कथा : गावाकडची माणसं

0

कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसं घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केवढे असते? शे दोनशे ते पाचशे. उंबरा इतकी त्याची व्याप्ती गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. गाव म्हणजे मातीतल्या माणसाचा जथ्या जो दु:खाचे अवडंबर करत नाही आणि सुखाचे बाजार भरवत नाही देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते. अशाच गावाकडच्या या माणसांची ही शब्दकथा….

गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहर्‍याला कल्हई केलेली नसेत. माणसे जशी असतात तशीच राहतात आणि तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसं घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केवढे असते?

शे दोनशे ते पाचशे. उंबरा इतकी त्याची व्याप्ती गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारतांना प्रत्येकाला एकेमेकांचे वडील माहित असतात. तेथे औपचारीकता ही औषधाला सापडणार नाही. फॉर्मेलीटीचे आपल्याला भारी कौतुक, तर त्यांना त्याचे वावडे. हाका मारतांना देखील ते हात अन् आवाज राखून मारणार नाहीत. जोरात आवाज असणारच. रानात ओरडायची सवय असल्याने हळुवारपणा ते जपणार नाहीत.

पण मुक्या प्राण्यांची माया असो व घरातल्या म्हातार्‍या माणसाची हेकेखोर मागणी असो. तेथे ते हळुवार होतील. जेव्हा ते हाका मारतील, जवळ येतील, बसतील आदी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यात पिकपाणी आणि पाऊसवारा हा असणारच. सुख दु:खाची देवाण घेवाण करतील. नडलेल्या गोष्टी सांगतील. पण कधी कधी हे देखील बिथरतात. भावकी आणि गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील.

कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो. त्याचा वचपाही त्यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडामाणसांचीच माणसे, फक्त फरक इतकाच की, आपण देखील हाडामासांचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्याची मातीशी नाळ घट्ट असते.

आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या आई-वडीलांशी देखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खुप चांगल्या पध्दतीने व्यक्त करतील. ‘अरे त्यांनी माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू?’ देव आजकल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ? त्याने त्याचे कर्तव्य निभावले नाही म्हणून काय झाले? देवाने मला खुप दिलयं, मी समाधानी आहे.

त्याचे कर्म त्याच्यापाशी. त्याला पांडुरंग बघून घेईल.’ असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत. मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्या अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील. पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.

डोक्याला वेगवेगळ्या रंगाचे फेटे लावून इथे तिथे बसेली म्हातारी माणसे हे यांचे खरे हाकाटे असतात. गावातला सर्वात जेष्ठ म्हातारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरूध्द शक्यतो कोणी जात नाहीत. गावातली टाळकरी अन भजनी मंडळी ही सर्वांच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव आणि ब्राह्मण यांच्यावर त्यांची अपार श्रध्दा गुलाल, बुक्का हाच यांचा ब्रम्हदेव, विष्णू, शंकर, चिरमुरे, लाह्या, बत्ताशे हाच इथला महाप्रसाद.

आताच्या घडीला देखील घरी टी.व्ही., फ्रिज नसणारी अनेक घरे गावात सापडतील. पण गुलाल बुक्का नसणारे घर गावात सापडणार नाही. आषाढीला उपवास अन त्यातले खाता येणारे हे देखील अनुभवण्यासारखे. याचा अर्थ गावात सर्व माणसे अशीच असतात असे नाही. काही माणसे इब्लीस अन् बेरकी देखील असतात. प्रत्येक गावात अशी काही माणसे असतातच. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोट घेण्यापर्यंत कधी कधी इथला माणूस घसरतो, तेव्हा सारा गावा हळहळतो. आयुष्याच्या पारंब्या तुटतील असे कोणतेही नाते ताणू नये हे इथले मुळामुळातले तत्वज्ञान.

आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो. आजकाल तरणी पोर जीन्सच्या पॅन्टी घालून येथे हरकुण दिसतो. नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबूज करत लगबगीने चालत जाणार्‍या बायका पाहतांना. लाल, हिरवे, पिवळे, तांबडे, ठिपके थवा करून चालण्यासारखे वाटते.

पायात बुट उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडले की काळपट चपला घालून चालणारी माणसे सावलीचे ज्ञान यांना अधिक उत्तम ठावून, पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन् पानाफुलात आयुष्य घालवतात. इथल्या मळकटलेल्या रस्त्याच्या कडेने घराघरातून वाहणारे मोरीचे पाणी उघड्या गटाराला मिळते. तिथे माशा अन डास चिलटांचे स्वतंत्र विश्व असते. फिरत फिरत हे गटार गावातल्या ओढ्यापाशी जाते. दर साली ओढ्याजवळच्या पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचे झाडातले जन्म. असे लहानपणापासून ऐकलेले त्यामुळे त्या पानवेलीचे पाने कोणी तोडत नसे. या दृढ समजाला कारणही तसेच असते.

गाव म्हणजे मातीतल्या माणसाचा जथ्या. जो दु:खाचे अवडंबर करत नाही आणि सुखाचे बाजार भरवत नाही देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते. ओढ्यातला पाण्यातही गावाचे अश्रु ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा असतो. देणार्‍या हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी, अखंड उर्जा देणारी सावली. गाव म्हणजे काही वस्ती, वाडी वा घरे नव्हे. गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भुमीपुत्रांच्या ठायी विसावलेलं गाव म्हणजे आई.

गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई. गाव म्हणजे आकाशाची निळई आणि निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा. सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दु:ख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणार्‍या अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकरी पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरणीच्या चरणी अर्पण करणार्‍या शेकडो माणसांचा एकसंघ देह असतो. म्हणून गावाकडची माणसं आणि गाव मनाला भावत ते असं. गावातला निसर्ग आणि रानावनातला निसर्ग मनमोहून टाकतो.

शेताच्या बांधावरून अन् डोंगरकपारीतून झुळूझळू वाहणार्‍या त्या निर्मळ पाण्यासारखी ही गावाकडची माणसं. आपल्याच विश्वात रमणरी ही गावाकडची माणसं.

  • समीर गायकवाड

LEAVE A REPLY

*