जिल्हा बँकेच्या कार्यप्रणालीबाबत आक्षेप

0

शेतकरी मराठा महासंघ : सहकार सभागृहाच्या दुरूस्तीचे स्पेशल ऑडीटची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचारी अधिकारी भरतीबाबत  आरोप होत असताना बँकेच्या कार्यप्रणालीवरच शेतकरी मराठा महासंघाकडून गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
बँक प्रशासनाने नुकताच सहकार सभागृहाचे नूतनीकरण केलेले असून यावर झालेल्या खर्चाचे स्पेशल ऑडीट करण्यात यावे, करार पध्दतीने कर्मचारी नेमतांना बँक प्रशासनाने त्याची जाहीरात न देता परस्पर एका व्यक्तीला याचा ठेका कसा दिला, यासह अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. या सर्वबाबींसंदर्भात सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या भरतीबाबत उमदेवारांसह शेतकरी मराठा महासंघाने सहकार आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. सहकार आयुक्तांनी विभागीय सहनिबंधक नाशिक यांना या भरतीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, ज्या अधिकार्‍याकडे चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधीत अधिकारी वाद्गस्त असल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केला आहे.
यासह बँकेची भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मोबाईल कॉल तपासण्यात यावे, 1991 पासून ग्रेडेशन दिलेल्या कर्मचार्‍यांची जात पडताळणी दाखले बँक प्रशासनाने घेतलेले आहे की नाही याचा खुलासा व्हावा, सेवा ज्येष्ठने ग्रेडेशन देण्याऐवजी मर्जीतील कर्मचार्‍यांना ग्रेड देण्यात आलेली आहे. बँकेत अनुकंपा भरती करण्यात आलेली नाही.
मित्रा समितीनूसार बँकेच्या अधिकार्‍यांची शैक्षणिक अर्हता न पाहता अधिकार्‍यांना नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. 2004-05 चा सुपकर यांचा लेखा परिक्षणाचा अहवालाची प्रत मिळावी, नायबर कंपनी राबलेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, भरतीसाठी उमेदवारांकडून जमा केलेल्या प्रत्येकी 750 रुपयांचा हिशोब मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
भरतीमध्ये नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये पदाधिकार्‍यांच्या तालुक्यातील उमदेवारांची संख्या अधिक असल्याचा संशय मराठा शेतकरी महासंघाचे अध्यक्ष दहातोंडे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे जिल्हा बँक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

 

LEAVE A REPLY

*