खोलवर उमटलेली तुझी नाममुद्रा?’

‘फक्त सहवासाठीचा आटापिटा म्हणून प्रसंगी बायका-पोरांना बाजूला सारून रात्री अपरात्री तुझ्यासाठी… तुझ्याचसाठी दिलेलं अकर्माचं दान? विसरलास? केलेलं काढू नये हे खरं, पण विषय काढलायस तू..’
‘असा अलिप्तपणा बरा नव्हे विठ्ठला…’

‘ज्याचा जीव तुझ्यात गुंततो, त्याला सांगून कळतं का शहाणपणाचं तत्त्वज्ञान?’
‘समंजसपणाची, संगतीची, प्रेमाची गोडी तू लावलीस हा तुझा अपराध आहे देवा…’
आता मात्र थोड्याशा खालच्या, समजविण्याच्या स्वरात विठ्ठल म्हणाला, ‘बा भक्तराजा, सदसदविवेकबुध्दि दिली आहे ना तुला? मग किती दिवस असा माझा नावाचा टाळ कुटत राहणार?’

‘माझा सहवास तेवढा सहजसाध्य नाही बाबा… प्रारब्ध बलवत्तर लागतं त्यासाठी…’
‘तुझ्या प्रारब्धात मी नाही, हे एवढ्या दिवसात कसं कळलं कसं नाही तुला?’

‘देवा आपण योगायोगानं भेटलो, असं म्हणाला होता ना तुम्ही? योगायोग हा प्रारब्धाचा भाग नाही का?’ भक्ताने वकीली मुद्दा टाकला.

‘इथेच तू पुन्हा भरकटलास… ही सगळी वाट निसरडी आहे बाबा…’ विठ्ठलाने बोलायला सुरुवात केली.
म्हणाला, ‘आपण भेटलो ते योगायोगाने हे खरे, पण तू माझ्यात गुंतणं हे तुझं प्रारब्ध आहे… हा योगायोग नक्कीच नाही…

भक्त गालात हसला.
म्हणाला, ‘भोळा विठ्ठल तू… इतका सहजासहजीचा हा खेळ नाही देवा… ती वस्तुस्थिती आहे भगवंता…’ भक्त ठामपणे उत्तरला.

विठ्ठल पुन्हा समजविण्याच्या स्वरात म्हणाला, ‘राजा, इतका जीव लावणं संसारीकाला शोभत नाही. कर्तव्यबुध्दि नष्ट होते. वाटेवर नुसतेच निवडुंग पसरलेले असतात. या प्रेमाच्या बंधनातून निसटणं अवघड जाते… तळमळत राहशील. मरेपर्यंत.’

‘तुझं नेमकं म्हणणं काय आहे ते एका वाक्यात सांगशील?’ भक्त इरेला पेटला. त्याच्या स्वत्त्वाचाही बांध आता फुटला. म्हणाला, ‘तुझंच म्हणणं मी ऐकावंसं असं तुला वाटत असेल तर एक घाव दोन तुखडे करायला मी तयार आहे…!’
विठ्ठलानं एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा चेहरा अधिकच कठोर झाला, आणि म्हणाला…

‘आत्मज भक्ता… मला विसरून जा… माझ्यात गुंतणं तुझ्या फायद्याचं नाही…’
विठ्ठलाच्या ह्या वाक्यावर मात्र भक्त पुरता कोसळला… त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली… डोळे पाण्याने डबडबले… तरीही स्वत:ला सावरत तो म्हणाला,

‘नशीबात नाही तुझा सहवास; मान्य…
प्रारब्धात नाही संगत मिळणार तुझी; चालेल…
नाही करणार तुझ्या रुपाचं ध्यान…. नाही फुटणार शब्द तुझ्या नावाचा…’

भक्तराजाचा संयम सुटला आणि हमसूस हमसून बोलत स लुटला…’ ‘माझ्या हाकेला ओ देणारा, मला सतत भानावर आणणारा, माझ्यासाठी घासातला घास काढून ठेवणारा, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसणारा हाच का तो मत्प्रिय सखा? तुझ्यासोबत मी असेनच असेन, असा आधार देणारा हाच का तो भोळा-भाबडा पांडुरंग?’

देवा, तुमच्यामुळे कवने सुचली, कविता स्फुरल्या, माझी प्रतिभा जागी झाली, जगण्यासाठीची तळमळ वाढली, तुझ्या रुपाचं ध्यान लावून, अकर्म का असेना, पण तल्लीन झालो, तहानभूक विसरलो, स्वभावातला कडवटपणा कमी व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिलो… एकतानता साधणे म्हणजेच ना रे सहज समाधी? ही अवस्था तुमच्यामुळष साध्य झाली देवा… हे सगळं खरंच विसरून जाऊ? कसा?

अभिजीत कुलकर्णी
निवेदक, सूत्रसंचालक, पुणे
संपर्क क्रंमाक : 9923399161

भक्तराजाच्या ह्या वक्तव्यावर मात्र विठ्ठलाकडे उत्तर नसावं. त्याने कमरेवरचे हात सोडले. चेहरा ओंजळीने झाकून घेतला… एकेक पाऊल टाकत तो व्यासपीठावरून खाली उतरून भक्तासमोर उभा राहिला.
आताचे दृष्ट आणखीनच वेगळे होते…

त्या भव्य उपासना मंदिरात आता दोन भक्त उभे होते…
एकमेकांचे… एकमेकांसमोर… शांतपणे… परस्परांना न्याहाळत, निरखत…
एक प्रेमात आकंठ बुडालेला, आणि दुसरा त्या प्रेमापुढे नतमस्तक झालेला.
थोड्या वेळाने पांडुरंगाने भक्तराजाला अलिंगन दिले. एकच क्षण…

आणि दुसर्‍या क्षणी भगवंतानेच मौन सोडले. भक्ताच्या मस्तकावर हात ठेवत त्या अतीव शांततेच्या स्वरात विचारले…
भक्तराजा. ‘आता… ह्या क्षणी… तुझ्या अंतरंगात नेमकं काय चाललंय तेवढं सांग….
काही तरी मधला मार्ग काढू…’

तशाही अवस्थेत
पाण्यानं गच्च भरलेल्या डोळ्यानं, जड गळ्यानं,
त्याचे थरथरते हात एकत्र जोडले गेले…. आणि मनात वाजणार्‍या टाळ-मृदंगाच्या नादात भक्तराज गाता झाला… विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल…

LEAVE A REPLY

*