पाडव्यानिमित्त दिवाळीसाठी खास आभूषणे

0

शिरोभूषणे –

केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात.

आंबोडयातील फुले –  ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.

वेणी – ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे.

कर्णभूषणे

कर्णभूषण घालणे हे हिंदू संस्कृतीचे लक्षण मानले जाते. कान टोचल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते असे काही लोकांचे म्हणणे आहे.

कुड्या – कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिध्द झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६-७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडया ह्या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात.

झुमके – याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत. फक्त याच्या आकारात फरक असेल.

कान –  हे कर्णभुषण पूर्ण कानाच्या आकाराचे असते. हल्लीच्या काळात हे आभुषण फार प्रचलित आहे.

बाळी  – बाळीला फिरकी नसते. यात सोन्याची किंवा चांदीची तार वळवून कानात अडकवलेली असते. पुर्वी मुलांना नजर लागू नये म्हणून भीक मागितलेल्या पैशाने जी बाळी बनविली जाई त्यास भिकबाळी म्हणत.

वेल – हा मोत्याचा किंवा सोन्याचा सर असतो तो कानातून केसात अडकवितात. तसेच मोठमोठी व जड कर्णभूषणे घालून कानाची पाळी ओघळू नये म्हणून कानात साखळी अडकविण्याची पध्दत आहे.

बुगडी – कानाच्या खालच्या पाळी बरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते.

कुडकं – कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकं घालण्याची पध्दत आहे. काही जमातींमध्ये ४-५ ठिकाणी कानाच्या कडा टोचण्याची पध्दत आहे.

गळ्यातील आभूषणे

चिंचपेटी – ही पोकळ सोन्याच्या पेटीने बनवलेली असते. मोत्याच्या नाजूक सरींना यष्टिलता किंवा यष्टिका म्हणत असत. लांबट टपो- आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवितात त्याला एकलट किंवाएकदानी म्हणतात. तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजुक तारेत गुंफलेले असतात. त्याचप्रमाणे मोहनमाळ, गुंजमाळ, जांभूळमाळ, जवमाळा ही बनविल्या जातात.

लफ्फा – लफ्फा हा प्रकार म्हणजे मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार. यात हारच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून रेशमी गादी मगच्या बाजूस लावलेली असते. हाराला पाठीमागे अडकविण्यासाठी कडया किंवा रेशमी दोरे असतात.

पुतळया – गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात. पुतळया ह्या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.

मंगळसूत्र – हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र हा सौभाग्यवती स्त्रीचा महत्त्वाचा अलंकार होय. मंगळसुत्र हे सातवाहन काळापासून चालत आले आहे. या काळात यास कनकसर व कनकदोर असे म्हणत पुढे यादव काळात ते कनकसूत्र व हेमसूत्र नावाने प्रचलीत झाले. नंतर त्याचे नामकरण साज असे झाले.

कोल्हापुरी साज – कोल्हापुरकडच्या लोकांनी हा साज मोठयाप्रमाणात वापरून त्याचे नामकरण असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बालपान, शंख, नाग, कासव. भुंगा अशी पदके तारेने समोरासमोर जोडलेली असतात. मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात.

दंडावरचे दागिने

वाकी – सुशिक्षित-नागर त्याचप्रमाणे ग्रामीण अशा सर्वच भागातल्या स्त्रियांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा हा दंडावरचा दागिना आहे. नागर उच्चवर्णीय स्त्रियांच्या वाकी सोन्याच्या, नाजूक घडणीच्या अशा असतात. तर ग्रामीण समाजात ठोसर व चांदीच्या वाकी आढळतात. सोन्याच्या वाकीमध्ये चटईच्या वाकी व रूद्रगाठीच्या वाकी असे दोन प्रकार महिलांचे विशेष आवडते आहेत.

नागबंद – हाही एक वाकीचाच प्रकार म्हणायला हवा. वेटोळे घालून बसलेली व फणा उभारलेली अशी सोन्याच्या नागकृतीच्या रचनेची वाकी ‘नाग’ अथवा ‘नागबंद’ अशा नावाने ओळखली जाते.

नागोत्र – गोल गोल वेटोळयांची भरपूर रूंदी लाभलेल्या या गोलाकार वाकीला नागोत्र असे नाव आहे. ग्रामीण व नागर ह्या दोन्ही भागात हा अलंकार सारखाच लोकप्रिय आहे. शहरी भागात हे नागोत्र सुवर्णाचं आणि नाजूक कलाकुसरीचं असतं. ग्रामीण भागात ते ठसठशीत व चांदीचं आढळतं आणि नागोत्तर ह्या नावाने ओळखलं जातं.

बाजूबंद – हाही सुरेख घडणीचा, सुवर्णाचा रत्नजडित असा दंडावरचा अलंकार आहे. तथापि हा बहुतकरून शहरी भागातच दिसून येतो. तर याच्या उलट तोळेबंद हा दागिना खेडेगावातून प्राधान्यानं वापरात असतो.

तोळेबंद – चटईच्या वाकीसारखीच जडणघडण असणारा हा भक्कम असा चांदीचा अलंकार ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे.

वेळा – हाही चांगला जाडजूड आणि विशेष कलाकुसरीचा चांदीचा अलंकार तोळेबंदासारखाच ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. आदिवासी स्त्रियांमध्येही या अलंकाराचा पुष्कळच प्रसार झालेला दिसतो. दंडावरचे प्रामुख्याने दिसणारे अलंकार एवढेच आहेत.

मनगटावरचे  दागिने

1 ) पाटल्या – पाटल्या हा प्रकार मूळचा पेशवेकाळातला. बांगडयांनंतर महिलांच्या हातात साधारणपणेदिसणारे दागिने म्हणजे पाटल्या आणि बिलवर. हे दोन्ही नग आजही घरोघरी वापरात आहेत. पाटल्या या नेहमीच्या ठराविक घडणीच्या नगालाच आपल्या महिलांनी आणखीही काही वेगळया कारागिरीची चातुर्ययुक्त जोड दिली आहे. ‘तोडीच्या पाटल्या’, ‘जाळीच्या पाटल्या’, ‘पुरणाच्या पाटल्या’, ‘पोवळ पाटल्या’ , ‘मोत्याच्या पाटल्या’ असे अनेक प्रकार त्यातून निर्माण केलेले आहेत.

2 ) बिलवर – बिलवरचा मूळ शब्द अरबी भाषेतला ‘बिल्लौर’ असा आहे आणि त्याचा अर्थ पारदर्शक स्फटिक पत्थर असा आहे. स्फटिक म्हटलं की त्याला वेगवेगळया बाजू-पैलू हे असणारच. त्यामुळे पैलू पाडलेल्या बांगडीला ‘बिलवर’ असं म्हटलं गेलं असावं.

3 ) गोठ – पन्नास वर्षापूर्वीच्या काळात पाटल्या आणि बिलवर यांच्या गटात गोठ हाही दागिना अपरिहार्यतेने असायचा. गोठ-पाटल्या-बिलवर असा त्रिकुटाचाच उल्लेख त्यावेळी वापरात, बोलण्यात असे. गोठ म्हणजे भरीव सोन्याचं गोलाकार कांबीचं वळं किंवा कडं.

4 ) गजरा – मोत्यांचे अनेक सर एकत्र गुंफून ते मनगटावर घातले जातात, त्या मोतीसरांना गजरा असे नाव आहे. हे सर रेशमी धाग्यांनी गुंफण्यात येतात व त्यांच्या दोन्ही टोकांना एकमेकांत अडकवण्यासाठी सोन्याचा फासा असतो. तथापि बहुधा सोन्याच्या रूंद आणि पातळशा पट्टीवर असे मोत्यांचे सर एकत्र ठेवून, मधून मधून पट्टीच्या असणा-या बारीक भोकातून तारेने अथवा धाग्यांनी बांधून ते सर या पट्टीवर कायमचेच जखडून ठेवलेले असतात. असं ‘गजरा’ या अलंकाराचे स्वरूप आहे.

5 ) जवे – जव या धान्याच्या दाण्यांसारखे सोन्याचे मणी सोन्याच्याच बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो. हा एक अतिशय देखणा आणि मनोहर असा दागिना आहे. याचं मूळ बहुधा राजस्थान-गुजरात हे असावं. कारण तिथे हे जवे आणि पिछोडया अशा जोडीनं हे अलंकार वापरले जातात. त्यापैकी जवे ही बांगडी सर्वात पुढे हाताच्या तळव्याच्या बाजूला घालायची आणि पिछोडया ही सर्वात मागे कोपराच्या जवळ घालायची असा तिथं संकेत आहे.

कटीभूषणे

पूर्वी कटीभूषणाचा उपयोग स्त्री व पुरूष दोघेही करत. त्या काळी कमरपट्टा, मेखला, रशेना, माचपट्टा, साखळया, करकोटा, ही कटीभूषणे वापरत. कटीभूषणे ही बहूदा चांदीची असत. मराठे-पेशवेकाळात नऊवारी साडीवर स्त्रिया कंबरपट्टा घालत. ब-याचवेळा या कंबरपटटयाच्या मध्यभगी खडा असत. उपनयनाच्यावेळी मुंजाच्या कमरेला जे तृणाचे कटीसूत्र बांधले जात त्यास मेखला म्हणतात.

आज या सर्व कटीभूषणांची जागा लहान अश्या छल्ल्याने घेतली आहे.

1 ) कमरपट्टा –  हा दागिन्यांमधील अतिशय जुना दागिना आहे. राजघराण्यातील राण्या नऊवारी पातळावर कबंरपट्टा लावत त्यामुळे त्या अगदी रुबाबदार वाटत. हा पट्टा ऍक्युप्रेशरचे काम करतो त्यामुळे पाठदुखी सारख्या विकारांना आळा बसतो. तसेच यामुळे पोटाचा घेर प्रमाणात रहातो.

2 ) मेखला – हा कमरेच्या एका बाजूला लटकणारा दागिना आहे. यात नक्षीदार साखळी/वेल असतात. ह्याला दोन टोके असतात. एक टोक साधारण पोटाच्या बाजुला अडकवतात व दुसरे टोक थाडे अंतर सोडून पाठीच्या बाजूला अडकवतात.

3 ) छल्ला – हे कटीभूषण भारतात प्रचलित आहे. बहुतांशू ठिकाणी ते वापरेले जाते. छल्ल्यामध्ये वरच्या बाजुस नक्षीदार प्लेट असते. व पाठीमागच्या बाजूस किचेन सारखे चाव्या अडकविण्यासाठी जागा असते.

पद्मभूषणे

1 ) जोडवी – साधारण लग्न झालेल्या महिला जोडवे घालतात.

2 ) अंगुष्ठा – पायाच्या अंगठयात अनवट अंगुष्ठा नावाचे जाड कडे, दुस-या बोटात जोडवी किंवा विरोद्या व चौथ्या बोटात मासोळी तर करंगळीत वेढणी घालण्याची पध्दत होती.

3 ) पैंजण – पैंजण हे एकपदरी असतात. तर तोरडया व वाळे जाडजुड असतात. वाळे हे तांब्याचे सुध्दा असतात. लहान मुलांच्या पायात असे तांब्याचे वाळे घालण्याची पध्दत आहे. चाळ हे नृत्यांगना वापरतात. चाळात अनेक घुंगरे असतात. ही शक्यतो पितळेची असतात. हातातील बोटांप्रमाणे पायातील बोटेही सजवली जात.  पैंजण, तोरडया, वाळे, चाळ ही पद्मभषणे चांदीचीच असतात. कारण चांदी थंड असल्याने पायातील उष्णतेस ती प्रतीरोध करते.

नाकातील आभूषणे –

पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला हा प्रकार आहे. महाराष्ट्रीयन स्त्री ही नथीशिवय पूर्ण होऊ शकत नाही. नाकातील नथींची अनेक नावे आहेत जसे चमकी, लोलक, मोरणी, नथीची ही कल्पना जनावराच्या नाकात असणा-या वेसणीतून निर्माण झाली आहे. मराठा नथ ही भारदस्त, लांब तारेची असते यात लहान मोठे बरेच मणी असतात. ही नथ ओठावर रूळते. तर ब्राह्मणी नथ ही नाजुक, मोजक्या लाल हिरव्या पाचूंची, मोत्यांची असते. सरजाची नथ ही वेणी गुंफल्याप्रमाणे, नक्षीदार विणकाम केल्यासारखी व वजनाने जड असते. हल्लीच्या काळात बायका नथ न घालता नाजुक एकच खडा किंवा मोती असणा-या किंवा सोन्या-चांदीत नाजुक फुलाच्या आकाराच्या मोरण्या (मुरण्या) घालतात.

हाताच्या बोटांतील दागिने –

दुसऱ्या शतकापासून हातांची बोटे सजवण्यासाठी अंगठया घालण्याची सुरुवात झाली. मातीच्या, लाकडाच्या, लोखंडाच्या, विविध मुद्रा, किंवा चिन्ह असलेल्या अंगठया वापरल्या जात. अंगठयामध्ये आरसाही वापरला जात. तर्जनीत चंदन, चांदी, हस्तीदंत, सोने यांपासून बनविलेली अगंठी घालण्याची प्रथा होती. या चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठीला ‘वेढा’ किंवा ‘वळ’ म्हणतात. मधल्या बोटात सिक्का घातला जाई. रूप्याची व हिऱ्याची अंगठी मुख्यत: अनामिकेत तर छल्ला किंवा मुदी करंगळीत घालण्याची पध्दत होती.

LEAVE A REPLY

*