लक्ष दीप उजळले…

0
आहेस ना ग घरात?’
‘हो, आता या सणावाराच्या दिवसात कुठे जाणार मी!’
‘म्हटलं, बाजारात खरेदीसाठी गेली स की काय?’
‘छे ग, अग चकलीची भाजणी करायचीय, डब्बे घासायचे आहेत, अनारशांचे तांदूळ भिजत टाकायचे आहेत. का ग बाई तुझी दिवाळी इथे नाही वाटत यंदा?

हा संवाद होता माझा आणि शमाचा! जुन्या कपड्यांच्या ढिगात मी बसले होते आणि तुझ्याकडे मी तासभर गप्पा मरायला येते असे म्हणून चक्क दिवाळी तोंडावर आली असतानाही माझी ही मैत्रीण हजर झाली. या स्वारीचा शब्दांचा धबधबा आपल्यावर कोसळल्याशिवाय आपली सुटका नाही हे मला ठाऊक होते;

पण तिच्याशी बोलल्यानंतर नेहमीच काही नवीन संकल्प, नवीन कल्पना शिकायला मिळतात याची मला खात्री होती, म्हणून मी तिला बोलते केले.

तशी ती मला म्हणाली, नाही! या दिवाळीत कुठेही बाहेर जायचे नाही असा आम्ही निर्णय घेतलाय.’ मग दिवाळीत मस्त फराळाचे पदार्थ करणार वाटत तू? मी विचारताच ती म्हणाली, दरवर्षी दिवाळीत तेच तेच पदार्थ करायचे, आपण खायचे, इतरांना बोलावयाचे या सार्‍या शिष्टाचाराचा मला कंटाळा आलाय बघ!

माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघताच शमा म्हणाली, ‘अग, स्वच्छता दिवाळीतच केली पाहिजे असे थोडेच आहे!’ मी तिला म्हटले, ‘अग, दिवाळीच्या निमित्ताने घराचा कानाकोपरा स्वच्छ होतो.’ तसे स्वच्छताप्रमुख म्हणाली. ‘फक्त दिवाळीतच स्वच्छता करायची असे थोडेच आहे! ती तर वर्षभर चालूच असते. अग पूर्वी घरं किती मोठ्ठी असायची, सामान किती असायचे आणि माणसेदेखील किती असायचे. त्यामुळे हे सर्व त्यावेळेस ठीक होते; पण आता परिस्थिती अगदी याच्या उलट झाली आहे. जर घर नेहमीच आवरले जात असेल तर मग खास दिवाळीचे आवरणे म्हणून वेळ घालवा कशाला!’
ते ही बरोबरच आहे म्हणा!

अग पण नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, नवीन वस्तूंची खरेदी, पिकनिकचे प्लॅन सारे काही दिवाळीतच जमते ना! मी तिला सहमती दाखवित; पण आपलीच री पुढे ओढीत म्हणाले. तशी ती पटकन म्हणाली, ‘का तू तुला आणि घरच्यांना दिवाळीव्यतिरिक्त कपडे घेतच नाहीस?आणि फराळाचे म्हणशील तर बाराही महिने लाडू-चिवड्यांनी तुझा डबा भरलेलाच असतो. तुझेच काय पण हल्ली सगळ्यांकडे हीच परिस्थिती आहे.

घरचे पदार्थ नसतील तर बाजारातून हवे तेवढे पदार्थ विकत आणता येतात. हा हे मात्र खरे आहे की दिवाळीत नवीन वस्तूंची आणि पिकनिकची मजा काही औरच असते; पण सगळ्या गोष्टी दिवाळीत करायलाच हव्या असे थोडेच आहे? शमाने या दिवाळीत काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतला होता, असे तिच्या बोलण्यावरून वाटायला लागले. तिला उत्कंठेने विचारले तशी ती म्हणाली, ‘अग आम्ही काही महिलांनी मिळून एक संस्था स्थापन केली आहे. दिवाळीच्या एवढ्या खर्चातून ओळखीच्या लोकांना आम्ही फक्त 50 रु. द्या असे म्हणतो.

कारण त्या पन्नास रुपयांमध्ये एका घराला दिवाळीचे फराळाचे मिळते.’ मी तिला सविस्तर विचारले तसे तिने सांगितले की, दोन वर्षे आम्ही प्रत्येक घरातून फराळाचे जिन्नस नेऊन ते आदिवासी पाड्यावरच्या लोकांना वाटले; पण समाधान होत नव्हते. कारण प्रत्येकीचे फराळाचे वेगवेगळे. मग ठरवले की लोकांकडून फक्त 50 रुपये घ्यायचे. समाजात माणुसकी असलेले लोकच जास्त भेटले मला. आम्ही त्या जमलेल्या निधीतूनच एकाकडून फराळाचे पदार्थ तयार करतो आणि एक दोन नाही तर तब्बल एक हजार पाकिटे वाटतो.

मी ऐकतच राहिले. भावनावश होऊन शमा बोलू लागली, ‘वर्षानुवर्षे आपण आपल्या घरासाठी, आप्तांसाठी गोडधोड बनवतोच; पण जो आपला कुणीही लागत नाही अशा माणसाला आपल्याकडून जेव्हा सणाला असे काही मिळते ना तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे, समाधानाचे लक्ष दीप उजळतात. मग सांग मला ही दिवाळी जास्त आनंदाची, श्रेष्ठ नाही का!’

शमा जाताना माझ्याकडून पन्नास रुपये घेऊन गेली आणि मला लाखामेलाचे समाधान देऊन गेली. तिच्यासारखीच माझी आणखी एक सखी कोणताही गाजावाजा न करता एका अंध मुलीला रोज शिकवित असते, वाचून दाखवित असते. लक्ष दीप उजळले..

घरात एकीकडे रंगाचा पसारा आणि दुसरीकडे ती तिला शिकवित होती. ‘अग, दिवाळी तोंडावर आली आहे. तिला सुट्टी दे मग!’ तिची धावपळ पाहून मी तिला म्हटले तशी ती पटकन म्हणाली, ‘छे ग! अग दिवाळी दरवर्षीच आहे; पण तिची मात्र आता परीक्षा आहे. तिला मिळालेले छान मार्क्स हीच माझ्यासाठी दिवाळीची भेट असणार आहे. स्वत:ला काहीही कमी नसताना समाजाचे ऋण फेडण्याची आणि एका व्यक्तीला साक्षर आणि सक्षम बनवायची तिची इच्छा म्हणजे जणू अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचीच होती.

दिवाळी सणाकडे वेगळ्याच नजरेने बघणार्‍या अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. त्यातील एक भेटलेली व्यक्ती होती. गेले दोन-तीन वर्षे दुभंगलेली नाती जोडायचा प्रयत्न करणारी होती. माहेर-सासरच्या गैरसमजातून जी नाती तुटली ती अत्यंंत वाईट तर्‍हेने. जवळच्या नातेवाईकांनी घरी येणे बंद केले.

सासू-सासरे, नवरा हे सर्व तुझ्यामुळे झाले म्हणून तिला दोषी धरतात. माहेरचे पाश तोडलेले अशी ती मात्र माझ्या दीर-नणंदांना माझ्या घरी आणेनच या ठाम विश्वासाने दर सणाला त्यांच्याकडे जाते. मनातील अढी न विसरलेले ते लोक आजच्या नाही पण पुढच्या दिवाळीला नक्की एकत्र येतील, असे तिला वाटतेय. दिवाळी नाती उजळून टाकणारी, जोडणारी या विश्वासाने ती जगतेय.

काल-परवा मैत्रिणीचा फोन आला. घरातील नवीन भांडी बाजूला काढतेय म्हणून तिने सांगितले. कारण विचारले तसे म्हणाली, ‘कामवाल्या बाईच्या मुलीचे लग्न ठरलेय. दिवाळीनंतर लग्न आहे. माझ्याकडे आलेली खूप नवीन भांडी माळ्यावर आहेत. आमच्याकडे इन-मीन तीन माणसे. भांडी लागणार ती अशी किती! संपूर्ण आंदनाची भांडी मी तिला देणार आहे. पाण्याचे टिप आणि कळशी तेवढी विकत आणीन! अग एका घरातील तो खर्च तेवढाच वाचेल.
मी बहिणीकडे मध्यंतरी गेले होते.

35-40 कोर्‍या साड्या बांधून बेडरूममध्ये ठेवल्या होत्या. कारण विचारले तशी म्हणाली, एवढ्या साड्या कोर्‍या आहेत. काहींचा पोत, काहींचा रंग काहींची जर आवडली नाही. लग्नात आलेल्या आणि बर्‍यापैकी किमती असलेल्या आहेत. दिवाळीत बाईला एक साडी देणारच आहे; पण तिच्या मुलीच्या लग्नात या साड्या लोकांना द्यायला देणार आहे मी.’ ताई हे सांगत असतानाच पोळ्याच्या मावशी आल्या.

तोंड भरून आशीर्वाद देत कौतुकाच्या सुरात म्हणाल्या, ‘तुमच्यासारख्या लोकांमुळे तर खर्‍या अर्थाने आम्हाला दिवाळीचा आनंद मिळतो. दिवाळीच्या दिव्यांच्या लखलखाटापेक्षा माणुसकीचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या डोळ्यांच्या ज्योती समाधानाने जेव्हा ते बघायला लागतात तेव्हा लक्षलक्ष दीप लावल्याचे समाधान, तृप्ती मिळते जी वर्षानुवर्षे दिवाळी साजरी करूनही तुम्हा-आम्हाला मिळत नाही.

LEAVE A REPLY

*