थोडसं फिल्मी बिल्मी…दिवाळीला असं झालं तर?

0
फोटोसेशनपासून स्टेज शोपर्यंत व्हाया उपग्रही वाहिन्यांवरील गेम शो अथवा कसलाही फुटकळ नाचकामाचा कार्यक्रम अशा ‘सिनेमास्कोप’ कर्तबगारीत लहान-मोठा, डावा-उजवा, उंच-बारीक, ताजा-थकलेला असा जवळपास सगळाच ‘कला कार संघ’ सध्या सॉलिडच बिझी असल्याने कोणाहीकडे दिवाळी खरेदीसाठी वेळ असा नाहीच.

कारण एकाने दिवाळीसाठी म्हणून मॉरीशसच्या मॉलमध्ये जाऊन चप्पल खरेदी करायची ठरवले तर नेमक्या त्या दिवसाची त्याची दुसर्‍या कलाकाराबरोबरची तारीख वाया जाण्याची शक्यता आहे. एखादीला नवीन गाडीतून फराळाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी संध्याकाळी पुण्याला जावेसे वाटतेय तोच तिला आडगावच्या एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मुलाच्या बारशाची ‘सुपारी’ येते.

(‘सुपारी घेणे’ म्हणजे परिचित-अपरिचित अशा कोणाच्याही लग्नापासून दुकानाच्या उद्घाटनापर्यंत कशा-कशाचीही हजेरी लावून बक्कळ कमाई करणे, असा ‘साईड बिझनेस’ गैर कसा म्हणता येईल.) मतलब, अख्खी इंडस्ट्री कशाकशात सॉलिड बिझी असल्याचे पाहून अखेर ‘चोवीस तास’ फक्त आणि फक्त दिवाळी खरेदीसाठी राखून ठेवण्याचा फतवा निघाला तेव्हा कुठे एक दिवस जेमतेम मोकळा निघाला.

आलोकनाथने लगोलग रिकाम्या दिवसात घरच्या घरीच तयार केलेले कंदील विकायला काढले (सगळेच आपापल्या कामात विलक्षण बिझी असल्याने आपल्यातील रिकामे कोण आहे, हे मात्र कोणालाच माहित नाही.); पण त्याच्या कंदीलावरही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गरिबीचे प्रतिबिंब उमटत असल्याने त्याच्याकडे अगदी मराठी मालिकेतील कलाकारदेखील खरेदीसाठी गेले नाहीत.

मराठी वाहिन्या वाढल्याने मराठी कलाकारांचेही मानधन वाढले आणि कमाई वाढल्याने त्यांनीदेखील रानडे रोडवरील खरेदीपेक्षा मॉलमधील खरेदीला प्राधान्य दिले. त्यातील बर्‍याचशा ‘चेहर्‍यांना’ तेथे जवळपास कोणीच ओळखले नसल्याने त्यांच्या खरेदीला फारसा वेळ लागला नाही. ऐश्वर्या नारकरने दिवाळी खरेदी म्हणून भरपूर झाडे विकत घेतली. घरच्या गच्चीत छोटीशी बाग करण्याची तिची इच्छा आहे. मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर यांनी चक्क पुस्तकं खरेदीला महत्त्व दिले.

मृणालला मात्र चाहत्यांच्या गराड्यातून मोकळे होण्यासाठी ‘सोनपरी’सारखं कुठूनही कुठेही जायला मिळाले असते तर खरंच बरे झाले असते असे वाटले. अलका आठल्येने ग्लिसरीन खरेदीला प्राधान्य दिले. जवळपास पंचवीस वर्षे प्रत्येक चित्रपटातून हुकमी रडकाम केल्याने तिच्याकडील अश्रूंचा प्रचंड साठा संपला..बिचारी, निर्मात्यांना जिवंत ठेवण्यासाठी तिला अश्रू खरेदी करावे लागताहेत. आश्विनी भावेला इंटरनेटद्वारे रोजच्या रोज तिकडे सॅनफ्रान्सिस्कोत मराठी चित्रपटाचे हालहवाल समजत असतात.

आजच्या दिवाळी खरेदीच्या दिवशी तिने तिकडच्या मॉलमध्ये जाऊन मराठी चित्रपटांच्या डीव्हीडी खरेदी केल्या. प्रचंड खरेदीत अवाजवी सूट मिळाल्याने तिला क्षणभर वाटले ‘कदाचित’ महाराष्ट्र राज्य शासनाची अनुदान योजना येथे लागू असावी. तेवढ्यात तिचा गोड गैरसमज दूर होताना तिच्या लक्षात आले की, ती त्याची पहिली ‘गिर्‍हाईक’ आहे. अमेरिकेत मराठी चित्रपट येतो; पण कुठेच पोहोचत नाही याचे उपयुक्त ज्ञान तिला मिळाले. ऐवीतेवी तिला वाटेल तेवढे ‘ज्ञानकण’ हवेच असतात.

वर्षा उसगावकरने गोव्यात पणजी समुद्र किनार्‍यालगत आणखी एका बंगल्याच्या खरेदीने आजचा दिवस साजरा केला. अगोदरच्या बंगल्याचा उपयोग राहण्या-खाण्या-पिण्यासाठी तर या नव्या बंगल्याचा उपयोग फक्त नटण्या-थटण्यासाठी, असा निश्चय करीत तिने या बंगल्याला ‘वॉर्डरोब’ असे नाव दिले, परंतु प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी या वॉर्डरोबमधील किती वस्त्रे वापरू शकू या शंकेने तिला बेचैन केले. आयुष्य भरभरून जगण्याची उर्मी तिला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती. किशोरी शहाणेने मात्र ‘घरसफाई’ला प्राधान्य दिले.

सर्वप्रथम तिने ‘आपले वाढते वय जाणवून देणारी सगळी वस्त्रे बोहारणीला दिली. जीन्सची एक पॅण्ट किंचीत फिट होत होती, खरं तर पुढची दिवाळी सहज गाठता आली असती; पण एक दिवस तीन शिफ्टमध्ये काम करून आपण नवीन फॅशनची कार्गो विकत घेऊ असे तिने ठरवले. आदेश बांदेकर चक्क सुचित्राला घेऊन पैठणी खरेदीला येवल्याला गेला; पण प्रत्येक ठिकाणी त्याला वहिनींचा गराडा पडत राहिल्याने बिचारा बायकोसोबत असूनही सारखा दूरच राहिला. विक्रम गोखलेंनी औषधे खरेदीला दिलेले महत्त्व खूप आश्चर्यकारक ठरले.

कोणी तरी खवचटपणे म्हणाले, त्यांनी स्मरणशक्तीच्या गोळ्या घ्याव्यात. दोन शब्दांमधला त्यांचा पॉज त्यामुळे वाया जाणार नाही. मकरंद अनासपुरेने विनोदी चुटके-किस्से यांचा विश्वकोषच विकत घेतला आणि हास्यसम्राटसाठीची पूर्वतयारी वाढवली. अमृता खानविलकरने आजच चोवीस तासात ‘फाड फाड मराठी’ याची ट्यूशन सुरू केली. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘ट्यूशन’ला साजेसा मराठी शब्द ती सांगणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील एकही जण आज मुंबईत नव्हता. ‘जगातील कानाकोपर्‍यातील सगळ्या वस्तू इकडे मिळतात, त्याच खरेदी करायला कशाला जायचे’ असा त्यांचा रोखठोक बाणा दिसला. यालाच मूर्तिमंत व्यावसायिकता म्हणतात. अमिताभने सहकुटुंब कोलकाता येथे वस्त्रे खरेदीला पसंती दिली. आपण इलाहाबादचे गंगा छोरा किनारावाला असलो तरी कोलकात्यामधील दिवस कधीच विसरता येण्यासारखे नाहीत.

तेथे आपण कधी काळी नोकरी करीत होतो, असे म्हणत हा ‘बाबू मोशाय’ खूप भावूक होतो. त्याने कोलकात्यातील प्रख्यात मॉलमधून जयासाठी माऊथ अ‍ॅप्रन घेतला. तो लावल्यावर तिचे तोंड बंद राहील, अशी त्याची अपेक्षा होती. अभिषेकला बंगाली बाबू रूपात सजायला खूप आवडते. अमिताभच्या सुनेलाही बंगाली साडी खूप खूप आवडली. या साडीत आज आपण जगातील सर्वात सुंदर स्त्री असल्यासारखे वाटते, असे ती स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्याचे ‘जोय बांगला’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

तिच्या बोलण्यात स्वत:बद्दलचा सौंदर्याभिमान तर डोकावला नाही ना, यावर विचार करायला व त्याची ‘बे्रकिंग न्यूज’ करायला एकाही वाहिनीकडे आज वेळ नव्हता. प्रत्येक वाहिनीचा प्रत्येक प्रतिनिधी फिल्मी दिवाळी खरेदीच्या ‘शोध पत्रकारिते’त रमला होता. शिल्पा शेट्टीच्या केवळ खरेदीसाठी तिचा भावी नवरा राज कुंद्रा याने भाड्याने विमान आणले म्हणून प्रचंड खुशीने तिने सिंगापूरसाठी टेक ऑफ घ्यायला काहीच हरकत नव्हती; पण ‘त्यापेक्षा आपण दोन सीटस्, एक प्रशस्त मेकअप रूम व ढिगभर आरसे असलेले विमान खरेदी करूया’ असा ती हट्टच धरून बसली.

क्षणभर राज कुंद्राच्या मनात आले, सोडलेल्या बायकोने कधीच असा गळेकापू हट्ट धरला नव्हता. मनातल्या मनात आपल्या प्रॉपर्टीचे आकडे मोडत-जुळवत असेपर्यंत शिल्पा त्याला जमिनीवर ठेवून आकाशात उडालीदेखील. सुश्मिता सेनला इंटरनेटशी चाळा करताना चीनमध्ये ‘जगावेगळी सिगारेट’ मिळते असे समजल्याने ती तिकडे झेपावली; पण चीनच्या ग्रामीण भागात पोहोचणे तिला धाडसाचे वाटले.

अखेर तिने स्थानिक तालुक्याच्या ठिकाणावरून वर्षभर पुरतील इतक्या सिगारेट घेतल्या व हा ब्रॅण्ड मुंबईत कुठे उपलब्ध होतो असे विचारल्यावर तिला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. कारण धारावी नाल्यापलीकडे ‘कुठेतरी’ हे ते उत्तर होते. हे ‘कुठेतरी’ म्हणजे या कुठे या प्रश्नाने तिच्या मेंदूचा भुसा व्हायची वेळ आली, तरी परतीचा प्रवास संपेना. प्रियांका चोप्राने मात्र खासगी हेलिकॉप्टरचे भाड भरून जास्तीत जास्त तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा झपाटा वाढवला. आपल्या ‘सिनेमाच्या फ्लॉपची चलती देवा तू थांबव’ दिवाळीच्या दिवशी सोन्याच्या ताटात ओटी आणेन, असे तिने गार्‍हाणे मांडले.

महेश भट्टने दिवाळी खरेदी म्हणून जगातील कोणत्याही विषयावर आज तरी मत व्यक्त करायचे नाही, पूर्णपणे गप्पच बसायचे असा हट्ट बाळगला. सनी देवल, अक्षयकुमार, सैफ अली खान आपापल्या मार्गाने दुबईत व्यायामाची अत्याधुनिक साधने खरेदी करायला गेले.

खरं तर याची त्यांना अजिबात आवश्यकता नव्हती पण दिवाळीला कोणतीच खरेदी न करणार्‍या कलाकाराच्या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळणार नाही, या नियमाला ते टरकले. बिपाशा बासूने ‘मुक्तांगण’मधील पॉश घरातील पहिली दिवाळी धडाक्यात साजरी करण्यासाठी जयपूरच्या मार्केटमध्ये शोभेचे फाटक खरेदी करण्यात वेळ सार्थकी लावायचे ठरवले, पण ‘जिस्मी’ इमेजमुळे तिला बॉडीगार्डस् बरोबर घ्यावे लागले. यावेळी तिच्यासोबत जानू नसल्याने, त्या दोघांचे काही बिनसले आहे का, यावर एबीसी वाहिनीने दर्शकांकडून एसएमएसने मते मागविली आहेत. त्यात पर्याय आहेत. 1) होय, 2) नसावे 3)काय फरक पडतो?

आदिती गोवित्रीकरने दिवाळी खरेदी म्हणून लखनौमधून उर्दू भाषिक पुस्तके विकत घेतलीय. आपले मराठी बिघडणे शक्यच नाही, पण सासर मुस्लिम असल्याने उर्दू आलेले बरे, ‘तिकडच्या घरची मंडळी’ देखील खुश राहतील. करिनाने प्रियकरापेक्षा भाच्यासाठी काही तरी विशेष खरेदी करायचे ठरवले. पण दर्जेदार वस्त्रे म्हणावीत तर ती लंडनमधून येतात, खेळणी घ्यावी म्हणावीत तर इलेक्ट्रॉनिक खेळणीदेखील हॉलभर आहेत.

अखेर तिने फटाके घ्यायचे ठरवले. पण नेपाळवरून विमानाने फटाके नेण्यास बंदी असल्याने ती हिरमुसली. अखेर मुंबईला परतताच तिने गाडी भरून फुलबाज्या घेतल्या. तेवढ्यात तिला एसएमएस आला की, माझ्या मुलाला फटाकेच आवडत नाहीत… शाहरूखने आपला गोडबोला स्वभाव वाढत राहण्यासाठी हैदराबादचे अख्खे स्वीट मार्केटच खरेदी केले. विजय मल्ल्याच्या खासगी विमानाने ही मिठाई मुंबईत येईल.

शाहरूखने सवयीप्रमाणे पत्रकारांसाठी वेगळे बॉक्सेस बनवून घेतल्याने त्याला कव्हरेजची फारशी चिंता नव्हती. स्वत:ला कव्हरेजमध्ये ठेवण्यासाठी त्याने दिवाळीचीही संधी सोडली नाही. बिचारा, आपला स्वभाव बदलू इच्छित नव्हता. राजू श्रीवास्तवने गाय-बैल-म्हशींची खरेदी करून जणू उपकाराची परतफेड केली. ज्यांच्या विनोदावर आपण स्टार झालो, त्यांना विसरून कसे चालेल, असे स्वत:च म्हणाला व स्वत:च हसला.

एवढ्यासाठी तो कानपूर या आपल्या मूूळ गावी गेला. रेखा अजूनही आपल्याला बहोतही खुबसुरत दाखवू शकणार्‍या अशा आरशांच्या खरेदीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेली. तेथेदेखील आपले चाहते त्रास देतील या भीतीने तिने बुरखा पांघरला होता. कंबख्त दिवाळी खरेदीदेखील ‘उघड्या चेहर्‍या’ने करता येवू नये म्हणून ती कातावली. आमिर खान मात्र ‘अशी एका दिवसात ठरवून दिवाळी खरेदी करणे म्हणजे भंकसगिरी आहे’ असे ‘न म्हणता’ही यापासून दूर राहिला

LEAVE A REPLY

*