दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची अशी आहे आख्यायिका…

0
वाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. तेजाची, वैभवाची उपासना. देवदानवांनी केलेल्या सागरमंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यापैकी एक लक्ष्मी. विद्युल्लतेप्रमाणे जिची कांती, जी संपत्तीची साक्षात मूर्ती, जिची त्रिखंडात अखंड कीर्ती अशी ती लावण्यमयी लक्ष्मी, देव आणि दानवांच्या दृष्टीस पडताच सर्वजण मोहित झाले. तिच्या कोमल हातात कमलपुष्प होते.

तिच्या कर्णकुंडलांची कांती तिच्या सुंदर मुखावर झळकत होती. तिचा वर्ण सुवर्णासारखा होता. अशी ती फक्त आपल्यालाच प्राप्त व्हावी अशी देव आणि दानवांची इच्छा झाली.

दैत्यराज बळीने लक्ष्मीला अडविले पण अत्यंत चपळाईने तिने स्वत:ची सुटका करून घेतली आणि महाविष्णूला वरले. विष्णूने लक्ष्मीचा स्वीकार केला. बळीला उच्चश्रवा नावाचा विजयी सप्तमुखी धवल अश्व प्राप्त झाला. देवांनी सर्व दैत्यांना सुरा पाजून धुंद केले आणि लक्ष्मीसह विष्णू स्वर्गात निघून गेले. पुढे दिवाळीचा सण आला.

सागराने जावयाला आमंत्रित केले. लक्ष्मीच्या माहेरी विष्णू आले. त्यांना तेथील निवास फारच आवडला आणि त्यांनी तेथेच तळ ठोकला. ही वार्ता बळीराजाच्या कानावर जाताच त्याने मोठा यज्ञ केला आणि ब्रह्मदेवाच्या वराने तो अजिंक्य झाला.

पुन्हा त्याने देवांशी घनघोर युद्ध आरंभिले आणि अल्पावधीत सार्‍या देवांना कैदेत टाकले. इतकेच नव्हे तर बळीने लक्ष्मीचेही हरण केले. तेव्हा भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून बळीला थेट पाताळात घातले आणि त्याच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका केली. लोकांनी दीपोत्सव साजरा केला. थाटामाटात लक्ष्मीपूजन साजरे केले. बळीसाठी पाडवा संपन्न झाला.

एकदा क्षीरसागरात भगवान विष्णू शेषावर पहुडले होते. शेषाच्या फण्यातील रत्नांची प्रभा विष्णूंच्या वक्षस्थळावरील कौस्तुभ मण्यावर पडली. त्याच्या तेजात लक्ष्मीच्या मुखचंद्राचे शांतशीतल चांदणे मिसळून गेले होते. भोवती नारद आणि तुंबरू विष्णू सहस्त्रनाम गात होते. श्रीलक्ष्मी भगवंताची चरणसेवा करता करता त्यांना मधून मधून कमलपत्राच्या पंख्याने वारा धालीत होती.

अशा निवांत वातावरणात भगवान विष्णूंना शांत झोप लागत असे. झोपेत ते मध्येच उठत आणि म्हणत ‘लक्ष्मी, मला येथून गेले पाहिजे. मग लक्ष्मी त्यांना शांत करून म्हणायची का बरं? तेव्हा भगवान म्हणत, ‘जगात धर्माला ग्लानी आली आहे, अधर्माचा कहर झाला आहे.

सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मला अवतार घेतला पाहिजे. मग लक्ष्मी म्हणे मीही अवतार घेईन. आपल्या कार्यात मीही सहाय्य करेन. अशा पद्धतीने भगवान विष्णूंबरोबर लक्ष्मीनेही अनेक अवतार घेतले. एकदा महर्षी नारदांनी भगवान नारायणांना प्रश्न केला की, भगवान लक्ष्मीची उपासना व पूजा कोणी केली? या देवीचे स्वरूप कसे आहे? तिची पूजा कशी करावी? हे सर्व आपण मला सविस्तर सांगावे.

यावर भगवान नारायण म्हणाले, ‘हे ब्रह्मन्, ही प्राचीन काळची कथा आहे. सृष्टीच्या आदिकाळात परब्रह्म परमात्मा भगवान कृष्णाच्या वामभागापासून रास मंडळात श्री राधा प्रकट झाली. परमसुंदरी राधेच्या चारही बाजूंनी वटवृक्ष शोभा देत होते. तिचे दर्शन सुख देणारे होते. श्रीकृष्णाच्या इच्छेने ही देवी पुढे दोन स्वरुपात प्रकट झाली.

वर्ण, तेज, वय, कांती, यश, वस्त्र, आभूषण, गुण, कृत्य, हास्य, अवलोकन, प्रेम व अनुनय या सर्वगुणात दोघीही समान होत्या. डाव्या अंगापासून लक्ष्मीची निर्मिती झाली. उजव्या अंगास राधा होतीच. तिने द्विभुज भगवान् श्रीकृष्णांचा पती म्हणून स्वीकार केला. राधेच्या अनुज्ञेने लक्ष्मीनेही भगवंतांना पती मानण्याचा निश्चय केेला आणि म्हणून ही दोन रूपे प्रकट झाली.

आपल्या उजव्या बाजूने द्विभुज श्रीकृष्ण बनले व डाव्या बाजूने चतुर्भुज विष्णू झाले. भगवान् विष्णूंना लक्ष्मी समर्पित झाली. हीच पुढे महालक्ष्मी या नावाने प्रसिद्धीस आली आणि चतुर्भुज विष्णूंसह वैकुंठात राहू लागली. कालांतराने भगवती लक्ष्मी योगसिद्धीच्या सहाय्याने विविध रूपात प्रकट झाली. परमशुद्ध, सत्वस्वरुपा, सौभाग्यसंपन्न अशी ही देवी वैकुंठात महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध झाली.

इंद्राच्या संपत्तीचे रूप धारण करणारी ही स्वर्गलक्ष्मी झाली. पाताळलोकात ही नागलक्ष्मी नावाने प्रसिद्ध झाली. राजगृहातही राजलक्ष्मी झाली. गृहस्थांच्या घरात तिला गृहलक्ष्मी म्हणू लागले. गायीमध्ये ती सुरभी झाली. यज्ञात ती दक्षिणा झाली. क्षीरसागराची ती कन्या झाली आणि वैकुंठाची शोभा बनली. इतकेच नव्हे तर भूषण, रत्न, फळ, जल, राजा, राणी, दिव्य नारी, गृह, धान्य, पवित्र स्थान, देवप्रतिमा, मंगलकलश, माणके, मोत्यांच्या माळा, बहुमूल्य हिरे, चंदन वृक्ष व त्याच्या सुरम्य शाखा, इ. मध्ये याच लक्ष्मीचा निवास असतो.

सर्वप्रथम वैकुंठधामात भगवान नारायणांनी या महालक्ष्मीची पूजा केली नंतर ब्रह्मदेवांनी भक्तिभावाने तिची पूजा केली. पुढे शिवाने हिची उपासना केली. स्वायंभुव, मनु, राघवेंद्र, ऋषिधर, मुनीधर, सभ्य गृहस्थ इत्यादिकांनी महालक्ष्मीची पूजा केली. गंधर्व आणि नागांनी तिचे पाताळात पूजन केले.

कालांतराने हिची तीनही लोकात पूजा होऊ लागली. इंद्र हिची उपासना करू लागले. राजा केदार, नील, बल, सुबल, ध्रुव, उत्तानपाद, शुक्र, बळी, कश्यप, दक्ष, कर्दम, विवस्वान, प्रियवत, चंड्या, कुबेर, वायु, यम, अग्नी व वरुण यांनी तिची आराधना केली. अशा रीतीने देवीची सर्वत्र पूजा होऊ लागली. इतकेच नव्हे तर सर्व ऐश्वर्याची ती अधिष्ठात्री देवी बनली आणि संपत्तीची ती प्रत्यक्ष मूर्ती झाली.

महालक्ष्मी नारायणाची प्रिया होऊन वैकुंठात राहू लागली. ती तेथील अधिष्ठात्री देवी झाली. पण पूर्वी हिनेच कन्या बनून पृथ्वीवर अवतार धारण केला होता. ही सागरकन्या कशी झाली हे मला सांगा. यावर भगवान म्हणाले, ‘एकदा दुर्वासाच्या रूपाने देवी भगवती इंद्राकडे गेली आणि सर्व लोक मर्त्य लोकात भटकू लागले. तेव्हा रागाने देवीने स्वर्गाचा त्याग केला आणि ती वैकुंठात वास्तव्य करू लागली. इतकेच नव्हे तर तिने महालक्ष्मीत आपले रूप विसर्जित केले. सर्व देव-देवता दु:खी होऊन ब्रह्मदेवाला शरण गेल्या.

मग नारायणाकडे गेल्या. त्यांनी आपले गार्‍हाणे सांगितले. तेव्हा श्री हरीची आज्ञा मान्य करून सर्वसंपन्न लक्ष्मी आपल्या कलेसह समुद्राची कन्या झाली. देव दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून लक्ष्मीचा जन्म झाला. त्यावेळी लक्ष्मीने सर्व देवांना वर दिला की मी भगवान् विष्णूंना वरमाला अर्पण करून त्यांच्याबरोबर वैकुंठात निघून जाईल. हिच्याच कृपेने असुरांच्या हाती गेलेले राज्य देवांना परत मिळाले.

केवळ देवाच्या भक्तीत गुंतून जे लोक संसाराकडे व व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात ते लक्ष्मीला आवडत नाहीत. तर जे लोक आपल्या गृहलक्ष्मीला सुखी ठेवून सचोटीने संसार करतात त्यांना लक्ष्मी खचितच प्रसन्न होते. गृहलक्ष्मीच्या रूपातही लक्ष्मीचा अवतार असतो. केवळ धनसंपत्तीच नव्हे तर जिथे, स्वच्छता, प्रेम, शांतता, सचोटी, स्वच्छ व्यवहार आणि विचार असतो तेथेच लक्ष्मीचा संचार असतो आणि अशाच घरी लक्ष्मी स्थिर असते.

धनसंपदा प्राप्त करून देणारी ती लक्ष्मी, विद्या प्रदान करणारी सरस्वती, स्त्रियांना पातिव्रत्य प्राप्त करून देणारी पार्वती. सर्वत्र सौभाग्य व मंगलाचे साम्राज्य निर्माण करणारी मंगळागौरी, अन्न समृद्धी करणारी गणेशा बरोबरची गौरी, प्रापंचिक संकटे दूर करणारी दुर्गा, संहारशक्तीचे रूप म्हणजे कालिमाता अशा विविध रूपाने नटलेल्या देवीची पूजा प्रत्येक कुटुंबात भक्तिभावाने केली जाते.

दिवाळीतील लक्ष्मीपूजन

दिवाळीतील लक्ष्मीपूजन विशेष महत्त्वाचे आहे. वास्तविक लक्ष्मीपूजन कोणत्याही महिन्याच्या शुक्ल अष्टमीला करावे असे शास्त्र सांगते. परंतु त्यातल्या त्यात चैत्र शुद्ध अष्टमी, भाद्रपद शुद्ध अष्टमी हे दिवस लक्ष्मीपूजनासाठी महत्त्वाचे मानले जातात.

परंतु अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी दीपावलीत प्रदोषसमयी जे लक्ष्मीपूजन आपण करतो ते वार्षिक स्वरुपाचे असते. त्या दिवशीच्या पूजनाचा मुहूर्त पंचागात दिलेला असतो. लक्ष्मीपूजन अमृतघडीला करतात किंवा संध्याकाळी प्रदोषसमयी सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटे व सूर्यास्तानंतर 24 मिनिटे या वेळेत करतात. ज्या योगे रत्नाकराची कन्या लक्ष्मी तुम्हा सर्वांच्या घरी खचितच स्थिर राहील.

लक्ष्मीचा फोटो असा असावा
लक्ष्मी कमलात आसनस्थ (बसलेली) असावी. लक्ष्मीचे चरण (पाय) पाकळ्याआड पूर्ण दडलेले असावे. दोन बाजूस दोन हत्ती सुवर्ण कलश सोंडेत धरून लक्ष्मीवर अमृतवर्षाव करीत असलेले असावेत. लक्ष्मीच्या दोन्ही हातातून ुवर्ण मोहरा पडत आहेत. लक्ष्मीची मुद्रा प्रसन्न व हास्य विलसणारी असावी. असा फोटो असावा.

यात जरी मुख्यत: धनसंपत्तीची अर्थात लक्ष्मी व कुबेर यांची पूजा अभिप्रेत असली तरी मनुष्याला इष्ट त्या सर्व सुखाचा लाभ व्हावा म्हणजेच भुकेलेल्यास अन्न, तृषार्तास पाणी, अनाथास आधार, गृहहीनास निवास, अर्थार्जन नसेल त्याला अर्थार्जनाची संधी, विद्यार्थ्यास विद्या, धनार्थी व संतानार्थी भक्तास संतती, सारांश जे भक्त जे मागेल ते सर्व मिळावे. मन:शांती, घरात शांती, व्यवसायात उन्नती, अभ्यासात प्रगती, निराधारास सत्संगती, आरोग्य, दीर्घायुष्य, यश, कीर्ती यापैकी सर्वांचा लाभ व्हावा यासाठी लक्ष्मीपूजन करावे, असा संकेत आहे.

दुकान, कार्यशाळा, व्यवसायाची जागा, घरी लक्ष्मीपूजन करावे. पूजेची तयारी दुपारपासूनच करावी. पूजास्थान, घर, दुकान स्वच्छ असावे. घराची खिडक्या-दारे उघडी ठेवावीत. घरातील सर्व दिवे लावावेत. घरात कुठेही केरकचरा असू नये. फुलांच्या माळा, तोरणे, रांगोळ्या, पणत्या इत्यादींनी घर सुशोभित करावे.

इष्टमित्र, सहव्यवसायी, नातेवाईक यांना आमंत्रित करावे. लक्ष्मी म्हणून नाणी-सोन्या चांदीचे दागिने, भांडी, रोख रक्कम, आपली औद्योगिक-व्यावसायिक साधने, दौत, शाई, लेखणी, पेन, पंचाग, धर्मग्रंथ, तराजू, वजनमापे इ. पूजेसाठी ठेवावीत. दरवर्षी रोख रकमेत व नाण्यात भर घालावी. सरस्वती पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्या रोजमेळ इ. घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणावयाच्या म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पानावर कुंकुममिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे.

LEAVE A REPLY

*