दिवाळी विविध राज्यातली

0
दिवाळीचा सण हा भारताच्या कानाकोपर्‍यात साजरा केला जातो. दिवाळीचा सण साजरा करण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी स्वरूप मात्र एकच आहे ते म्हणजे चैतन्य, आनंद आणि उल्हास. दिवाळीत काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत दिवाळीचा एकच जल्लोष असतो.

घरे स्वच्छ करून रंगविली जातात. घरामध्ये मिष्टान्न बनविली जातात. नवीन वस्त्रालंकार परिधान केले जातात. अभ्यंगस्नान, दिव्यांची रोषणाई, दीपदान, लक्ष्मीपूजन असे सारे कार्यक्रम सगळीकडे केले जातात. दिवाळीत सगळ्यात उत्साह असतो तो भुईनळे, फुलबाज्या, फटाके, शोभेची दारू उडवायचा. हा सण सुख समृद्धीचा मानला जातो.

राजस्थान

राजस्थानी लोक प्रभू श्रीराम वनवासातून परत आले या घटनेशी दिवाळीचा संबंध जोडतात. या मंगलदिनी लंका दहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवितात. मांजरीला लक्ष्मी मानून तिला खाऊ-पिऊ घालतात.

पंजाब

पंजाबमधील लोक श्रीरामाच्या राज्यभिषेकाच्या स्मृती प्रित्यर्थ दीपोत्सव करून दिवाळी साजरी करतात तर शिख बांधव अमृतसर सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात.

गुजरात

गुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळीस प्रारंभ होतो. त्या दिवसाला वाघवारान असे म्हणतात. सिंधी लोक रात्री गावाबाहेर जाऊन मशाली लावून नृत्य करतात. त्यानंतर तलावाच्या काठची माती आणून एक चबुतरा करतात. त्यावर काटेरी झाडाची फांदी रोवून तिची पूजा करतात

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्ना

न करतात. आंध्र प्रदेशात लोक घरासमोर मचाण बांधून रात्रभर पणत्या लावतात व त्याच्यावर बसून स्त्रिया रात्रभर लक्ष्मीच्या आगमनाची गाणी गातात. बलिप्रतिपदा बळीराजाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. बळीराजा देवांचा शत्रू असला तरी तो प्रजाहितदक्ष व दानशूर होता. त्याचे राज्य हे सुराज्य होते.

राज्यातील नागरिकांविषयी तो अत्यंत जागृत होता. त्यामुळे त्याचे सुराज्य पुन्हा स्थापित व्हावे अशी आशा लोकांना वाटते. म्हणून आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे लावण्याची प्रथा आहे.

कर्नाटक

कर्नाटकातदेखील महाराष्ट्राप्रमाणे सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची प्रथा आहे. हे स्नान गंगास्नानाइतके पुण्यकारक असते अशी लोकांची धारणा आहे.

केरळ

केरळमध्ये ‘ओणम’ हा उत्सव बळीच्या स्मृतीप्रित्यर्थ आश्विन महिन्यात साजरा होतो.

बंगाल

बंगालमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण बंगालमध्ये काली पूजेला जास्त महत्त्व असल्याने लक्ष्मीपूजनापेक्षा कालीपूजा महत्त्वाची मानतात. आश्विनी अमोवस्येच्या रात्री कालीमातेची स्तुतीपर गीते, स्तोत्रे गाऊन जागरण करतात. माता कालीमध्येच लक्ष्मी, सरस्वती आणि शक्ती असते त्यामुळे तिन्हीचे रूप म्हणजे माता काली अशी त्याची धारणा आहे, तर त्या रात्रीला ते महानिशा म्हणतात.

उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागातील लोकांची पूजा ही शहरी लोकांपेक्षा थोडी वेगळी असते. ते दिवाळीच्या दिवशी गाईची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशाली पेटवून त्या प्रकाशात नृत्य करतात. जैन समाजाच्या शेवटच्या तीर्थंकारांचे अश्विनी अमावस्येला महानिर्वाण झाले. त्यावेळेस उपस्थितांनी महावीरांची पूजा केली. तेव्हापासून महावीरांचे भक्त प्रतिवर्षी जिनेश्वराची पूजा करून दिवे लावून उत्सव साजरा करू लागले.

ती तिथी महत्त्वाची मानून जैनांनी वीर निर्वाण संवत हा एक नवीन शक सुरू केला. आजही जैन लोक दीपावलीचा उत्सव आस्थेने साजरा करतात.

दिवाळी म्हणजे भारतीय मनाचा, भारतीय एकात्मतेचा सांस्कृतिक व सामाजिक अविष्कार आहे. दिवाळीच्या दिवसात मातीचे किल्ले बनवून त्यांच्या भोवती ऐतिहासिक प्रसंगाचे देखावे उभे करतात, तर चित्रकारांची विविध कलापूर्ण रांगोळींची प्रदर्शने भरवली जातात.

दिवाळीविषयी किंवा दीपोत्सवास सुरूवात कधी झाली याविषयी काही ऐतिहासिक कथा आहेत. त्यात सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रित्यर्थ दीपोत्सव साजरा करण्यात आला असे सांगितले जाते तर सम्राट विक्रमादित्याच्या राज्यभिषेकाच्या सोहळ्यात दीपोत्सव साजरा झाला म्हणून दीपावली उत्साहात सुरू झाली असे म्हणतात. कथा कोणत्याही असोत, पण आपणा सर्वसामान्यांना दिवाळी म्हणजे आशेेची पहाट, हर्षोल्हास!

LEAVE A REPLY

*