1200 शेतकर्‍यांनी घेतली उचल

0
जिल्हा सहकारी बँकेची माहिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- खरीप पिकांसाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी शासनाने कर्जमाफीपोटी देऊ केलेल्या दहा हजार रुपये मदतीचा लाभ जिल्ह्यातील 1 हजार 200 शेतकर्‍यांनी आतापर्यंत घेतला आहे. एप्रिल 2012 नंतर थकबाकीत असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याने त्यापूर्वीच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना देण्यात आलेली दहा हजार रुपयांची हमी शासनाने घेतली असल्याने जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुख्य कर्जमाफीसंदर्भात शासनाच्या वित्त विभागाच्या स्पष्ट आदेशाची प्रतीक्षा बँकांना आहे.

शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास काही कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत शेतकर्‍यांची अडचण होऊ नये म्हणून शासनाने बी-बियाणे व खतांसह अन्य अनुषंगिक खर्चासाठी 10 हजार रुपये शेतकर्‍यांना देण्याचे आदेश बँकांना दिले होते.

मात्र, नंतरच्या कर्जमाफी आदेशानुसार 1 एप्रिल 2012 नंतर थकीत असलेल्या शेतकर्‍यांनाच दीड लाख कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याने 31 मार्च 2012 पर्यंत थकीत असलेल्या शेतकर्‍यांपैकी कोणी 10 हजाराची मागणी केली व नंतर मुख्य कर्जमाफीच्या निकषात ते अपात्र ठरले तर त्यांना दिलेल्या 10 हजार रुपयांच्या वसुलीचा प्रश्न बँकांसमोर होता.

मात्र, शासनाने नुकताच 1 जुलैला यासंदर्भातील आदेश जारी करून 1 एप्रिल 2012 नंतर पीक व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्यांना 10 हजाराचा लाभ द्यावा तसेच या तारखेआधीच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना असे पैसे दिल्यानंतर पुढे ते कर्जमाफी योजनेत अपात्र ठरले तरी त्यांच्या या 10 हजाराच्या रकमेला शासनाची हमी असेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बँकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, असे दहा हजार रुपये मिळावेत म्हणून शेतकर्‍यांकडून फारसा प्रतिसाद नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांनी असे दहा हजार रुपयांची मागणी करणारे अर्ज संकलित करून नियमात असलेले मंजूर केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 200 शेतकर्‍यांनी अशी प्रत्येकी 10 हजाराची रक्कम घेतली असल्याची माहिती जिल्हा बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

शासनाकडून दररोज नवनवीन माहिती घेण्यात येत आहे. आता सरकारने 2012 ऐवजी 2009 पासून शेतकर्‍यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या शेतकर्‍यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर लगेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तात्काळ कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती पाठवा असा फतवा काढण्यात येत आहे. बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि तालुका आणि गाव पातळीवर सोसायट्यांचे सचिव माहिती काढण्यात व्यस्त आहेत. आता 2009 नूसार नव्याने शेतकर्‍यांची माहिती काढावी लागणार असून यासाठी पुन्हा 8 ते दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

जिल्हा बँकेने सोमवारपर्यंत जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांची यादी जाहीर करावी, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. ही माहिती सोमवारी जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील शिवसैनिक जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याची माहिती सेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांनी गुरूवारी दिली. आंदोलनाचे नेतृत्व दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*