दिवाळीत‘डिझायनर’ बोळके; शोभिवंत पणत्या, मातीचा आकाशकंदिल आकर्षण

0
नाशिक । दिवाळी सण मोठा, नाही उत्साहाला तोटा ही उक्ती दरवेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलून दाखवली जाते. त्याला कारण म्हणजे या सणामुळे घराघरांत आणि बाजारपेठेत संचारणारा उत्साह.

मात्र दिवाळीसाठी लागणार्‍या वस्तू, पूजाविधीचे साहित्य दर हंगामात नवीन रुपडे लेवून येत असेल तर उत्साहात भर पडून त्या वस्तू लक्षवेधी ठरतात. यंदा दिवाळीसाठी लागणारे मातीचे बोळके चक्क चमकी, रंग, कृत्रिम हिरे आणि आकर्षक आकारात डिझाईनमध्ये विक्रीला आले आहेत. त्यांना डिझायनर बोळके म्हणून कुंभार बांधवांकडून आधुनिक नाव दिले गेले असल्याने बाजारपेठेत ते लक्षवेधी ठरत आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी मातीच्या बोळक्यांमध्ये लाह्या, बत्तासे भरून पूजा मांडली जाते. पांढरे, तांबडे पटे असलेले मातीचे पारंपरिक बोळके पूर्वी बाजारपेठेत विक्रीला असत. दहा ते पंधरा रुपयात पाच मातीचे बोळके पूर्वी विक्री होत असत.

मात्र यंदा हिरवा, लाल, नारंगी कलर असलेले मातीचे बोळके चमकी, कृत्रिम हिर्‍यांचा साज चढवून बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. पाच बोळक्यांची किमत 40 ते 60 रुपये एवढी आहे.

शहरात मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड परिसर, रामकुंडाकडे जाणारा मार्ग, अशोक थिएटर परिसरात हे आकर्षक बोळके कुंभार बांधवांनी विक्रीला ठेवले आहेत. यंदाच्या दिवाळी उत्सवात बोळक्यांची वेगळी रचना ग्राहकांना आवडत असल्याचे श्रीराम अर्धन पोटस्चे विशाल प्रजापती यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*