जिल्हा न्यायालयात बाल दिन साजरा

0

नय्यर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणतात. 20 वर्षापर्यंत अभ्यास केला, तर त्याचे पुढील आयुष्य सुखाचे व समृद्धीचे जाते. शिक्षकांमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचले आहे. अभ्यासात एकाग्रता असणे गरजेचे आहे. आपल्याला शिक्षण क्षेत्रातील काही समजत नसेल, तर शिक्षकाला जरूर विचारावे. आपल्या विचाराचा वापर योग्य कामासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने बाल दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात बाल दिन शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गुलाबपुष्प व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हुड, सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असो.चे अध्यक्ष सुरेश ठोकळ, बाळासाहेब पवार, कावेरी वाघ, स्वाती पवार, अतुल खांदवे, मुख्या. मंदा हांडे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड. अनुराधा येवले, अधीक्षक नगरकर, एस. व्ही. देशमुख, रतन येणारे, योगेश हळगांवकर आदी उपस्थित होते.
न्या. हुड म्हणाले की, उद्याचा भारत मुलांना घडवायचा आहे. तुम्ही उद्या न्यायाधीश म्हणून काम करताल. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व जागृत समाजाने मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे, असे सांगितले.
प्रास्ताविकात न्या. केस्तीकर म्हणाले की, न्यायालयाच्या मुख्य इमारतीत बाल दिन साजरा करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांना लहान मुले खूप आवडत. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त बाल दिन साजरा केला जात आहे. लहान मुले समाजाचे सैनिक आहेत. चांगला समाज घडविण्यासाठी या मुलांची भविष्यात गरज आहे. विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक मदत करण्याचे काम केले जाते. मुले आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून मदत करण्याचे काम विधी सेवा प्राधिकरण करते, असे सांगितले.
यावेळी दुर्गादेवी नय्यर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना खाऊ देण्यात आला. यावेळी मुलांना न्यायालयाबद्दल माहिती देऊन कामकाजाची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

*