सरकारच्या मार्गदर्शनानंतर शेतकर्‍यांना 10 हजार!

0

 जिल्हा बँकेच्या नजरा सहकार खात्याकडे,
उपनिबंधकांनी पाठविले पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्य सरकारने खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांप्रमाणे उचल देण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले आहेत. मात्र, या उचलला बँकांनी किती व्याजदराची आकारणी करावी, याबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत संभ्रम दूर झालेला नव्हता. सरकारच्या सहकार विभागाकडून मार्गदर्शन आल्यानंतरच शेतकर्‍यांना दहा हजारांची उचल देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँक प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, सरकारकडून व्याजदर आकारणीसाठी मार्गदर्शन करावे, राज्य सरकारने कर्जाची रक्कम थकीत असणार्‍या शेतकर्‍यांना दहा हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिलेले असले तरी थकीत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना दहा हजारांची उचल देण्यापूर्वी जिल्हा बँकेला नाबार्ड आणि रिर्जव्ह बँकेची परवानगी आवश्यक राहणार आहे. याबाबत बँकेकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र देण्यात आले असून त्यावर मार्गदर्शन मागवले आहे.
जिल्हा बँकेकडून आलेले पत्र राज्य सरकारच्या सहकार विभागाला पाठवण्यात आले आहे. यात व्याजदर आकारणी आणि थकबाकीदारांना नव्याने नव्याने कर्ज दतांना नाबार्ड आणि रिर्जव्ह बँकेची परवागी घेणे आवश्यक आहे का? याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात सरकारकडून यासंदर्भात खुलासा आल्यानंतर शेतकर्‍यांना दहा हजारांची मदत करता येईल, अशी शक्यता बँकेकडून वर्तण्यात आली. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना दहा हजारांची आर्थिक मदत देण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत असल्याने तोपर्यंत सरकार मदतीच्या निकष ठरवून ते जिल्हा बँकेला पाठवणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
………….
चाळणीतून निम्मे गळणार :
जिल्ह्यात बँकेच्या अंदाजानूसार साधारण 95 हजार ते 1 लाख शेतकरी राज्य सरकारच्या कर्जमाफीस पात्र आहेत. या शेतकर्‍यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहेत. मात्र, सरकारकडून लावण्यात येणार्‍या नियमांच्या चाळणीत राजकारणी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ठेकेदार, सरकारी नोकरदार आणि त्यांचे नातेवाईक, शिक्षक, आयकर भरणारे यांना या कर्जमाफीची सवलतीचा फायदा मिळणार नाही. यामुळे मदतीस पात्र असणारे निम्म्याहून अधिक शेतकरी सभासद सरकारच्या योजनेला मुकणार असल्याची भिती यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
…………..

LEAVE A REPLY

*