दिव्यांगनिधी खर्चासाठी धावपळ

४ महिन्यात २० कोटी खर्च अशक्यप्राय ; प्रशासनाकडून प्रयत्न सुरू

0
नाशिक | दि.७ प्रतिनिधी – महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यासाठी अलिकडेच करण्यात आलेला २० कोटींचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाकडुन नियोजन करण्यात आले आहे. मात्र चालु अर्थिक वर्षातील शिल्लक असलेल्या चार महिन्यात दिव्यांगासाठी तरतुद करण्यात असलेला निधी खर्च होणे अशक्य असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. तरीही इमारती उभारणी वगळता इतर उपाय योजना – उपक्रम तातडीने घेण्यासाठी महापालिकेकडुन धावपळ सुरू झाली आहे.

महापालिका प्रशासनाकडुन गेल्या तीन वर्षात अंपगाच्या कल्याणासाठी अंदाजपत्रकांच्या ३ टक्के निधी खर्च करण्यासाठी निधींची तरतुद करण्यात आली नसल्याचे अलिकडेच आ. बच्चु कडु यांच्या नाशिक दौर्‍यात समोर आले होते. याच कारणावरुन महापालिका आयुक्त व आ. कडु यांच्यात शाब्दीक चकमक होऊन प्रकरण हातघाईवर आल्यानंतर हे प्रकरण राज्यात गाजले होते.

यानंतर प्रशासनाने तातडीची पाऊले उचलत शहरातील दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना व उपक्रमांसाठी २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्वच दिव्यांगाचा सर्व्हे करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता.

तसेच नंतर शहरातील दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी योजना व उपक्रम अशा १८ शिर्षकाखाली एक प्रारुप कृती अराखडा तयार करण्यात आला होता. याच कृती आराखड्यानुसार प्रशासनाकडुन अंमलबजावणीचे काम सुरू झाले आहे. महापालिका प्रशासनाकडुन आता चालु अर्थिक वर्षातील शिल्लक चार महिन्यात हा कृती आराखडा पुर्ण करण्याची धावपळ सुरू झाली आहे.

आत्तापर्यत कृती आराखड्यानुसार विभाग प्रमुख व विभागीय अधिकार्‍यांकडुन कोण कोणती कामे सुरू आहे, त्यांची स्थिती आज काय आहे, कामांची स्थिती अशा बाबींचा आढावा घेण्यासाठी नुकतीच अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात प्रशासनाने संपुर्ण कृती आराखड्याचा आढावा घेण्यात येऊन कामांना वेग देण्याच्या सुचना देण्यात आल्या.

कृती आराखड्यातील दिव्यांगासाठी बांधण्यात येणार्‍या वास्तुच्या कामांसाठी निवीदा प्रक्रिया व प्रत्यक्ष उभारणीस मोठा कालावधी लागणार असल्याने ही कामे चालु वर्षात पुर्ण होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही यातील काही कामांची मंजुरीची आणि निवीदा प्रक्रिया पुर्ण करुन कार्यादेश देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

तर दिव्यांगांना अर्थिक मदत, क्रीडा, हस्तकला, चित्रकला स्पर्धा, विविध उपक्रम, साहित्य वाटप, वैद्यकिय निधी वाटप, व्यवसायाकरिता अर्थसहाय्य आदीसह उपक्रम मात्र येत्या ४ महिन्यात करण्यासाठी प्रशासनाकडुन शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

LEAVE A REPLY

*