Friday, April 26, 2024
Homeनगर‘जिल्हा नियोजन’ साठी धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज

‘जिल्हा नियोजन’ साठी धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज

‘मोठ्या निर्वाचन’च्या 3 जागांसाठी 18, लहान निर्वाचन क्षेत्रातील एका जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून (जिल्हा परिषद) रिक्त झालेल्या एका जागेवर राष्ट्रवादीचे धनराज गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आलेला आहे. यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर मोठ्या निर्वाचन क्षेत्रातून (महापालिका) मुदत संपलेल्या तीन जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून लहान निर्वाचन क्षेत्रातील एका जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. जिल्हा नियोजनच्या पोटनिवडणूक आणि रिक्त होणार्‍या जागांसाठी उमेदेवारी दाखल करण्याची मुदत गुरूवारी संपली.

- Advertisement -

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा नियोजनच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून त्यांच्या चिरंजीव धनराज गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. यामुळे धनराज गाडे यांची निवड बिनविरोध होणार आहे. बारागावनांदूरच्या जिल्हा परिषद गटातून धनराज गाडे यांची निवड बिनविरोध झाली होती. दरम्यान मनपाच्या क्षेत्रातून 3 जागांसाठी मोठ्या संख्येने 18 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

यात सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष लोंढे, ज्ञानेश्‍वर उर्फ अमोल येवले, सागर बोरूडे, सुनील त्रिंबके, अनिल शिंदे आणि मनोज कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर महिला सर्वसाधारण प्रवर्गातून मीना चोपडा, ज्योती गाडे (कर्डिले), संध्या पवार, रुपाली वारे, रिजवान शेख, सुनीता कोतकर, आशा कराळे, सोनाली चितळे यांचा समावेश आहे. याच क्षेत्रातील ओबीसी प्रवर्गातून अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, सुवर्णा जाधव आणि मनोज दुलम यांचा समावेश आहे. दाखल अर्जामुळे नियोजन समितीच्या मोठ्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.

लहान निर्वाचन क्षेत्रातून (नगरपालिका) सर्वसाधारण प्रवर्गासाठी सूर्यकांत भुजाडी (राहुरी), गणेश भोस (श्रीगोंदा), मंदार पहाडे (कोपरगाव), शहराजी खेतमाळीस (श्रीगोंदा), आसाराम खेंडके (श्रीगोंदा) आणि रमेश लाढणे (श्रीगोंदा) यांचे उमदेवारी अर्ज दाखल आहेत. एका जागेसाठी सहा अर्ज आल्याने याठिकाणी चुरसपूर्ण निवडणूक होणार आहे. यात विशेष करून एकट्या श्रीगोंदा तालुक्यातून चौघा उमेदवारांचा समावेश आहे. दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी होऊन शनिवारी 7 तारखेला अंतिम उमेदवारी यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीवर हकरती घेण्यासाठी मुदत असल्याने 13 तारखेला उमेदवारांची अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर 24 तारखेला जिल्हा नियोजनच्या रिक्त झालेल्या आणि मुदत संपलेल्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोग जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राबविणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रातून दाखल अर्ज पाहिल्यास यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नियोजन समितीत महाविकासआघाडीचा प्रयोग होणार नसल्याचे सध्या दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या