कथा – देह दिव्यांग… मन अथांग

0

आज तो पुन्हा एकटा होता. त्याला आभाळ खोदावेसे वाटले, सागराला गिळून टाकावेसे वाटले. सुर्याचे गंध कपाळी लावून संपून जावेसे वाटले. कारण तो आतून दु: खी होता.  रिकामे मन म्हणजे सैतानाचा कारखाना असतो हे तो आज शब्दश: अर्थाने अनुभवत होता.  कारण तो आज निष्क्रिय आणि एकटा होता. का बरे देवाने माझ्यावर असा अन्याय केला असेल? तो मनाशीच पुटपुटला. हे अपूर्णत्त्व देण्यापेक्षा विधात्याने मला जन्माला घालताच का बरे संपवले नसेल…? अशा असंख्य विचाराच्या लाटा त्याच्या मन:किनारावर आदळू लागल्या..

त्याच त्याच विचारांनी त्याचे डोके अधिकच जड पडले. कमरेपासून लुळे झालेले त्याचे दोन्ही पाय.. लुळापुळा पडलेला देह पाहून त्याला स्वत:चीच घृणा वाटू लागली. संपूर्ण जगाचे दु:ख त्याच्या चेहर्‍यावर दिसू लागले. आणि स्मृतीच्या कोषातून जातांना आता त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.. अश्रू नव्हे ते.. रक्ताचे आसूच जणू …अशीच वेदना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागली. मूक यातनेतून तो अश्रु गाळू लागला.

असंख्य विचारांचे काहूर त्याच्या मनात दाटून आले. देह संपवावा आणि आता या क्षणी मृत्यूला जवळ करावे असे त्याला वाटले. रुक्ष मन आणि अश्रुंनी कोरडे पडलेले डोळे… तो मृत्यूकडे जाण्यासाठी सरपटू लागला… जसा तो वळाला तशा असंख्य मुंग्या त्याच्या देहाने चिरडण्यापासून वाचण्यासाठी सैरावरा पळू लागल्या.. त्याला वाटले.. अरेच्चा मला माझा देह नकोसा वाटत आहे आणि या इवलासा जीवाची जगण्याची धडपड मानवापेक्षाही किती मोठी आहे. तोंडात साखरेचे कण घेऊन तो मुंग्यांचा ताफा त्याच्या पासून स्वत:ला वाचवत निघून गेला.. हा पुन्हा सरपटू लागला.  आसवे गाळू लागला… त्याच्या डोळ्यांतील एक अश्रू पायावर पडला आणि त्याच क्षणी त्याला वाटले जर या अश्रुबिंदूत जादुगार्‍याच्या छडी प्रमाणे जादू झाली आणि त्याने आपले व्यंग बरे झाले तर किती छान होईल. नकोच बरे होणे… मरुन जावे वाटतयं मला….. त्या पेक्षा डोळ्यातून ओघळणारा अश्रूच जर ज्वालामुखीच्या तप्तरसाप्रमाणे आपल्याला संपवेल तर अधिक बरे होईल. पण क्षणभरच….

दुसर्‍याच क्षणी त्याच्या निष्प्राण पायात आणि विझलेल्या मनात नवचैतन्य आले.. आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणे  त्याच्या मनाताही आशेची नवी दामिनी चमकली… गलितगात्र झालेल्या देहामध्ये  नवे चैतन्य पसरले.  का कुणास ठाऊक आणि कसे तेही माहित नाही परंतु आपण जगले पाहीजे……तो स्वत:शीच पुटपुटला वेड्यासारखा……. बाहेर अंधारून आले होते. पाऊस पडण्याचा बेतात होता… परंतु अचानक पिवळा सोनेरी संधीप्रकाश दाटून आला आणि मळभ दूर होऊन किरणांचे सोनेरी कवडसे काळ्याकुट्ट ढगांतून बाहेर पडू लागले. क्षणातच पाऊसधारा सुरू झाल्या आणि त्यामध्ये सोनेरी किरणे मिसळून सोनथेंबाचा सुरेख वर्षाव तृषार्त धरतीला तृप्त करू लागला.

पश्चिम दिशेला भव्य सप्तरंगी इंद्रधनुचा बाण त्याला दिसला… हे पाहून त्याच्या मेलेल्या मनाला पालवी फुटली. नाही मी माझे जीवन संपवणार नाही.. त्याने ठाम निर्धार केला. निसर्गाच्या बदलाचा त्याच्या मनावरही खोल परिणाम झाला. त्याने मनाला समजावले. आता रडत बसाचयचे नाहीं. आपल्याला देवाकडून मिळालेले हे अर्ध शरीर यामागे देवाचीच काही तरी दैवी योजना असावी. आपल्याला हे दिव्यांग शरीर देण्यामागे देवाचे काही तरी नियोजन असावी.. असू  दे आपले अर्धे शरीर अपंग परंतु निम्मा देह तर परिपूर्ण आहे ना….? तो वेड्यासारखा स्वत:शीच बडबडू लागला…काळ्याकुट्ट ढगातून लख्ख वीज चमकली. अंधारुन आलेले मळभ पूर्ण दूर झाले…..

पाऊस पडून गेल्यामुळे धरीत्री पावसात नाहून अधिकच सुंदर दिसू लागली….. पश्चिम किणार्‍यावर इंद्रधनुचा गोफ अधिकच लोभसपणे दिसू लागला. जणू तो त्याला म्हणत असावा की जरा माझ्याकडे बघ.. माझे अस्तित्व क्षणभराचे पण मी अगणित मनाला आनंद देतो… सप्तरंग उधळतो….. त्याच्याही मनात इंद्रधनूचा गोफ आतून उमलून आला….गच्च फुलांचे ताटवे उमलून वर यावे तसा त्याचा चेहरा उमलला… मनात विचार आला, माझा निम्मा देह कुणाच्या तरी उपयोगी पडावा म्हणूनच माझी निर्मिती झाली आहे. मी इतरांच्या जीवनात इंद्रधुनू फुलवणार.. बस्स झाले….रडगाणे. आजपासून मी माझ्यासारख्याच दिव्यांगांची अथवा मंतीमंदांची सेवा करणार…बाहेरचा अंधार एव्हाना दूर झाला आणि काळेकुट्ट ढग दूर होऊन विशाल आकाशाचे मंडल अधिकच विशाल झाले होते. आजपासून मी अशा रुग्णांची सेवा करणार ज्यांना माझी गरज आहे. तो सरसरपट सरसरपट देहाला पुढे पूढे नेऊ लागला. सुरवटासारखे…

या क्षणी त्याच्या डोळ्यांत आकाशाला गवसणी घालणारा आत्मविश्वास आणि आनंद दाटून आला होता. अश्रुंची जागा आता मानवता आणि सेवेने घेतली होती. नव्या जगण्याने, विचारांनी त्याच्या निम्म्या देहात शंभर हत्तींचे बळ संचारले. त्या चैत्यन्याने आपला निम्मा देह कधी काळी लुळा, अपूर्ण होता याचे भानही त्याला उरले नाही….. आज तो अपूर्ण नव्हता….. निवासी मतीमंद मुलांच्या शाळेत तो बालकांची सुश्रुषा करण्यात रममाण झाला होता. तिथेच त्याची ओळख मतीमंद, दिव्यांग मुलांसाठी आश्रमशाळा काढणार्‍या गुरुजींशी झाली.. ज्या गुरुजींनी आपले उभे आयुष्य अशा मुलांच्या कल्याणासाठी वेचले होते.

एका रम्य सायंकाळी तो गुरुजीसोबत बसला होता. “ गुरूजी. तुमच्याबद्दल खूप जणांकडून ऐकले, वाचले. इतके उच्च शिक्षण घेऊन तुम्ही या छोट्याशा खेड्यात मतीमंद, दिव्यांगासाठी आश्रमशाळा चालवावी असा विचार तुमच्या डोक्यात कसा आला.? त्याच्या प्रश्नांनी गुरूजींचा चेहरा गंभीर झाला. त्याच्या निष्प्राण पायांकडे पाहून ते म्हणाले, मित्रा तुला वाटतं तसं काहीही नाही… रग्गड पगाराची नोकरी सोडून मी निराधार अपंग मुलांसाठी आश्रमशाळा काढली…. का तुला जाणून घ्यायचे आहे…. अरे माझ्या आईची ही प्रेरणा आहे. तीचे दोन्ही पाय पोलिओमुळे लुळे झालेले होते. त्यातच तिने प्रतिकुल परिस्थितीतून आम्हाला मोठे केले, जन्मभर त्या माऊलीने दु:ख, अवहेलना सोसून आम्हाला उच्च शिक्षण दिले, मायेचा आसरा दिला. आणि कर्तव्य संपवून ती जेव्हा गेली त्या दिवशी ती मला म्हणाली, माझे सर्व आयुष्य हालअपेष्टांमध्ये गेले. तुम्ही शिकून अशाच लोकासाठी कार्य करा तेव्हाच मला मुक्ती मिळेल. असे तिने आम्हाला सांगितले आणि ती गेली. त्याच क्षणी मी ठरवले की माझे जीवन अशा लोकांसाठी खर्च करणार. म्हणूनच मी विदेशात जाऊन पैसा कमवला आणि आज ही आश्रमशाळा चालवत आहे.  ते क्षणभर भावूक झाले. पण काहीकरी मिळवळ्याचा सार्थ आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता…

राजा. तू आत्महत्येचा विचार सोडून येथे येण्याचा निर्णय घेतला हे योग्यच केलेस… गुरुजी  सांगत होते आणि तो अनिमिषपणे त्यांच्याकडे पाहत होता… बाळा ! तू पायाने अपूर्ण आहेस म्हणून जीवन संपवायला निघालास. स्वत:ला खरंच तू अपूर्ण समजतोस का……? शांत विचार कर आणि मग उत्तर दे.. खरंच तू अपूर्ण आहेस. “तू ज्या अपंगत्त्वाचा विचार करतोय ते अपंगत्त्व निदान लोकांना उघड्या डोळ्यांनी दिसतय तरी…. मात्र शरीराने धडधाकट असणारे कितीतरी लोक आतून, मनाने अपंग आहेत. माझ्या नजरेतून बघशिल तर भूतलावर येणार प्रत्येक व्यक्ती अपूर्णच दिसेल. काही वरुन जरी दिसत नसले तरी आतून अपंग आहेत. कुणी पैसासाठी अपंग तर कुणी वासनेने बरबटलेला.. कुणी सत्तेसाठी अंध तर कुणी  दारु, ड्रग यासाठी लाचार, अपंग झालेला..कुणी संपत्ती, खूर्चीसाठी ‘अपाहिज’ होऊन कुबड्या घेतो… बघ हे अपंत्त्व नव्हे काय? निदान तू तसा तरी नाहीस ना? गुरुजी गंभीर होऊन बोलत गेले तसा त्याचा चेहरा दुर्दम्य इच्छाशक्तीने उजळत गेला.

गुरूजी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले बाळा या जगात मनाने अपंगत्व वाहायचे की स्वत:च्या पायावर उभे राहून इतरांना मदत करायची ते तू ठरव..तूझे या जगात विशेष महत्त्व आहे म्हणूनच देवाने तुला जगात पाठवले…   तुझे अर्ध शरीर पंगू आहे असे म्हणण्यापेक्षा अर्ध शरीर देवाने मला कामासाठी दिले असे समज. त्याचा उपयोग स्वत:सोबत इतरांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी कर…. बघ तुला आत्महत्येपेक्षा जगण्यासाठी नवा अर्थ गवसेल. अपंग व्यक्तींचे मन कधीही भंगत नाही ते अभंगच असते. देंह जरी अपंग मन राहील अभंग… गुरुजींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आईच्या वचनाला पूर्ण करणारे ते आनंदाश्रू होते.

जगाकडे बघ…. गुरुजी अश्रू पुसत पुन्हा त्याला सांगू लागले. पाय लुळे झालेल्या स्त्रीकडून सुंदर नृत्य होते. नाचे मयुरी च्या सुधा चंद्रन सारखे. हात आणि पाय नसलेल्यांनी पोहण्याचा विश्वविक्रम केला आहे…. दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही कृत्रिम पायांनी अनेक जण एव्हरेस्ट शिखर सर करतात.  दोन्ही हात नसलेल्यांनी तोंडात कुंचला पकडून सुरेख चित्र रेखाटली आहेत. कोण म्हणेल त्यांना अपंग ? तुझेही अर्ध शरीर परिपूर्ण आहे…तू अपंग नाही तर देवाचा मुलगा आहेस….तुझ्यामध्ये एक गोष्ट भलेही देण्यास देव विसरला असला तरी तूला काहीतरी अलौकिक नक्कीच त्याने दिले असेल ते तू ओेळख…..चल तू आणि मी…. आपण सारे नव्या जगाची निर्मिती करूयात… दिव्यांगाचा, मतीमंदांचा हात होऊयात… आधार होऊयात..चल….. तो पुन्हा सरपटू लागला पण नवी ऊर्जा घेऊन…..

गुरुजींचा हात त्याच्या लुळ्या झालेल्या देहावरून फिरला आणि त्याच्या देहात वीज चमकावी तसे नवचैतन्य सळसळले. तो गुरुजींच्या मागे सरपटत सरपटत आश्रमशाळेच्या पायवाटेवर चालू लागला. नव्हे तर आपल्या ध्येयाकडे सरकू लागला…….

आज गुरुंजींच्या आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा जग जिंकल्याचा आनंद होता. कारणही तसंच होतं..25 वर्ष गुरूजींसोबत अथकपणे अपंग, मतीमंदांची सेवा स्वत: दिव्यांग असतानाही केल्यामुळे त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णकमळ देऊन गौरव होणार होता. राष्ट्रपती भवनातील  संपूर्ण सभागृह शांत गंभीर होते. त्याच्या नावाची घोषणा झाली. तो चार चाकांच्या खूर्चीवर बसून होता.. गुरूजी त्याला वर नेणार होते. इतक्यात राष्ट्रपतीच खाली वळाले त्याच्या दिशेने आणि सूवर्णकमळ त्याच्या गळ्यात टाकून त्याची गळाभेट घेतली. त्याच्या गुरुजींना आनंदाश्रूंनी समोरचे काही दिसेनासे झाले. मात्र सोनरी पदक एकदम चमकले. कारण त्यांनी पारखलेल्या हिर्‍याचा तो सन्मान होता.. तोही गुरुजींकडे पाहून मुसमुसून रडू लागला. गुरूजी मागे जाऊन बसले. भावनाप्रधान होऊन… ते पदक घेऊन तो भरल्या डोळ्यांनी चाकाच्या खूर्चीवरून खाली उतरत सरपट सरपटत गुरुंजीकडे जाऊन त्यांच्या गळ्यातील सूवर्ण पदक गुरुजींच्या गळ्यात टाकले. हा प्रकार पाहून सपूर्ण सभागृहातील लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. राष्ट्रपतींनाही अश्रू रोकणे अवघड झाले…

थरथरत्या हाताने आणि भरलेल्या डोळ्यांनी गुरूजींनी त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. आणि कानात पुटपुटले…. बाळा…! आज तू जग जिंकलेस. मला तुझा सार्थ अभिमान आहे.  त्या वाक्याने त्याच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला.. तो आनंदाश्रूंनी न्हाऊ लागला. त्याने गुरुजींना घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

जगातील वंचितांचे, दु: खी, कष्टी लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी देव तूला शक्ती देवो असा आशीर्वाद गुरुजींनी त्याला दिला. संपूर्ण उपस्थित लोक हा सोहळा पाहत होते. तो गुरू -शिष्यांच्या नात्याचा परमोच्च महोत्सव होता. ….आता सर्व जण शांत, स्तब्ध झाले. वातावरणात एक ताण आणि गंभीर शांतता….. हळुहळू शांतता भंगली ती एका गाण्याने….. गाण्याचे सूर अधिकच वाढू लागले… स्वर होते…

इतनी शक्ती हमे दे ना दाता

मन का विश्वास कमजोर हो ना

हमे चले नेक रस्ते पे हमसे

भुल कर भी कभी भूल हो ना..

— नील कुलकर्णी

 

LEAVE A REPLY

*