जिल्हा बँकेच्या सलाबतपूर शाखेवर दरोड्याचा प्रयत्न

0

खिडकीचे गज कापून प्रवेश; सीसीटीव्हीचे कनेक्शन कापले; सायरन वाजताच ठोकली धूम

सलाबतपूर (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. मात्र बँकेचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकलीे व मोठा अनर्थ टळला. मात्र बँकेच्या परिसरातील व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, गटार अमावास्येच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अहमदनगर जिल्हा बँकेच्या सलाबतपूर येथील शाखेवर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मध्यरात्री वीज गायब असल्याने संधी साधत चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. आत जाताच सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे कनेक्शन कापून टाकले व सायरनचेही कनेक्शन कापण्याचा प्रयत्न केला मात्र सायरनचे कनेक्शन कट न होता सायरन जोराने वाजू लागला.

त्यामुळे तेथेच बाहेर झोपलेल्या रखवालदाराला जाग आली व त्याने चोहोबाजूंनी फिरुन पाहिले मात्र वीज गायब असल्याने सर्वत्र अंधार होता. खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. सायरन बंद न झाल्याने चोरट्यांनीही अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. मात्र सायरनच्या आवाजाने गोंधळलेल्या चोरट्यांनी चोरीसाठी आणलेले साहित्य, पिशव्या तेथेच ठेवून गेले.

मध्यरात्रीच रखवालदाराने शाखाधिकारी श्री. देशमुख यांना बँकेचा सायरन वाजत असल्याबाबत फोनवरुन माहिती दिली. लगेच शाखाधिकारी तिथे येवून बँकेची  पाहणी केली असता खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे लक्षात आले. मात्र बँकेची तिजोरी व इतर वस्तूही सुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सायरन वाजल्यामुळे बँकेतील जवळपास 4 लाख रुपयांची रोकड वाचली. या शाखेत अलिकडेच सीसीटीव्ही यंत्रणा बसविलेली असून ही यंत्रणा कार्यरत होती की नाही हे समजू शकले नाही.

घटनेनंतर सकाळी पोलिसांना पाचारण करण्यात आलेण श्‍वानपथकही बोलावण्यात आले होते. मात्र श्‍वानाने केवळ गोगलगाव रस्त्याच्या दिशेने 100 फुटापर्यंतच माग दाखवला. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शैलेंद्र ससाणे, कॉन्स्टेबल राहुल यादव, पोलीस नाईक पी. एस. मोढवे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनीही घटनेची माहिती घेतली. सलाबतपूर गावात सततच रात्रीचे भारनियमन चालू असते. रात्री विज गायब झाली तर पुन्हा सुरळीत करायला लाईनमन नसतो. बहुतेकवेळा अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यामुळे गावात, वाड्यावस्त्यांवर शेळीचोरी व इतरही छोट्या-मोठ्या चोर्‍या होतात. वीज वितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल यावेळी अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*