बाजार समित्यांच्या निवडणुकांवर आता जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण

0

शेतकरी नव्याने होणार मतदार : याद्या अद्ययावत करण्याची मोहीम सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) – सहकार खात्याच्या अखत्यारित असणार्‍या बाजार समित्यांच्या निवडणुका यापुढे सहकार प्राधिकरणामार्फत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात होणार आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र कृषिउत्पन्न बाजार समिती कायदा 1963 मध्ये बदल केला आहे.
त्यानुसार आता जिल्हा निवडणूक शाखा यापुढे सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका घेणार आहे. तसेच आता नव्याने शेतकरी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार होणार असून त्याबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.
यापूर्वी पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणार्‍या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात होत असत. पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असणार्‍या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधकांमार्फत होत होती.
मात्र, आता कायद्यात सुधारणा केल्याने सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली होणार आहेत. बाजार समिती निवडणुकीत यापूर्वी सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल-मापाडी व व्यापारी प्रवर्गांत निवडक मतदार होते. यामुळे त्यांची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी मोडण्यासाठी बाजार समितीत कृषी माल विक्रीस आणणार्‍या शेतकर्‍यालाही मतदार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कायद्यातील बदलामुळे आता शेतकर्‍यांनाही बाजार समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. यासाठी 18 वर्षे पूर्ण असणारा शेतकरी, पाच वर्षांत किमान तीन वेळा बाजार समितीत शेतमालाची विक्री केलेला शेतकरी आणि ज्यांच्या नावे 10 गुंठे जमीन आहे, अशा व्यक्तीला बाजार समितीचा मतदार करण्यात येणार आहे.
राज्य सकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सूचना आल्यानंतर गुरुवारी जिल्हा निवडणूक विभागाने प्रभारी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांना बोलावून नव्याने बाजार समित्यांच्या मतदारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक तालुकास्तरीय उपनिबंधकांमार्फत बाजार समितीनिहाय नवीन निकषानुसार शेतकर्‍यांची यादी तयार करून त्यांची मतदारयादी तयार करण्याची कार्यवाही करणार आहेत.
कायद्यातील सुधारणानुसार मतदारयाद्यांची कार्यवाही –
जिल्हा निवडणूक विभाग जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणूक यापुढे जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहे. महाराष्ट्र कृषिउत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या निवडणुका नसल्या तरी कायद्यातील सुधारणानुसार शेतकरी मतदारांच्या याद्या तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
– अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग
आता सर्व निवडणुका जिल्हाधिकार्‍यांमार्फत
जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांपैकी नगर जिल्ह्यात नगरची कृषिउत्पन्न बाजार समितीची उलाढाल पाच कोटींपेक्षा अधिक आहे. या बाजार समितीची निवडणूक जिल्हा निवडणूक विभाग घेत असे. उर्वरित 13 बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधकांना घ्याव्या लागत. आता सर्व निवडणुका जिल्हाधिकार्‍यांमार्फत घेण्यात येणार आहेत.
सन 2018 मध्ये एकही निवडणूक नाही
2013-2015 या दोन वर्षांत जिल्ह्यातील बहूतांशी बाजार समित्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. यामुळे पुढील 2018 मध्ये एकाही बाजार समितीची निवडणूक नाही. मात्र, 2019 पासून बाजार समित्यांच्या नव्या संचालक मंडळासाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. यामुळे आतापासून नव्याने शेतकर्‍यांची मतदारयादी तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्राधिकरणाचे काम सुधारण्याची मागणी
बाजार समित्यांच्या निवडणुकांची जबाबदारी महसूल खात्याच्या गळ्यात आली असली तरी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कारभारावर महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या नाराजी आहे. यामुळे भविष्यात निवडणुकांवर महसूल विभागाचे कर्मचारी बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. यामुळे प्राधिकरणाने आपल्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*