Monday, April 29, 2024
Homeनगर‘जिल्हा नियोजन’च्या तीन जागा बिनविरोध

‘जिल्हा नियोजन’च्या तीन जागा बिनविरोध

माघारीच्या दिवशी 18 जणांची माघार : दोन जागांसाठी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये लढत

अहमदनगर (प्रतिनिधी) – अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी (सोमवारी) 18 जणांनी माघार घेतल्याने जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित महापालिकेतील दोन जागांसाठी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत होत आहे. 24 डिसेंबरला ही निवडणूक होत असून 26 रोजी मतमोजणी होईल. नियोजन समितीच्या जागा तीन जागा बिनविरोध निघाल्याने आता प्रशासनाचा बराचसा ताण कमी झाला आहे.

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांसाठी निवडणूक विभागाने निवडणूक जाहीर केली होती. त्यात मनपा गटातून 3, जिल्हा परिषद गटातून 1 व नगरपालिका गटातून 1 अशा जागांचा समावेश होता. त्यातील जिल्हा परिषदेची जागा धनराज शिवाजीराव गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने आधीच बिनविरोध झाली आहे. उर्वरीत 4 जागांसाठी महानगरपालिकेतून 18, तर नगरपालिकेतून 6 अर्ज दाखल झाले होते.
नगरपालिका गटासाठी गणेश बाबासाहेब भोस, आसाराम गुलाब खेंडके, शहाजी तुकाराम खेतमाळीस, रमेश झुंबर लाढाणे (सर्व श्रीगोंदा, नगरपालिका), सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी (राहुरी) व मंदार पहाडे (कोपरगाव) या सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशी येथे इतर पाचजणांनी अर्ज माघारी घेतल्याने गणेश भोस बिनविरोध निवडले गेले.

महापालिका क्षेत्रातून तीन जागांची निवडणूक होत आहे. यात सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी मीना संजय चोपडा, ज्योती अमोल गाडे, संध्या बाबासाहेब पवार, रूपाली निखिल वारे, शेख रिजवाना फारूक, सुनीता संजय कोतकर, आशा शिवाजीराव कराळे, सोनाली अजय चितळे अशा 8 महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 7 जणींनी माघार घेतल्याने आशा कराळे बिनविरोध निवडल्या गेल्या.

सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष लोंढे, ज्ञानेश्वर येवले, सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, अनिल शिंदे, मनोज कोतकर अशा 6 जणांनी अर्ज केले. पैकी सोमवारी चौघांनी माघार घेतल्याने रिंगणात ज्ञानेश्वर येवले व अनिल शिंदे राहिले आहेत. शिवसेनेच्या या दोन्ही नगरसेवकांत या जागेसाठी लढत होत आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गातून अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, सुवर्णा जाधव व मनोज दुलम यांनी अर्ज दाखल केले. त्यातील घुले व दुलम यांनी माघार घेतल्याने आता राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुधे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होत आहे.

पसंतीक्रमानुसार मतदान
मनपाच्या दोन जागांसाठी 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील महासैनिक लॉन येथे मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी मतदानाची वेळ असून पसंतीक्रमानुसार मतदान होणार आहे. मनपाचे एकूण 67 नगरसेवक यासाठी मतदान करणार ्आहेत. 26 डिसेंबरला तेथेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या