मुलाखत : अरुण ठाकूर – शाळा एक सजा; नव्हे मजा

0

शिस्तीचा बडगा असलेली, घोकंपट्टी करून घेणारी, भल्यामोठ्या देणग्या आणि फिया आकारणारी, पोषाखी शाळा खरंच मुलांना आवडते का? मुलं मनापासून अशा शाळांमध्ये जात असतील का? नसेल तर मुलांच्या स्वप्नातली शाळा कशी असेल? मुलांना त्यांच्या मताप्रमाणे स्वातंत्र्य देणाऱ्या ‘नील’च्या शाळेसारखी शाळा खरंच अस्तित्वात असेल का? या प्रश्नांची उत्तरं नाशिकच्या ‘आनंदनिकेतन’ या प्रयोगशील आनंददायी शिक्षण असलेल्या शाळेचे संस्थापक अरूण ठाकूर यांच्याकडून मिळतात. आविष्कार शिक्षणसंस्थेच्या ‘आनंदनिकेतन’चं शाळा- एक सजा; नव्हे मजा असं स्लोगनच आहे. आणि इथं गेल्यावर ते किती बरोबर आहे, हे कळतं… आनंदनिकेतन बद्दल जाणून घेऊया त्यांच्याच कडून 

तुमचं बालपण व शालेय शिक्षणाविषयी थोडं…

एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात माझा जन्म झाला. आई ९वी पास होती. आम्ही चार भावंडं. मोठ्या तीन बहिणी आणि मी. माझे वडील पोलिसांत असल्यामुळे त्यांची दर दोन वर्षांनी बदली होत असे. जास्तीत जास्त दोन वर्षं मी एका शाळेत राहिलो. इतक्या गावागणिक शाळा बदलल्या. पहिली-दुसरीला उद्गीर, त्यानंतर धुळ्याला शिकलो. धुळ्यातील शाळेला मोठं मैदान होतं. मुंबईमधील गुजराती-मराठी माध्यमाच्या शाळेतही गेलो.

शाळेत मी पहिल्या पाचांत कधीच नसायचो. काय शिकलो तेही आता फारसं आठवत नाही. १९६६ साली माझ्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आणि आमच्या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. घरात सर्वांत छोटा असल्यानं मला त्याची फारशी झळ लागली नाही. त्यानंतरचं पुढचं ओझं आईनं वाहिलं. आई, तिची आई आणि आम्ही चार भावंडं या सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर पडली. तिनं मोठ्या हिमतीनं खानावळ चालवली. नाशिकमध्ये स्वतःचं घरही उभं केलं. आवश्यक तेवढाच खर्च करण्याची सवय मला तेव्हापासूनच लागली.

१९६९ साली नाशिकमधील पेठे हायस्कूलमधून ११वी मॅट्रिक झालो. त्यावेळी मला सर्वांत जास्त गुण मिळाल्याचं आठवतंय. त्यानंतर १२वीला प्रीडिग्री सायन्सला प्रवेश घेतला आणि सर्व विषयांत नापास झालो. नंतर आर्ट्‌सला गेलो. १९७१-७२ला कॉलेजची पहिली दोन वर्षं झाल्यावर नोकरी लागली. त्यानंतर कॉलेजला गेलोच नाही.

तुम्ही सेवादलाशी संबंधित होतात. त्या चळवळीकडे कसे आकर्षित झालात?

कॉलेजचं शिक्षण सोडलं त्या काळात १९७३-७४ च्या सुमारास मी सेवादलात गेलो. घरात सर्वांत लहान असल्यानं मला थोडं स्वातंत्र्य होतं. राजकीय घडामोडींविषयी प्रचंड कुतूहल असायचं. १९७५च्या काळातील आणीबाणीमुळे राजकीय वातावरण पेटलं होतं. हुकूमशाहीला विरोध, सरकारला विरोध, राजबंद्यांना मदत या गोष्टी आमच्या चळवळीचा भाग होत्या. नाशिकमधील कारागृहात मृणाल गोरेंसह अनेकजण होते. त्यांना आम्ही छुपी मदत करायचो. १९७७ च्या निवडणुकीत जनता  दल निवडून आलं. जनता दलाला आमचा विरोध होता. मी सेवादलातच राहिलो. त्यावेळी सेवादलातही अंतर्गत वाद झाला. सत्यशोधक समाजवादी ही नवी संघटना उभी राहिली.

शरद पाटील, रणजीत परदेशी हे आमचे आयडॉल्स होते. शरद पाटील काही वेगळं सांगू पाहत होते. त्यांची भाषणं आम्ही येवल्यात लावली. त्यानंतर समता आंदोलन ही नवीन संघटना काढली. ती वर्षभर चालली. त्याकाळात संसदबाह्य राजकारण असा नवीन प्रवाह होता. त्या प्रवाहाचा मी एक भाग झालो होतो. आमची संघटना शहरी मध्यवर्गीय होती. नंतर काम थंडावत गेलं. कोणत्याही लढाईला संसदेत कुणीतरी उचलून धरावं लागतं.

ती गोष्ट आमच्यापाशी नव्हती. त्यामुळे काहींना पक्ष काढावा वाटला. त्यांनी तो काढला; पण मला वैयक्तिकरीत्या कोणत्याही राजकीय पक्षात नाही जावंसं वाटलं. त्याच काळात रशियाचं पतन झालं. तारू शकेल अशी कोणतीही राजकीय विचारसरणी राहिली नाही. कम्युनिस्ट डळमळीत झाले आणि सगळंच कोसळलं. आत्मविश्वास खचत गेला. समाजवादाचं नवं रूप काय असेल, हा प्रश्न पडला. त्यामुळे आमच्या चळवळीतले बहुतेकजण स्वतःच्या आयुष्याबद्दल वेगवेगळा विचार करून मार्गस्थ झाले.

सामाजिक कामाविषयी…

नामांतर चळवळीच्या दरम्यान बाबा आढाव यांच्याशी संबंध आला. त्यांच्याबरोबर बराच फिरलो. वेगळं जग पाहिलं. त्यांच्याबरोबर फिल्डवर जाताना नेहमी वेगळं काहीतरी शिकायला मिळायचं. लोकांचे प्रश्न समजून घेताना प्रत्येक प्रश्नाकडे खालच्या माणसाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागली. विनायकराव कुलकर्णी, महमद खडस यांच्यामुळंही माझी बरीच वैचारिक जडणघडण झाली. मुस्लीम-दलितांबाबत वेगळा दृष्टिकोन तयार झाला. ‘नरकसफाईची गोष्ट’ हे सफाई कामगारांचं जीवन दाखवणारं पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यातूनच मिळाली.

 तुम्हाला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. वाचनानं नेमकं काय दिलं?

लहानपणापासूनच मला वाचनाची आवड होती. आमच्यावर आर्थिक संकट ओढवलं तेव्हाही वाचनसंस्कृतीवर परिणाम होऊ दिला नव्हता. पेपर रोज घरी यायचा. माणूससारखी नियतकालिकं यायची. ‘माणूस’चा माझ्यावर बराच प्रभाव होता. मी फिडेल कॅस्ट्रो, नक्षलवाद, समाजवाद, कम्युनिझम यावरचं लेखन सातत्यानं वाचायचो. माणूसमध्ये लेखन करणारे तीघंजण अनिलच होते. अनिल अवचट, अनिल थत्ते हे त्यातलेच. तिघांचीही शैली वेगळी होती. अफाट वाचलं. वाचत गेलो.

 प्रयोगशील शाळेची कल्पना कशी सुचली?

मी सोशो-पोलिटिकल वाचन आवडणारा माणूस असल्यानं शिक्षण हा वाचन आणि चिंतनाचा मुख्य भाग कधी नव्हता. कॉलेजमध्ये असताना वर्गात वसईची कॅथॉलिक ख्रिश्चन मुलं मोठ्या प्रमाणावर होती. त्यांच्याशी खूप विषयांवर संवाद होत असे. त्याच दरम्यान ‘नील’च्या शाळेचा मूळ अनुभव (त्याचा ‘नीलची शाळा समरहिल’ हा मराठी अनुवाद आता उपलब्ध आहे.) वाचला. अशी शाळा असू शकते, याची कल्पनाही करू शकत नव्हतो. तोतोचानही वाचनात आलं होतं. त्यानंतर शिक्षणाकडं वेगळ्या तऱ्हेनं पाहणारी माणसं कोण, याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

असं असूनही शाळा काढण्याचा विचार त्यावेळी मनात नव्हता. आम्ही वाचत, विचार करत होतो. दरम्यान मी वयाच्या ३८व्या वर्षी लग्न केलं. मुलगा झाला. मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं याविषयी माझं व पत्नीचं एकमत होतं. शाळेचा प्रश्न उभा राहिला. इयत्ता पहिलीपर्यंत तो रचना विद्यालयात शिकला. त्याचदरम्यान मला साताऱ्याहून नाशिकला आलेल्या विनोदिनी पिटके काळगी या भेटल्या. त्या गणिताच्या लेक्चरर होत्या. त्यांची मुलगीही शाळेत जात होती. एक दिवस विनोदिनी मला म्हणाली, ‘‘ आपण शाळा काढूया.’’ मी म्हणालो, ‘‘काढू.’’

शहरात ‘नील’च्या शाळेच्या जवळपास जाणारी शाळा कशी काढता येईल, याचा आम्ही विचार करू लागलो.

प्रयोगशील शाळेची सुरूवात…

विनोदिनीनंच शाळेचं रजिस्ट्रेशन तसंच शाळा उभारणीच्या काळातलं सगळं काम केलं. त्यावेळी ती नोकरी करत होती. कोल्हापूरला डॉ. लिला पाटील यांची ‘सृजनआनंद’ ही प्रयोगशील शाळा आहे, ती शाळा पाहिली. १९९८ साली दूध सेंटरच्या समोरच्या बाजूला माणिकनगरमध्ये एक हॉल भाड्यानं घेऊन तिथं शाळा सुरू केली. प्रयोगशील शाळेच्या विचारानं आम्ही समाजवादी लोक एकत्र आलो. शाळा सुरू होण्याच्या दिवशी सगळेजण सोडून गेले. मी आणि विनोदिनी दोघंच उरलो. मग तिनं नोकरी सोडली आणि पूर्णवेळ शाळेसाठी देण्याचं ठरवलं. आधी खेळघर, त्यानंतर बालवाडी सुरू केली. मुलं गोळा करणं, घरोघरी जाऊन शाळेबद्दल माहिती देणं हे करावं लागलं. कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्व किंवा एखाद्या ट्रस्टचं बॅकिंग नसल्यानं सगळी उभारणी आमची आम्हालाच करायची होती.

नील, तोतोचान, सृजनआनंद या सगळ्या मॉडेल्सच्या जवळ जाणारी शाळा काढायची, पण अनुदान आणि देणग्या घ्यायच्या नाहीत, हे आधीपासूनच ठरवलं होतं. गरीब आणि श्रीमंतांची मुलं एकत्र शिकतील, कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला जाणार नाही, धर्माभिमान मुलांना शिकवायचा नाही, ही तत्वे जपायचं ठरवलं. आम्हाला अभिमान हे इंद्रिय नाही, असं आम्ही गमतीनं म्हणायचो. आनंददायी अर्थपूर्ण शिक्षण याला जुळणारं नाव हवं होतं, म्हणून शाळेचं नाव ‘आनंदनिकेतन’ ठेवलं. अनेक शाळा अशा खर्चिक असतात की तिथं गरिबांची मुलं शिकूच नयेत, अशी व्यवस्था असते. आम्ही ते कप्पेच कमी केले. शाळेत सर्व उत्पन्नगटातील मुलं यावीत म्हणून पालकांसाठी ही कमीत कमी खर्चाची शाळा आहे. गॅदरिंग- ड्रेस पालकांना विकत किंवा भाड्यानं आणू देत नाही. तयार करा, एकमेकांकडून आणा असं सांगतो. पौष्टिक खाऊची स्पर्धा घेतली जाते. एका वर्गात जास्तीत जास्त चाळीस मुलं आहेत. विद्यार्थिसंख्या वाढली म्हणजे वैयक्तिक लक्ष देता येत नाही.

उच्च माध्यमिक वर्गाच्या मान्यतेसाठी आंदोलन केलं होतं.

८ वी ते १० वीच्या वर्गांच्या मान्यतेसाठी आंदोलन करावं लागलं. आधी सातवीपर्यंत मान्यता मिळाली. आठवीपासून सरकारनं विनाअनुदानित शाळांना मान्यता द्यायची नाही, असं ठरवलं. तेव्हा पाच वर्षं एकाही शाळेला मान्यता मिळाली नव्हती. त्यावेळी माझाही मुलगा आठवीत गेला होता. आम्ही मान्यतेसाठी आंदोलन केलं, वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्या. धरणं धरलं, पथनाट्य सादर केली, उपोषण केलं. त्यावेळी शाळेचं भाडंही भरावं लागत होतं. मैदान नव्हतं. खूप नाइलाजाने आठवीचा वर्ग बंद ठेवावा लागला.

आठवीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना दुसऱ्या शाळेचा पर्याय समोर ठेवला. नंतर आम्ही विचार केला, आठ वर्षांपूर्वी कामगारनगरमध्ये शाळेची नवीन इमारत तयार झाली. आठवी ते दहावी शाळाही आपण चालवावी, असा विचार केला. आठवीचा वर्ग सुरू केला. आठवीपासूनची शाळा बेकायदेशीर असेल, त्यामुळे दहावीला मुलांना १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसावं लागेल, हे पालकांना सांगितलं. पालकांनी त्यावेळी आमच्यावर विश्वास दाखवला. या सगळ्या काळात सरकारचा खूप त्रास झाला; पण समाजाची साथ मिळत गेली. त्यातून इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत गेलं.

तीन-चार वर्षं झगडल्यावर स्वयंअर्थसहाय्य या नावाखाली उच्च माध्यमिक शाळेला मान्यता मिळाली. आमच्या शाळेची फी आम्ही खूपच कमी ठेवली आहे. शाळेला विद्यार्थ्यांच्या फीमधून जे पैसे मिळतात त्यातला ६० टक्के भाग शिक्षकांच्या पगारासाठी आणि ४० टक्के शाळेच्या देखभालीसाठी खर्च केला जातो. आम्ही तर शिक्षकांना केवळ पेट्रोल भत्त्याइतकंच मानधन देऊ शकतो, याचं वाईट वाटतं. चार-पाच शिक्षक असे आहेत की ज्यांना चांगल्या पगाराची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र फंड उभा करण्याचा विचार आहे.

विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही कोणती तत्वं जपता?

कोणतीही शाळा ही विद्यार्थिकेंद्री असली पाहिजे, असं मला वाटतं. शाळेत शिकवताना मुलांवर कोणत्याही प्रकारची सक्ती नको. मुलांचं स्वातंत्र्य हा आमच्या शाळेचा पाया आहे. शाळा आणि शिक्षण ही मुलांची स्पेस आहे, हा विश्वास मुलांनाच वाटला पाहिजे. बालवाडी हा मुलांच्या शिक्षणातला महत्त्वाचा टप्पा असतो. बालवाडीच्या मुलांना शिक्षिका अजिबात रागवत नाहीत. टीचर्स रुममध्ये मुलं मोकळेपणानं येऊन चर्चा करू शकतात. प्रश्न विचारू शकतात. इतर शाळांना मुलं आणि शिक्षक यांच्यात अंतर राखलं पाहिजे, असं वाटतं.

पण आमच्या शाळेत ते अंतरच नाही. तो विश्वास शाळा मुलांना बालवाडीपासूनच देते. बालवाडी, खेळवाडीत मुलं रडतात. त्यांना रागवून गप्प बसवलं जात नाही. कारण इथं लहान मुलांनी रडणं हे नैसर्गिक आहे, असं मानलं जातं. अभिनेते मोहन आगाशे यांचं शिक्षणप्रक्रियेबद्दलचं एक वाक्य आवर्जून सांगतो, ‘ कोणी कुणाला की शिकवू शकत नाही. कोणी कुणाला शिकण्यापासून रोखू शकत नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त मदत करू शकतात.’ हे वाक्य आम्हाला तंतोतंत पटतं. शिक्षण हे क्रिएटिव्ह असावं. गॅझेट आधारित नसावं. प्रत्येक बाबतीत मुलांचं स्वतंत्र मत, अधिकार मान्य केला जाईल, असं असावं.

अरुण ठाकूर परिवारासोबत

शिक्षकांना कसं घडवलं?

मी आणि विनोदिनीनं शाळा सुरू केली. नंतर दीपा, मुक्ता आल्या. आमच्याकडच्या सर्व शिक्षिका १५-१६ वर्षांच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या आहेत. शिक्षिकांना निवडतानाही आम्ही त्यांचं मुलांवर प्रेम किती आहे, स्वतः शिकायला किती तयार आहेत, ते पाहतो. शिकत राहणाऱ्या शिक्षिका हव्यात. बालवाडीच्या शिक्षिकांकडे पाहून अनेक शिक्षिका तयार झाल्या. मुक्ता ही हसतमुख आणि प्रेमळ आहे, इतकी की ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी मुक्ताताई आहे.

दीपा शाळेत कार्यालयीन कामकाज पाहायला आली होती. ती कधी शिक्षिका होऊ शकेल, असं तिलाच वाटलं नव्हतं. शाळेच्या व्हरांड्यात बसायची. सृजनआनंदच्या प्रशिक्षणाला गेली आणि आल्यावर आत्मविश्वासानं मुलांना शिकवू लागली. शिक्षकांची निवड अशीच केली गेली. ज्यांना आपण शिकवू शकू, असं वाटलं, त्यांना संधी दिली गेली. ज्यांना जे अडलं, त्यांचे प्रश्न सर्वांशी चर्चा करून सोडवले गेले. त्यामुळे अंतर्गत मतभेद आणि राजकारणाचा अभाव आमच्या शाळेत जाणवतोच. मुख्याध्यापिका, संस्थापकांसह सर्व शिक्षकांची खोली एकच आहे. मुख्याध्यापिका हे पद बदलतं ठेवलं जातं. आमच्याकडे अनेक शिक्षिका चांगल्या शिकलेल्या आहेत. अनेक शिक्षिका आमच्या शाळेत आल्यावर अमूलाग्र बदलल्या. त्यांचे विचार बदलले.

 शिक्षणाचे प्रयोग कोणते आहेत?

मुलांना काय हवं असतं? ते शाळेला माहीत हवं. मुलांचं निरीक्षण करणं हा  एक जॉब आहे. गुणात्मक स्वरूपात नाही म्हणून वर्णनात्मक मूल्यमापन हा पर्याय आम्ही स्वीकारला. मूल्यमापन आम्ही पालकांशी शेअर करतो. सुरुवातीला या गोष्टीला पालकांचा विरोध होता. त्यांच्या डोळ्यांसमोर इतर शाळांमधली गुणात्मक स्पर्धा, शिस्त, पोषाखीपणा या गोष्टी होत्या. शाळा म्हणजे शिस्त, ही गोष्ट त्यांच्या डोक्यात पक्की बसली होती.

शिस्त या एकाच विषयावर खूप पालकसभा सुरुवातीला घ्याव्या लागल्या होत्या. कारण आज्ञाधारकपणा या गोष्टीला आम्ही गुण मानत नाही. आज्ञाधारकतेमागे कुतूहल, उपजत ऊर्जा झाकली जाते. संस्कार म्हणजे नेमकं काय, या विषयावर पालकांशी चर्चा झाल्या. आता पालकांना ते पटतं आहे. ज्या पालकांना आमच्या शाळेचं वेगळेपण माहीत आहे, तेच मुलांना या शाळेत घालतात.

शालेय शिक्षण घेताना मुलांच्या डोक्यात स्पर्धा नको, सहकार हवा. माणसाच्या इतिहासात सहकारानंच प्रगती केलीय, त्यामुळे मी एकटा, बाकीचे विरुद्ध हा दृष्टिकोन मानसिकतेला घातक ठरतो. शाळेतल्या मुलांना चौथीनंतर आम्ही स्पर्धेला पाठवतो, त्यात जिंकणं हा उद्देश नसतो. त्यातून सादरीकरण, विचार करण्याची पद्धती, स्वतःचे विचार स्वतः लिहिण्याची कला अवगत होते. स्वतः सगळ्या गोष्टी करणे, प्रयोगशील राहणं यातून कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळते.

उदाहरण द्यायचं तर आमच्या शाळेतली मुलं आठवडी बाजाराला भेट देतात, यातून कितीतरी गोष्टी मुलांना मिळतात. वस्तू घेणारा वर्ग, गरजा भागवणारा वर्ग, कष्ट, व्यवहार अशा अनेक गोष्टी त्यातून समजतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवही देण्याचा प्रयत्न करतो. सौरऊर्जा कशी असते हे प्रात्यक्षिक मुलं पाहतात. पानांवरून झाडं ओळखू शकतात.

मराठी माध्यमाबद्दल…

एक काळ असा होता, इंग्रजी माध्यमाचं प्रचंड आकर्षण होतं. त्याला आता काही प्रमाणात तडा गेल्याचं जाणवतंय. परिसरभाषेतील शिक्षणाकडे ओढा वाढलाय.  मराठीला आम्ही मातृभाषा म्हणत नाही, परिसरभाषा म्हणतो. परिसरभाषेत शिकल्यावर कल्पनाशक्तीला वाव मिळतो, हे आता लोकांना पटतंय. माध्यमाचा विचार त्याच्याशी जोडलेला असतो. भाषा कोणत्याही वयात शिकता येते; पण माणूस विचार त्याच्या परिसरभाषेतूनच करतो. इंग्रजी माध्यमात जाणाऱ्यांच्या बाबतीत असं होतं, की परिसरातलं ज्ञान ग्रहण करण्यची प्रक्रियाच थांबते. इंग्रजी न जाणणारे लोक निर्बुद्ध असतात, हा समज एका सिस्टिमनं तयार केला आहे.

सिस्टिमशिवाय ज्ञान असतं, याची अनेक उदाहरणं आहेत. पूर्वी पाण्याच्या योजना अनुभवानं तयार झाल्या आहेत. वनस्पतींविषयींचं आदिवासींचं ज्ञान हे अनुभवातून आलेलं आहे. जेन ही बेंगळुरूला आदिवासींसाठी कानडी माध्यमाची शाळा चालवते. तिच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात आदिवासी मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत. या शाळा मुलांना जे ज्ञान देतात, त्याचा त्यांना दैनंदिन जीवनात काहीच उपयोग नाही. अशी अनाथ अवस्था आहे. परिसरात अनंत ज्ञान आहे, यावर विश्वास असल्यानं आम्ही शिक्षणासाठी परिसरभाषेवर विश्वास ठेवतो. भाषेचा व ज्ञानाचा जवळचा संबंध आहे. ज्ञानाची निर्मिती ही भाषेशिवाय शक्य नाही. मराठी माध्यमातील मुलं कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजी न आल्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात का, या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं देईन. कारण आमच्या शाळेतून पासआऊट झालेली मुलं आपापल्या क्षेत्रात उत्तम शिकत आहेत. मुंबई येथील मीनल परांजपे यांची पुस्तकं, पद्धती आम्ही वापरतो. त्याचा चांगला फायदा दिसतोय. आमचा प्रयोग यशस्वी झाल्याचं जाणवतंय. इंग्रजी भाषा शिकवण्याचीही वेगळी पद्धत असल्यानं कॉलेजमध्ये गेल्यावर मुलांना कॉम्प्लेक्स येत नाही. केंब्रिजच्या परीक्षेतही मुलांनी यश मिळवलंय. उलट परिसरभाषा ही ज्ञानभाषा झाल्यानं अनेक गोष्टींचं आकलन मुलांना चांगल्या पद्धतीनं होतं.

 स्वयंपाकघर, गच्चीवरची बाग याविषयी…

आमच्या शाळेत स्वयंपाकघर आहे. तिथं मुलं सुरी व गॅस न वापरता काम करतात. त्यातून श्रमसंस्कार होतात. हे काम मुलीचं, हे काम मुलाचं असा भेद लहानपणापासूनच नको, हा हेतू त्यामागं आहे. तसंच स्वयंपाक हे आनंदाचं काम असल्याचं त्यांच्या मनावर बिंबत जातं. लिंगभाव समानतेला चालना मिळते. शाळेच्या गच्चीवर सौरचूल आहे. तिचं कार्य व महत्त्व आमच्या बालवाडीतली विद्यार्थिनीही सहजपणे सांगते. शाळेच्या गच्चीवर सुरेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मातीविरहित शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. मुलं त्यांच्या घरातला ओला कचरा आणतात आणि त्या कचऱ्यापासून होणाऱ्या खतामध्ये अगदी  काही भाज्यांची लागवड केली आहे. शाळेत रात्रनिवास व स्नेहभोजन असतं.

पालकांना काय सांगाल?

पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. मुलांशी मुलांसारखं वागावं. मुलांचं स्वातंत्र्य मान्य करावं. शारीरिक शिक्षा तर करताच कामा नये. हुकूमही देऊ नये. दुसऱ्यांचं पाहून मुलं शिकत असतात. ज्या कुटुंबात हिंसेचा पुरस्कार होतो, ती मुलं हिंसक तरी होतात किंवा आत्मविश्वास तरी गमावतात. अशा मुलांच्या बाबतीत शाळेला खूप लढा द्यावा लागतो.

नील, तोतोचान, सृजनआनंद या सगळ्या मॉडेल्सच्या जवळ जाणारी शाळा काढायची, पण अनुदान आणि देणग्या घ्यायच्या नाहीत, हे आधीपासूनच ठरवलं होतं. गरीब आणि श्रीमंतांची मुलं एकत्र शिकतील, कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला जाणार नाही, धर्माभिमान मुलांना शिकवायचा नाही, ही तत्वे जपायचं ठरवलं. आम्हाला अभिमान हे इंद्रिय नाही, असं आम्ही गमतीनं म्हणायचो.

शाळेतली मुलं आठवडी बाजाराला भेट देतात, यातून कितीतरी गोष्टी मुलांना मिळतात. वस्तू घेणारा वर्ग, गरजा भागवणारा वर्ग, कष्ट, व्यवहार अशा अनेक गोष्टी त्यातून समजतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवही देण्याचा प्रयत्न करतो. सौरऊर्जा कशी असते हे प्रात्यक्षिक मुलं पाहतात. पानांवरून झाडं ओळखू शकतात.

  • मुलाखत : शिल्पा दातार ( mrs.shilpapankaj@gmail.com)

LEAVE A REPLY

*