अनुभव : आफ्रिकेच्या घाना देशातील अनोखी जंगल सफर

0

मी २०१०-११ हे माझ्या आयुष्यातलं एक वर्ष घाना या देशात सामाजिक सेवा क्षेत्रात काढून आलो. त्या वास्तव्यादरम्यान बरंच फिरायला मिळालं कामाच्या आणि पर्यटनाच्या निमित्तानेही. अर्थात मिळणारे मानधन मर्यादीत असल्यामुळे बरेचसे प्रवास स्थानिक माणसांच्या संगतीत सार्वजनिक वाहतूक सेवा वापरत केले आणि बरेच काही शिकवून आणि स्मरणीय अनुभव देऊन गेले. त्यातलाच एक प्रवास म्हणजे तिथल्या भर उन्हाळ्यात माझ्या राहूल चक्रबोर्ती ह्या एका भारतीय दोस्ताच्या साथीने केलेला.

माझी नेहमीची सवय म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येक दिवशी कुठे जाणार, कुठे राहणार याचे व्यवस्थित नियोजन करून निघणे. बऱ्याच वेळेला असे केल्याने आपण अनपेक्षित अनुभवांना मुकतो हे जाणवल्यावर ह्यावेळेस माझ्या सवयीला मुरड घालत आठ दिवसाची सुट्टी घेऊन एखाद्या परदेशी बॅकपॅकरसारखे हातात एक गाईडबूक ठेवून फिरायचे ठरवले. (तसा घानामध्ये मी परदेशीच.) राहुलची सोबत असल्याने आणि बऱ्याच ठिकाणी आमचं व्हॉलंटीयर मित्रमंडळींचे नेटवर्क असल्याने काळजी फारशी करावी लागणार नाही असा माझा होरा होता व तो खराही ठरला.

मी राहत होतो घानाच्या उत्तर पूर्व भागातील बोंगो हया गावात तर राहुल होता देशाच्या दक्षिण भागात. आमचे भेटण्याचे पहिले ठिकाण होते उत्तर पश्चिम भागातील जिरापा हे गाव. तिथे आमचे काही सहव्हॉलंटीयर होते. सकाळी ६ वाजता सुटणारी बस पकडायला चार वाजताच नंबर लावण्यासाठी जावे लागले. अखेर एक तासाच्या उशीराने ७ वाजता बस सुटली आणि सहा तासांनी थोड्याशा पक्क्या, तर बऱ्याचशा कच्च्या खडबडीत रस्त्याने ६ तास प्रवास करून मी वा ह्या उत्तर पश्चिम प्रदेशाच्या मुख्य शहरी पोचलो. तिथून परत पुढे दोन तासाचा ट्रो ट्रो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेंपो सेवेतून प्रवास करून जिरापाला पोचलो. सुदैवाने हा रस्ता पूर्णतः पक्का आणि चांगला होता.

माणसांच्या जवळ सहज येणारी वार्टहॉग

ट्रोट्रो  वाहनाने प्रवास

प्रवासाचा सगळा ताण आणि शीण मित्रमंडळी भेटल्यानंतर गेला. फक्त भारतीयच नव्हे तर अन्य देशीय लोकांसोबत असे मैत्र जुळवणे मला घानामधल्या व्हॉलंटीयरींगने शक्य करून दिले. त्या रात्री आम्ही तिथल्या कॅथोलिक चर्चला भेट दिली. तो दिवस ईस्टरच्या आदल्या रात्रीचा होता. मी चर्चच्या मासचा अनुभव पहिल्यांदाच घेतला पण सर्वाधिक लक्षात राहिले तर झायलोफोन ह्या स्थानिक वाद्याचे सूर. मनामध्ये गूंजत राहिलेल्या त्या सुरावटी आणि दिवसभराचा थकवा ह्यामुळे कधी झोप लागली ते कळलंच नाही.

पुढचे लक्ष्य होते वेचिआऊ. ह्या गावाच्या जवळ एक खुप मोठा पसरलेला जंगल प्रदेश होता. वेचिआउ गाव वा ह्या प्रदेश मुख्यालयापासून कच्च्या रस्त्याने ४० किमी वर आहे. हे अंतर कापायला आमच्या ट्रो ट्रोला दोन तास लागले. हा इतका अंतर्भाग आहे की इथल्या माणसांनी आतापर्यंत भारतीय माणसांना पाहिले नाही आणि घानामध्ये सर्वत्र बोलली जाणारी स्थानिक इंग्रजी बोली समजणारे लोकही इथे सहज सापडत नाहीत. वेचिआउला खास हिप्पो अभयारण्य बनवण्यात आले आहे. हे संपूर्ण अरण्य तेथील गावकरी सांभाळतात. परिसरातल्या गावांना येथे होणाऱ्या पर्यटन व्यवसायामुळे थोडाफार रोजगार मिळतो. या अरण्यामधून ब्लॅक व्होल्टा नदी वाहते. ह्या नदीच्या पार बुर्कीना फासो हा देश आहे. इथे देशाची सीमा जरी असली तरी कुठलीही तपासणी चौकी वगैरे नाही. दोन्ही देशांचे नागरीक इकडून तिकडे ये जा करत असतात. दोन्ही देश एकमेकांचे मित्र देश आहेत.

हिप्पो

ब्लॅक वोल्टा नदीतील हिप्पो

ब्लॅक व्होल्टा नदीतच हिप्पो ह्या अजस्त्र प्राण्यांचा अधिवास असतो. हे प्राणी पूर्णतः शाकाहारी असतात आणि दिवसभराचा काळ नदीच्या उथळ पात्रात डूंबत घालवतात. ह्या हिप्पोंना पाहण्यासाठी होडीतून जावे लागते आणि दुरूनच दर्शन घेता येते कारण ते फार हिंस्र असतात. ह्या भर अंतर्भागातही लोकांची तुरळक वस्ती आहे. गावांमध्ये वीजेची सोय आणि मोबाईलचे नेटवर्क दोन्ही नाही. अशा भागात जंगलात निवासाची सोय आहे. तेथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. तिथल्या गाईडने खास आमची झोपायची सोय छतावर केली होती.

निरभ्र आकाशातील सुंदर तारे तारकांच्या संगतीत आणि तिथल्या तीव्र शांततेत मला लवकर झोपच लागली नाही आणि बराच वेळ आकाशाचे निरीक्षण करत मी जागा राहिलो. मध्येच झोप लागली पण उठलो ते राहुलच्या हाकेने. “सचिन उठ ते बघ हिप्पो आले. त्यांचाच आवाज येतोय.” मी हसत सुटलो कारण आवाज जवळच्या एका घरातील बकऱ्यांचा होता. दिवस उन्हाळ्याचे असले तरी मध्ये रात्री ३ वाजायच्या दरम्यान जागा झालो तेंव्हा थंडीने कुडकुडत होतो. इतका थंडावा घानाच्या ह्या उष्ण कटीबंधीय भागात पहिल्यांदा अनुभवला. जंगले आणि हिरवळ जर टिकवून ठेवली तर होत असलेली जागतिक तापमानवाढ कशी थांबवता येईल त्याचा हा प्रत्यक्ष अनूभव मी घेत होतो.

भूकेसाठी चीनी बिस्किटे

सकाळी उठल्यानंतर कमी प्रकाशात प्रातर्विधीसाठी शौचालयात गेलो तर तेथेही वन्यजीवनाने सोडले नाही. लाल मुंगळ्यांनी नको तिथे आक्रमण केले आणि ते हटवता नाकी नऊ आले. खास लवकर उठून आम्ही केलेली पक्षी निरीक्षण सफर ठीकठाक झाली. ती झाल्यानंतर मी गाईडच्या परवानगीने त्या ब्लॅक व्होल्टा नदीत जरावेळ डूंबून घेतले. गाईडने सांगितले की नदीजवळ मगरींचा संचार आहे पण चिंता करण्याची गरज नाही. ती भीती सुक्ष्म स्वरूपात मनात राहिल्यामुळे त्या डुंबण्यालाही एका साहसाचे स्वरूप आले याचा मनोमन आनंद मग मी तत्पश्चात घेतला. आता कडकडून भूक लागली होती पण बरोबर आणलेले खाद्य संपले होते. येथेच चीन ही काय चीज आहे ते समजून आले कारण आमची भूक भागवायच्या कामी त्या अंतर्भागातल्या गावच्या छोट्या दुकानात चीनी बिस्कीटे आली होती.

जंगली  हत्तींच्या जवळ

त्यानंतर तिथून निघालो ते पुढच्या टप्प्याकडे,  मोले राष्ट्रीय उद्यानाकडे. हे घाना सरकारने नियंत्रित केलेले आहे. मोले मोटेल म्हणजे पर्यटक निवासाची जागा एका उंचशा टेकडीवर आहे आणि तेथून खालच्या एका तळ्याच्या जागेचे विहंगम दृश्य दिसते. पाण्यावर येणारे प्राणी पक्षी पाहण्यामध्ये येथे बराच वेळ घालवता येतो. फक्त शांत चित्तवृत्ती मात्र हव्यात. मोलेला जाण्याची ही दुसरी वेळ होती. पहिल्या वेळेस गेलो असताना तिथे आमचा मित्र बनलेला उस्मान हा रेंजर गाईडच्या खास सांगण्यावरून आम्ही ही दुसरी भेट देत होतो.

रेंजर गाईड उस्मान

कारण जंगली हत्तींचे दर्शन ह्या काळातच होत असते. उस्मानने आम्हाला त्याच्या गटामध्ये ओढून घेतले. चालतच आम्ही निघालो आणि त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी ते दिसले. आफ्रिकन हत्ती आशियाई हत्तींपेक्षा आकाराने मोठे आणि अधिक रौद्र दिसतात. त्यांना माणसाळवता येत नाही. त्यामुळे ते अधिक भीतीदायक असतात. आम्हाला त्यांचे जवळून परंतु सुरक्षित अंतरावरून दर्शन घडवण्याचे उस्मानचे कसब खासच मानले पाहिजे असे होते.

किंतांपो धबधब्याखालील ध्यानधारणा

उस्मानची आणि आमची मैत्री अशीच अनपेक्षित. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो आम्हाला बरीच मदत करत होता. इतकेच नव्हे तर खास आम्हाला रात्री जेऊही घातले. घानासारख्या गरीब देशात परदेशी माणसांसोबत राहून आपला काहीतरी फायदा होईल ह्या अपेक्षेने जवळीक साधणारे बरेच लोक भेटले पण उस्मानसारखे निरपेक्ष मैत्री ठेवणारे लोक मात्र कमी. असे असले तरी त्यांच्या निव्वळ असण्याने मैत्रीचे धागे वंश, देश ह्यांच्या पलीकडेही कसे बांधले जाऊ शकतात त्याची जाणीव सतत होत राहत असे.

पुढचे दोन दिवस आम्ही घानाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या तमाले ह्या शहरात आमच्या अन्य व्हॉलंटीयर मित्रांचा पाहुणचार घेत काढले. पुढे जायचं की नाही याबद्दल हो ना करत मी आणि राहुलने शेवटी आमचा मोर्चा दक्षिण दिशेने वळवला. मी गमतीने राहुलला म्हटलं की माझ्या बॅकपॅकला पडलेले भोक जोपर्यंत मोठे होत नाही तो पर्यंत प्रवास करायला हरकत नाही. गाईडबुकानुसार जवळ होतं किंतांपो हे शहर आणि तिथला धबधबा.

आतापर्यंत मी किंतांपो पाचवेळा क्रॉस केलं होतं पण कधी उतरून आजुबाजूला फिरायची वेळ आली नव्हती. ह्या शहराचे मला पहिल्यापासून विशेष अप्रूप वाटायचे कारण हे शहर म्हणजे घानाच्या उत्तर आणि दक्षिण भागांच्या सीमारेषेवर वसल्यासारखे आहे. घानाचा उष्ण कोरडा गवताळ उत्तर भाग येथे उष्ण आर्द्र सदाहरित वृक्षांच्या दक्षिण प्रदेशाला मिळतो. किंतांपोच्या उत्तरेला दाग्बोन जमातींची मुस्लिम बहुल वस्ती आहे तर दक्षिणेला अकान जमातींचा ख्रिश्चन बहुल प्रदेश. येथे भाषाही बदलतात.

किंतांपोच्या जवळ सहा किमीवर तिथला प्रसिध्द धबधबा आहे. आम्ही भर सकाळी तिथे पोचलो. धबधबा असलेले पार्क नुकतेच उघडत होते आणि आम्ही दोघेच पर्यटक तिथे होते. मधला दिवस आणि पर्यटक नसण्याच्या कालावधीत फिरण्याचा हा फायदा होता. किंतांपो धबधबा उद्यानामध्ये नदीचा प्रवाह तीन वेगवेगळ्या टप्प्यात धबधब्यच्या स्वरूपात खाली येतो.

पहिल्या टप्प्यात ह्या प्रवाहाने चक्क पाषाणांना भोक पाडले आहे. तिथे हा प्रवाह जमिनीच्या खाली लूप्त होतो आणि १० मीटर पुढे जाऊन परत भुपृष्ठावर येतो. तिसरा टप्पा सर्वात मोठा. ग्रॅनाईटच्या दगडांवरून साधारण ३० मीटर उंचीवरून हे पाणी कोसळते. येथे प्रवाहात आंघोळ करता येते. मी तिथे प्रपाताच्या प्रवाहाखाली पाण्याच्या आवाजात तल्लीन होऊन कितीवेळ बसलो होतो कळलेच नाही. राहुल उतरला नव्हता. त्याचे आणि पाण्याचे फारसे सख्य नव्हते आणि मी त्याच्या बरोबर उलट. त्याने कितीतरी हाका मारल्या त्या माझ्यापर्यंत पोचल्याच नाहीत. “मांडी घालून राहिला होतास म्हणून समजलं तरी जिवंत आहेस म्हणून.” तो विनोदाने मला म्हणाला.

“अजून पुढे येणार ना नक्की?” राहुलने विचारलं. आता पुढचा प्रवास अजुन दक्षिणेकडे होता. तो त्याच्या गावापासून आता अंतराच्या हिशेबात जास्त जवळ होता तर मी दूर. माझ्याकडे सुट्टीचे दोन दिवस हातात होते. “चल फिरूया अजून.” मी त्याला म्हटलं. बोआबेंग फीएमा माकड अभयारण्याकडे आम्ही प्रवास करू लागलो. अशाच काही ट्रो ट्रो बदलत तिथे पोचलो आणि त्या लोकप्रकल्पाचे ऑफिस गाठले. सुदैवाने त्या दिवशी पोचणारे आम्हीच पहिले पर्यटक होतो. निवासाची सोय असल्यामुळे तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. जंगल लगेचच फिरून घ्या असा सल्ला रिसेप्शन ऑफीसातल्या बाईने दिला आणि बरोबरच्या गाईडसोबत आम्ही निघालो.

वेलींचा सांगाडा

 वेलींचा सांगाडा

तसा ह्या जंगलाचा जीव छोटा होता परंतु उंच वाढलेले वृक्ष आणि त्यामधून काढलेल्या पाऊलवाटा. त्यातच भर दिवसाही जमिनीपर्यंत पोचणारा कमी प्रकाश. ह्या सर्वामुळे वातावरण गूढ वाटत होते. हे अभयारण्य म्हणजे एक खूप मोठी देवराई होती. बोनो जमातीच्या ह्या गावामध्ये माकड हा प्राणी दैवी समजला जातो. इथे एक खास स्थानिक पूजारी आहे आणि त्याचे काम इथल्या मृत माकडांचे अंत्यविधी करणे व त्यांचे दफन करणे. जंगलातून जाणाऱ्या नदीच्या प्रवाहाचा आवाज फिरताना बऱ्याच ठिकाणी ऐकू येतो पण जंगलातील नदीच्या भागाकडे जाण्याचे अधिकार फक्त पूजाऱ्याचे. एका ठिकाणी एका मोठ्या वृक्षाला वेटोळे घातल्यामुळे तयार झालेला वेलींचा सांगाडा पहायला मिळाला. मधला वृक्ष मरून कुजून गेल्यामुळे फक्त वेलींचा सांगाडा राहिला होता. यात आतमध्ये जाउन शिडीसारखे वर चढता येत होते.

मोना माकड

इथल्या ४.५ वर्ग किमीवर पसरलेल्या जंगलात दोन प्रजातींच्या माकडांना खास संरक्षण देण्यात आले होते. मोना माकडे तपकिरी रंगाची आणि आकाराने मोठी असतात. ही जास्त हिंस्र आणि तुलनेने खुल्या जागेत राहतात. दुसरा प्रकार कोलोबस माकडे. ही आकाराने लहान असतात आणि सहज दिसणे शक्य नसते कारण त्यांना अधिक दाट पानांच्या, फांद्यांच्या आड राहणे आवडते. काळ्या पांढऱ्या रंगाची ही माकडे दिसायला एखाद्या मांजरासारखी व सुंदर होती.

माकडांची दफनभूमी

जंगलाची फेरी संपवून बाहेर गावात आलो तर बरीच माकडे सर्रास घरांवरून उड्या मारत फिरत होती. एका घरात खास लाकडी कोरीव काम केलेल्या वस्तू विक्रीसाठी मांडून ठेवल्या होत्या. किंमतीही शहरात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा कमी होत्या. मी दोन लाकडी मुखवटे तिथे खरेदी केले. ते आजही इथे भारतात आफ्रीकेच्या आठवणी ताज्या करण्याचं काम करतात. त्यानंतर आम्ही असेच थोडे इथे तिथे फिरलो. इथे काजू आणि आंब्याची बरीच लागवड होती आणि झाडांवर दोन्ही फळे लगडलेली होती. मनसोक्त आंबे आणि काजूबोंडे खायला मिळाली आणि कोकणात असल्याचा आनंद मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणावर माकडांचा धुमाकुळ चालू असताना झाडांवर अशी फळे लगडलेल्या अवस्थेत कशी राहू शकतात हे कोडे मला आजही सुटलेले नाही. तिथल्या माणसांना विचारले पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. रात्री गप्पा मारत घरगुती पध्दतीने केलेल्या स्पॅगेटीचा आस्वाद घेतला आणि काहीवेळाने साध्या स्वच्छ बेडवर झोपेच्या अधीन झालो.

 

टानो देवराई

माझ्या बॅगेला पडलेलं भोक मोठं झालं होतं. “आज परत निघूया.” मी राहुलला म्हटलं. त्यालाही प्रवास थांबवावा असं मनातून असावं. तो लगेच हो म्हणाला. पण त्या आधी सकाळी अजून काही बघून घेता आलं तर पाहुन घेऊ असं म्हणत गाईडबूक पाहिलं तर अर्ध्या दिवसात होईल अश्या टानो देवराईची माहिती होती. टेचीमान ह्या आमच्या जवळच्या शहरापासून निव्वळ ६ किमी वर असलेली टानो देवराई म्हणजे एक खुप मोठे २० वर्ग किमीवर पसरलेले जंगल आहे. तिथल्या बोनो जमातीने राखलेल्या ह्या जंगलाला त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्व आहे. पुर्वीच्या काळात झालेल्या अन्य जमातींमधल्या लढायांदरम्यान ह्या जंगलाने आणि त्यातील डोंगरांनी बोनो जमातीच्या लोकांना आसरा दिला होता. ह्या जंगलावरच तिथे इकोटूरीझम प्रकल्प लोकसहभागातून साकारला होता. गाईड येईपर्यंत आम्ही तिथे पर्यटक नोंदणी पुस्तक चाळत बसलो. गेल्या दोन वर्षात तिथे भेट देणारे आम्ही पहिले भारतीय होतो. तसं पाहिलं तर घानामध्ये रोजगाराच्या निमित्ताने युरोपीयन व अमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोक जास्त प्रमाणात जाऊन राहिले आहेत. पण बरेचसे लोक आपल्याच कोशात कसे जगत राहतात त्याचे ते उत्तम निदर्शक होते.

टानोचे जंगल आणि वाळवीचे बांधकाम

टानोच्या जंगलात तिथल्या अन्य प्राण्यांसोबत वाघळांना खास संरक्षण देण्यात आले आहे. आम्ही तिथे गेलो तेंव्हा वाघळांचा एक मोठा थवा आकाशात उडू लागला होता. डोक्यावर पाण्याचे काही थेंब पडले तेंव्हा सोबतचा गाईड म्हणाला की, “ते वाघळांचे मूत्र आहे. पवित्र असते.” तिथे टानोला मांसासाठी गाई मारतात आणि वटवाघळांना, त्यांच्या मूत्राला पवित्र समजतात. इथे कोकणात संधीवाताच्या औषधासाठी वटवाघळं मारतात आणि गाईंना, त्यांच्या मूत्राला पवित्र समजतात. कोणी काय पवित्र मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

टानो जंगलातील झोपडी

टानोच्या डोंगरांमधून फिरणे आल्हाददायक होते. विविध आकाराचे मोठमोठे पाषाण फारच सुंदर होते. एक तर चक्क मानवी लिंगाच्या आकाराचा होता. एका पाषाणावर नैसर्गिक रीत्या पडलेल्या खाचा होता. त्यावरून चढायची पूर्वी स्पर्धा लागत असे. पहिला येइल त्याला तिथे उपस्थित असलेल्या आवडीच्या मुलीबरोबर विवाह करायला मिळत असे. मी त्या दगडावर चढून पाहिलं. “कोणी मुलगी नाही इथे. चल खाली उतर.” राहुल ओरडला. एका ठिकाणी एक माठ फोडून जमीनीत अर्धवट पुरलेला होता. ह्या माठात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या ओलसरपणावरून पावसाचे अंदाज बांधले जातात असं गाईडने सांगितलं. एका ठिकाणीत मातीचे बाऊल उलटे एकावर एक ठेवल्यासारखे दिसत होते. ते माणसाने नव्हे तर तिथल्या एका जातीच्या वाळवीने बांधले आहेत हे कळल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला.

वाळवीने केलेले बांधकाम

टूर संपवून आम्ही टेचीमान ह्या जवळच्या मोठ्या शहरात परतायचे ठरवले. “अजून फिरायचं का?” राहुलने विचारलं. मी त्याला माझ्या बॅकपॅकला पडलेलं आता मोठं झालेलं भोक दाखवलं आणि आता त्यामुळे बास असं सांगितलं. दुपारचा एक वाजला होता. आम्ही एका स्पॉटमध्ये (जेथे पेये मिळतात असे ठिकाण) बसून टूरमध्ये केलेला हिशेब पूर्ण केला. एकमेकांची पैशाची देणी चुकती केली आणि निरोप घेतला. दोघे विरूध्द दिशांना निघालो. मी उत्तरेला तर तो दक्षिणेला.

तीन ट्रो ट्रो बदलून मी बोल्गातांगा ह्या माझ्या जवळच्या शहरात पोचलो. रात्रीचे पावणेनऊ वाजले होते. माझ्या बोंगो ह्या गावाला जाणारे आता काही मिळणे शक्य नाही असे वाटून मी आता तिथल्या मित्रमंडळापैकी कोणातरी आसरा घ्यायचे ठरवले. पण मनात विचार आला, बोंगोच्या ट्रो ट्रो सुटतात तिथे जाऊन बघावे आणि तिथे एक प्युजो टॅक्सी होती. माझ्या ओळखीचा अब्दूल नावाच्या ड्रायव्हरचीच होती. त्याने खचाखच भरलेल्या टॅक्सीत मला कसेतरी सामावून घेतले आणि आम्ही एका टॅक्सीत कोंबले गेलेले दहा जण बोंगोकडे निघालो. माझ्या फाटक्या बॅकपॅकसह मी चार वाहने बदलून नऊ तासात बोंगोला पोचलो. शरीराच्या प्रत्येक स्नायूमध्ये दुःख होते आणि मनात मात्र प्रवास संस्मरणीय झाल्याचे सूख होते.

लेखक श्री सचिन पटवर्धन आणि त्यांचा मित्र राहुल

(लेखक कृषीतज्ज्ञ असून विविध सामाजिक संस्थांअंतर्गत त्यांनी कृषी संशोधन, कृषी प्रकल्प यासंदर्भात विविध समाजउपयोगी काम केलेले आहे. काही काळ ते पश्चिम आफिका खंडात असलेल्या घाना देशात कार्यरत होते.)

LEAVE A REPLY

*