नगर जिल्हा सिंचनामध्ये पास, स्वच्छतेत नापास

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौर्‍यावर असलेल्या अंदाज समितीच्या पाहणीत नगर जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये पास तर, तिर्थक्षेत्र परिसरातील स्वच्छतेमध्ये नापास ठरला आहे. जिल्ह्यात पर्यटनाला चांगली चालना मिळू शकते, असे मत समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
बुधवारी नगर जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानसभेच्या सदस्यांच्या अंदाज समितीने नेवासा व कोपरगावमधील सहकारी कारखाने, दूध डेअरी, नगरमध्ये एमआयडीसी, उत्पादन शुल्क, वन विभाग, लघु पाटबंधारे, गौणखनिज आदी विविध ठिकाणी भेटी दिल्या.
दरम्यान पाहणीत विविध विषय हाताळले. आढळून आलेल्या त्रुटी व अनियमितता आदींचा अहवाल सरकारचे प्रधान सचिव यांना सादर करण्यात येणार आहे. दौर्‍यातील तपासणीची माहिती गोपनिय असल्याचे सुरवातीलाच सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे अधिक भाष्य न करणेच पसंत केले. दौर्‍या दरम्यान शेतकर्‍यांशी संवाद साधला. जिल्हात आल्यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून खातेनिहाय अधिक माहिती घेतली.
शिर्डी व शनिशिंगणापूर येथील स्वच्छता शेगावच्या तुलनेत खूप कमी असल्याचे सांगून समितीने स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात पर्यटन वाढीच्या दृष्टिने प्रयत्न केल्यास अनेक पर्यटनस्थळे आहेत.त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला चांगली चालना मिळू शकते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अंदाज समिती कार्यकारी प्रमुख उदय सामंत, नेवाशाचे आमदार बाळसाहेब मुरकुटे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार चरण वाघमारे, आमदार डॉ.शशिकांत खेडकर, आमदार वीरेंद्र जगताप व आमदार संजय कदम या विधान सभेच्या सदस्यांचा समावेश होता.
जिल्हा दौरा पूर्ण झाल्यावर बुधवारी सकाळी तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही समिती सदस्यांची एकत्रित बैठक पार पडली. दरम्यान समितीशी पत्रकारांनी संवाद साधला असता सदस्यांनी दौर्‍या दरम्यानची काही माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा आदींसह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.दरम्यान, राज्यात 26 समित्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून बाबनिहाय माहिती घेत आहे. समित्या विविध जिल्ह्यातील आमदारांचा समावेश आहे.

नेवासा, सुपा भुखंडामध्ये अनियमितता
नगर जिल्ह्यात नेवासा व सुपा एमआडीसी भूखंड वाटपात अनियमितता झाल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील इतर ठिकाणच्या तक्रारीकडे जातीने लक्ष घालणार असल्याचे आमदार उदय सामंत म्हणालेे.

विदर्भातील नेते अपयशी
जिल्ह्यात ठिबक सिंचनचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या तुलनेत विदर्भात सिंचन काम खूप कमी असून तत्कालीन सरकारच्या काळातील विदर्भातील नेते सिंचनचे काम करण्यात अपयशी ठरल्याची टीका आ. वीरेंद्र जगताप यांनी केली.

LEAVE A REPLY

*