Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘साईज्योतीत’ झेडपी कर्मचार्‍यांना अदाकारीची संधी देणार – शालिनीताई विखे

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – शासकीय सेवेत काम करताना प्रत्येकालाच ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशावेळी या रोजच्या धावपळीतून थोडासा विरंगुळा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठीच जिल्हा परिषदेने आपल्या कर्मचार्‍यांसाठी विशेष स्पर्धा घेऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून आता दरवर्षी होणार्‍या साईज्योती स्वयंसाहाय्यता यात्रा बचत गट प्रदर्शनावेळी बाहेरच्या कलावंतांना न बोलवता जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.

नगर जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण अध्यक्षा विखे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात 24 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेत नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, डॉ. सुनील तुंबारे, रमाकांत काठमोरे, डॉ. संदीप सांगळे, सुनीलकुमार राठी, डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात वासुदेव सोळंके यांनी केले.

सांस्कृतिक स्पर्धेत अजय पवार, सुनिल चांदणे, महेश भागवत, राहुल पालवे, तेजस्विनी शिंदे, रवींद्र ताजणे यांना वैयक्तिक तर एकता शिक्षक ग्रुप, रणरागिनी ग्रुप, मिशन कर्मा ग्रुप, कलाप्रेमी शिक्षक मंच यांना सांघिक पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. सेवाज्येष्ठतेनुसार निवड झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक पुरुष, स्थापत्य अभियांत्रिकी, वरिष्ठ साहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक या पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!