Monday, April 29, 2024
HomeUncategorizedदिवाळी २०२० : शुद्ध बीजापोटी फुले रसाळ गोमटी

दिवाळी २०२० : शुद्ध बीजापोटी फुले रसाळ गोमटी

नाशिक | अर्जुन ताकाटे

संस्कृती, संस्कार, धर्म व परंपरा, प्राचीन व अर्वाचीन संस्कृती यांसारखे अनेक शब्द आपल्या वाचनात आले, ऐकण्यात आले पण प्रत्यक्षात याचा अर्थ काय? याचे फारसे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला नसेल. आज संस्कृतिक परंपरा समजून घेण्याचा या लेखाच्या निमित्ताने प्रयत्न करूया.

- Advertisement -

अमूर्त सांस्कृतिक वारसा जपला जावा, तो नष्ट होऊ नये म्हणून 18 एप्रिल 2020 रोजी एकूण 106 अमूर्त सांस्कृतिक वारसांचा (कला) समावेश करण्यात आला. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 24/24 मिशन हाती घेत यावर अनेक बाबतीत नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2003 मध्ये एक सर्वे करण्यात आला.

असणार्‍या एकूण 106 कलांचा समावेश करून त्याची विभागणी पाच भागात करण्यात आली. 1) भाषासहीत मौखिक परंपरा 2) प्रदर्शन आणि कला 3) सामाजिक प्रथा, सण आणि उत्सव 4) निसर्ग, ब्रह्मांड यांचा अभ्यास 5) शिल्पकला, मूर्ती बनवणे, कौशल्य यांचा समावेश होतो. या प्रत्येक भागात आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा कसा जोपासला गेला, कोणत्या भागात कोणती संस्कृती आहे याची माहिती आपण घेतल्यास अनेक पंथ, अनेक जाती, धर्म आणि वेष यात विविधता असूनही देशाच्या एकतेचे प्रतीक पाहावयास मिळते.

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील अनेक कलात्मक कौशल्यांचा समावेश या 106 वारसांमध्ये आहे. त्यापैकी महाराष्ट्र या आपल्या राज्यातील एकूण 13 वारसांचा समावेश युनोस्कोने केला आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील चार कोणते अमूर्त सांस्कृतिक वारसा आहेत हे पाहणे अधिक आवडेल.

1) झाडीपट्टी :- झाडीपट्टी हा एक नृत्य प्रकार आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या भागात हा नृत्य प्रकार पाहावयास मिळतो. ज्या भागास आपण कोकण म्हणतो त्या भागाचा यात समावेश होतो. ज्या भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्या भागात कापणी करण्याच्या काळात हा नृत्य प्रकार साजरा केला जातो.

2) दशावतार :- भगवान विष्णू यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी एकूण दहा अवतार घेतले असे वर्णन धर्म ग्रंथातून वाचावयास मिळते. यात विविध रूपे घेऊन नाट्य, नृत्य स्वरुपात कार्यक्रम केला जातो. प्रसिद्ध धार्मिक स्थळी हा उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात त्याला बोहडा असेही म्हणतात. सिंधुदुर्ग भागात अधिक प्रमाणात हे उत्सव होतात. याचेही प्रकार आहेत.

3) चामड्याच्या बाहुल्या :- बकरी व हरीण यांच्या कातडीपासून या बाहुल्यांची निर्मिती केली जाते. यास कठपुतली बाहुल्या म्हणतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इ. राज्यात ही कला जोपासली जाते.

4) कुंभमेळा :- दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. देशात असणार्‍या प्रसिद्ध धार्मिक स्थळी हे कुंभमेळे भरवले जातात. भारतात नाशिक, उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार या ठिकाणी देशातील अनेक साधू- संत, वेगवेगळ्या फडाचे महंत येऊन हजेरी लावतात.

आपला वारसा चालवण्यासाठी किंवा आपल्या पंथाची उद्दिष्टे, तत्त्वे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रसार माध्यमे, प्रवचन, कीर्तन, भजन, आरती अशा विविध माध्यमांचा उपयोग करून संसकृती वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जातो.

राज्यातील सांस्कृतिक वारसांचा विचार करणे अधिक योग्य होईल. प्राचीन कालांपासून चालत आलेले सण-उत्सव, नृत्य,अन्न, वेष, रंगभूषा, घराची ठेवण व देखभाल, नाते परंपरा, संघटन कौशल्य, योग, आनंद, दु:ख, वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी दीपावली या सण-उत्सवात पाहावयास मिळतात.

हे उत्कृष्ट उदाहरण सांस्कृतिक वारसाचे आहे, हे विसरून चालणार नाही. दीपावली सणानिमित्त समाजातील सर्वच लोक घराची साफसफाई करतात. घराची रंगरंगोटी करतात. नक्षिकाम, रांगोळी, आकाशकंदिल तयार करणे इ. कामे आवडीने करतात. हे काही कोणी सांगितले म्हणून नाही तर चालत आलेली परंपरा जपतात. विविध नृत्य प्रकार साजरे केले जातात. भागानुसार त्याचे प्रकार वेगळे असतात एवढेच.

सणाच्या निमित्ताने गोडधोड केले पाहिजे. घरातील सर्वच लहानथोर व्यक्तींना ते खाऊ घातले पाहिजे त्यात एक वेगळाच आनंद महिलावर्गाला मिळतो. विविध प्रकारचे पदार्थ त्या तयार करतात. कितीही गरीब असला तरी दिवाळी आनंदात कशी साजरी होईल यासाठी प्रयत्नशील असतो. ‘पाडवा गोड झाला’ नावाचा एक मंगेश पाडगावकर यांचा पाठ वाचण्यात आला.

त्यात ती माऊली अत्यंत गरीब परिस्थितिशी संघर्ष करत असतानाही शिळ्या भाकरी खलबत्यात कुटून त्याचा भुगा करते आणि शेजारून आणलेला गूळ त्यास मिसळून आपल्या मुलांना खाऊ घालते व पाडवा सण गोड करते. ही उदाहरणे कशाचे प्रतीक आहेत? त्याचे उत्तर एकच आहे ते म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा.

दीपावली सणाच्या निमित्ताने दूरवर असलेली घरातील बायका माणसे सण साजरा करण्यासाठी आवर्जून घरी येतात. घराच्या माणसांशी यानिमित्ताने जवळीक साधतात. यातूनच संघटन कौशल्य वृद्धिंगत होते, असे म्हणता येईल.

बायका एकत्र येऊन रांगोळी काढतात. अधिक प्रसन्न व आनंददायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न घरातील हरएक व्यक्तीकडून केला जाता असल्याचे पाहावयास मिळते. पुरुष माणसे स्वत: आकाशकंदिल तयार करतात. त्यात वेगवेगळे रंग, नक्षी, आकार, रूप भरण्याचा मनापासून त्यांचा कल असतो.

घरात सांजेला सगळीकडे दिवे लागण केली जाते. रोषणाई होते. बलिपूजन, भाऊबीज, लक्ष्मीपूजन या प्रत्येक दिवसाला काय महत्त्व आहे? का साजरे केले जातात हे सण? याचे उत्तर माझ्या मते एकच आहे ते म्हणजे आपल्या धर्म परंपरेनुसार संस्कृतीचे जतन करणे होय. विविध अंगी गुण वैशिष्ट्य असणारा हा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणेदेखील आवश्यक आहे.

फक्त शासनानेच लक्ष दिले पाहिजे असे नाही तर या देशाचे नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे. आपल्या परिसरातील गडकिल्ले, नद्या, झाडी यांचे जतन होणे गरजेचे आहे.

निसर्गात असणारे पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती यांचेही जतन झाले पाहिजे. भूतकाळातील व्यवस्थेचा अभ्यास करून पुढील भविष्याची दिशा ठरवावी. स्वदेश दर्शन सक्तीचे करावे. परिसर अभ्यासाची सवय बालपणापासून करण्याची पद्धत अवलंबावी. वेळोवेळी निसर्ग अभ्यास, त्यात होणारे बदल आणि त्यानुसार पुढील जीवन व्यवस्था ठरवणे या सर्व बाबींचा अभ्यास हा एक सांस्कृतिक वारसा जपण्यासारखे आहे.

निसर्गातील कोणताही प्राणी, पक्षी, समाजरचना, निसर्ग, राज्य, पिके, व्यवसाय याविषयी निर्णय घेताना त्याचा इतिहास पाहिला जातो, हेही उदाहरण वारसा जतन करण्याचेच आहे. संत तुकराम महाराज म्हणतात, ‘शुध्द बीजापोटी फुले रसाळ गोमटी’. यासाठी बीज शुद्ध असावे म्हणजेच त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा भरभक्कम असावा.

: अर्जुन ताकाटे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक

9423926047

- Advertisment -

ताज्या बातम्या