जिल्ह्याने सहकाराची मुहूर्तमेढ रोवली

0

ना. विखे; कृषी पतसंस्थेची वार्षिक सभा शांततेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – ज्या ठिकाणी आर्थिक शिस्त पाळली जात नाही, त्या संस्था बंद पडतात. सहकार क्षेत्राला यामुळे काळिमा फासला जातो. ज्या ठिकाणी शिस्त पाळली जाते, त्या संस्था चांगल्या व आदर्श पद्धतीने सुरू आहेत. सहकाराचा पाया खर्‍या अर्थाने नगर जिल्ह्याने रोवला आहे. राज्याला सहकाराची ओळख जिल्ह्याने करून दिली. जिल्हा कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था 32 वर्षांपासून सुरू आहे. आर्थिक शिस्त पाळल्यामुळेच संस्था नावारूपाला आली आहे. पतसंस्थेमुळे अनेक छोट्या मोठ्या कुटुंबाला आधार मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
अहमदनगर जिल्हा कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सूर्यकांत गोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, शिरीष जाधव, लक्ष्मण भोकनळ, व्हा. चेअरमन बाबासाहेब कचरे, साहेबराव आघाव, सोमनाथ बाचकर, विठ्ठलराव गुंजाळ आदींसह सभासद उपस्थित होते.
विखे म्हणाले की, ठेवीदारांचा विश्‍वास कायम राहण्याकडे संस्थांनी लक्ष दिले पाहिजे. कारण सहकार हा विश्‍वासावर व आर्थिक शिस्तीवर चालतो. पतसंस्थांनी राजकारणापासून दूरच राहिले पाहिजे. संस्था या संचालक मंडळावर अवलंबून असतात. त्यासाठी हे संचालक मंडळ सक्षम असावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी गुणवंतांचा व सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, व्हा. चेअरमन बाबासाहेब कचरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. नितीन चौरे यांनी अहवाल वाचन केले.
दोन कोटी 36 लाख रुपयांचा नफा –
पतसंस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. पतसंस्थेचे सभासद भागभांडवल 18 कोटी 17 लाख 30 हजार 831 आहे. कायम ठेवी 95 लाख 83 हजार 641, तर सभासद मुदत ठेवी सात कोटी 88 लाख 87 हजार 420 रुपयांच्या असून, मागील आर्थिक वर्षात पतसंस्थेला दोन कोटी 36 लाख 70 हजार 833 रुपये नफा झाला आहे, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*