काव्यरंग : अमेय जोशी यांच्या कविता भाग १

0

मी घरी जातो आहे

 चला भो एकदाचा पोहोचल आता घरी

आज बरा राजासारखा जातोय खरा

हे दोस्त लोक स्पेशल गाड़ी घेउन आले म्हणुन शायनिंग जरा,

दरवेळी त्या बस ट्रेनचे धक्के खावे लागतात,

घरी येऊन आधी सगळी हाडं मोजावे लागतात

रात्री बेरात्री कधी पण गावात पोहोचायचं

तंगडे तोडत फाट्यापासुन घराकडं जायचं

चुकुन कधी दिवसाकडं गावामधे आलं तर

वांदरांचं टोळकं फिक्स दिसनार कट्ट्यावर

कामधंदे नको साल्यांना नुसती बसुन मळायची

जिंदगी ची यांची philosophy आपल्याला नाही कळायची

कट्ट्यावरती हजेरी लावुन पुढं पुढं निघायचं

विठुमाऊली  देउळ येईल तिथं जरा थांबायचं

डोळे मिटुन हात जोडुन करावा त्याला नमस्कार

नौकरी पाण्याचं कसं चाललंय द्यावा याचा समाचार

देवळाबाहेरच्या फुलवाल्याची टोपली नक्की बघायची

मोगरीची एक वेणी आमच्या हिच्यासाठी उचलायची

मोगरीच्या धुंदीत चालत पुढं पुढं निघायचं

चौकाच्या बाजाराला पुन्हा जरा थांबायचं

पोरासाठी गाड़ीं बंदूक अन पोरीसाठी बाहुली 

फ्रॅाक बघायचं

अण्णासाठी लेंगा सदरा अन् अक्काला एक

चांगलं लुगडं पण घ्यायचं

पक्या घोड्याला आम्ही घेतलेलं काही पटत नाही

मोठा भाऊ प्रेमानं आणतो याला काही वाटत नाही

आम्ही आणलेल्या गोष्टी घालुन मिरवंल तर खरी ध्यान

गॅागल घालुन असा फिरल जसा काही शाहरुख खान

सगळं घेऊन त्यावरचं स्टिकर पहिले काढायचं

शहरातली खरेदी परवडत नाही आपल्याला हे

घरच्यांना कशाला दाखवायचं

पिशव्या टाकुन खांद्यावर पुढं पुढं निघायचं

पाटलाच्या घरापाशी पुन्हा थोडं थांबायचं

करावं लागतं भाऊ पाटील आहे गावचा

Ego hurt झाला तर उधारी मागायला

लागलीच घरी यायचा

रामराम पाटील कसं काय पाटील काहीतरी बोलायचं

त्याची म्हस त्याची गाड़ी कौतुक करत सुटायचं

पैशेवाल्याचा चहा प्यायचा क्रिमचं बिस्किट खायचं

अन् घरच्या भाकरीच्या भुकेने पुढं पुढं निघायचं

लांबुनच दिसंल अंगणामधली तुळस अक्कानी लावलेली

आमच्या पोरांसारखी ती पण फुटभर वाढलेली

ओसरीमधे अण्णा आमचे पेपर वाचत असतात

चेहरावरच्या सुरकुत्या त्यांच्या जास्तच वाढलेल्या दिसतात

आमची ही अन् अक्का आत चुलीपाशी असनार

चुलीच्या धुराड्यात बसुन भाकरी थापत असनार

पक्या गाढवानं शेगडीचं काम केलेल काही दिसत नाही

टवाळक्या करायच्या सोडुन बाकी दुसरं सुचत नाही

तेव्हढ्यात कुठुन कार्ट आमचं पाठीवर येउन लटकतं

हातातली पिशवी खेचुन सुसाट बाहेर सटकतं

पोरापोरीलाअण्णा अक्काला सगळ्यांना आणलेलं वाटायचं

मग मोगरीच्या मालकिनीला हळुच एकट्यात गाठायचं

वाटतं खरं मढवावं तिला चाँदी अन् सोन्यानं

खुप सांभाळली गरीबाला तिनं अन् १० रुपयाच्या मोगरानं

नेहमी सगळं असंच होत पण आज काही जमलं नाही

ही साली स्पेशल गाड़ी गावात कुठंच थांबली नाही

ना कट्ट्याला सलाम ना माऊलीला प्रणाम

ना मोगरीचा गजरा ना पाटलाला रामराम

ना बाहुली ना बंदूक ना सदरा ना साडी

सरळ घरापाशीच आणली दोस्तानी आपल्या गाड़ी

पोरं बेक्कार चिडचिड करनार कार्ट तर तमाशा करनार

कट्टी घेउन बसतील बापाशीतोंडं फुगवुन गप्प बसणार

बायको बिचारी आज पन एक शब्द बोलणार नाही

शेवटचं बोलली होती कधी ते पन आता आठवत नाही

अक्का पुन्हा वर्षभर नवं लुगडं घेणार नाही

आमच्या भरवशावर राहुन अण्णा नवा सदरा शिवणार नाही

असं वाटतं कान पकडुन माफी मागायला लागणार आज

पन ऐकु जाईल का त्यांना त्यांच्या माणसाचा आवाज

या तिरंगा ओढलेल्या पेटी मधला आवाज

या घरी आलेल्या माणसाचा आवाज!!!!

LEAVE A REPLY

*