Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा विकास मंडळाच्या सभेवर वादाचे सावट

Share

मंडळाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप : प्राथमिक शिक्षकांचे राजकारण पुन्हा तापले

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 12 हजार प्राथमिक शिक्षकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची आज शनिवारी होणार्‍या सभेवर वादाचे सावट आहे. सभासद, विश्‍वस्तांना सभेचा अजेंडा न पाठविता, गुपचूप विकास मंडळाची सर्वसाधारण सभा घेण्याचा मंडळाच्या धुरिणांनी आखला असल्याचा आरोप शिक्षक नेत्यांनी केला आहे. यामुळे आजची सभा होणार की गुंडाळणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विकास मंडळाच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षकांचे राजकारण चांगलेच तापले आहे.

नगर शहरांमध्ये लाल टाकी परिसरामध्ये शिक्षक विकास मंडळाची 52 गुंठे जागा भरवस्तीत आहे. याठिकाणी पूर्वीची एक इमारत उभी असून विद्यमान विश्वस्त मंडळाने तेथे सुमारे 13 कोटी रुपये खर्चुन व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद असलेल्या शिक्षकांच्या कायम ठेवीमधून सर्व नियम धाब्यावर बसून सुमारे 82 लाख रुपये विकास मंडळाकडे वर्ग करण्यात आले. त्यातून सध्या विकास मंडळाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. निधीअभावी सध्या हे काम बंद आहे. बँकेच्या सत्ताधारी गुरुमाऊली मंडळांमध्ये रोहकले आणि तांबे असे दोन गट पडल्याने बँकेकडून मिळणारा सभासदांचा निधी बंद झाला. तसेच जिल्ह्यातील नगर आणि पारनेर वगळता इतर सर्व तालुक्यांचा यासाठी विरोध असल्याने सभासदांनी निधी वर्ग केला नाही.

जिल्हा उपनिबंधकांनी बँकेने सर्वसाधारण सभेत दोन वर्षापूर्वी केलेल्या याबाबतच्या ठरावाला मंजुरी देताना न्यायालयीन वाद उद्भवल्यास संचालक मंडळ जबाबदार राहील या अटीवर परवानगी दिल्याने बँकेचे संचालक ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे विकास मंडळाला या संकुलासाठी शिक्षक बँकेकडून निधी मिळाला नाही. बँकेच्या या वर्षीच्या वार्षिक सभेत सुद्धा याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता विकास मंडळाच्या विश्वस्त मंडळाने आज होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विकास मंडळाचे गाळे विकून निधी उभारण्याचा निर्णय घेतला असून संकुलातील गाळे विकून हे बांधकाम पूर्ण केले जाणार असल्याचे समजते.

मात्र, विकास मंडळाच्या या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. गाळे विकले गेल्यास शिक्षकांची हक्काची जागा ही खासगी लोकांच्या घशात जाणार आहे. या निर्णयाविरुद्ध जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे राहू शकते. एका व्यक्तीच्या हट्टापायी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराच्या मध्यवस्तीत असलेली ही शिक्षकांची जागा अशा पद्धतीने खाजगी बिल्डरला देण्यास विरोध असून ज्यांनी मोठ्या वल्गना करून हे काम सुरू केलं त्यांनी त्यासाठी आता निधी उभारावा. मात्र, या जागेचे खासगीकरण होऊ नये, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केली आहे. गुरुमाऊली मंडळाचे राजू साळवे, बाळासाहेब सरोदे, सलीमखान पठाण, नारायण पिसे व जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकांनी असे झाल्यास त्याविरोधात आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.

महामंडळ सभेच्या दिवशी सर्वसाधारण सभा
आजच्या विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल छापलेला नाही. तो वेबसाईटवर टाकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील किती शिक्षक वेबसाइट पाहतात याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा कोल्हापूरला असतांना त्याच दिवशी ही सभा ठेवण्यात आली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!