Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedदिवाळी २०२० : कपालेश्वर पालखी..

दिवाळी २०२० : कपालेश्वर पालखी..

नाशिक | सुनील शिरवाडकर

नाशिकचा एक सांस्कृतिक वारसा महाशिवरात्री. दुपारचे दोन वाजले. दादाजी वैद्य घरातून निघाले. हातात भगवान शिवशंकराचा पंचमुखी मुखवटा होता. तो घेऊन ते कपालेश्वर मंदिरात आले. मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. फुलांच्या माळांनी सर्व मंदिर सजवण्यात आले होते.

- Advertisement -

प्रवेशद्वारावर दोन उंच केळीचे खांब लावलेले होते. मुखवटा घेऊन ते आत आले. गाभार्‍यात पूजा झाली. कपालेश्वर पालखी मंडळाचे शिवभक्त आधीपासूनच आले होते. कोणी फुलांच्या माळा ओवत होते तर कोणी पालखीच्या दांड्याला सजावट करत होते. पालखीच्या आत शाही बैठक मांडण्यात आली. पालखीत मुखवटा ठेवला. दोन्ही बाजूंनी लोड ठेवण्यात आले.

साधारण चार वाजता मंदिरातून पालखी निघाली. महाशिवरात्री असल्याने पालखीचा थाट मोठा बघण्यासारखा होता. रस्ते रांगोळ्यांनी सजवले जात होते. बँड पथक.. त्यानंतर नेहमीचे ढोल पथक. आज तर ढोलवादकांची संख्या पन्नासच्याही पुढे होती.

त्यानंतर पालखी. मध्यभागी तो तेजस्वी मुखवटा..मस्तकावर गंगा धारण केलेला.. त्यावर शेषशायी नागाने आपला फणा धरलेला.. छत्र.. चामरे..अब्दागिर्या..त्यामागून शिवभक्त. दर दहा- वीस पावलांवर पालखी थांबत होती. जागोजागी तिचे स्वागत होत होते.

शनिचौक, मालवीय चौकातून पालखी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ आली. तसे पाहिले तर वर्षभर दर सोमवारी निघणारी कपालेश्वराची पालखी काळाराम मंदिराकडे येत नाही. ती मालवीय चौकातूनच सरदार चौकात जाते. पण आजचा दिवस वेगळा. वर्षातले काही ठराविक दिवसच पालखीचा मार्ग थोडा बदलतो.

शिवशंकराचा चांदीचा पंचमुखी मुखवटा पालखीत मिरवण्याचे दिवस जेमतेम दहा-बारा. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या. याच दिनी हा मुखवटा बाहेर येतो आणि मग तो असतो पालखीचा महापर्व काळातील महासोहळा. काळाराम मंदिर संस्थानतर्फे पालखीचे स्वागत झाले. आरती झाली. एकप्रकारे हरीहर भेटच.

‘बम बम भोले’च्या गजरात पालखी रामकुंडावर आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. परंपरेनुसार दीक्षित घराण्याकडे मग पूजेची सूत्रे सोपवण्यात आली. रूद्राच्या मंत्रघोषात शिव अभिषेक सुरू झाला. अभिषेकासाठी कोणी दूध आणले होते तर कोणी गुलाबजल. आज महाशिवरात्री असल्याने उसाचा रस वाहण्यासाठी भक्त तिष्ठत होते. उसाच्या रसाचा अभिषेक झाला.

अभिषेकानंतर तो रस प्रसाद म्हणून वाटण्यात आला. रात्री दहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात आली. मुखवटा कपालेश्वराच्या शिवलिंगावर ठेवण्यात आला आणि मग कपालेश्वराचे रूप..तो गाभारा.. एकूणच मंदिर विलक्षण चैतन्याने भारून गेले. भक्तांच्या अलोट गर्दीत आरतीला सुरुवात झाली. ‘लवथवती विक्राळा..’

‘ओम हर हर हर महादेव’ एकामागून एक आरत्या झाल्या. ‘कपालेश्वर भगवान की जय’ असा गजर होऊन रात्री बारा वाजता महाशिवरात्री पूजन सोहळा झाला.

पंचवटीत राहणारा गाडे परिवार म्हणजे कपालेश्वराचे गुरव. काल सकाळी दादाजींनी पंचमुखी शिवाचा मुखवटा मंदिरात आणला..तेव्हापासून या गाडे मंडळींनी त्याचे पावित्र्य जपत आत्यंतिक भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. दादाजींनीदेखील सर्व गुरवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मग आज सकाळी मुखवटा दादाजींच्या स्वाधीन करण्यात आला. जुन्या तांबट आळीत राहणारे दादा उमाशंकर वैद्य पहिल्यापासूनच शिवभक्त.

कपालेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. एकदा त्यांना कपालेश्वराचा दृष्टांत झाला. त्यानुसार दादा उमाशंकर वैद्य यांनी कपालेश्वर चरणी चांदीचा मुखवटा अर्पण करण्याचे ठरवले. ही गोष्ट 1893 सालची. सोनार समाजातील तत्कालीन कसबी सुवर्णकार रामचंद्र रावजी इंदोरकर यांच्याकडे हे काम सोपवण्यात आले. आपले सर्व कसब, कारागिरी पणाला लावून त्यांनी हा पंचमुखी शिवाचा मुखवटा घडवला आणि त्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा तो कपालेश्वर पालखीत मिरवण्यात आला.

श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या या महापर्व काळात वैद्य कुटुंबाकडे असलेला मुखवटा कपालेश्वर पालखीत असतो. वंश परंपरेने या पालखी सोहळ्याचा खर्च आणि परंपरा वैद्य कुटुंबाकडे राहील हे 125 वर्षांपूर्वीच ठरवण्यात आले. प्रमोदभाई वैद्य, अरविंदभाई वैद्य यांनी दादा उमाशंकरांची परंपरा निष्ठेने पुढे चालू ठेवली.

कपालेश्वर मंदिरात बर्‍याच प्रथा, परंपरा पाळण्यात येतात. भगवान शिवशंकराचे हे जागृत, जाज्वल्य स्थान. दर शनिवारी संध्याकाळी लघुरुद्राभिषेकाला प्रारंभ होतो. पूजा झाल्यानंतर होणार्‍या आरतीला नाशिकचे तमाम शिवभक्त हजर असतात. हा आरती सोहळा रात्री उशिरापर्यंत चालतो. या लघुरुद्राभिषेकाचे तीर्थ हे खूप पवित्र समजले जाते.

दर सोमवारी आणि खास करून शनिवारी संध्याकाळी कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍यांची संख्या लक्षणीय असते. शेकडो वर्षे झाली.. पिढ्या बदलल्या. कपालेश्वराची कृपा नाशिककरांवर सदैव राहिली आहे. कपालेश्वर भगवानचा महिमा वर्णन करायचा तर शब्द अपुरे पडतील.

म्हणूनच शिवमहिम्न स्तोत्रात म्हटले आहे.. हे ईश्वरा! सागराच्या पात्रात काळ्या पर्वतासारखे काजळ कालवून शाई केली, कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली, लिहिण्यासाठी कागद म्हणून पृथ्वी कल्पिली आणि स्वतः गणेश, सरस्वती जरी सर्वकाळ लिहीत बसले तरीही तुझ्या गुणांचा पार लागणार नाही.

सुनील शिरवाडकर 9423968308.

- Advertisment -

ताज्या बातम्या