Thursday, May 2, 2024
Homeनगरजिल्हा रूग्णालयात अपघाती मृतांचे शवविच्छेदन

जिल्हा रूग्णालयात अपघाती मृतांचे शवविच्छेदन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्च 2020 पासून जिल्हा रूग्णालयात करोना रूग्णांवर उपचार केले जात आहे. सर्वत्र करोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत अपघाती मृत्यू झालेल्या रूग्णांचे शवविच्छेदनाचे कामही जिल्हा रूग्णालयात सुरू आहे. आलेल्या मृतदेहाचा पंचनामा करणे, शवविच्छेदन करून घेणे, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणे ही सर्व प्रक्रीया पार पाडण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाबासाहेब आसाराम गुंजाळ ‘ऑन ड्युटी 24 तास’ सेवेत आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षापासून करोना संसर्गाने सर्वत्र हाहा:कार केला आहे. मार्च 2020 मध्ये आलेला करोना अजूनही आहे. आता तर दुसर्‍या लाटेने अनेकांना बाधित केले आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात प्रमाणापेक्षा जास्त करोना रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. सुमारे चारशे ते पाचशे रूग्णांवर त्याठिकाणी उपचार केले जात आहे. करोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर महापालिकेच्यावतीने नगरमध्येच अंत्यसंस्कार केले जातात. अशा या परिस्थितीत इतर अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाणही सुरूच आहे.

वाहनांचा अपघात, गळफास, विषारी औषध, जळीत, पाण्यात जीव देणे, खून अशा कारणांमुळे झालेल्या मृत्यूचे शवविच्छेदन करण्यात येते. यासाठी जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणल्यावर त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया करण्याची जबाबदारी पोलीस कर्मचारी गुंजाळ यांची आहे. सन 2020 मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या 270 मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तर जानेवारी ते एप्रिल 2021 या चार महिन्यात 77 मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदन विषयी गुंजाळ यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता ते म्हणाले, “करोनाच्या या काळात जिल्हा रूग्णालयात अपघाती मृत्यू झालेल्यांचे शविच्छेदन प्रक्रीया सुरूच आहे. मृतदेह आल्यावर त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. पंचनामा, शवविच्छेदन करून घेणे, तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणे ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. हे करत असताना करोनाची भिती आहेच, परंतु अजून करोनाची लागण झालेली नाही. तशी काळजी घेत आहे.” असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या