दिवाळीत मामाच्या गावाचे आकर्षण झाले कमी : सुट्टीत मोबाईल गेम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरच मुले व्यस्त

0
बेलपिंपळगाव (वार्ताहर) – काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या म्हटलं की लहान मुलांना चाहूल लागायची ती मामाच्या गावाची. त्या काळात मुलं गावी गेली की खेळात मग्न असायची. कधी नव्हे ती मोकळीक मिळायची.परंतु सध्या ह्या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि त्याला कारण म्हणजे मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, मोबाईल गेम.
शाळेला सुट्टी लागताच मामाच्या गावाला जाणारी मुलं घरीच थांबणे पसंत करू लागली आहेत. पूर्वी मुलं दिवसभर मैदानात खेळताना दिसायचे. आरडा ओरडा, पळापळ, कोणी क्रिकेट तर कुठं कबड्डी, पण आता हे सारं काळाच्या ओघात बदलत आहे. मित्र नाही, सगेसोयरे नाही. दिवसभर मोबाईलवर व्यस्त असल्याने कोणासोबत बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे माणुसकी संपते की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
काही वर्षांपूर्वी मोबाईल जास्त प्रमाणात नसल्याने दिवाळीत ग्रामीण भागातील माहिती मिळायची. मोकळ्या हवेत फिरून दिवस आनंदात जात असे. पण आता दिवसभर किमान पाच मुलं जरी असले तरी ते सर्व एका खोलीत राहून सर्व मोबाईलवर व्यस्त दिसतात.
कुणालाही एकमेकाशी बोलणे आवडत नाही. यामुळे माणुसकी संपत चालली आहे. ग्रामीण भागातील वातावरण, खेळ, यापासून मुलांना दूर करायचे की मोबाईलच्या विळख्यात गुंतवून त्यांचे जीवन खराब करायचे याचा विचार आता पालकांना करावा लागणार आहे.
आपली संस्कृती, माणुसकी, शेती, पारंपरिक खेळ याकडे त्याला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून पुढील काळात सुट्टीचा आनंद घेताना दिसतील. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना परावृत्त करावे लागेल. आपले सण, उत्सव, खेळ, ग्रामीण वातावरण, मित्र, शिक्षण, संस्कृती, संस्कार यांचे मुलांना ज्ञान व्हायला हवे.

 

LEAVE A REPLY

*