अहमदनगर : उत्साहाची आतषबाजी!, जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आकाशकंदील आणि पणत्यांचा मिणमिणत्या प्रकाशाने उजळलेले अंगण, आकाशामध्ये सुरू असणारी फटाक्यांची आतषबाजी, दारासमोर सडा-रांगोळी करण्यात मग्न असणार्‍या महिला व मंदिरांमध्ये दर्शनासाठी सुरू झालेली लगबग… अशा उत्साहात प्रकाशोत्सवाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवाळी सणातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. या देवतेचे पूजन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात झाले.

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनास अनन्यसाधारण महत्त्व असून घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी परंपरेप्रमाणे मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी यश, कीर्ती आणि धनलाभाची कामना करीत महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करण्याचा प्रघात आहे. काल गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी 5.15 ते रात्री 8.13 पर्यंत होता.

लक्ष्मीपुजनासाठी आवश्यक असणारे लक्ष्मी मातेची मूर्ती, केरसूणी, साळीच्या लाह्या, बत्तासे, विविध प्रकारची फळे, विड्यांची पाने, रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारचे छापे, यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीपूजन मंगलमय वातावरणात करण्यात आले.

व्यापार्‍यांनही दुकानांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला.लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तमाम व्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग पहायला मिळाली. याआधीच्या चोपड्यांचे व्यवहार पूर्ण करुन नवीन चोपड्या विकत घेवून त्यांचं विधीवत लक्ष्मीपूजन केले. काहींनी संगणकाची विधिवत पूजा केली.

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या दिवशी पूजेसाठी तसेच घरांना, दुकांनाना हार करण्यासाठी झेंडू, शेवंती, अस्टर, अशी फुले खरेदी करण्यात येतात. शहरातील वाडियापार्क, चितळे रोड, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, याभागांमध्ये फुलांचे विक्रेते बसले होते.झेंडू व शेवंतीच्या फुलांना अधिक मागणी असल्यामुळे या फुलांचे भाव किलोमागे 10 ते 20 रुपयांनी वाढले होते. किरकोळ बाजारामध्ये झेंडूची फुले 80 ते 100 रुपये किलो दराने विकली गेली. तर, शेवंतीची फुले 120 ते 150 रुपये किलो दराने विकण्यात येत होती. दरम्यान, पुढील दोन दिवस फुलांची मागणी अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

*