दिवाळीसाठी खास महाराष्ट्रीयन पेहराव

0

परकर-पोलके

पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके,  मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाचीसाठी पहिल्यांदा परकर-पोलके शिवायची. मुलगी वयात येईपर्यंत ती ते वापरत असे. हे  परकर-पोलके मुखत्वे करून  धटवाडी खणाचे असे. पूर्वी बायका घरातच ते शिवणकाम करीत असत. कमरेपर्यंत शिवलेले पोलकं आकर्षक दिसवं म्हणून  फुगा बाही, पफ बाही  कौतूकाने शिवली जात असे. केसांच्या घटट रिबीनी लावलेल्या दोन वेण्या, पायात पैंजण, पोटापर्यंत उंचीचा पोलका आणि पायाच्या लांबी इतका परकर असा बहुतेक मुलींचा पेहराव असे.

प्रिंटेड चिटचा कपडा वापरायची त्या काळी आवड होती. त्यावरची नक्षी ही नाजूक पण आकर्षक असायची. किशोरवयीन वयातील चंचलता, आणि दंग मस्ती लक्षात घेऊनच हा पेहेराव बनवला गेला होता.  मुलींना खेळतांना परकराचा छानसा ओचाही बांधता यायचा. हल्ली पारंपारिक परकर पोलक्यात आधुनिक बदल करून आवडीने घातले जातात.

नऊवारी

भारतीय संस्कृती ही विश्वातील काही प्राचीन संस्कृतींपैकी एक. वेशभूषा आणि अलंकारांची विशेष आवड असणाऱ्या भारतीयांसाठी, साडी हा महत्त्वाचा पेहराव आहे. असे मानले जाते साडीचे आगमन पाच हजार वर्षांपूर्वी झाले.काळानुसार, जीवनशैली आणि प्रदेशांनुसार साडी नेसण्याच्या पध्दतीत बदल होत गेले.

साडीच्या बरोबरीने अनेक पेहराव आले, फॅशन बदलल्या तरी साडीचे अस्तित्व आजही टिकून आहे. वैश्विक बदलांमधे अनेक जीव, वस्तू, वास्तू लोप पावल्या, काळाच्या ओघात काही टिकल्या तर काही नवीन रुपात सामोऱ्या आल्या. साडी ही त्यापैकीच एक. ‘साडी’ ह्या शब्दाचा उगम ‘सत्तिका’ या प्रक्रित शब्दापासून तयार झाला तर काहींच्या मते ‘चीरा’ (कापड) ह्या संस्कृत शब्दापासून झाला.

गावात अजूनही नऊवारी टीकून आहे. हल्ली तरुण मुलीही मंगळागौरींना, लग्नात, मुंजीत अगदी कॉलेजच्या ‘साडी डे’ ला ही ठेवणीतली आजीची जुनी पण खास नऊवारी साडी नेसतात. अशी ही नऊवारी साडीची जादू वर्षानूवर्ष टिकून आहे. ‘नऊवारी’ चा शब्दशा अर्थ आहे नऊ-वार सलग कापड.

न शिवलेले/कापलेले सलग कापड पुराण काळापासून अतिशय पवित्र मानले गेले आहे. हे कापड सुती, रेशीम असे विविध पोत आणि विविध रंगात असणारे असते. नक्षीकामाने पदर आणि काठाचे सौंदर्य अधिक उठून दिसते. राजा-महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नक्षीकाम केले जायचे. नऊवारी साडीच्या आत परकर घालावा लागत नाही, नऊवारीचा खालचा भाग धोतरासारखा असतो.

ही नऊवारी साडी नेसायची कशी ? साडीचा मध्य दोन भागात घडी करून काढायचा. मग तो मध्य मागे कंबरेवर ठेऊन साडीची दोन टोकं पुढे आणायची. त्यांची पोटावर घटट गाठ मारायची. त्यानंतर ती दोन्ही टोके पायांमधून काढून उजव्या टोकाला निऱ्या घालून पाठीमागे कंबरेत खोचून द्यायचे. डाव्या टोकाला पायाभोवती घेऊन उजव्या खांद्यावर पदरासारखे टाकायचे. झाली नेसून नऊवारी !

पैठणी

पैठणी ही मराठी स्त्रीची शान समजली जाते. काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची, त्यावर रंगकाम, भरतकाम करणारे कलाकार होते. पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले ‘प्रतिष्ठान’ म्हणजेच आताचे पैठण.

पैठणी ही साडी जगभरात ‘रेशीम आणि जरीत विणलेली कविता’ म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम,मागणी पैठणीनुसार अस्सल सोन्याच्या तारांचा जरीचा काठ पैठणीला साडयांमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवून देते. एक साडी पूर्ण करायला एक महिना ते एक वर्ष लागतो. आता जरी आधुनिक यंत्र उपलब्ध असली तरी उत्कृष्ट पैठणी ही फक्त हातानेच विणता येते असे विणकरांचे ठाम मत आहे.

पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा काठावरचा रंग. काही साडया ‘कॅलिडोस्कोपिक’ असतात. म्हणजे त्या साडीची वीण दोन रंगातली असते व आपल्याला कधी एक तर कधी दुसरा असे झटकन बदलणारे रंग दिसतात. पैठणी विणण्याकरता काही ठरलेले रंग आहेत. पैठणीत वापरण्यात येणारे रंग असे – पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्लू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिन्क), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्लू). पूर्वी हे सर्व रंग नैसर्गिक असायचे. वेगवेगळ्या भाज्या, फळे, फुले यांच्यापासून ते तयार होत. कॅलिडोस्कोपिक रंग असे वापरले जातात – कुसूंबी (लाल/जांभळा) , लाल/हिरवा, काळा/पांढरा, लाल/काळा, पिवळा/हिरवा.

पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.

 

कोल्हापुरी चप्पल

कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.

पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. काप्दासी पायताण ह्या नावाने ती ओळखली जात असे. नावावरून ती कोठे बनवली गेली त्या गावची देखील माहिती मिळत असे. १९२० साली ती सोदाग्र कुटुंबाने तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले.

कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी,गांधीवादी अशी नावेही घेतली. अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

या चपला सपाट असतात. इतर चपलांप्रमाणे त्यांच्या टाचा उंचावलेल्या नसतात. अर्थात आता काळानुसार बदल झाले आहेत. यांना मध्यभागी एक पट्टी असून एक अंगठा असतो. यांना चामड्याचा पृष्टभाग असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते.

LEAVE A REPLY

*